विष्णूदासाची कविता
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी
( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥
यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥
केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥
वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥
झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥
गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥
जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥
आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥
शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.