https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-5 Sant Namdev Abhang-5

Sant Namdev Abhang-5

संत नामदेवांचे अभंग-5

 

याधीच्या लेखात आपण संत नामदेवांनी ‘नामा’ची महती हर प्रकारे सांगितली आहे, त्यासंबंधात काही अभंग पाहिले. नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

 

नामाचे महत्त्व किती सांगू आणि किती नको असे नामदेवाला होऊन जाते, आणि पुढील काही अभंगात, नामदेव, आपल्या अभंगांतून नामाचे सामर्थ्य सांगतात.

वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव होसी अरे जना

गायन करिसी तरी गुणिजन होसी | परी वैष्णव होसी अरे जना

पुराण सांगसी तरी पुराणिक चि होसी | परी वैष्णव होसी अरे जना

कर्म आचरसी तरी कर्मठ चि होसी परी वैष्णव होसी अरे जना

यज्ञ करिसी तरी याज्ञिक चि होसी परी वैष्णव होसी अरे जना

नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना

 

वेद, पुराण, यज्ञ, गायन, निरनिराळ्या प्रकारचे कर्म केले, तर त्या त्या क्षेत्रात मनुष्य पारंगत होईल, पण तो ’वैष्णव’ होईल याची खात्री नाही. पण केशवाचे, विष्णूचे नांव घेतल्यास मनुष्य तद्रूपच होऊन जातो असे नामदेव महाराज सांगतात.

काही काही अभंग हे खूपच विशेष आहेत. म्हणून ते मुद्दाम वेगळ्या रंगात  दिले आहेत. त्यातलाच हा एक अभंग. एका विशिष्ट वयानंतर सर्वांनी लक्षात घेण्यासारखा हा उपदेश आहे.

सर्वांगसाजिरीं आहेत इंद्रियें तंव सावध होयें हरिकथे

कीर्तन नर्तन वाचे जनार्दन | पवसी पतन येरझारी

पूर्ण मनोरथ घडती एका नामें दाटेल सप्रेमें जीवहेतु

नामा म्हणे विलास करीं तूं आणिक | सर्वी सर्व एक नाम असे

 

या शरीराचा, त्याच्या इंद्रियांचा, काही भरवसा नाही. जोपर्यंत सगळी इंद्रियें शाबूत आहेत, सुस्थितीत आहेत, तोपर्यंतच हरिकथेसाठी सावध व्हायला पाहिजे. नसता मुखाने ‘राम राम’ च्या ऐवजी ‘लाम लाम’ असे येऊन, तो राम ‘लांब’ जाण्याची वेळ यायची!

नामाच्या पुण्याचे- वक्ता आणि श्रोता दोघेही वाटेकरी आहेत. दोघांनाही त्याचा फायदा होतो. अर्थात श्रोता ‘सावधान’ असला पाहिजे आणि वक्ता ‘प्रेमळ’ असला पाहिजे.

जें जें पुण्य जोडे हरिनामगजरीं | त्याचे वांटेकरी दोघे जण

सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता जो भजे अनंता निर्विकल्प

तेणें सुखें सुख चढे नित्य नवें जाणती अनुभवें संतजन

नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं | संडिती वारी पंढरीची

नाम कसेही घ्यावे, कीर्तनाचे रंगी ‘नाचता’ येत नसले, तरी वेडे वाकडे नाचावे, असा एक फारच बहारदार अभंग आहे-

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी | म्हणें वाचा उदंडीं रामनाम

श्रीहरीसारिखा गोसावी पैं चांगु फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां

चुकलें पाडस कुरंगिणी गिंवसी | तैसा हृषीकेशी न्याहाळी तूंतें

धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें तैसा वोरसे तूंतें केशिराज

नामा म्हणे इतुकें करवे नि्दैवा | तरी वाचेसीं केशवा उच्चारी पां

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां- वेड्या बागड्या सारखे, कसेही वेडे वाकडे तोंड करून गायले आणि नाचले, तर हृषीकेशी माऊली ही आपल्या लेकराकडे कौतुकानेच पाहते. जणू चुकलेले पाडस हरिणीला सापडले तर तिला जसा आनंद होईल, तसा आनंद देवाला, भक्ताला पाहून होतो- वासराला पाहून धेनू हंबरते- तिला पान्हा फुटतो- अगदी तशीच, देवाची आपल्या लेकरांप्रति प्रीती असते. नामदेव महाराज म्हणतात, अरे निर्दैवा! इतकेही करणे जमत नसेल, तर वाचेने नुसते केशव केशव म्हण.

नामदेव महाराज लहानपणा पासूनच विठ्ठलाचे लाडके होते, त्यांच्या लहानपणी त्यांनी विठ्ठलाला, हट्ट करून नैवेद्य खायला लावला होता. मोठेपणीही, जेंव्हा मुक्ताईने ‘हे मडके जरा कच्चे आहे’ असे म्हटले, तेंव्हा ते रुसून विठ्ठल माऊलीकडेच गाऱ्हाणे घेऊन गेले होते. अशा कितीतरी कथा, नामदेवांच्या निरागसपणाच्या आपल्याला ठाऊक आहेत. त्याच आधारावर ते सांगतात, की देवाला आपल्या भक्ताचे तसेच कौतुक असते, जसे एखाद्या मातेला, आपल्या बालकाचे.

नामात तल्लीन झाल्यानंतर स्वतःच्या स्त्री पुत्राचीही आठवण त्यांना राहिली नाही अशी त्यांची स्थिति त्यांनी वर्णन केली आहे-

हातीं वीणा मुखीं हरि| गाये राउळाभीतरीं

अन्नउदक सोडिलें | ध्यान देवाचें लागलें

स्त्री पुत्र बाप माय यांचा आठव होय

देहभाव विसरला | छंद हरीचा लागला

नामा म्हणे हें चि देई। तुझे पाय माझी डोई

नामाच्या तल्लीनतेमध्ये देहभानच राहत नाही- मग देह राहिला काय किंवा गेला काय- कोण फिकीर करते? म्हणून नामदेव महाराज म्हणतात- ‘काळ देहासि आला खाऊ- आम्ही आनंदे नाचू गाऊ’

काळ देहासी आला खाऊं | आम्ही आनंदें नाचूं गाऊं

कोणे वेळेस काय बा गाणें | हें तों भगवंता मी नेणें

टाळ मृदंग दक्षिणेकडे | माझें गाणें पश्‍चिमेकडे

नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी द्यावी सेवा

पूर्ण कृपा केली देवा | दिधली पादपदूम-सेवा

पापें पळालीं पळालीं | नामकीर्तन-कल्लोळीं

रंगमाळा जागरणीं | तेथे मुक्ति वाहती पाणी

जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा

नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी

नामदेव स्वतःला ‘संत’ म्हणवत नाहीत- “जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा” असे म्हणतात आणि “नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी” असे म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतात- देवाच्या भक्तांची हीच तर ओळख असते!

संत नामदेवांच्या निवडक अभंगांचा हा पाचवा भाग, नामाची महति आणि सामर्थ्य सांगणारा होता. पुढील भागात, नामदेव महाराज संतांचा महिमा सांगतात त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

माधव भोपे

 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here