विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात. विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी ७ अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.
विष्णूदासाची कविता
Renuka Ashtak-8
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं
( वृत्तः भुजंगप्रयात )
तुझीं आसती कोटि ब्रह्मांड बाळें ।
तसें घेइ पोटीं मलाही दयाळे ॥
नको दुसर्या गर्भवासासि धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥१॥
तुझ्या वांचुनी होतसे जीव कष्टी ।
तुला एकदां पाहुं दे माय दृष्टीं ॥
नको प्रीतिचा लाविला कोंभ मोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥२॥
समर्थागृहीं इष्ट शिष्टाधिकारी ।
तया पंगतीं बैसलीया भिकारी ॥
नको अन्नपात्रामधें भिन्न वाढूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥३॥
जपोनी तुझें नांव मोठें प्रतापी ।
बुडाला जगीं कोणता सांग पापी ॥
नको येकट्याला मला खालिं धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥४॥
तुझ्या भेटिची लागली आस मोठी ।
परी दुष्ट येती आडवे शत्रु कोटी ॥
नको भीड त्यांची धरुं माझि तोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥५॥
तुझा पुत्र हा वाटल्या तारणें हो ।
तुझा शत्रु हा वाटल्या मारणें हो ॥
नको तीसरा याविणें खेळ मांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥६॥
पुरे झाली ही नांवनीशी कवीता ।
रसाभास होतो, बहु शीकवीता ॥
मना माउलीला नको व्यर्थ भांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥७॥
अम्ही लेकरांनीं रडावें रुसावें ।
अमा देउनी त्वांचि डोळे पुसावे ॥
नको कायदा हा तुझा तूंचि फाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥८॥
गडे ! येउनी तूं कडे घे मुक्यानें ।
करी शांत आलिंगुनीया मुक्यानें ।
नको विष्णुदासाप्रती तूं विभांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥९॥
**************************************
या आधील पदांची लिंक खाली दिलेली आहे.
Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1
Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2
Renuka Ashtak-3 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3
Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4
Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5
Renuka Ashtak-6 तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6
Renuka Ashtak-7 अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.