https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-7 Sant Namdev Abhang-7

sant namdev

Sant Namdev Abhang-7

संत नामदेवांचे अभंग-7

यापूर्वीच्या सहाव्या भागात संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांतून सांगितलेली संताची महति आपण पाहिली.

संत हे सर्वसामान्य जनांसाठी, अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगत असतात. जशी माऊली आपल्या लेकरांना जेवू घालतांना त्यांच्या तोंडात मावतील असेच छोटे छोटे, चिमणे घास करून भरवते, आणि जे काही दूध भाकरी किंवा भात वगैरे असेल, ते अगदी बारीक कुस्करून त्या मुलाला सुपाच्य करून देते, तद्वतच संत हे सर्वसामान्य जनांना वेदांतातील अवघड ज्ञान, सोपे करून सांगत असतात.

खालील अभंग हा ‘खेळिया’ म्हणून ओळखला जातो. त्याच्यात उपनिषदांतील ‘एकोहं बहुस्यामि’ असे परब्रह्माच्या ठिकाणी झालेले स्फुरण, आणि त्यासाठी ‘अरुप’ असलेले ते, नांव रूपाला आले, आणि कसा खेळ करू लागले, याचे मनोरंजक वर्णन आहे. ‘स्वतःच स्वतःला व्यायले’ ही कल्पना किती सार्थ आहे!

आणि ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते बारा वर्ष लपाले रे.. यातून शुकदेवांची गोष्ट सांगितली आहे. शुकदेव हे पोपटाच्या स्वरूपात भगवान शिवांच्या कोपापासून वाचण्यासाठी त्रिभुवनात फिरत शेवटी महर्षि व्यासांच्या आश्रमात आले आणि त्यांच्या पत्नीच्या मुखात प्रवेश करून लपून बसले. महर्षि व्यासांनी त्यांना शिवाच्या कोपापासून वाचविले, आणि शुकदेव व्यासांच्या पत्नीच्या गर्भात शिरले. बाहेरच्या जगात मायेचा संपर्क येईल म्हणून ते १२ वर्ष बाहेरच आले नाही. शेवटी महर्षि व्यासांच्या सांगण्यावरून ते बारा वर्षांनी भीत भीत बाहेर आले, तेंव्हा त्यांची अवस्था बारा वर्षाची बालकाची होती. जन्मल्याबरोबर ते नग्न अवस्थेतच, जंगलाच्या दिशेने पळाले, अशी कथा आहे.

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण- चार मुखें असलेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे नारद यांच्याबद्दलही विनोदाने ‘ कुचाळी करुनी पोरे भांडवी आपण राहे वेगळा रे’ असे वर्णन केले आहे! अशाच मिस्किल शैलीत हनुमानाचे आणि श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे. आणि शेवटी हा सर्व एक खेळ आहे हे सत्य सांगितले आहे.

नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें जीवशिव नांव पावलें रे

आपली चि आवडी रुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें | जाणूनि खेळ खेळें रे

ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले | ते बारा वर्षे लपालें रे

कांपत कांपत बाहेरी आलें | तें नागवें चि पळुनी गेलें रे

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण | तो खेळियांमाजीं आगळा रे

कुचाली करूने पोरें भांडवी | आपण राहे वेगळा रे

खेळ खेळे परी डायीं सांपडे तो एक खेळिया शाहणा रे

खेळियांमाजीं हनुम्या शाहणा | पडे कामव्यसनीं रे

काम चि नाहीं तेथें क्रोध चि कैंचा | तेथें कैचे भांडण रे

रामा गड्याची आवडी मोठी | म्हणूनि लंके पेणें रे

यादवांचा पोर एक गोप्या भला | तो बहुत चि खेळ खेळला रे

लहान थोर अवघीं मारिलीं | खेळ चि मोडूनि गेला रे

ऐसे खेळिये कोट्यानुकोटी | गणित नाहीं त्यासी रे

विष्णुदास नामा म्हणे वडील हो | पहा देहीं शोधूनि रे

खालील अभंगात, अद्वैत अनुभव आल्यानंतर सुख दुःखाची कोण पर्वा करते, सापाने त्वचा (कात) टाकली आणि बिळात गेला की मग बाहेर राहिलेल्या त्या निर्जीव त्वचेला कोण सांभाळते, अशी अनेक उदाहरणें देऊन, अद्वैत अनुभव सोपा करून सांगितला आहे.

सुखदुःखें दोन्ही आम्हांसी सारिखीं | प्रतीति पारखी मना आली

अंतर्बाह्य एक ब्रह्म चि कोंदलें | दुजेपण गेलें निपटूनि

त्वचा टाकूनियां सर्प गेला बिळीं | मग ते सांभाळी कोण सांगा

ओघ सांडूनिया गंगा सिंधू ठाये | विसरली धाये खळाळाची

नामा म्हणे रात्र जैसी कां पाहिठी | धारणा ते झाली तैसें आम्हां

ब्रम्हानंदाची प्राप्ती झाल्यानंतर इतर गोष्टींची कोण पर्वा करते- याची अजून काही उदाहरणे देतात

निद्रिस्ताचे सेजे साप कां उर्वशी पाहों विषयासी तैसे आम्ही

ऐसी कृपा केली माझ्या केशिराजें प्रतीतीचें भोजें एकसरा

शेण आणि सोनें भासतें समान | रत्न का पाषाण एकरूप

पाया लागो स्वर्ग वरी पडों वाघ | आत्मस्थितीभंग कदा नोहे

नामा म्हणे कोणी निंदा अथवा वंदा झालों ब्रह्मानंदाकार आम्ही

संत मंडळींचे उपकार मानतांना, आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा असे म्हणून पुढील अभंगात संतांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां माझिया सकळां हरीच्या दासा

कल्पनेची बाधा हो कोणे काळीं | ही संतमंडळी सुखी असो

अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी

नामा म्हणे तयां असावें कल्याण | ज्यां मुखीं निधान पांडुरंग

नंतर महाभारतातील एक कथा सांगून, ब्रह्मनिष्ठ वैराग्यशील पुरुषाचे महत्त्व सांगतात.

पत्रावळी काढी वैकुंठनायक | धांवूनियां शुक आला तेथें

दाटी पाहुनी द्वारीं मानसीं विचारी | जावया भीतरी काय काज

वाहे हा प्रसाद स्वहस्तें अनंत | वेंचोनियां शीत घाली मुखीं

घंटानाद वाजे लक्षद्विजपंकिति | अक्षयीं वाजती वेळोवेळां

ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव पुसे धर्मराव देवाजीसी

सांगतसे खूण वैकुंठनायक | ब्रह्मनिष्ठ एक आला येथें

तेथूनि उठले धर्म नारायण | बाहेरी येऊन पाहताती

शुकाचिये मिषें व्यासाचा नंदन | सांगतसे खूण जगदीश

धरूनियां करीं नेला तो भीतरीं | नामा म्हणे करी पूजा त्याची

खालील एका अभंगात ज्ञानेश्वरीबद्दल सुप्रसिद्ध ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हा चरण आला आहे. ज्ञानदेव हे नामदेवांचे समकालीन होते. पण त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच संजीवन समाधी घेतली. त्यांचे वर्णन करतांना ‘ज्ञानराज माझी योग्यांची माऊली’ असे म्हणून, ज्ञानेश्वरीचे महत्त्व वर्णन करतांना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी असे सांगतात. आणि हे अगदी खरेच आहे. ज्ञानेश्वरी हा युगानुयुगांत एखादाच होणारा असा ग्रंथ आहे. आणि तो नुसताच ‘वाचण्याचा’ नाही, तर ‘अनुभवण्याचा’ आहे, हे ज्ञानेश्वरीचे जाणकार चांगलेच जाणतात.

त्यापुढे जाऊन, नामदेव महाराज आपल्या गुरूंचे-विसोबा खेचरांचे ऋण व्यक्त करतांना म्हणतात- डोळियाचा डोळा उघडला ज्याने- अशा सद्गुरूंचे पाय मी विसंबणार नाही.

ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणें निगमवल्ली प्रगट केली

अध्यात्मविद्येचें दाविलेसे रूप | चैतन्याचा दीप उजळिला

छप्पन्नभाषेचा केलासे गौरव | भवार्णवीं नाव उभारली

श्रवणाचे मिषें बैसावें येऊनि | साम्राज्यभुवनीं सुखी नांदे

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओंवी अनुभवावी

सद्गुरूसारिखा सोइरा जिवलग | तोडिला उद्वे संसारींचा

काय उतराई होऊं कवण्या गुणें जन्मा नाहीं येणें ऐसें केलें

माझें सुख मज दाखविले डोळां | दिधली प्रेमकळा नाममुद्रा

डोळियाचा डोळा उघडिला जेणें लेवविले लेणें आनंदाचे

नामा म्हणे निकी सांपडली सोय | विसंबे पाय खेचराचे

 

पुढील भागात संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहूयात.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-6 Sant Namdev Abhang-6

sant namdev

Sant Namdev Abhang-6

संत नामदेवांचे अभंग-6

तेराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेले थोर संत नामदेव यांच्या अभंगांविषयी आपण चर्चा करीत आहोत. यापूर्वीच्या चौथ्या आणि पाचव्या भागात भगवंताच्या नामाचे महत्त्व आणि नामाचे सामर्थ्य याबाबत नामदेवांचे अभंग आपण पाहिले.

नामाची गोडी लागायला, सत् संगत- आणि संतांची संगत पाहिजे. संतांचा महिमा सांगणारी काही भजने आपण पाहूयात.

संतपायीं माया धरितां सद्भावें तेणें भेटे देव पोआप

म्हणूनि संतां अखंड भजावें | तेणें भेटे देव पोआप

साधूपाशीं देव कामधंदा करी | पीतांबर धरी वरी छाया

नामा म्हणे देव इच्छी संतसंग | आम्हां जिवलग जन्मोजन्मी

ज्ञानेविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत | वेद बोले हात उभारोनि

तरी तें चि ज्ञान जाणायालागूनि | संतां वोळगोनि वश्य कीजे

प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला | पाहिजे साक्षिला सद्गुरु तो

नामा म्हणे सेवा घडावी संतांची | व्हावी कृपा त्यांची तें चि ज्ञान

संतांची महति सांगतांना नामदेव महाराज म्हणतात- ‘साधूपाशी देव कामधंदा करी’- आणि अनेक संतांच्या गोष्टींमधून आपल्याला हे दिसते- देव जनाबाईला जात्यावर धान्य दळू लागले, काम करू लागले, संत कबीराचे शेले विणू लागले, चोखोबासोबत गुरे ओढू लागले अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. संतांनी आपला भार पूर्ण देवावर घातलेला असतो. त्यामुळे मग त्यांची पूर्ण जबाबदारी तो घेतो.  

परिसाचेनि संगें लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे

कीटकी ध्यातां भृंग झाली तो चि वर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे

अग्नीस मिळें तें ये परतोन तैसा भेटे नारायण संतसंगे

नामा म्हणे केशवा मज देई संतसंग आणिक कांहीं तुज मागें बापा

 

जसे परिसाचे स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण होते, तसेच सामान्य जनांना संतांच्या संगतीने नारायणाची भेट होते, म्हणून नामदेव महाराज म्हणतात हे देवा- मला फक्त संत संगत दे- आणखी काहीही नको.

कडू वृंदावन साखरें घोळिलें | तरी काय गेलें कडूपण

तैसा तो अधम करी तीर्थाटण | नोहे त्याचें मन निर्मळत्व

बचनागरवा दुग्धी शिजविला | तरी काय गेला त्याचा गुण

नामा म्हणे संतसज्जनसंगती | ऐशास हि गति काळांतरीं

kadu vrundavan

कडू वृंदावन नांवाचे फळ असते, जे आयुर्वेदात काही रोगांसाठी औषधीच्या रूपात वापरतात. ते खूप कडू असते. साखरेत घोळले तरी त्याचे कडूपण जात नाही. अधम माणसाने तीर्थाटन केले तरी त्याचे मन निर्मळ होत नाही. बचनाग- हेही एक प्रकारचे विष आहे-ते दुधात शिजविले तरी त्याचा विषारी गुण काही जात नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, इतके कडू, किंवा अधम असले तरी, अशा लोकांचीही बुद्धि संतांच्या संगतीने पालटू शकते, आणि कालांतराने त्यांनाही योग्य गती मिळू शकते.

धिग धिग तो ग्राम धिग धिग तो आश्रम | संतसमागम नाहीं जेथें

धिग धिग ते संपत्ति धिग धिग ते संतति | भजन सर्वांभूती नाहीं जेथें

धिग तो आचार धिग तो विचार वाचें सर्वेश्‍वर नाहीं जेथें

धिग तें गाणें धिग तें पढणें | विठ्ठठनामनाणें नाहीं जेथें

नामा म्हणे धिग धिग त्यांचें जिणें | एका नारायणेंवांचूनियां

नामदेव महाराज म्हणतात, तो गांव, तो आश्रम काय कामाचा जिथे संत समागम नाही. त्याचा धिक्कार असो. अशी संपत्ति आणि अशी संतती यांचा पण धिक्कार असो.

मंत्र तंत्र दीक्षा सांगतील लक्ष | परी राम प्रत्यक्ष करी कोणी

प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय आणिकांची काय चाड मज

सर्वकर्मी राम भेटविती मातें जीवेंभावें त्यांतें ओवाळीन

नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला | सोयरा भेटला अंतरींचा

 

संतांचें लक्षण- संत कसा ओळखावा याबद्दलही नामदेव महाराज सांगतात

संतांचें लक्षण ओळखावया खूण दिसती उदासीन देहभावा

सतत अंतरीं प्रेमाचा जिह्याळा | वाचे वसे चाळा रामकृष्ण

तुझ्या ध्यानीं ज्यांचें सदा भरलें मन | विश्‍व तूं चि म्हणून भजती भावें

ऐसे नित्यानंदें बोधें जें निवाठे | ते जीवावेगळे करीं नाम्या

 

आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या आवाजात अगदी समर्थपणे गायलेला आपण ऐकतो-

वैष्णवाघरीं सर्वकाळ | सदा झणझणती टाळ

कण्याभाकरीचें खाणें गांठी रामनामनाणें

बैसावयासी कांबळा | द्वारीं तुळसी रंगमाळा

नामा म्हणे नेणती कांहीं चित्त अखंड विठ्ठलपायीं

 

अजून संतांचे लक्षण सांगतांना नामदेव महाराज सांगतात- सगळ्या गोष्टीत सम राहतो- तो खरा संत –

जैसा वृक्ष नेणें मानअपमान | तैसे ते सज्जन वर्तताती

येऊनियां पूजा प्राणी जे करिती | त्याचें सुख चित्तीं तया नाहीं

अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती | तया म्हणती छेदूं नका

निंदास्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे

नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी | जीवा शिवा गांठी पडुनी जाय

 

आणि मग भक्तांनी सुद्धा हेच गुण अंगी बाणवावेत- लोकांच्या निंदेने व्यथित होऊ नये-

निंदील हे जन सुखे निंदूं द्यावें सज्जनीं स्वभावें क्षोभूं नये

निदास्तुति ज्यासी समान पैं झाली | त्याची स्थिति आली समाधीसी

शत्रु मित्र ज्यासी सम समानत्वें तो चि पैं देवातें आवडला

माती आणि सोनें भासे ज्या समान | तो एक निधान योगिराज

नामा म्हणे ऐसे भक्‍त जे असती | तेणें पावन होती ठोक तिन्ही

 

 

संत नामदेवांचे अभंग खूप आहेत. त्यातील काही निवडक अभंग आपण पाहत आहोत. आचार्य विनोबा भावे यांनी हे निवडक अभंग अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले होते, त्या आधारावर आपण ही लेखमाला सुरू केली आहे. यापुढील भागात अजून काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-5 Sant Namdev Abhang-5

sant namdev

Sant Namdev Abhang-5

संत नामदेवांचे अभंग-5

 

याधीच्या लेखात आपण संत नामदेवांनी ‘नामा’ची महती हर प्रकारे सांगितली आहे, त्यासंबंधात काही अभंग पाहिले. नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

 

नामाचे महत्त्व किती सांगू आणि किती नको असे नामदेवाला होऊन जाते, आणि पुढील काही अभंगात, नामदेव, आपल्या अभंगांतून नामाचे सामर्थ्य सांगतात.

वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव होसी अरे जना

गायन करिसी तरी गुणिजन होसी | परी वैष्णव होसी अरे जना

पुराण सांगसी तरी पुराणिक चि होसी | परी वैष्णव होसी अरे जना

कर्म आचरसी तरी कर्मठ चि होसी परी वैष्णव होसी अरे जना

यज्ञ करिसी तरी याज्ञिक चि होसी परी वैष्णव होसी अरे जना

नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना

 

वेद, पुराण, यज्ञ, गायन, निरनिराळ्या प्रकारचे कर्म केले, तर त्या त्या क्षेत्रात मनुष्य पारंगत होईल, पण तो ’वैष्णव’ होईल याची खात्री नाही. पण केशवाचे, विष्णूचे नांव घेतल्यास मनुष्य तद्रूपच होऊन जातो असे नामदेव महाराज सांगतात.

काही काही अभंग हे खूपच विशेष आहेत. म्हणून ते मुद्दाम वेगळ्या रंगात  दिले आहेत. त्यातलाच हा एक अभंग. एका विशिष्ट वयानंतर सर्वांनी लक्षात घेण्यासारखा हा उपदेश आहे.

सर्वांगसाजिरीं आहेत इंद्रियें तंव सावध होयें हरिकथे

कीर्तन नर्तन वाचे जनार्दन | पवसी पतन येरझारी

पूर्ण मनोरथ घडती एका नामें दाटेल सप्रेमें जीवहेतु

नामा म्हणे विलास करीं तूं आणिक | सर्वी सर्व एक नाम असे

 

या शरीराचा, त्याच्या इंद्रियांचा, काही भरवसा नाही. जोपर्यंत सगळी इंद्रियें शाबूत आहेत, सुस्थितीत आहेत, तोपर्यंतच हरिकथेसाठी सावध व्हायला पाहिजे. नसता मुखाने ‘राम राम’ च्या ऐवजी ‘लाम लाम’ असे येऊन, तो राम ‘लांब’ जाण्याची वेळ यायची!

नामाच्या पुण्याचे- वक्ता आणि श्रोता दोघेही वाटेकरी आहेत. दोघांनाही त्याचा फायदा होतो. अर्थात श्रोता ‘सावधान’ असला पाहिजे आणि वक्ता ‘प्रेमळ’ असला पाहिजे.

जें जें पुण्य जोडे हरिनामगजरीं | त्याचे वांटेकरी दोघे जण

सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता जो भजे अनंता निर्विकल्प

तेणें सुखें सुख चढे नित्य नवें जाणती अनुभवें संतजन

नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं | संडिती वारी पंढरीची

नाम कसेही घ्यावे, कीर्तनाचे रंगी ‘नाचता’ येत नसले, तरी वेडे वाकडे नाचावे, असा एक फारच बहारदार अभंग आहे-

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी | म्हणें वाचा उदंडीं रामनाम

श्रीहरीसारिखा गोसावी पैं चांगु फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां

चुकलें पाडस कुरंगिणी गिंवसी | तैसा हृषीकेशी न्याहाळी तूंतें

धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें तैसा वोरसे तूंतें केशिराज

नामा म्हणे इतुकें करवे नि्दैवा | तरी वाचेसीं केशवा उच्चारी पां

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां- वेड्या बागड्या सारखे, कसेही वेडे वाकडे तोंड करून गायले आणि नाचले, तर हृषीकेशी माऊली ही आपल्या लेकराकडे कौतुकानेच पाहते. जणू चुकलेले पाडस हरिणीला सापडले तर तिला जसा आनंद होईल, तसा आनंद देवाला, भक्ताला पाहून होतो- वासराला पाहून धेनू हंबरते- तिला पान्हा फुटतो- अगदी तशीच, देवाची आपल्या लेकरांप्रति प्रीती असते. नामदेव महाराज म्हणतात, अरे निर्दैवा! इतकेही करणे जमत नसेल, तर वाचेने नुसते केशव केशव म्हण.

नामदेव महाराज लहानपणा पासूनच विठ्ठलाचे लाडके होते, त्यांच्या लहानपणी त्यांनी विठ्ठलाला, हट्ट करून नैवेद्य खायला लावला होता. मोठेपणीही, जेंव्हा मुक्ताईने ‘हे मडके जरा कच्चे आहे’ असे म्हटले, तेंव्हा ते रुसून विठ्ठल माऊलीकडेच गाऱ्हाणे घेऊन गेले होते. अशा कितीतरी कथा, नामदेवांच्या निरागसपणाच्या आपल्याला ठाऊक आहेत. त्याच आधारावर ते सांगतात, की देवाला आपल्या भक्ताचे तसेच कौतुक असते, जसे एखाद्या मातेला, आपल्या बालकाचे.

नामात तल्लीन झाल्यानंतर स्वतःच्या स्त्री पुत्राचीही आठवण त्यांना राहिली नाही अशी त्यांची स्थिति त्यांनी वर्णन केली आहे-

हातीं वीणा मुखीं हरि| गाये राउळाभीतरीं

अन्नउदक सोडिलें | ध्यान देवाचें लागलें

स्त्री पुत्र बाप माय यांचा आठव होय

देहभाव विसरला | छंद हरीचा लागला

नामा म्हणे हें चि देई। तुझे पाय माझी डोई

नामाच्या तल्लीनतेमध्ये देहभानच राहत नाही- मग देह राहिला काय किंवा गेला काय- कोण फिकीर करते? म्हणून नामदेव महाराज म्हणतात- ‘काळ देहासि आला खाऊ- आम्ही आनंदे नाचू गाऊ’

काळ देहासी आला खाऊं | आम्ही आनंदें नाचूं गाऊं

कोणे वेळेस काय बा गाणें | हें तों भगवंता मी नेणें

टाळ मृदंग दक्षिणेकडे | माझें गाणें पश्‍चिमेकडे

नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी द्यावी सेवा

पूर्ण कृपा केली देवा | दिधली पादपदूम-सेवा

पापें पळालीं पळालीं | नामकीर्तन-कल्लोळीं

रंगमाळा जागरणीं | तेथे मुक्ति वाहती पाणी

जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा

नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी

नामदेव स्वतःला ‘संत’ म्हणवत नाहीत- “जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा” असे म्हणतात आणि “नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी” असे म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतात- देवाच्या भक्तांची हीच तर ओळख असते!

संत नामदेवांच्या निवडक अभंगांचा हा पाचवा भाग, नामाची महति आणि सामर्थ्य सांगणारा होता. पुढील भागात, नामदेव महाराज संतांचा महिमा सांगतात त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

माधव भोपे

 

संत नामदेवांचे अभंग-4 Sant Namdev Abhang-4

namdev-7

Sant Namdev Abhang-4

संत नामदेवांचे अभंग-4

 

मागील लेखात आपण ‘देह अभिमान’ म्हणजे ‘मी देह आहे’ या समजुतीमुळे काय काय दुःख सहन करावे लागते, याचे वर्णन संत नामदेवांनी केलेले पाहिले. नंतर आपल्या मनाला, विषय भोगांपासून दूर राहून, देवाच्या स्मरणात राहण्याविषयी परोपरीने समजावले त्याचे अभंग आहेत.

आता पुढील काही अभंग हे ‘नामाच्या गोडी विषयी आहेत.

नामाची गोडी सांगतांना संत नामदेवांनी काही खूप बहारदार उदाहरणे दिली आहेत. त्यावरून, एखादी गोष्ट समजावून सांगतांना, उपमांचा वापर केल्यावर ती गोष्ट कशी आपल्या मनावर पटकन ठसते, याचाही अनुभव येईल.

गोक्षीर लाविले आंधळियामुखीं | तेथील पारखी जिंव्हा जाणे

तैसें देवा तुझें नाम निरंतर | जिंव्हेसी पाझर अमृताचे

सोलूनियां केळें साखरें घोळिलें | आंधारी खादलें तरी गोड

जाणोनियां नामा करी विनवणी | अमृताची खाणी नाम तुझें

 

नाम कळत किंवा नकळत जरी घेतले, तरी त्याचा फायदा व्हायचा तो होतोच, त्याची गोडी येतेच, हे सांगतांना नामदेव महाराज सांगतात- गाईचे दूध आंधळ्या माणसाला जरी प्यायला दिले, तों ते पाहू शकत नसला, तरी त्याच्या जिभेला त्या दुधाची चव बरोबर कळते. दिसत नाही म्हणून त्याचे काही अडत नाही. तसे देवा, तुझ्या नामाची महति माहीत नसतांना जरी नांव घेतले, तरी तुझे नांव अमृतरूपी असल्याने, जिंव्हेला जणू अमृताचा पाझर फुटतो.

केळे सोलून, त्यात साखर घालून, अंधारात जरी खाल्ले, तरी ते गोडच लागते. तसे देवाचे नांव हे जाणता, अजाणता कसेही घेतले, तरी त्याची गोडी अनुभवास येतेच.

नाम तें चि रूप रूप तें चि नाम नामरूप भिन्न नाहीं नाहीं

आकारला देव नामरूपा आला म्हणोनि स्थापिले नाम वेदी

नामापरता मंत्र नाहीं हो आणिक | सांगती ते मूर्ख ज्ञानहीन

नामा म्हणे नाम केशव केवळ | जाणती प्रेमळ भक्‍त भले

 

नाम आणि रूप हे भिन्न नाहीतच मुळी. देव हा ‘नाम’ रूपाने आकारास आला आहे. नामापरता दुसरा कोणता मंत्र नाही.

मंत्राचा पैं मंत्र हरि हा उच्चार लगे तो विचार करणें कांहीं

सुफळ नाम गाढें वाचेसीं उच्चारू | केशव हा चि करूं सर्वांभूती

नाहीं त्यासी पतन नव्हेचि बंधन | नित्य हें चि स्नान रामनामें

नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालूं नका

 

आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही नामाचा उच्चार सुरू करा, जास्त काही विचार करण्याची गरज नाही. आणखीन जास्त पसारा वाढवायची गरज नाही.

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

पहा विचारूनि अनुभव मनीं | नका आडरानीं झणीं भरू

नामावांचूनियां तरलों जे म्हणती | ते आधीं बुडती भवाब्धींत

नामा म्हणे नाम ओकाराचें मूळ | ब्रह्म तें केवळ रामनाम

विठ्ठल विठ्ठल म्हणा उघडा मंत्र जाणा | कळिकाळ आंकणा होईल तुम्हां

वेदांचें हें सार शास्त्रांचे गहृर | तें जाणा अक्षर विठ्ठलनाम

करावें खंडण अखंड उच्चारण | देश काळ वर्तमान नाहीं येथें

जीवींचें निजगूज मुक्‍तीचें तें बीज | नामा म्हणे मज सांपडलें

काळ वेळ नसे नामसंकीर्तनीं उंच नीच योनि हें हि नसे

धरा नाम कंठीं सदा सर्वकाळ | मग तो गोपाळ सांभाळील

कृपाळु कोंवळा सुखाचा सागर | करील उद्धार भाविकांसी

नामा म्हणे फार सोपें हें साधन | वाचे नाम घेणें इतुकें चि

 

पढावे वेद, नको शास्त्रबोध | नामाचे प्रबंध पाठ करा

नव्हे ब्रह्मज्ञान, होय वैराग्य | साधा भक्तिभाग्य संतसंगें

येर क्रियाकर्म करितां हो कळी– | माजीं कोण बळी तरले सांगा

नामा म्हणे गूज सांगितलें संतीं यापरती विश्रांति आणिक नाहीं

 

केशव म्हणतां क्ले जाती परते | त्याहूनि सरतें आणिक नाहीं

वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी | उदंड वाचेसीं हरि म्हण

पहा याहूनियां आन नाहीं दुसरें | भीष्में युधिष्ठिर उपदेशिला

नामा म्हणे धरीं केशवीं विश्‍वास | तरसी गर्भवास नामें एके

साराचें हि सार भक्‍तीचें भांडार | नाम निरंतर गातां वाचे

कासया करावें आणिक साधन नामाविण क्षण जाऊं नेदी

दया शांति क्षमा हें चि पैं भूषण नामसंकीर्तन अहर्निशी

नामा म्हणे जप अखंड नामाचा | काळ हा सुखाचा सदोदित

भवसिंधूचा पार तरावयालागीं साधन लियुगीं आणिक नाहीं

अहर्निशीं नाम जपा श्रीरामाचे जें सकळ धर्माचिं मुकुटमणि

चले वर्णाश्रम धर्मआचरण | घडे व्रत दान तप कोणा

नव्हे तीर्थाटन पुराणश्रवण | नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध

नामा म्हणे नाम राघोबाचें गातां | ब्रह्मसायुज्यता घर रिघे

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे | नामापासीं असे भक्ति मुक्ति

नामाऐसें सोपें नाहीं त्रिभुवनी नाम संजीवनी साधकांसी

यज्ञदानतपें नामें आलीं हाता | नामें सर्व सत्ता प्राप्त होय

नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं | नाहीं त्याचे तुकीं दुजा कोणी

कलियुगात यज्ञ, तप, निरनिराळी व्रतें हे सर्व करण्याची मनुष्याची क्षमता राहणार नाही, म्हणून सर्व संतांनी ‘नामाचा’ आश्रय घ्यायला सांगितले आहे. ‘नानक नाम जहाज है’- संसार रूपी, निरनिराळ्या संकटांनी भरलेला भवसागर तरून जाण्यास नाम हे ‘जहाज आहे- या जहाजात बसून, सुरक्षितपणे, आरामात पैलतीराला पोंचता येते, असे गुरु नानक सांगून गेले आहेत. कोणत्याही संताची वाणी पाहिली, तरी त्यात हर प्रकारे नामाचे महत्त्व सांगितले आहे.

नामदेवांच्या तर नांवातच ‘नाम’ आहे. नामदेव हे केवळ ‘नाम’ घेण्यासाठीच जन्माला आले. त्यामुळे, नाम माहात्म्य सांगतांना नामदेवांच्या वाणीला अधिकच बहर येतो यात काही नवल नाही.

पुढील लेखात आपण नामाच्या सामर्थ्याबद्दल नामदेवांचे काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-3 Sant Namdev Abhang-3

vithal mandir

Sant Namdev Abhang-3

संत नामदेवांचे अभंग-3

 

संत नामदेवांची भजने पाहतांना, मागील लेखात आपण, मनुष्य कसा विषयसुखाच्या मागे लागून केविलवाणा झाला आहे, अशा अर्थाचे काही अभंग पाहिले. तसेच भक्तीचे नुसते वरवरचे सोंग किंवा ढोंग करणाऱ्या लोकांचा कसा सुळसुळाट झाला आहे, त्याबद्दल ही नामदेवांचे अभंग पाहिले. तसेच, “सजीवासी हाणी लाथा, निर्जीवपायी ठेवी माथा”, असे क्रांतिकारी विचार ही पाहिले.

आता, देह अभिमान- “मी देह आहे” अशा भ्रमामुळे मनुष्याचे कसे हाल होतात, आणि त्यावर काय उपाय आहे, याबद्दल काही खूप छान अभंग आहेत.

देहाचा अभिमान धरावा चित्तीं | धरावी उपरति उपशम

सर्वांभूतीं देव ऐसी समबुद्धि सांडावी उपाधि प्रपंचाची

चिंता करी नाम्या येणें तरसी जाण| तुज सांगितली खूण निर्वाणींची

 

लौकिकाची कांहीं धरावी लाज | हें चि निज काज साधावें तें

निंदा करिती तो मानावा आदर | स्तुति तें उत्तर नायकावें

धरावी चाड मानसन्मानाची | आवडी भक्तीची रूढवावी

नामा म्हणे हें चि रूढवावें मानसीं | क्षण एक नामासी विसंबूं नये

 

निर्विकल्प ब्रह्म कैसेनि आतुडे | जंववरी मोडे मीतूंपण

शब्दचित्रकथा सांगती पाल्हाळ | मन नाहीं निश्‍चळ हरिपायीं

आणूतें प्रमाण होतां दुजेपण | मेरूतें समान देईल दुःख

नामा म्हणे ब्रह्म सर्वांभूती पाहीं तरी ठाईचा ठाई निवशील

 

 

परब्रह्मींची गोडी नेणती बापुडीं | संसारसांकडीं विषयभरित

तूंते चुकली रे जगजीवनरक्षा अनुभवाविण लक्षा नये चि रे कोणा

जवळीं असतां क्षीर नव्हे चि वरपडा | रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला

दर्दुरा कमळिणी एके ठाई बिढार | वास तो मधुकर घेऊनि गेला

नामा म्हणे ऐसीं चुकली बापुडीं | अमृत सेवितां पुडी चवी नेणे

एकदा परब्रह्माची गोडी लागली, तर संसारातील विषय आवडणार नाहीत. इथे गोचीड आणि गाईचे वासरू यांची तुलना केलेली आहे. गोचीड हे, गाईच्या स्तनापाशी असते. पण ते आयुष्यभर तिचे रक्तच सेवन करते. जेंव्हा की गाईचे वासरू मात्र दूधरूपी अमृत सेवन करते. तसेच दर्दुर म्हणजे बेडूक आणि मधुकर म्हणजे भुंगा हे दोन्ही कमळाच्या जवळ असतात, पण कमळाच्या सुगंधाचे सेवन भुंगा करतो, आणि बेडूक मात्र कमळाच्या अगदी जवळ असूनही त्याच्या सुगंधापासून वंचित राहतो. तसेच विषयी लोक, संसारात येऊन हरिनामरूपी अमृत सेवन करण्याच्या ऐवजी विषयरूपी चिखलाचेच सेवन करण्यात धन्यता मानतात.

संसार करितां देव जैं सांपडे | तरी कां झाले वेडे सनकादिक

संसारीं असतां जरी देव भेटता | शुकदेव कासया जाता तयालागीं

ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार | तरी कां निरहंकार झाले साधु

नामा म्हणे आतां सकळ सांडून | आलोंसें शरण विठोबासी

 संसार करून जर देव सापडला असता, तर सनकादिक, शुकदेव हे कशाला संसारापासून दूर राहिले असते, असे म्हणून, सगळे सोडून विठोबाला शरण जा असे नामदेव महाराज कळकळीने सांगतात.  

संसारसागर भरला दुस्तर | विवेकी पोहणार विरळा संत

कामाचिया लाटा अंगीं आदळती नेणों गेले किती पोहूनियां

भ्रम हा भोंवरा फिरवी गरगरा | एक पडिले घरा चौर्‍यांशीच्या

नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचे भय कळिकाळाचें नाहीं तुम्हां

वरील अभंग इतके सोप्या शब्दात आहेत, की त्यांच्यावर वेगळे काही भाष्य करण्याची गरज पडत नाही. पण त्यानिमित्ताने, आपलीही उजळणी होते, म्हणून भाष्य करावेसे वाटते.

त्यानंतर, येणारे भोग, शरीराची पीडा इत्यादि ही आपल्याच कर्माची फळें आहेत, त्यासाठी ईश्वराला किंवा कोणाला दोष देण्याची काय गरज आहे, अशा प्रकारचे काही अभंग आहेत-

पापाचें संचित देहासी दंडण | तुज नारायणा बोल नाहीं

सुख अथवा दु: भोगणें देहासी सोस वासनेसी वाऊगा चि

पेरी कडू जिरें इच्छी अमृतफळ | अर्कवृक्षा केळ केवीं होय

मुसळाचें धनु होय सर्वथा | पाषाण पिळितां रस कैंचा

नामा म्हणे देवा तुज कां रुसावें मनासी पुसावें आपुलिया

 नंतर समर्थांनी जसे आपल्या मनाला समजावले होते, तसेच नामदेव महाराजही पुढील काही अभंगांमधून समजावतात

अरे अलगटा माझिया तूं मना | किती रानोरानां हिंडविसी

विठोबाचे पायीं दृढ घाठीं मिठी| कां होसी हिंपुटी वायांविण

संकल्प विकल्प सांडी तूं समूळ | राहे रे निश्‍चळ क्षणभरी

आपुलें निजहित जाण तूं त्वरित | वासनारहित होई वेगीं

नामा म्हणे तुज ठाईंचें कळतें सोसणें कां लागते गर्भवा

क्षण एक मना बैसोनि एकांतीं | विचारीं विश्रांति कोठें आहे

लक्ष चौर्‍्यांशीच्या करितां येरझारा | शिणलासी गव्हारा वेळोवेळां

दुर्ल आयुष्य मनुष्यदेहींचें | जातसे मोलाचें वायांविण

नामा म्हणे तुज येतों काकुळती | सोडीं रे संगति वासनेची

वासनेची संगत सोडण्याविषयी नामदेव महाराज अगदी काकुळतीला येऊन सर्वांना विनंती करतात

वासनेची करणी आइकें तूं मना | या केली रचना ब्रह्मांडाची

निर्गुण चैतन्य सदा सुखराशि | त्या दिलीं चौऱ्यांशी लक्ष सोंगे

ऐसी हे लाघवी पाहतां क्षणभंगुर | ब्रह्मादि हरिहर ठकिले इणें

नामा म्हणे तरी चि इचा संग तुटे | दैवयोगें भेटे संतसंग

दैव योगाने संत भेटले, तरच या वासनेचा संग तुटू शकतो.

परियेसी वासने संकल्पस्वरूपे | विश्‍व त्वां आटोपें वश केलें

ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें | विषयाकारणें ठोठिंगत

परी माझ्या मना सांडीं वो समर्थे | देई मज दीनातें कृपादान

नामा म्हणे पुढती गांजिसील मज | येईल केशिराज सोडवणे

ब्रह्मादिक ही या वासनेची खेळणीं आहेत. अशा वासनेला नामदेव महाराज दम देतात की तू मला सोड, माझ्या नादी लागू नकोस, कारण तू जर मला गांजलेस, तर साक्षात केशीराज मला सोडवायला समर्थ आहे, हे लक्षात ठेव

पुढील लेखात नाम स्मरणाचे महत्त्व सांगणारे काही अभंग बघणार आहोत.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-2 Sant Namdev Abhang-2

namdev-5

Sant Namdev Abhang-2

संत नामदेवांचे अभंग-2

 

संत नामदेवाची भजनें म्हणजे अगदी थोड्या शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करणारी आहेत. मागील लेखात आपण नामदेवांची, आयुष्याच्या क्षणभंगुरपणाबद्दलची काही भजनें पाहिली. त्याचप्रमाणे  संसारात पडल्यावर माणूस, स्वतःचे आणि मुला बाळांचे पोट भरता भरता, कसा केविलवाणा होऊन जातो, पण त्याला त्याचे भान नसते, हे सांगणारे काही त्यांचे अभंग आहेत.

विषयाचा आंदणा दिसे केविलवाणा | करितसे कल्पना नानाविध

कुटुंबपाईक म्हणवी हरीचा दास मागे ग्रासोग्रास दारोदारी

पोटालागीं करी नाना विटंबना | संतोषवी मना दुर्जनांच्या

वैराग्याची वार्ता कैंची दैवहता | नुपजे सर्वथा प्रेमभावो

नामा म्हणे ऐसे तारी एक्या गुणें | अजा आरोहण गजस्कंधीं

goat on the shoulder of elephant

विषयांनी बांधलेला माणूस केविलवाणा दिसतो, सतत नानाविध कल्पना- असे झाले तर-तसे झाले तर- अशा कल्पना करून करून चिंता करत राहतो. ‘मागे ग्रासोग्रास दारोदारी’ हे या स्वरूपात नाही, तरी वेगळ्या स्वरूपात आपण आजही पाहतोच. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कशा कशा दुर्जनांची चाकरी करावी लागते, त्यांना खुश ठेवावे लागते. अशा माणसाला वैराग्य कुठून येणार- तो ‘दैव-हत’- दैवापुढे हतबल झालेला असा- जो माणूस आहे, त्याच्या हृदयात देवाविषयी प्रेम भाव कसा उपजेल?

पण असे जरी असले, तरी एक मार्ग आहे- “अजा आरोहण गजस्कंधीं” या ठिकाणी एक छान उपमा दिली आहे- बोकड जंगलातून जात असतांना- त्याला नाना प्रकारच्या हिंस्त्र श्वापदांपासून भय असते- पण कसेही करून जर त्याने हत्तीशी मैत्री करून घेतली- तर तो त्याच्या खांद्यावर बसून मजेत जंगल पार करू शकतो- समर्थाचा आश्रय घेतल्यास संकटांना घाबरण्याचे कारण उरत नाही- मग सर्व शक्तिमान परमेश्वराचा आश्रय घेतला- तर संसाररूपी जंगल विनासायास, सुरक्षितपणे पार करता येते.

अजून एका अभंगात, वीतभर पोटासाठी काय काय करावे लागते, याचे अगदी वास्तव वर्णन केले आहे- मला यात अजून एक सुचवावेसे वाटते- आजकाल नुसते पोट भरणे एवढे अवघड राहिले नाही- पण या ठिकाणी आपण रसना- जिभेची चटक- किंवा वासना- विविध भोग भोगण्याची अदम्य इच्छा- या गोष्टी जर घातल्या, तर खालील अभंग अगदी तंतोतंत आजच्या काळाला लागू पडतो-

वीतभर पोट लागलेंसे पाठी | साधूसंगें गोष्टी सांगूं देई

पोट माझी माता पोट माझा पिता | पोटानें ही चिता लाविलीसे

पोट माझा बंधु पोट माझी बहीण | पोटानें हें दैन्य मांडियेले

विष्णुदास नामा पोटाकडे पाहे | अजूनि किती ठाय हिंडवीसी

त्यानंतरच्या एका अभंगात, पापा पासून वाचण्याचा अगदी सोपा मार्ग संत नामदेव सांगतात-

परदारा परधन परनिंदा परपीडन | सांडोनि भजन हरीचें करा

सर्वांभूती कृपा संतांची संगति | मग नाहीं पुनरावृत्ति जन्ममरण

नामा म्हणे नलगे साधन आणिक | दिधली मज भाक पांडुरंगे

खरंच- आपल्या आजूबाजूला पाहिले, तर सर्व प्रकारची दुष्कृत्यें या चार प्रकारात मोडतात- परदारा, परधन, परनिंदा आणि परपीडन. या चार गोष्टी सोडून, हरीचे भजन जर केले, आणि सगळ्यांबद्दल कृपाभाव ठेवला, आणि संत- सज्जनांची संगत धरली- तर यापेक्षा वेगळे साधन काय लागणार- अशा माणसाला जन्ममरण आणि  पुनरावृत्तिपासून सुटका मिळेल, यात काही संशय नाही- आज इतरांबद्दल द्वेष, असूया, या गोष्टींमुळे मनुष्य नाना प्रकारच्या मानसिक आणि मनो कायिक रोगांना बळी पडत असलेला आपण बघतो- तो सगळ्यांबद्दल कृपाभाव जर ठेवला, तर अशा रोगांपासून दूर राहू शकेल. या तीनच ओळींमध्ये संत नामदेवांनी आधुनिक जगात सुद्धा कसे राहावे याचा आदर्शच घालून दिला आहे असे दिसते.

आणि मग आजकालच्या जगात नुसतेच भक्त असण्याचे ढोंग करणारे- महात्मा असण्याचे ढोंग करणारे असे लोक कसे बोकाळले आहेत, त्याबद्दलचे काही अभंग आजच्या स्थितीलाही तंतोतंत लागू पडतात-

मुखीं नाम हातीं टाळी दया नुपजे कोणे काळीं

काय करावें तें गाणें | धिग धिग लाजिरवाणें

हरिदास म्हणोनि हालवी मान | कवडीसाठीं घेई प्राण

हरिदासाचे पायीं लोळे | केशीं धरोनि कापी गळे

नामा म्हणे अवघे चोर | एक हरिनाम थोर

पोटीं अहंतेसी ठावो | जिंव्हे सकळ शास्त्रांचा सरावो

भजन चालिले उफराटें। कोण जाणे खरें खोटें

सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा

सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा

मृत्तिकेच्या पूजा नागा जित्या नागा घेती डांगा

नामा म्हणे अवघें खोटें | एक हरिनाम गोमटे

 वरील अभंगात तर सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा, असे सांगून अशा दांभिक लोकांचे वर्णन केले आहे- सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा, मृत्तिकेच्या पूजा नागा जित्या नागा घेती डांगा या ओळींमधून नामदेव किती सुधारक विचाराचे होते, हे दिसून येते.

 ज्ञानदेवांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसांनी अल्लाउद्दीन खिलजीचें महाराष्ट्रावर आक्रमण झालें. तत्पूर्वी महाराष्ट्र मुसलमानांच्या आक्रमणापासून मुक्‍त होता. पण नामदेव महाराज ऐंशी वर्षं जगले. म्हणजे ज्ञानदेवानंतर नामदेव जवळ जवळ पन्नास वर्षे राहिले.  त्यांनी  पाहिलें की सगळीकडे इस्लामचा प्रचार चालला आहे.  काही इस्लामचे राजे तर आले आणि गेले.  काही टॅक्स घेऊन परत गेले, परंतु सूफी तत्त्वज्ञानी भारतात फिरत होते ते महाराष्ट्रांतहि होते आणि परमात्मा एक आहे असें सांगत होते. नामदेवाने विचार केला की हा जो हल्ला आहे तो कसा परतवता येईल? त्यातला चांगला अंश ग्रहण केल्याशिवाय होणार नाही. इस्लाम म्हणतो, परमेश्वर एक आहे. पण हिंदूंमध्ये काय चालतें ? कुणी गणपतीची पूजा करतात, कुणी कुणाची, कुणी कुणाची. आणि जो तो आपली उपासना श्रेष्ठ मानून चालला आहे. फकीर सांगत होते, अल्लाह एक आहे, मानव एक आहे. त्यातले गुण घेतले पाहिजेत, म्हणजे तो हल्ला परतवता येईल. नामदेवाने विचार केला, आपणसुद्धा एकच ईश्‍वर मानतो. परमेश्‍वराचें एकत्व तर आपणहि मानतो. आपण दहा ईश्‍वर काही मानत नाही. हिंदूंचे मत वेदामध्ये एका वाक्यात आलें आहे, एकं सत्विप्रा बहुधा वदन्तिसत्य एक आहे, पण विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नामांनी बोलावतात. हिंदू धर्मातहि परमेश्‍वराचें एकत्व मानले आहे. पण तें लोपल्यासारखें होते. आम्ही नाना देवतांच्या मागे लागल्यामुळे या देवतेचा उपासक त्या देवतेच्या दर्शनालासुद्धा जाणार नाही, इतकी तयारी होती. म्हणून नामदेवाने विचार केला की एकत्वाचें प्रतिपादन केले पाहिजे. म्हणून जिथे जिथे इस्लामचा प्रचार होता तिथे तिथे यात्रा करीत नामदेव महाराज पोहोचले. इस्लामचा प्रचार सगळ्यात जास्त पंजाबात होता, म्हणून नामदेव महाराज तेथे गेले आणि  वीस वर्ष राहिले! तिथे त्यांनी पाहिलें की, प्रत्येक गांवात एक फकीर फिरत आहे आणि ईश्‍वर एक आहे असें समजावून सांगत आहे. नामदेवाने विचार केला ही एकता तर आपल्याहि धर्मात आहे, पण ती सांगितल्याशिवाय कशी कळणार? त्यांनी  एक भजन केलें आहे. त्यात एका बाजूने हिंदूला टोला हाणला

व दुसऱ्या बाजूने मुसलमानांना.

हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीति

नामे सोई सेविआ जह देहुरा मसीति

 हिंदू देवळातील देवाला पूजतात, तर मुसलमान मस्जीदीला पवित्र मानतात- पण दोघांनीही हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सोई सेविआ जह देहुरा मसीति त्याचे सेवन करा-त्याची आस धरा-जो न देवळात राहतो, न मस्जीदीत. हिंदु देवळाची पूजा करतात आणि देवाला विसरले; मुसलमान मशिदीची पूजा करतात, मशिदीतच परमेश्‍वर आहे असें मानतात. म्हणजे तुम्हीसुद्धा मूर्तिपूजक आहात. म्हणून दोन्हीची पूजा सोडा आणि अंतर्यामी जो भगवान्‌ आहे त्याच्याकडे वळा, असें सांगत सांगत नामदेव महाराज  फिरले.  त्याचा परिणाम असा झाला की इस्लामची जी लाट आली होती ती थोपविली गेली. नानक महाराज आले, त्यांनी तेंच सांगितलें.

असो. हे थोडे विषयांतर झाले. पण आजकालच्या जगात, दंभ- ढोंग यांचीच कशी चलती झाली आहे, हे सांगणारे आणखी काही अभंग आहेत-

काय करूनि तीर्थाटणें | मन भरिलें अवगुणें

काय करावें तें तप | चित्तीं नाहीं अनुताप

मन:संकल्पाचीं पापें | जाती तीर्थाचेनि बापें

नामा म्हणे सर्व सोपें पाप जाय अनुतापें

 बापरे! मन:संकल्पाचीं पापें | जाती तीर्थाचेनि बापें किती स्पष्ट बोलतात नामदेव महाराज- मनात नुसता पापाचा संकल्प जरी केला तर तीर्थाच्या बापानेही ती पापें जायची नाहीत!

आणखी एक अभंग- मीच भक्त आहे- मीच मुक्त आहे अशी शेखी मिरविणाऱ्या पापी आणि दुराचारी लोकांची पोलखोल केली आहे-

देहाचें ममत्व नाहीं जों तुटले | विषयीं विटलें मन नाहीं

तंव नित्यसुख कैसेनि आंतुडे | नेणती बापुडे प्रेमसुख

मी चि एक भक्‍त मी चि एक मुक्‍त | म्हणवी पतित दुराचारी

नामा म्हणे तुझे कृपेविण देवा | केंवीं जोडे ठेवा विश्रांतीचा

तसेच एका अभंगात- हट्टाने कठिण योग साधना करणाऱ्या साधकांना सुद्धा सावध केले आहे- भुजंग हा नुसता पवन म्हणजे वाऱ्याचा आहार करून राहतो, अशी वदंता आहे- पण म्हणून तो काही योगेश्वर होत नाही. निरनिराळ्या योग साधनांनीt काया पालटेल- पण मन शुद्ध झाले नाही तर त्याचा काही उपयोग नाही असे सांगितले आहे.

 भुजंग विखार पवनाचा आहार | परी योगेश्‍वर म्हणूं नये

पवनाच्या अभ्यासें काया पालटी | परी तो वैकुंठीं सरता नव्हे

मन हें दर्पण करोनि निर्मळ | पाहें पां केवळ आत्मा स्वयें

तुझा तूं केवळ तुजमाजीं पाहीं | नामा म्हणे ध्याई केशिराजु

 आपल्या संत परंपरेमध्ये अशी अनेक रत्नें आहेत. अशा या अमूल्य ठेव्याची ओळख आपण येत्या काही लेखांत करून घेणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांची भजने-1