https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

भक्तांच्या कथा-1-श्री गणेश-Devotee-1 Shri Ganesh

ganesh-2-1024x892

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

प्रथम भक्त- श्री गणेश

ganesh prithvi parikrama

Devotee-1 Shri Ganesh

श्री गणेश हे तर स्वतः च आद्य देव आहेत, मग त्यांचे नांव भक्तांमध्ये कसे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भगवंताची रूपें अनंत आहेत. पण या रूपांपैकी ५  रूपें ही मुख्यतः पूजली जातात- 

१. भगवान नारायण- किंवा विष्णू, २. भगवान शिव, ३. भगवति महाशक्ति, ४. भगवान सूर्य, आणि ५. भगवान गणपति.  

गणपति आद्य पूज्य असल्याच्या अनेक कथा वाचायला मिळतात, गणपति हे रुद्रगणांचे अधिपति आहेत, त्यामुळे त्यांची पूजा सर्वप्रथम केल्याने कार्य निर्विघ्न पार पडते, अशी श्रद्धा आहे. गणेशाला प्रथम पूजनाचा मान कशामुळे प्राप्त झाला, याबद्दलची कथा सर्वश्रुत आहे- जेंव्हा सृष्टीच्या आरंभी, देवतांमध्ये कोणाला प्रथम पूजनीय मानले जावे हा प्रश्न उपस्थित झाला, तेंव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सर्व प्रथम पूर्ण करून येईल, त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल. 

त्यानंतर सर्व देव आपआपल्या वाहनांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. त्यावेळी, गणेशाने, आपल्या आई वडिलांची, अर्थात, भगवान शंकर आणि पार्वती यांची प्रदक्षिणा केली, कारण की, ‘माता साक्षात् क्षितेस्तनुः’ अर्थात, माता साक्षात पृथ्वीरूप आहे, आणि पिता हे प्रजापतिरूप आहेत.  त्यामुळे श्रीगणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा अशा रीतीने सर्वांच्या आधी पूर्ण झाली आणि तेंव्हापासून श्री गणेशाला आद्य पूजेचा मान मिळाला.  हीच कथा, श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्या संदर्भात सुद्धा वेगळ्या प्रकारे येते. 

पण या कथेचा आशय इतकाच, की अशा प्रकारे आपल्या माता पित्यांची श्रेष्ठता आणि माता पित्याच्या  भक्तिचा आदर्श श्री गणेशाने स्थापित केला आणि दाखवून दिले, की केवळ शरीराच्या बळावर किंवा इतर लौकिक साधनांवर विश्वास ठेवून सिद्धी मिळू शकत नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही धोका खाऊ शकतो.  अशा प्रकारे आपल्या माता पित्याच्या भक्तीचा आदर्श घालून देणाऱ्या श्री गणेशाला आरंभी वंदन!

Renuka Ashtak-7 अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7

mahur gad-2

( वृत्त – भुजंगप्रयात )
दयाळे ! तुझ्या कोटि ब्रह्मांड पोटीं
स्वयें पाळिशी जीव कोट्यानकोटी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥१॥


कधीं आपुलें दाविसी मूळपीठ
मिळो ना मिळो खावया गूळ – पीठ
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥२॥


तुझ्यापाशिं राहीन खाईन भाजी
जगामाजि सांगेन ही माय माझी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥३॥


बरा नाहिं का मी धुया लुगडें हो
अशा पूरवावी दयाळू गडे, हो
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥४॥


तुझी भक्ति अंगामधें संचरावी
तुझी माउली वेणि म्यां विंचरावी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥५॥


तुला प्रार्थना हीच जोडूनि पाणी
तुझ्या द्वारिं राहीन, वाहीन पाणी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥६॥


नसे द्यावया वस्त्र यद्वा दशीला
तुझ्या पंक्तिला येउं दे द्वादशीला
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥७॥


जिवाहूनि आतां करुं काय दान
आईनें रुसावें असा कायदा न
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥८॥


सदा विष्णुदासाचिया हे अगाई
दया येउं दे जाहलों गाइ – गाई
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥९॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-6 तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

renuka-7

 वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥


सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥


विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥


साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥


सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥


मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥


पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ – भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥


माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥


ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥


तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥


काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥


पहा जातो नरजन्म – रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥


कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥


मीच अथवा तुज ह्रदय – मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस – रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥


कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥


केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-5 तू विचित्र गारुडीण- रेणुका अष्टक-5

renuka-3

( वृत्त : चामर )
तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१॥

तारिलेस, तारतीस, तारशील, पातकी
अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात कीं
हेचि पाय हांसतील कौतुकें तुला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥२॥

एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें
घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
तारसी न मारसी न बारसीनं कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥३॥

मुख्य कार्यकारणांत तूंचि होसि वांकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
आवघें तुझेंचि कृत्य हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके तुला ॥४॥

तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी
विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
नित्य मार शत्रुहातिं मारवीसि कां मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके ! तुला ॥५॥

जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा
मीं तसा कधीं न कांहिं बाइ ! कापिला गळा
हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥६॥

रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहिं राजिवासना
ती उनाड सांगतीस आटपावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥७॥

ओढती न पेरुं देति हात चालु चाडिचे
दुष्ट काम – क्रोध मांग जातिचे लुचाडिचे
त्यांचि पाठ रखितेस हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥८॥

काय जन्म घातलासि, लाविलीस काळजी
काळजांत इंगळीच खोंचलीस काळ जी
ही जराचि धाड धाडलीस खावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥९॥

काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वतीं
काय घातलासि हा अनाथ देह कर्वतीं
काय लोटलेंसि घोर दुःखसागरीं मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१०॥

काय लीहिलेंसि दैविं गर्भवास सोसणें
काय दीधलेंसि जन्म – मृत्युलागिं पोसणें
काय लाविलेंस नित्य तोंड वासणें मला
हें विहीत काय, सांग माय रेणुके ! तुला ॥११॥

आदि मध्य – आवसानिं सर्व विश्व चाळसी
होसि तूं तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रुप गुण कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके तुला ॥१२॥

विष्णूदासाची कविता 

 

Renuka Ashtak-4 लक्ष कोटी चंद्रकिरण-रेणुका अष्टक-4

renuka-7

( वृत्त : चामर )
लक्ष – कोटि चंडकिरण  सुप्रचंड विलपती
अंबचंद्रवदनबिंब दीप्तिमाजि लोपती
सिंहशिखर अचलवासि मूळपीठनायका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥१॥

आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणिं दिव्य कुंडलें
डोलताति, पुष्पहार भार फार दाटले
अष्टदंडिं, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥२॥

इंद्रनीळ, पद्मराग, पाच, हीर वेगळा
पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळा
पैंजणादि भूषणेंच लोपल्याति पादुका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥३॥

इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रह्म, नारदादि, वंदिती
आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती
प्रचंड चंड मुंड खंडविखंडकारि अंबिका
धर्म – अर्थ – काम – मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥४॥

पर्वताग्रवासि पक्षि ‘ अंब अंब ’ बोलती
विशाल शालवृक्ष रानिं भवानि ध्यानिं डोलती
अवतार – कृत्यसार जड – मुढादि तारका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥५॥

अनंत ब्रह्मांड पोटिं, पूर्वमुखा बैसली
अनंत गुण, अनंत शक्ति, विश्वजननि भासली
सव्यभागिं दत्त, अत्रि, वामभागिं कालिका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥६॥

पवित्र मातृ – क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमीं
अंब – दर्शनासि भक्त – अभक्त येति आश्रमीं
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका
धर्म – अर्थ – काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥७॥

 

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-3 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3

renuka-7

विष्णूदासाची कविता 

तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी

( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥
यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥
केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥
वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥
झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥
गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥
जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥
आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥
शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥