https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2

renuka-3

विष्णूदासाची कविता 

लाज याची रेणुके, तुला सारी

( वृत्त : दिंडी )
अखिल पतितांची, दुरित कृती केली
पतितपावन ही, कीर्ति आयकेली
म्हणुनि पडलों येउनी तुझ्या दारीं
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१॥
मूळपीठ स्वस्थानिं वास केला
सतत जपलों मी नाममालिकेला
बहुत दिन गे, घातली तुझी वारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥२॥
जरी आहे मी स्वार्थ – काम – साधू
तरी लोकांनीं मानियलें साधू
तुझ्या नांवाची दाखवितों थोरी
लाज याची रेणुके तुला सारी ॥३॥
नसे ब्रह्मांडीं तुझ्यावीण कोणी
अतां वेगें उडि घालि सुनिर्वाणीं
त्रिविध तापें तापलों असे भारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥४॥
गृहीं व्यालेली कामधेनु माय
ग्रामलोकांसी ताक मागुं काय
कृपण म्हणतिल निर्दैवि हा भिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥५॥
जन्मतां गाजे सिंहिणिचें तोक
ग्रामसिंहाचे संगे करी शोक
जंबुकाचें भय कंप घे शिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥६॥
होय सर्पाची दासि गरुड – माता
गलंडानें वैद्याचि रडे कांता
समर्थाचा आश्रीत करी चोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥
तुझ्या नामीं विश्वास अल्प नाहीं
म्हणुनि धांवे दुष्कीर्ति कल्पना ही
पतित पापी मी परम दुराचारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥८॥
तुझ्या चरणाची भेट घ्यावि वाटे
परी नेते प्रारब्ध आडवाटें
गळां पडली दृढ संचिताचि दोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥९॥
अहा ! दारिद्र्यें पीडित गृह – दारा
कर्जदारहि धावोनि येति दारा
त्यात रोगाची दाटली उभारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१०॥
चलित दिवसाची साथि काकि मामी
परी निर्वाणीं कुणि न ये कामीं
निर्धनाची मानिती ते शिसारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥११॥
पहा बुडतों मी दुःखसागरांत
कशी बसलिस तूं स्वस्थची घरांत
कृपावंते ही विनती अवधारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१२॥
सर्व माझे अजि हारले उपाय
म्हणुनि अंबे धरियले तुझे पाय
विष्णुदासाची दीनजननी, तारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१३॥

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

renukadevi-1

विष्णूदासाची कविता 

अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये

वृत्त : ( शिखरिणी )
न द्यावी कां वाटे, पतित म्हणुनी भेट मजला ।
न घ्यावी कां वाटे, खबरहि अनाथाचि तुजला ॥
नतोद्धारायाची, सय अझुनि कां येउंच नये ।
अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये ॥१॥
म्हणेना बाई ये, जवळ पिपिलीके शर्करा ।
म्हणेना अंगासी, मर्दन मला केशर करा ॥
तसें बुद्ध्या येणें, मज तुजकडे भाग पडतें ।
अगाई रेणुके ! मजविण तुझें काय अडतें ॥२॥
अनंदे तूं भेटी, खचित मज देशील म्हणुनी ।
अनंदें मीं होतों, अजवर अयुष्यासि गणुनी ॥
निदानीं राहीला, मरणलग हा वाद शिलकीं ।
अगाई रेणुके ! कशि तुं निगमा वादशिल कीं ॥३॥
उपेक्षा दीनाची, करतिस तुझी बाइ मरजी ।
नसे जागा द्याया, तुजवर अपीलाचि अरजी ॥
दया माया कांहीं, मजविषयिं चित्तांत नसुं दे ।
अगाई रेणुके ! अठवण तुला माझि असुं दे ॥४॥
अनावृष्टीनें या, मरतिल किती जीव न कळे ।
तुझीं हीं जीं बाळें, जगतिल किती जीवनकळे ॥
कसें झालें ? आलें, प्रलयसम हें वर्ष बिघन ।
अगाई रेणुके ! सदय ह्रदयें वर्षवि घन ॥५॥
जिलाही दीनाची, निगम म्हणती कल्पलतिका ।
दिनाचा वेलीनें कवळुनी गळा कापिल ति कां ॥
कशी झाली रक्षा – कर हयग्रिवा सायक रसी ।
अगाई रेणुके ! विपरित असें काय करसी ॥६॥
असोनी तूं माझ्या, ह्रदयिं फिरवीसी दशदिशा ।
कुटस्था लावीली, जनन मरणाची अवदशा ॥
सवेंची म्हातारा, करुनि करिसी बाळ तरणा ।
अगाई रेणुके ! तुजजवळ ही कां प्रतरणा ॥७॥
करावें तें केलें, तिळभर उणें नाहिं पडलें ।
तुझ्या एक्या नामीं, सकलहि मला धर्म घडले ॥
कृपेचें राहीलें, उचित प्रिय देणें तुजकडे ।
अगाई रेणुके ! लवकर अतां घे मजकडे ॥८॥
अहो मी अन्यायी, म्हणवुन उपेक्षा करुं नये ।
क्षमावंते, माते ! निजपथ क्षमेचा त्यजुं नये ॥
पतीतोद्धारायास्तव मिरविसी कंकण करीं ।
अगाई रेणुके ! पतित मी अहों पावन करी ॥९॥
दिनाची तूं आई, अलिस दृढ आह्मां समजुनी ।
कृपादृष्टी ठेवी, निज परशुरामा समजुनी ॥
तरी दीनाला घे, जवळ स्तन देवोनि अननीं ।
अगाई रेणूके ! जरि तुं अससी दीन – जननी ॥१०॥
स्वयें विष्णूदासा – वदनिं वदवीसी शिखरिणीं ।
जशी अंबा रंभा, मधुफळ रसाची शिकरिणी ।
तशी ही सद्विद्याक्षर शिकविशी बोधक मला ।
अगाई रेणुके ! नमन तुझिया पादकमला ॥११॥

भूपाळ्या-1 Morning holy prayers in Indian tradition

Morning holy prayers in Indian tradition

प्रातःकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व देवांचे, संतांचे, स्मरण करण्याची आपली परंपरा आहे. आजकाल ती लोप पावत चालली आहे. बऱ्याच लोकांना प्रातःस्मरण करण्याची इच्छा असते, पण संबंधित साहित्य सहज उपलब्ध  नसते. या ठिकाणी आपले परंपरागत साहित्य, वेगवेगळ्या भूपाळ्या, इत्यादि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या उपक्रमातील पहिले पुष्प आज प्रकाशित करीत आहोत. यानंतर अजून भूपाळ्या, स्तोत्रे, इत्यादि या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. 

आपण ब्लॉग ला subscribe केल्यास नवीन पोस्ट प्रकाशित होताच सर्वप्रथम आपणास नोटिफिकेशन मिळू शकेल. 

माधव भोपे 

ganapati

भूपाळी श्री गणपतीची

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिद्धींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथा  शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । कंठी हार  साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी  शोभा । स्मरता उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

shriram

भूपाळी रामाची

उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिले भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥

vitthal-rukhumai

भूपाळी पंढरीची

उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविध ताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपति दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी । महादोष  हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर  । पैलपार तरतील ॥ ४ ॥

shri vishnu-1

भूपाळी श्रीविष्णूची-1

राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥


माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥


केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥


प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥


पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥

shri vishnu-2

भूपाळी श्रीविष्णूची-2  

[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥


भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥


सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रल्हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥


रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥


झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महामुद्गल  ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥


तुझा नामदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥


घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥


मीराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोनि  वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥


कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥


गूळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥


गरुडपारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाचा ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥


हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥


निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-5

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-5

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-4    वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

याठिकाणी, अहंकार, हा शब्द, आपला consciousness, अशा अर्थाने लक्षात घ्यायला हवा. गीतेत अहंकार हा शब्द ५ ठिकाणी आला आहे. त्यातील पाहिला उल्लेख, ७ व्या अध्यायात, चौथ्या श्लोकात आलेला आहे.

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च |
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा||

 भूमि, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतें, आणि मन बुद्धि आणि अहंकार, या आठ प्रकारांने विभाजित असलेली ही माझी ‘अपरा’ म्हणजे जड प्रकृती आहे.

तसेंच १३ व्या अध्यायात, ५ व्या श्लोकात,

महाभूतान्यङ्ककारो बुद्धिरव्यक्त मेव च |

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचरा: ||

 क्षेत्र क्षेत्रज्ञ योगा मध्ये, क्षेत्राच्या वर्णनात वरील श्लोक आला आहे, पाच महाभूतें, अहंकार, बुद्धि, आणि ‘अव्यक्तम्’ एव, म्हणजे मूल प्रकृति सुद्धा, दहा इंद्रियें, एकम् म्हणजे एक ‘मन’ आणि पञ्च इन्द्रिय गोचरा, म्हणजे पाच इंद्रियांचे विषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे क्षेत्र आहेत असे सांगितले आहे.

मनुष्याचे उद्दिष्ट जरी, सत्व रज, तम या तीन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचे असले, आणि मन, बुद्धि आणि अहंकार यांच्या अतीत असलेले तत्व जाणून घेण्याचे असले, तरी, जो पर्यंत ते उद्दिष्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत, ही सर्व ‘instruments’ सुस्थितीत रहावीत हीच प्रार्थना देवीकडे केली आहे.

आपण नेहमी वापरतो त्या अर्थाने अहंकार हा शब्द, किंवा त्याचे रूप, गीतेच्या  खालील श्लोकांमध्ये आले आहे, ते जिज्ञासूंनी पाहावे. (अध्याय- श्लोक)

१६-१८; १८-१७;, १८- ५८,५९.

आपण ४२ व्या श्लोकापर्यंत अर्थ पाहिला. देवी कवच एकूण ५६ श्लोकांचे आहे. उर्वरित १४ श्लोकांबद्दल थोडक्यात पाहू.

पदमेकं न गच्छेतु यदीच्छेच्छुभमात्मनः।
कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैव गच्छति॥43

 

मनुष्य आपले शुभ इच्छित असेल तर कवचाशिवाय एक पाऊल ही पुढे टाकू नये. (या स्तोत्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा श्लोक आहे असे वाटते.)

तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः।
यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम्‌।

परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान्‌॥44

 

कवचाने सुरक्षित मनुष्य जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला धन प्राप्ति होईल आणि पूर्ण कामनांची सिद्धि करवणाऱ्या विजयाची प्राप्ति होईल. तो ज्या ज्या अभीष्ट वस्तूचे चिन्तन करेल त्या त्या वस्तूची त्याला निश्चित प्राप्ति होईल. तो पुरुष या पृथ्वीवर तुलनारहित महान ऐश्वर्य प्राप्त करील.

निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः।

त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यः कवचेनावृतः पुमान्‌॥45

 

कवचाने सुरक्षित मनुष्य निर्भय होतो. युद्धात त्याचा पराजय होत नाही आणि तो तीन्ही लोकांत पूजनीय होतो.

इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम्‌।
यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः॥46

 

देवीचे हे कवच, देवांनाही दुर्लभ आहे. जो रोज नियमपूर्वक तीन्ही संधीकाळी (सकाळ, दुपार, संध्याकाळ) श्रद्धेने या स्तोत्राचा पाठ करतो,

दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येष्वपराजितः।
जीवेद् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः॥47

 

त्याला दैवी कला प्राप्त होते, आणि तो तीन्ही लोकांमध्ये कधीही पराजित होत नाही. तो अपमृत्यू पासून रहित होतो, आणि शताधिक वर्षेंपर्यंत जीवित राहतो.

नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः।
स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम्‌॥48

 

(लूत आणि विस्फोटक हे व्याधींचे प्रकार आहेत) या व्याधी नष्ट होतात त्याच्यावर, स्थावर, जंगम आणि कृत्रिम विषाचा काहीही परिणाम होत नाही. [कण्हेर, भांग, अफू, धत्तुरा, आदींचे ‘स्थावर’ विष म्हटले जाते. साप, विंचू इत्यादि विषारी प्राणी चावल्यामुळे चढलेले म्हणजे, ‘जंगम’ विष, आणि, अहिफेन (अफू) आणि तेल यांच्या संयोगाने किंवा, तत्सम विविध वस्तूंच्या संयोगाने बनलेले कृत्रिम विष]


अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले।
भूचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः॥49

 

या पृथ्वीतलावर मारण, मोहन आदि जितके अभिचार प्रयोग आहेत, तसेंच अशा प्रकारचे जितकेही मंत्र यंत्र आहेत, ते सर्व, या कवचाला हृदयात धारण केल्याने त्या मनुष्याला पाहताच नष्ट होतात. पृथ्वीवर विचरणारे ग्रामदेवता, आकाशचारी देवविशेष, जलदेवता, उपदेश मात्राने सिद्ध होणारे निम्न कोटीचे देवता,

 

सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा।
अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः॥50

 

ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः।
ब्रह्मराक्षसवेतालाः कूष्माण्डा भैरवादयः॥51

 

नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते।
मानोन्नतिर्भवेद् राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम्‌॥52

 

आपल्या जन्माच्या बरोबर प्रकट होणारे देवता (सहजा) कुलदेवता, माला (कंठमाला इत्यादि), डाकिनी, शाकिनी, अंतरिक्षामध्ये विचरणाऱ्या घोर डाकिनी, ग्रह, भूत, पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, ब्रम्हराक्षस, वेताळ, कूष्मांड आणि भैरव आदि अनिष्टकारक देवता सुद्धा हे कवच हृदयात धारण केलेल्या मनुष्याला पाहूनच पळून जातात. कवचधारी पुरुषाला राजासमान वृद्धि प्राप्त होते.

(वरील विवरणात दिलेल्या ‘कुलदेवता’ या शब्दाचा आपापल्या कुलदेवते सोबत गल्लत करू नये. वरील सर्व क्षुद्र देवता म्हणवल्या जातात, आणि निरनिराळ्या योनितल्या देवता आहेत, ज्या की त्या त्या पातळीवर exist होतात.)

यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले।

जपेत्सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा॥53

यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्‌।
तावत्तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी॥54

 

कवचाचा पाठ करणारा पुरुष आपल्या कीर्तीने विभूषित भूतलावर सुयशासाहित वृद्धीला प्राप्त होतो. जो प्रथम कवचाचा पाठ करून मग सप्तशतीचा चण्डी पाठ करतो तो, जोपर्यन्त वन, पर्वत, आणि काननासाहित ही पृथ्वी टिकून रहाते, तोपर्यंत त्याची पुत्र, पौत्र आदि संतान परंपरा कायम राहते.

देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम्‌।
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः॥55

 

नंतर, देहाचा अंत होतो, तेंव्हा, तो पुरुष भगवती महामायेच्या प्रसादाने त्या नित्य परम पदाला प्राप्त होतो, जे की देवांलाही दुर्लभ आहे.

लभते परमं रूपं शिवेन सह मोदते॥ॐ॥56

तो सुंदर दिव्य रूप धारण करतो आणि शिवासहित आनंदाचा भागीदार होतो.

आजकालच्या मनोविज्ञानात सकारात्मक विचारांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. आपली संस्कृति पाहिली, तर पावलोपावली, मनाला नकारात्मक विचारांपासून परावृत्त करून  सकारात्मक विचारांकडे जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतो, जो की खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपल्या अवतीभोवती सगळीकडे आसुरी विचार आणि आचार बोकाळलेले दिसतात, आणि तेच कसे नॉर्मल आहेत असे उदात्तीकरण केले जाते. अशा काळात, अशा मंगल आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या आपल्या पुरातन ठेव्याचे आपण जतन केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.  

ॐ शांतिः शांतिः शांतिः!

माधव भोपे

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

१७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते.

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे रक्षण कर. आग्नेय दिशेला अग्निशक्ति तू माझे रक्षण कर.

आठ दिशांची माहिती आपणा सर्वांना आहेच. तरीही, उजळणीसाठी आपण अष्टदिशांचे चित्र पाहू

Durgadevi kavach

देवी कवचामध्ये पूर्व दिशेपासून सुरुवात करून, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य अशाप्रकारे क्रमाने सर्व दिशांनी ती देवी माझे रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे. वरील आठ दिशांच्या शिवाय, ऊर्ध्व आणि अध अर्थात वर आणि  खाली या प्रकारे १० दिशा झाल्या. म्हणून एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

याशिवाय, पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे:–अग्रतः म्हणजे पुढे, आणि  पृष्ठतः म्हणजे मागे, जया आणि विजया देवी माझे रक्षण करोत. डाव्या बाजूला अजिता आणि दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अपराजिता माझे रक्षण करो. १७ ते ४२ या श्लोकांत विविध अंगांचे आणि संकल्पनांचे रक्षण करण्याविषयी देवीची विविध नांवे घेऊन प्रार्थना केली आहे.

कवचामध्ये उल्लेख केलेले विविध अवयव आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांची माहिती बघूयात

1

शिखा (शेंडी)

उद्योतिनी

2

मूर्ध्नि (मस्तक भाग)

उमा

3

ललाट (कपाळ)

मालाधरी

4

भुवया

यशस्विनी

5

भ्रूमध्य

त्रिनेत्रा

6

नाकपुड्या (नासिका)

यमघण्टा

7

दोन्ही डोळ्यांचा मध्यभाग

शङ्खिनी

8

श्रोत्र (कान)

द्वारवासिनी

9

कपोल (गाल)

कालिका

10

कर्णमूल

शांकरी

11

नासिका (नाक): इथे नाकपुड्या आणि नाक हे दोन वेगवेगळे कल्पिले आहेत)

सुगन्धा

12

उत्तरोष्ठ(वरील ओठ)

चर्चिकादेवी

13

अधरोष्ठ(खालचा ओठ)

अमृतकला

14

जिंव्हा

सरस्वती

15

दात

कौमारी

16

कण्ठप्रदेश

चण्डिका

17

घण्टिका (गळ्याची घाटी)

चित्रघण्टा

18

तालुका (टाळू)

महामाया

19

चिबुक (हनुवटी)

कामाक्षी

20

वाचा

सर्वमङ्गला

21

ग्रीवा (गळा)

भद्रकाली

22

पृष्ठवन्श(मेरुदण्ड्)

धनुर्धरी

23

बहिः कण्ठ(कण्ठाचा बाहेरील भाग)

नीलग्रीवा

24

नलिका(कण्ठनळी)

नलकूबरी

25

स्कन्धयोः (दोन्ही खांदे)

खड्गिनी

26

दोन्ही बाहू म्हणजे दण्ड

वज्रधारिणी

27

दोन्ही हात

दण्डिनी

28

अङ्गुली(हाताची बोटें)

अम्बिका

29

नखें

शूलेश्वरि

30

कुक्षि (कोख, उदर) पहा: वामकुक्षी

कुलेश्वरी

31

स्तन

महालक्ष्मी

32

मन

शोकविनाशिनी

33

हृदय

ललितादेवी

34

उदर

शूलधारिणी

35

नाभि

कामिनी

36

गुह्य

गुह्येश्वरी

37

मेढ्र(लिंग)

पूतना आणि कामिका

38

गुदा

महिषवाहिनी

39

कटी (कंबर)

भगवती

40

जानु (गुडघे)

विन्ध्यवासिनी

41

जंघा(म्हणजे पोटऱ्या)

महाबला, सर्व कामना पूर्ण करणारी

42

गुल्फ(पायाचे घोटे)

नारसिंही

43

पादपृष्ठ(पायांचा वरचा भाग)

तैजसी

44

पायाची बोटें

श्री देवी

45

पायाचे तळवे

तलवासिनी

46

नखें(पायाची)

दंष्ट्राकराली

47

केश

ऊर्ध्वकेशिनी

48

रोमकूप अर्थात, शरीरावरील रोमछिद्र

कौबेरी

49

त्वचा

वागीश्वरी

50

रक्त, मज्जा, वसा,मांस, अस्थि, मेद

सप्त धातूंपैकी सहा धातू: रक्त-blood, मज्जा- bone marrow and nervous tissue,

वसा-म्हणजे रक्तामध्ये स्थित स्नेह (ज्याला आजकालच्या भाषेत fatty acid म्हणता येईल), मांस म्हणजे स्नायू म्हणता येईल, अस्थि म्हणजे हाडें, आणि मेद म्हणजे चरबी किंवा fat. वरील सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत हे ओघानेच आले.

पार्वति

51

अंत्र म्हणजे आतडे किंवा gut.

कालरात्री

52

पित्त (शरीरात अन्न पचविण्यासाठी पित्त आवश्यक आहे) म्हणजेच वेगवेगळे पाचक रस.

मुकुटेश्वरी

53

पद्मकोश म्हणजे मूलाधार आदि कमलकोश

पद्मावती

54

कफ (कफ म्हणजे आपण समजतो तसा चिकट पदार्थ नव्हे, आयुर्वेदात कफ संकल्पना वेगळी आहे)

चूडामणी

55

नखांचे तेज

ज्वालामुखी

56

शरीरातील समस्त संधि (सांधे)

अभेद्या (जिचे भेदन कोणतेही अस्त्र करू शकत नाही)

57

शुक्र

ब्रह्माणी

58

छाया

छात्रेश्वरी

59

अहंकार, मन, बुद्धि

धर्मधारिणी

60

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण

वज्रहस्ता

61

प्राण

कल्याण शोभना

62

रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करतांना

योगिनी

63

सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण

नारायणी

64

आयुष्य

वाराही

65

धर्म

वैष्णवी

66

यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

चक्रिणी

67

गोत्र

इंद्राणी

68

पशू

चंडिका

69

पुत्राचे रक्षण

महालक्ष्मी

70

भार्येचे रक्षण

भैरवी

71

पंथ (अर्थात, while travelling)

सुपथा

72

मार्ग

क्षेमकरी

73

राजाच्या दरबारी

महालक्ष्मी

74

सर्व ठिकाणी

विजया

आपल्याकडे सर्व देवांची कवचें प्रसिध्द आहेत. रामरक्षा हेही एक प्रकारचे कवच आहे, आणि   डोक्यापासून ते पायापर्यंत च्या अवयवांचा उल्लेख आहे. आपल्यापैकी काहींनी योगनिद्रेचा class कधी केला असेल. त्यामध्ये, शरीराच्या एकेक अवयवांवर आपला consciousness घेऊन जाऊन, शरीराचा तो तो भाग शिथिल होत आहे, अशी कल्पना करायची असते.

देवी कवचामध्ये आपल्या शरीराचे बाह्यभाग, आणि बरेच अंतर-अवयव यांच्या कडे आपले ध्यान  (consciousness) घेऊन जाऊन, त्या त्या भागांना, किंवा, अंतर्गत अवयवांना, देवीच्या एकेक नावाशी, रूपाशी, जोडले आहे, आणि त्या त्या भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे. या कवचात स्थूल अवयवांसोबत काही सूक्ष्म गोष्टी, आणि काही concepts ही जोडले आहेत. त्यातील, सत्व, रज आणि तम हे गुण, रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करणारी इंद्रियें. (बाह्य इंद्रियें नव्हे, तर त्या त्या संवेदना जाणवणारी मेंदूतील centres), यांचा उल्लेख आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात. तसेच, मन आणि बुद्धि यांचे रक्षण कर, हेही लक्षात येऊ शकते. पण अहंकार? आपल्या मनात कदाचित अशी शंका येऊ शकते, की माझ्या अहंकाराचे रक्षण कर, असे कसे म्हटले जाऊ शकते? कारण अहंकार हा शब्द आपल्याकडे सहसा तो मनुष्य फार अहंकारी आहे, म्हणजे गर्विष्ठ आहे, अशा अर्थाने वापरला जातो. अहंकाराचा त्याग करा, असेच सर्व ठिकाणी सांगितल्याचे ऐकायला, वाचायला, येते. मग अहंकाराचे रक्षण कर असे कसे?

याबद्दल वाचूयात पुढील भागात 

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-3

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-3

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

 

मागील भागावरून पुढे चालू 

आता आपण  १७ व्या श्लोकापासून ते ४२ व्या श्लोकापर्यंत जे देवी कवच आहे, त्याची विशेषता पाहू:

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी ।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥१७॥

दक्षिणेऽवतु वाराही नैर्ऋत्यां खड्गधारिणी।

प्रतीच्यां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी॥१८॥

उदीच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी।

ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदधस्ताद् वैष्णवी तथा ॥१९॥

एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

जया में चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः॥२०॥

अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता।

शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता॥२१॥

मालाधारी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी।

त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके॥२२॥

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी।

कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी॥२३॥

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका।

अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती॥२४॥

दन्तान्‌ रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका।

घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके॥२५॥

कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमंगला।

ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी॥२६॥

नीलग्रीवा बहिःकण्ठे नलिकां नलकूबरी।

स्कन्धयोः खड्गिनी रक्षेद् बाहू में व्रजधारिणी॥२७॥

हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगुलीषु च।

नखाञ्छूलेश्वरी रक्षेत्कुक्षौ रक्षेत्कुलेश्वरी॥२८॥

स्तनौ रक्षेन्महादेवी मनः शोकविनाशिनी।

हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी॥२९॥

नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं गुह्येश्वरी तथा।

पूतना कामिका मेढ्रं गुदे महिषवाहिनी॥३०॥

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी।

जंघे महाबला रक्षेत्सर्वकामप्रदायिनी॥३१॥

गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तैजसी।

पादांगुलीषु श्री रक्षेत्पादाधस्तलवासिनी॥३२॥

नखान्‌ दंष्ट्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी।

रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा॥३३॥

रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती।

अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी॥३४॥

पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा।

ज्वालामुखी नखज्वालामभेद्या सर्वसंधिषु॥३५॥

शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा।

अहंकारं मनो बुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी॥३६॥

प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकम्‌।

वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याणशोभना॥३७॥

रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी।

सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा॥३८॥

आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी।

यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी॥३९॥

गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके।

पुत्रान्‌ रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी॥४०॥

पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा।

राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता॥४१॥

रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु।

तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती पापनाशिनी॥४२॥

यात प्रथम सर्व दिशांचा उल्लेख असून दाही दिशांना देवी माझे रक्षण करो, अशी प्रार्थना आहे. तसेच, मागून पुढून, डाव्या, उजव्या बाजूकडून रक्षण करो. तद्नंतर, शेंडी पासून सर्व अवयवांचे रक्षण करण्याविषयी तपशीलवार आले आहे. शेंडी, मस्तक, ललाट (कपाळ), भुवया, भ्रुवोर्मध्य, दोन्ही डोळ्यांचा मध्य, नाकपुड्या, कान, कपोल(म्हणजे गाल), कानाचे मूळ (कर्णमूळ), नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, दात, कन्ठ, गळ्याची घाटी, तालु, चिबुक म्हणजे हनुवटी, बोलण्याची शक्ति म्हणजे वाणी, कण्ठाचा बाहेरील भाग, कण्ठनळी, दोन्ही खांदे, दोन्ही दंड, दोन्ही हात, त्यांची बोटें,  आणि नखें, पोट, दोन्ही स्तन, हृदय, उदार, नाभी, गुह्यभाग, (मेढ्र)लिङ्ग, गुदा, कटिभाग, गुडघे(जानुनी विन्ध्यवासिनी), दोन्ही जंघा (म्हणजे मराठीत पोटऱ्या), गुल्फ म्हणजे पायाचे घोटे ज्याला इंग्लिश मध्ये ankle म्हणतात. पायांचा पृष्ठ भाग, पायांची बोटें, पायांचे तळवे,  नखें, केश, रोमकूप म्हणजे शरीरावरील रोमावली. त्वचा,

रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे, मेद; आंत (आंतडे), 

एवढेच नव्हे, तर, शरीरातील पित्त, कफ, नखांचे तेज, शरीरातील समस्त संधि,

वीर्य, छाया (सावली), प्राण अपान इत्यादि पंचप्राण, अहंकार, मन बुद्धि

एवढेच नाही, तर रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांचा अनुभव, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण,

आयु,

धर्म, यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

वरील सर्व गोष्टी स्वतः च्या संदर्भातील झाल्या,

आता त्यानंतर, गोत्र, पशु, पुत्र, पत्नी यांचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे

राजाच्या दरबारात तसेच सर्व भयापासून रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे.

एवढे कमी आहे की काय, म्हणून शेवटी असे म्हटले आहे, की वरील वर्णनात जर एखादे स्थान राहून गेले असेल तर त्याचे ही रक्षण कर.

इतका comprehensive विचार केला आहे, हे बघून मन थक्क होते.

क्रमशः

माधव भोपे