Morning holy prayers in Indian tradition
प्रातःकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व देवांचे, संतांचे, स्मरण करण्याची आपली परंपरा आहे. आजकाल ती लोप पावत चालली आहे. बऱ्याच लोकांना प्रातःस्मरण करण्याची इच्छा असते, पण संबंधित साहित्य सहज उपलब्ध नसते. या ठिकाणी आपले परंपरागत साहित्य, वेगवेगळ्या भूपाळ्या, इत्यादि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या उपक्रमातील पहिले पुष्प आज प्रकाशित करीत आहोत. यानंतर अजून भूपाळ्या, स्तोत्रे, इत्यादि या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील.
आपण ब्लॉग ला subscribe केल्यास नवीन पोस्ट प्रकाशित होताच सर्वप्रथम आपणास नोटिफिकेशन मिळू शकेल.
माधव भोपे
भूपाळी श्री गणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिद्धींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथा शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । कंठी हार साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी शोभा । स्मरता उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिले भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
भूपाळी पंढरीची
उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविध ताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपति दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी । महादोष हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर । पैलपार तरतील ॥ ४ ॥
भूपाळी श्रीविष्णूची-1
राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥
माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥
केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥
प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥
पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥
भूपाळी श्रीविष्णूची-2
[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥
भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥
सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रल्हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥
रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥
झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महामुद्गल ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥
तुझा नामदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥
घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥
मीराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोनि वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥
कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥
गूळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥
गरुडपारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाचा ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥
हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥
निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.