Devotee-3 Bhagwan Brahma
याआधी आपण श्री गणेश यांची मातृ पितृ भक्ति पाहिली तसेच भगवान शिवांची विष्णुभक्ति पाहिली. यानंतर त्रिदेवांमधील, सृष्टिनिर्मितीचे कार्य करणारे ब्रह्मदेव यांची भक्ति जाणून घेणार आहोत.
श्रीमद् भागवतात, श्री यमराजाने आपल्या दूतांना प्रमुख भागवताचार्यांचे वर्णन करतांना सांगितले, की
- भगवान ब्रह्मा, 2. भगवान शंकर, 3. देवर्षि नारद,
- सनकादि कुमार, 5. महर्षि कपिल, 6. महाराज मनु,
- भक्तराज प्रह्लाद, 8. महाराज जनक, 9. श्रीभीष्मजी,
- दैत्यराज बलि, 11. महामुनी शुकदेव आणि मी स्वतः, म्हणजे 12. यमराज,
असे बारा आचार्य आहेत जे की रहस्यमय दुर्बोध विशुद्ध भागवत धर्माला जाणतात. त्या बारा आचार्यां मध्ये भगवान ब्रह्मा हे प्रथम आचार्य आहेत.
स्वयंभूर्नारदः शम्भूः कुमारः कपिलो मनुः|
प्रह्लादो जनको भीष्मो बलिर्वैयासकिर्वयम||
द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटाः|
गुह्यं विशुद्धं दुर्बोधं यं ज्ञात्वामृतमश्नुते|| (श्रीमदभागवत श्लोक 6.3.20-21)
सृष्टीच्या आरंभी शेषशायी भगवान विष्णूंच्या नाभीतून एक ज्योतिर्मय कमल प्रकट झाले आणि त्या कमळाच्या कर्णिकेवर भगवान ब्रह्मा प्रकट झाले.
ब्रह्मदेवाने हे पाहण्यासाठी, की हे कमल कुठून येते आहे, त्या कमळाच्या नाळेमध्ये, म्हणजे पोकळ दांडीमध्ये प्रवेश केला आणि हजार वर्षपर्यन्त शोधत राहिले. पण त्यांना काहीच पत्ता लागला नाही, तेंव्हा ते निराश होऊन कमळाच्या मुखावर परत आले. त्यावेळी त्यांना ‘तप’ हा शब्द दोनवेळा ऐकायला आला. त्यानुसार ब्रह्मदेव दीर्घ कालपर्यंत तप करीत राहिले. तपाद्वारे त्यांचे अंतःकरण पूर्ण निश्चल झाल्यानंतर त्यांना आपल्या अंतःकरणातच शेषशायी भगवान श्री विष्णूचे दर्शन झाले. ब्रह्मदेवाद्वारे स्तुति केली गेल्यानंतर, भगवंताने त्यांना चार श्लोकांमध्ये भागवताचा उपदेश केला. तेच मूळ चतुः श्लोकी भागवत होय.
अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम्।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥१ ॥
श्रीभगवान म्हणतात – सृष्टीपूर्वी फक्त मीच होतो. माझ्या पलीकडे काही नव्हते, खरे-खोटे किंवा त्यापलीकडे. सृष्टी नसतानाही (संहाराच्या वेळी) मी तिथेच राहतो. ही सृष्टीची सर्व रूपे मीच आहे आणि या सृष्टी, परिस्थिती आणि संहारातून जे काही उरले आहे, तेही मीच आहे.
ऋतेऽ र्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽऽभासो यथा तमः ॥ २ ॥
माझ्या मूळ तत्वाव्यतिरिक्त जे सत्य दिसते (दिसते) पण आत्म्यात दिसत नाही (दिसत नाही), त्या अज्ञानाला आत्म्याचा भ्रम समजा जो प्रतिबिंब किंवा अंधारासारखा मिथ्या आहे ॥२॥
यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे पाच महान तत्वे (पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश) जगाच्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंमध्ये अंतर्भूत असूनही त्यांचा अंतर्भाव नाही, त्याचप्रमाणे मी सर्व गोष्टींमध्ये उपस्थित असूनही, मी सर्वांपासून वेगळा आहे ॥3॥
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्व जिज्ञासुनाऽऽत्मनः।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा ॥ ४ ॥
ज्याला आत्म्याचे सार जाणून घ्यायचे आहे, त्याच्यासाठी एवढेच जाणून घेणे योग्य आहे की अन्वय (सृष्टी) किंवा व्यतिरेक (विनाश) या क्रमाने सर्वत्र आणि सदैव (स्थान आणि काळाच्या पलीकडे) राहणारा घटक तोच आत्मा आहे. – सार.
याप्रकारे ब्रह्मदेवाने साक्षात भगवंतांकडून सृष्टीच्या सुरुवातीला तत्त्वज्ञान प्राप्त केले.. नंतर ब्रह्मदेवाने देवर्षि नारदांनी विचारल्यावरून त्यांना या भागवत तत्त्वाचा उपदेश केला आणि भगवतकृपेने हृदयात स्फुरलेल्या भगवंतांच्या लीलांपैकी मुख्य चोवीस अवतारांची चरित्रे सूत्ररूपाने सांगितली. देवर्षि नारदांनी ते तत्वज्ञान आणि भगवतचरित्र महर्षि व्यासांना ऐकविले आणि व्यासांनी त्याला श्रीमद् भागवताच्या स्वरूपात अठरा सहस्र श्लोकांच्या स्वरूपात शुकदेव यांना ऐकविले. या क्रमाने श्रीमद् भागवताचा सर्व लोकांत विस्तार झाला.
जेंव्हा जेंव्हा पृथ्वी असुरांच्या अधर्माचरणाने पीडित होते, तेंव्हा तेंव्हा ती देवतांसह भगवान विष्णूंकडे जाऊन आपले गाऱ्हाणे मांडते. त्यावेळी ब्रह्मदेव त्या परम परमेश्वराची प्रार्थना करून जसा त्यांचा आदेश होईल त्याप्रमाणे देवतांना आदेश देतात. अशा प्रकारे भगवंताचे बहुतेक अवतार हे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे होतात आणि त्या त्या अवतारांच्या वेळी ब्रह्मदेव भगवंताच्या लीलांचे दर्शन करण्यासाठी उपस्थित होतात.
जेंव्हा भगवान वामन अवताराने दैत्यराज बळीच्या यज्ञात तीन पावले भूमीच्या दानाचा संकल्प करून घेतला, आणि संबंध पृथ्वी एका पायाने व्यापून आपल्या विराट स्वरूपाला प्रकट करीत दुसरा पाय स्वर्गाकडे नेला, तेंव्हा भगवंताचा तो चरण ब्रह्मलोकापर्यन्त पोंचला. त्यावेळी ब्रह्मदेवाने मोठ्या श्रद्धेने तो चरण धुतला, आणि त्याची पूजा केली. भगवान वामनाच्या त्या चरणाच्या अंगठ्याच्या नखामुळे ब्रह्मांडाचे बाह्य आवरण थोडेसे फाटले आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडातून बाहेर ब्रह्मवारि भगवंताच्या श्रीचरणावर आले. ब्रह्माने भगवंताचे ते चरणोदक, म्हणजेच ‘ब्रह्मद्रव’ आपल्या कमंडलूमध्ये भरले, आणि सदैव ते चरणोदक आपल्या जवळ ठेवू लागले. महाराज भगीरथ यांनी तप केल्यावर त्याच कमंडलूमधील थोडेसे द्रव ब्रह्माने सोडले, ते तीन रूपांमध्ये झाले. ती तीन रूपें म्हणजे, स्वर्गातील मंदाकिनी, पाताळातील भोगावती, आणि पृथ्वीवर गंगा यांच्या रूपाने भगवंताचे तेच चरणोदक साक्षात ब्रह्मद्रव प्रवाहित होत आहे. म्हणूनच गंगा ही विष्णू चरणांपासून निघाली आहे अशी आपली श्रद्धा आहे. 
ब्रह्माजी ने स्वतः आपल्या स्थितीचे वर्णन करीत म्हटले आहे, की माझी वाणी कधी असत्याकडे प्रवृत्त होत नाही, माझे मन कधी असत्याकडे जात नाही, माझी इंद्रियें कधी असन्मार्गाकडे झुकत नाहीत, कारण मी हृदयामध्ये अत्यंत उत्कंठेने श्रीहरि चे नाम धारण करतो.
अशा प्रकारे भागवत धर्माच्या प्रथम आचार्य ब्रह्माजी ने सर्वांना हा उपदेश केला आहे की वाणीने कधी असत्य भाषण होऊ नये, मन कुमार्गाला जाऊ नये, इंद्रियें विषयाकडे प्रवृत्त होऊ नयेत, यासाठी एकमात्र उपाय म्हणजे भगवंताचे नाम हृदयात धारण करणे हा आहे.
अशा प्रकारे, भक्तांच्या मालिकेत आपण श्री गणेश, भगवान शिव यांच्यानंतर ब्रह्मदेवांचे स्मरण केले. यानंतरच्या लेखात आपण परम भक्त श्री यमराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यानंतर, सनकादि कुमार, देवर्षि नारद, ब्रह्मर्षि वशिष्ठ, महर्षि अत्रि, महर्षि भृगु यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
श्रीहरि!
संकलक- माधव भोपे