Roads in America- अमेरिकेतील रस्ते
अमेरिकेची महत्वाची जमेची बाजू म्हणजे अमेरिकेतील रस्ते. भरपूर रुंद, व्यवस्थित बांधलेले, वेगवान आणि विना थांबता, विना अडथळ्याचा प्रवास करता येण्यासारखे रस्ते.
३ ते ४ लेन च्या रस्त्यांवर (प्रत्येकी ३ ते ४, म्हणजे दोन्ही बाजूंनी ६ ते ८ लेन ) तुम्ही विना अडथळा सरासरी ताशी १०० ते १२५ किमी च्या वेगाने आरामात जाऊ शकता. रस्ते दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे टोल वेज, म्हणजे ज्या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी टोल द्यावा लागतो, आणि दुसरे म्हणजे फ्री वेज, म्हणजे ज्यावर टोल द्यावा लागत नाही.
फ्री वेज हे टोल वेज च्या समांतर, पण थोडे बाजूला, कमी रुंद (पण तरीही आपल्याकडील मोठ्या रस्त्यांपेक्षा ही जास्त रुंद) असे रस्ते, जिथे वेगमर्यादा कमी असते. तुम्हाला रमत गमत, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत जायचे असल्यास, तुम्ही अशा फ्री वेज ने जाऊ शकतात.
आणि हो, दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर, वेग मर्यादा सगळी वाहने कसोशीने पाळतात. ट्रॅफिक पोलिसाच्या गाड्या उपरोक्त दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर कायम गस्त घालत असतात, आणि तुम्ही जर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जातांना आढळला, तर लगेच तुम्हाला अडवले जाते.
अमेरिकेत कायद्याचा चांगलाच दरारा आहे. कोणीही पोलिसांशी हुज्जत घालत नाही किंवा धमकावत नाही. इतकेच नाही तर पोलिसांनी इशारा केल्यानंतर गुपचुप गाडी बाजूला घेतली जाते व पोलिसांशी अत्यंत आदराने बोलले जाते. कारण येथील ट्रॅफिक पोलिसांनाही खूप अधिकार आहेत, आणि कायदा मोडणार्यांची गय केली जात नाही.
आम्ही इथे असतांना एक बातमी खूप गाजली होती. एका माणसाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. तो थांबला ही. त्याच्या सोबत त्याची गर्ल फ्रेंड होती. अतिरेक्यांचा भीतीमुळे इथे, सहसा, अशा वेळी पोलीस, त्या व्यक्तीला हात वर करण्याची सूचना देतात. अशा वेळे हात वर करून, पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. चुकून जरी हात खिशाकडे गेला, तर, तुम्ही पिस्तुल काढता आहात असे वाटून पोलीस ऑफिसर लगेच त्याच्या जवळचे पिस्तुल काढून तुम्हाला गोळी ही झाडू शकतो. त्याला तसा पूर्ण अधिकार आहे. तर त्या माणसाचा हात खिशाकडे गेल्यामुळे ऑफिसरने गोळी झाडली व त्यात त्या गाडी चालकाचा मृत्यू झाला. तो चालक आफ्रिकन-अमेरिकन (ब्लॅक) असल्यामुळे नंतर बरीच निदर्शने वगैरे झाली. पण त्या ऑफिसर वर काहीही कारवाई झाली नाही, उलट त्याचे वरिष्ठ व सरकार त्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले.
आता टोल रस्ते म्हटल्यावर भारतातील टोल नाके डोळ्यासमोर येतील तर तसे अजिबात नाही. टोल रस्ते असूनही कुठे टोल नाके नाहीत, की गाड्यांचे थांबणे नाही. मग टोल कसा वसूल करतात? इथे जवळ जवळ प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतेच. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही क्रेडिट कार्डवरच चालते.
प्रवासासाठी स्वतःची कार हेच मुख्य साधन आहे, तर टोल रोड साठी तुम्हाला प्री पेड कार्ड मिळते. त्याचे एक स्टीकर तुम्ही तुमच्या कारच्या विंडस्क्रीन वर बाहेरच्या बाजूने लावलेले असते. तुम्ही जेंव्हा टोल रोड वरून जाता, तेंव्हा, त्या रोड वर ठराविक अंतरावर, उंच जागी लावलेले कॅमेरे तुमच्या कार वरील त्या स्टीकर वरील इन्फोर्मेशन सेन्स करतात आणि तुमच्या क्रेडिट कार्ड अकौंट मधून टोल ची रक्कम वजा होते. ( आता आपल्याकडेही अशी पद्धत आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे समजले; खरेच तसे झाले तर खूप बरे होईल. अर्थात, आपल्याकडील डोकेबाज मंडळी टोल कसा चुकवायचा याचे अनेक मार्ग सुरुवातीला शोधून काढतील- उदाहरणार्थ साईडने कट मारणे, स्टीकर झाकून टाकणे, इत्यादि) ज्यांच्या गाडीवर असे स्टीकर नसेल, त्यांच्या गाडीची माहिती कॅमेऱ्यात रजिस्टर होते आणि महिना अखेरीस त्यांना, त्या महिन्यात त्यांनी जेवढा प्रवास टोलच्या रस्त्यावरून केला असेल त्याचे, बिल पोस्टाने त्यांच्या घरी, तसेच ई-मेल वर येते.
आता आपल्या भारतीय मनाला हा प्रश्न पडू शकतो की बिल न भरले तर काय करून घेणार आहेत? कोण विचारणार आहे? तर याचे उत्तर असे, की अमेरिकेतील ९९ % लोक हे कायदा पाळणारे आहेत. तसे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहेत म्हटले तरी चालेल. आणि दुसरे म्हणजे, तुम्ही कुठलेही सरकारी बिल थकवले तर तुमच्यावर लगेच कायदेशीर कार्यवाही सुरु होते. त्यात उशीर, किंवा दयामाया नाही, की ओळखपाळख, राजकीय लागेबांधे, इत्यादीचा संबंध नाही. तिसरे म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डचा स्कोअर खाली येतो आणि परिणाम म्हणून तुमचा व्याजाचा दर वाढतो, त्यावरील लिमिट खाली येते आणि सर्वच बाजूंनी तुमची कोंडी होऊन जाते. त्यामुळे, सरकारी बिल न भरण्याचा वेडेपणा सहसा कुणीही करीत नाही.
या प्रशस्त अशा, सिमेंटने बांधलेल्या टोल वेज वर ठिकठिकाणी स्पष्ट शब्दात माहिती व सूचना लिहिलेल्या असतात (अर्थात त्यांचा अर्थ नीट कळण्यासाठी काही दिवस इथे राहणे आवश्यक आहे). तसेच इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स वर महत्वाचे संदेश झळकत असतात. एखादे संशयास्पद वाहन, किंवा कायदा मोडून पाळणारे एखादे वाहन असल्यास अशा वाहनांची माहिती या बोर्ड्स वर झळकत असते.
आम्हाला रस्त्यावर अशी माहिती अधून मधून वाचायला मिळत होती. अजून एक म्हणजे, या लांब लचक रस्त्यांवर, समजा एखादे वाहन मध्येच बंद पडले किंवा त्यांना काही कारणामुळे थोडेसे थांबावे लागले, तर रस्त्याच्या कडेला मधून मधून ठराविक अंतरावर जास्तीची जागा असते, जेथे की असे वाहन थोड्या वेळासाठी उभे करता येईल. त्यामुळे बाकीच्या ट्रॅफिकचा खोळंबा होत नाही. अमेरिकेतील असे टोल वेज हे गावांपासून किंवा मुख्य वस्तीपासून भरपूर लांब असतात, त्यामुळे असे रस्ते कुठल्याही गावाच्या भर वस्तीतून जात आहेत असे कधीच नसते. आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उंच आणि घनदाट अशी झाडे लावलेली असतात. त्यामुळे, गाडी चालवतांना छान वाटते.
तर अशा या रस्त्यांवर असलेली आणखी एक अप्रतिम सुविधा म्हणजे ठराविक अंतरावर असलेले “रेस्ट एरियाज” . रेस्ट एरिया म्हणजे टोल वे पासून थोड्या अंतरावर, सहसा हिरव्यागार झाडीत आतल्या बाजूस असलेली विश्रांतीची ठिकाणे. ही विश्रांतीची ठिकाणे अत्यंत नीट नेटकी, स्वच्छ आणि विनामूल्य असतात. छोटीशी पण टुमदार, बैठी इमारत, बाहेर गाड्या पार्क करायला खूप म्हणजे खूपच प्रशस्त जागा. आणि बिल्डिंग अर्थातच पूर्णपणे एअर कंडिशन्ड. रेस्ट एरिया मध्ये आत बसायला छान जागा, खुर्च्या, सोफे, इत्यादि असतात.
त्या त्या भागाचा नकाशा, त्या भागाची माहिती देणारी पॅम्फ्लेट्स इत्यादि ठेवलेले असतात. तेथील छोट्याशा ऑफिसमध्ये माहिती देण्यासाठी एखादी व्यक्ती बसलेली असते व ती तुम्हाला, विचारलेल्या गोष्टीची तत्परतेने व सविस्तर माहिती, हसतमुख चेहऱ्याने देते. प्रत्येक ठिकाणी एक अॅटोमॅटिक व्हेंडिंग मशीन ही ठेवलेली असते, ज्यात तुम्ही ठराविक रकमेची नाणी, नोटा टाकून, किंवा कार्ड स्वाईप करून कोल्ड ड्रिंक, चॉकलेट्स, कुकीज किंवा इतर पॅक्ड खाण्याचे पदार्थ घेऊ शकता. प्रत्येक रेस्ट एरिया मध्ये अत्यंत स्वच्छ, भरपूर पाणी असलेली, कमोड मध्ये पुरेसे टिशू पेपर्स असलेली, पूर्ण एअर कंडिशन्ड, अशी, वॉश रूम उपलब्ध असते (इथे तिला रेस्ट रूम म्हणतात.) लहान मुलांसाठी कमी उंचीची सोय पण उपलब्ध असते. प्रत्येक ठिकाणच्या वॉश बेसिन मध्ये सेन्सर बसवलेले असतात (विमान तळावर असतात तसे), जेणे करून तोटी च्या खाली हात धरल्यावर पाणी येईल.
तर तुम्ही गाडी चालवतांना थकले असल्यास, किंवा तुम्हाला सोबत आणलेले पदार्थ खाण्यासाठी थांबायचे असल्यास, ही एक अप्रतिम व्यवस्था आहे. हे रेस्ट एरियाज त्या त्या ठिकाणच्या कौंटी कडून मॅनेज केले जातात असे कळाले.
—–००००—–
माधव भोपे.
वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे.
माधव भोपे
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.
