Sant Namdev Abhang-3
संत नामदेवांचे अभंग-3
संत नामदेवांची भजने पाहतांना, मागील लेखात आपण, मनुष्य कसा विषयसुखाच्या मागे लागून केविलवाणा झाला आहे, अशा अर्थाचे काही अभंग पाहिले. तसेच भक्तीचे नुसते वरवरचे सोंग किंवा ढोंग करणाऱ्या लोकांचा कसा सुळसुळाट झाला आहे, त्याबद्दल ही नामदेवांचे अभंग पाहिले. तसेच, “सजीवासी हाणी लाथा, निर्जीवपायी ठेवी माथा”, असे क्रांतिकारी विचार ही पाहिले.
आता, देह अभिमान- “मी देह आहे” अशा भ्रमामुळे मनुष्याचे कसे हाल होतात, आणि त्यावर काय उपाय आहे, याबद्दल काही खूप छान अभंग आहेत.
देहाचा अभिमान न धरावा चित्तीं | धरावी उपरति उपशम
सर्वांभूतीं देव ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची
चिंता न करी नाम्या येणें तरसी जाण| तुज सांगितली खूण निर्वाणींची
लौकिकाची कांहीं न धरावी लाज | हें चि निज काज साधावें तें
निंदा करिती तो मानावा आदर | स्तुति तें उत्तर नायकावें
न धरावी चाड मान–सन्मानाची | आवडी भक्तीची रूढवावी
नामा म्हणे हें चि रूढवावें मानसीं | क्षण एक नामासी विसंबूं नये
निर्विकल्प ब्रह्म कैसेनि आतुडे | जंववरी न मोडे मीतूंपण
शब्द–चित्र–कथा सांगती पाल्हाळ | मन नाहीं निश्चळ हरि–पायीं
आणूतें प्रमाण होतां दुजेपण | मेरूतें समान देईल दुःख
नामा म्हणे ब्रह्म सर्वांभूती पाहीं । तरी ठाईचा ठाई निवशील
परब्रह्मींची गोडी नेणती बापुडीं | संसार–सांकडीं विषयभरित
तूंते चुकली रे जगजीवनरक्षा । अनुभवाविण लक्षा नये चि रे कोणा
जवळीं असतां क्षीर नव्हे चि वरपडा | रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला
दर्दुरा कमळिणी एके ठाई बिढार | वास तो मधुकर घेऊनि गेला
नामा म्हणे ऐसीं चुकली बापुडीं | अमृत सेवितां पुडी चवी नेणे
एकदा परब्रह्माची गोडी लागली, तर संसारातील विषय आवडणार नाहीत. इथे गोचीड आणि गाईचे वासरू यांची तुलना केलेली आहे. गोचीड हे, गाईच्या स्तनापाशी असते. पण ते आयुष्यभर तिचे रक्तच सेवन करते. जेंव्हा की गाईचे वासरू मात्र दूधरूपी अमृत सेवन करते. तसेच दर्दुर म्हणजे बेडूक आणि मधुकर म्हणजे भुंगा हे दोन्ही कमळाच्या जवळ असतात, पण कमळाच्या सुगंधाचे सेवन भुंगा करतो, आणि बेडूक मात्र कमळाच्या अगदी जवळ असूनही त्याच्या सुगंधापासून वंचित राहतो. तसेच विषयी लोक, संसारात येऊन हरिनामरूपी अमृत सेवन करण्याच्या ऐवजी विषयरूपी चिखलाचेच सेवन करण्यात धन्यता मानतात.
संसार करितां देव जैं सांपडे | तरी कां झाले वेडे सनकादिक
संसारीं असतां जरी देव भेटता | शुकदेव कासया जाता तयालागीं
ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार | तरी कां निरहंकार झाले साधु
नामा म्हणे आतां सकळ सांडून | आलोंसें शरण विठोबासी
संसार करून जर देव सापडला असता, तर सनकादिक, शुकदेव हे कशाला संसारापासून दूर राहिले असते, असे म्हणून, सगळे सोडून विठोबाला शरण जा असे नामदेव महाराज कळकळीने सांगतात.
संसार–सागर भरला दुस्तर | विवेकी पोहणार विरळा संत
कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पोहूनियां
भ्रम हा भोंवरा फिरवी गरगरा | एक पडिले घरा चौर्यांशीच्या
नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचे । भय कळिकाळाचें नाहीं तुम्हां
वरील अभंग इतके सोप्या शब्दात आहेत, की त्यांच्यावर वेगळे काही भाष्य करण्याची गरज पडत नाही. पण त्यानिमित्ताने, आपलीही उजळणी होते, म्हणून भाष्य करावेसे वाटते.
त्यानंतर, येणारे भोग, शरीराची पीडा इत्यादि ही आपल्याच कर्माची फळें आहेत, त्यासाठी ईश्वराला किंवा कोणाला दोष देण्याची काय गरज आहे, अशा प्रकारचे काही अभंग आहेत-
पापाचें संचित देहासी दंडण | तुज नारायणा बोल नाहीं
सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वाऊगा चि
पेरी कडू जिरें इच्छी अमृतफळ | अर्कवृक्षा केळ केवीं होय
मुसळाचें धनु न होय सर्वथा | पाषाण पिळितां रस कैंचा
नामा म्हणे देवा तुज कां रुसावें । मनासी पुसावें आपुलिया
नंतर समर्थांनी जसे आपल्या मनाला समजावले होते, तसेच नामदेव महाराजही पुढील काही अभंगांमधून समजावतात
अरे अलगटा माझिया तूं मना | किती रानोरानां हिंडविसी
विठोबाचे पायीं दृढ घाठीं मिठी| कां होसी हिंपुटी वायांविण
संकल्प विकल्प सांडी तूं समूळ | राहे रे निश्चळ क्षणभरी
आपुलें निजहित जाण तूं त्वरित | वासनारहित होई वेगीं
नामा म्हणे तुज ठाईंचें कळतें । सोसणें कां लागते गर्भवा
क्षण एक मना बैसोनि एकांतीं | विचारीं विश्रांति कोठें आहे
लक्ष चौर््यांशीच्या करितां येरझारा | शिणलासी गव्हारा वेळोवेळां
दुर्लभ आयुष्य मनुष्य–देहींचें | जातसे मोलाचें वायांविण
नामा म्हणे तुज येतों काकुळती | सोडीं रे संगति वासनेची
वासनेची संगत सोडण्याविषयी नामदेव महाराज अगदी काकुळतीला येऊन सर्वांना विनंती करतात
वासनेची करणी आइकें तूं मना | या केली रचना ब्रह्मांडाची
निर्गुण चैतन्य सदा सुख–राशि | त्या दिलीं चौऱ्यांशी लक्ष सोंगे
ऐसी हे लाघवी पाहतां क्षणभंगुर | ब्रह्मादि हरिहर ठकिले इणें
नामा म्हणे तरी चि इचा संग तुटे | दैवयोगें भेटे संत–संग
दैव योगाने संत भेटले, तरच या वासनेचा संग तुटू शकतो.
परियेसी वासने संकल्पस्वरूपे | विश्व त्वां आटोपें वश केलें
ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें | विषयाकारणें ठोठिंगत
परी माझ्या मना सांडीं वो समर्थे | देई मज दीनातें कृपादान
नामा म्हणे पुढती गांजिसील मज | येईल केशिराज सोडवणे
ब्रह्मादिक ही या वासनेची खेळणीं आहेत. अशा वासनेला नामदेव महाराज दम देतात की तू मला सोड, माझ्या नादी लागू नकोस, कारण तू जर मला गांजलेस, तर साक्षात केशीराज मला सोडवायला समर्थ आहे, हे लक्षात ठेव
पुढील लेखात नाम स्मरणाचे महत्त्व सांगणारे काही अभंग बघणार आहोत.
माधव भोपे
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.