https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Sant Tukaram abhang-1

संत तुकारामांचे अभंग-1

महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांबद्दल माहिती करून घेतांना, सुरुवातीच्या १० भागांमध्ये आपण १३ व्या शतकातील संत नामदेव यांच्या अभंग संपदेतील काही अभंगांची माहिती घेतली.

येत्या काही भागांमध्ये आपण १६ व्या आणि १७ व्या शतकातील, थोर संत कवि तुकाराम महाराज यांच्या रसाळ अभंगांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील संतांचे अभंग आणि रचना इथल्या प्रत्येक स्त्री पुरुष लहान थोर यांच्या रक्तातच भिनले आहेत असे म्हटले तरी चालेल, इतके ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहेत. वारकऱ्यांच्या तोंडात तर संत तुकारामांचे अभंग सतत असतात, कीर्तनकारांच्या कीर्तनातही संत तुकारामांच्या अभंगांशिवाय पान हलत नाही. आणि घरोघरी संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकाराम यांचे हरिपाठाचे अभंग हे नित्य म्हटल्या जाणाऱ्यापैकी आहेत.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची

ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंतांची

संत तुकारामांच्या अभंगांची शब्दरचना अत्यंत प्रभावकारी आणि प्रत्ययकारी आहे. त्यांचे अभंग हे त्यांच्या अनुभवातून आपोआप उमटलेले शब्द आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक रचना ही सरळ मनाला भिडते.

संत नामदेवांचे राहिलेले कार्य त्यांनी आपल्याकडून करून घेतले आहे, अशी तुकाराम महाराजांची धारणा होती.

नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले. देवाचे वर्णन करणारे  कवित्व करावे, उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले,  व तू अभंगाचे माप पुरपूर टाक, असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की,”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”

भागवत धर्माचा, वारकरी पंथाच्या इमारतीचा पाया ज्ञानदेवांनी रचला, आणि संत तुकाराम हे त्या इमारतीचे कळस झाले, असे संत बहिणाबाई म्हणून गेली आहे.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

 

संत तुकारामांच्या काळी, महाराष्ट्रात मोगल आणि इतर आक्रमकांचा धुमाकूळ सुरू होता. प्रजेला कोणी वाली उरले नव्हते. लोकांमध्ये अंधश्रद्धा बोकाळली होती. अशा वेळी, जनजागृती करण्याचे आणि अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे कामही संत तुकारामांनी केले. त्याच वेळी छत्रपति शिवाजी महाराजांचा उदय झाला. संत तुकारामांची आणि शिवाजी महाराजांची भेट प्रसिद्ध आहे.

 

संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहतांना आपण सुरूवातीला त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले काही अत्यंत प्रसिद्ध अभंग पाहणार आहोत.

 

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां

तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें

 

 

अत्यंत कमी शब्दात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणणारा हा अभंग हा वारकऱ्यांच्या, कीर्तनकारांच्या अत्यंत आवडीचा आहे.


 

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती

मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळही

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो

सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं

आपल्या विठ्ठलाचे सौंदर्य वर्णन करतांना तुकाराम महाराज त्याला ‘राजस सुकुमार- मदनाचा पुतळा-‘ अशी उपमा देतात. त्याच्यासमोर चंद्र आणि सूर्य यांचे तेज लोप पावते. ‘कासे सोनसळा- कंबरेला सोनेरी पितांबर आणि- पांघरे पाटोळा (पाटोळा म्हणजे पांघरायचे वस्त्र) असा हा घननीळ- मेघासारखा निळा रंग असलेला माझा विठ्ठल पाहण्यासाठी मला धीर निघत नाही.- याठिकाणी तुकाराम महाराज स्वतःला गोपीच्या स्वरूपात पाहतात- आणि म्हणतात- सकळही तुम्ही व्हा गे एकसवा- तुम्ही सगळ्या एका बाजूला व्हा- आणि मला माझ्या घन नीळाला पाहू द्या.

 

खेळिया

 

मागे संत नामदेवांचे अभंग पाहतांना आपण नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें । जीव-शिव नांव पावलें रे

आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

या अभंगात संत नामदेवांनी संसार हा खेळ समजून कसा खेळायचा ते सांगितले आहे ते पाहिले होते आणि त्यात त्यांनी सहजरित्या अद्वैत सिद्धांत सांगितला होता.

संत तुकाराम सुद्धा त्यांच्या पर्यन्त होऊन गेलेल्या संतांची महति सांगतांना, हा खेळ त्याच्या नियमानुसार जो खेळेल तोच ‘उतरेल’ असे सांगतात. सगळीकडे एकत्व पाहिल्यास तुझ्यावर ‘डाव’ येणार नाही. द्वैतबुद्धि ठेवली, तर फसगत होईल. त्रिगुणांच्या फेऱ्यात सापडला तर दुःखी होशील, पण ‘या चौघांची’ म्हणजे चार वेदांची आज्ञा पाळशील तर दुःखी होणार नाहीस असे सांगतात.

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोघांची तरी धरीं सोई रे

 

खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयांची घाई रे ।

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे

 

या खेळात गुंतायचे नाही- निराळेच राहायचे- खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा- नामदेव या शिंप्याच्या पोराने विठ्ठल ‘बसवंत’ केला- तो खेळात नाही अडकला.

 

आपुल्या संवगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे

एक घाई खेळतां तो न चुकेचि कोठें । तया संत जन मानवले रे ।

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे

कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे

सकळिकां मिळोनी एकचि घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायी रे ।

रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे

पांचा संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे

ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनी । तो ही खेळिया निवडिला रे ।

ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे

जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे

एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ।

 

ब्राह्मणाचा पोर- म्हणजे एकनाथ- याने आपले गुरू -जनार्दन यांना ‘बसवंत’ केले- आदर्श मानले आणि गुरूंच्या उपदेशामुळे, ते स्वतःच ‘बसवंत’ झाले.

आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे

तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे

एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ।

 


 

आणि खालील अभंगात- भीमातीरि विठ्ठलाच्या आनंदात नाचणाऱ्या वैष्णवांच्या आनंद सोहळ्याचे अप्रतिम वर्णन केले आहे. हा अभंग स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतानी अजूनच विलोभनीय केला आहे-

 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे

क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे

कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।

लुब्धली नादीं लागली समाधि । मूढ जन नर नारी लोकां रे

पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।

वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणीं जाती रे

निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

वरील ओळी ऐकून अक्षरशः अंगावर शहारा येतो- मातले हे वैष्णव वीर रे! काय शब्दरचना आहे!

संत तुकारामांचे ‘तुकाराम गाथा’ या स्वरूपात जवळ जवळ ४५८३ अभंग आहेत. सगळ्या अभंगांचा अभ्यास करायचा म्हटले तर अक्खा जन्म सुद्धा कमी पडेल. आपण येत्या काही लेखांत, आचार्य विनोबा भावे यांनी निवडलेले काही अभंग आणि इतर काही अभंग पाहणार आहोत.

 

 

माधव भोपे 


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here

Discover more from GoodLifeHub.in

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading