https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Sant Tukaram abhang-3

संत तुकारामांचे अभंग-3

संत तुकारामांचे अभंग पाहत असतांना आपण मागील लेखात काही स्फुट अभंग पाहिले..

तुकरामांनी त्यांच्या अभंगात ठिकठिकाणी आपल्या जीवनातील काही घटना कुठलाही आडपडदा न ठेवता वर्णन केल्या आहेत. खालील अभंगात त्यांनी आपल्या जन्मापासून ते इंद्रयाणीत वह्या बुडवीपर्यन्तच्या वेगवेगळ्या घटना थोडक्यात वर्णन केल्या आहेत.

तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले होते.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

संत तुकारामांना चार मुले होती. त्यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती पण नवऱ्याला माया लावणारी होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.Sant Tukaram abhang-3

नंतर, प्राकृतात रचना केली म्हणून जेंव्हा त्यांना त्यांचे अभंग इंद्रयाणीत बुडविण्याची आज्ञा झाली, तेंव्हा अभंग इंद्रयाणीत बुडवून ते व्यथित होऊन इंद्रायणीकाठीच तेरा दिवस आकांत मांडून, देवाशी भांडण काढून बसले. नंतर त्यांच्या अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्यानंतर, देवाला आपल्यासाठी विनाकारण त्रास दिल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. तेही त्यांनीं आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहे.

 याती शूद्र वैश्य केला वेवसाव । आधीं तो हा देव कुळपूज्य

नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्‍न तुम्हीं संतीं

संवसारें जालों अतिदुःखें दु:खी । मायबापें सेखीं क्रमिलिया

दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली

लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां

देवाचें देऊळ होतें जें भंगलें । चित्तासी तें आलें करावेंसें

आरंभीं कीर्तन करी एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं

कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्‍वासें आदरें करोनियां

गाती पुढें त्यांचें धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां

संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली

ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि

वचनें मानिलीं नाहीं सुहृदांचीं । समूळ प्रपंची वीट आला

सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां

मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं

यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे

निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखवलें

बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान

विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे

आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे

भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें

तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे

 


 

अभंगांच्या वह्या बुडविल्यानंतरचा आकांत त्यांनीं खालील अभंगात मांडला आहे

तेरा दिवस झाले निश्‍चक्र करितां पवसी अनंता मायबापा

पाषाणांची खोळ घेऊनि बैसलासी काय हषीकेशी झालें तुज

तुजवरी आतां प्राण मी त्यजीन हत्या मी घालीन पांडुरंगा

फार विठाबाई धरिली तुझी आस करीन जीवा नाश पांडुरंगा

तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण प्राण हा सांडीन तुजवरी

 

आणि जेंव्हा विठ्ठलाच्या कृपेने तेराव्या दिवशी अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्या त्यावेळी झालेला पश्चात्ताप त्यांनीं खालील अभंगात व्यक्त केला आहे.

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला

जनाचियां बोला साठीं चित्त क्षोभविलें

भागविलासी केला सीण अधम मी यातीहीन

झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों

अवघें घालूनियां कोडें तहानभुकेचें सांकडे

योगक्षेम पुढें तुज करणें लागलें

उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद

तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें

 

संसारात इतक्या विपत्ति आल्या तरी ‘जे होते ते बऱ्यासाठीच’, या विचाराने ते लिहितात-

बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली

अनुतापें तुझें राहिलें चितन । झाला हा वमन संवसार

बरें झालें देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्यें

बरें झालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ठोरें गुरे

बरें झालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा

बरें झालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं

तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण

 ____________________

 तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरूची फक्त ओझरतीच भेट झाली. राघवचैतन्य केशवचेतन्य- बाबाजी असे त्यांच्या गुरूंचे नांव असल्याचे तुकाराम महाराज सांगतात. माघ शुद्ध दशमी, गुरुवारी त्यांनीं गंगास्नानाला (इंद्रायणी) जातांना आपल्याला अचानक ‘सापडविले’, आपल्या डोक्यावर हात ठेवला, आणि ‘रामकृष्ण हरि’ हा मंत्र दिला, असे ते सांगतात. पण गुरूंची काही सेवा घडली नाही म्हणून ते खंत पण व्यक्त करतात.

babaji chaitanya

 सद्गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडलीं सेवा कांहीं

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर

राघवचैतन्य केशवचेतन्य । सांगितली खूण माळिकेची

बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि

माघ शुद्ध दशमी पाहूनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे


रामकृष्ण हरि या नांवाचा आधीच त्यांना छंद लागला होता, आणि गुरूंनी तोच त्यांच्या आवडीचा मंत्र त्यांना सांगितला. त्यांना कुठे गुहेत जावे लागले नाही, की तप करावे लागले नाही, हेही त्यांनीं सांगितले आहे.

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंफा कांहीं कोठें

जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे

तुका म्हणे मज दावियेला तारू कृपेचा सागरु पांडुरंग


मागील एका लेखात जसे आपण बघितले होते, तोच अभंग इथे पुन्हा उद्धृत करीत आहोत, ज्याच्यात त्यांनीं नामदेवांनी आपल्याला त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्याबद्दल स्वप्नात येऊन सांगितल्याचा उल्लेख आहे.

ामदेवें केलें स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगे येऊनियां

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये

शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन

नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे

संत तुकारामांची अभंग संपदा एवढी मोठी आहे, आणि एवढी रसाळ आहे, की त्यातून निवड करणे शक्य नाही. तरी आपण त्यातील काही मुख्य मुख्य अभंग येत्या काही लेखांत पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

 

 

माधव भोपे


Discover more from GoodLifeHub.in

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post your comments here