Sant Tukaram abhang-5
संत तुकारामांचे अभंग-5
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील काही अभंग आपण मागील 4 लेखांमधून पाहत आहोत. मागील काही लेखांत आपण पाहिले की संतांचा रुसवा देवापाशी, प्रेम देवाशी, भांडण देवाशी, जे काही मागायचे, हक्काने, तेही देवापाशीच. कुठल्याही प्रकारे, प्रत्येक क्षण हा देवाशी जोडला गेला पाहिजे. गीतेतील
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥अ.९-२२ ॥
“जे लोक अनन्य भावाने निरंतर माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो” या वचनावर दृढ श्रद्धा संतांची असते. त्यामुळेच ते देवाशी भांडूही शकतात.
तुकाराम महाराजांचे काही अभंग असे देवाशी भांडण व्यक्त करणारे आहेत.
तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चित्ती वाटतसे
काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा
तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वायांविण श्रम केला
देवाला इथे तुकाराम महाराज चक्क, ‘झोपला होता काय?’ असे खडसावून विचारीत आहेत! (भक्तांवर, तुझे नांव घेणाऱ्यांवर विपत्ति येतात, त्यावेळी धावून न येता नुसती गंमत पाहतोस). आणि देवा, तुझे नांव घेण्याचा उगाच खटाटोप केला असे म्हणत आहेत!
____________________
तसेंच खालील अभंगात, तुम्ही निर्गुणाची ‘खोळ’ ओढून बसला आहात, मग आम्हालाच का डोळे आणि कान दिले, या डोळ्यांनी आणि कानांनी तुमची अपकीर्ति पाहिली आणि ऐकली जात नाही, असे सांगतात.
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले
नाइकवे तुझी अपकीर्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे
आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला
तुका म्हणे दु:खी असें हें कळों द्या । पुढलिया धंद्या मन नेघे
________________________
आणि खालील अभंगात तर, हरि तूं निष्ठुर असेही म्हणतात! आणि पुढे त्या अभंगात, हरिश्चंद्राचे, शिबी राजाचे, बळी राजाचे, उदाहरण देऊन म्हणतात, की या तुझ्या भक्तांचे तू सर्वस्व हरण केलेस. तुला भावाने जे भजतात, त्यांच्या संसाराची तू ही गति करतोस,
हरि तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण
नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें
घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व
पुत्र पत्नी जीव । डोंबा घरीं वोपविलीं
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दयाळु भूतीं
तुळविलें अंतीं । तुळें मांस तयाचें
बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर
करूनि काहार । तो पाताळीं घातला
तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति
ठाव नाहीं रे पुढती । तुका म्हणे करिसी तें
__________________
आणखी एका अभंगात, देवा तू आंधळ्याची काठी हिरावून घेऊन त्याला कड्यावर लोटून देतोस, आणि साखर म्हणून हातात माती देतोस असेही म्हणतात.
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी
हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित
चाळवूनि हातीं । साकर म्हणोनि द्यावी माती
तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे
__________________
तसेच खालील अभंग “आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण” इतक्या अटीतटीने देवाशी भांडणारे आहेत.
आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण
झालों पोरटीं निढळें । ठाव नाहीं बुड आळें
आम्हीं जना भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें
तुका म्हणे देश । झाला देवाविण ओस
कामधेनूचें वासरू । खाया न मिळे काय करूं
ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें
बेसुनि कल्पद्रुमातळीं । पोटासाठी तळमळी
तुका म्हणे नारायणा । भले लोकीं हें दिसेना
दुष्काळात जेंव्हा खायलाही मिळत नव्हते, तेंव्हाही भांडण विठ्ठलाशीच होते! त्यांनी कोणापुढेही हात पसरला नाही. शिवाजी महाराजांनी दिलेला धनाचा नजराणा, त्यांनी आदरपूर्वक परत पाठविला, ही कथा प्रसिद्धच आहे.
दिवट्या, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।
पुढे ते म्हणतात,
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।
_____________________
देवाशी भांडणात एके ठिकाणी तर ते म्हणतात, देवा, आम्ही पतित नसतो, तर तू पतितपावन कसा झाला असतास?
जरी मी पतित नव्हतों देवा । तरि तूं पावन कैंचा तेव्हां
म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी
लोहो महिमान परिसा । नाहीं तरी दगड जैसा
तुका म्हणे याचकभावें । कल्पतरु मान पावे
देवा, आम्ही मोठ्या नवसाने तुला झालोत, नाहीतर तुझे नांव कोणी घेतले असते, एवढेच काय, तुला पिंडदान तरी कोणी केले असते!?
नवां नवसांचीं । झालों तुम्हासी वाणीचीं
कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें
कोण होतें मागे पुढें । दुजे बोलाया रोकडें
तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतासि वोसंगा
__________________
संत ज्ञानेश्वर यांना सर्व संत आपली माऊली मानत. तुकाराम महाराजही ज्ञानेश्वरांबद्दल बोलतांना आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त करतात-
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं
जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया
बोलिली लेंकुरें । वेडी वांकुडीं उत्तरे
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा
____________
आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या आवाजात अजूनच प्रभावीपणे व्यक्त केला आहे-
ज्ञानियांचा राजा हा अभंग येथे ऐकू शकता
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी
ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणें काय पुढें
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेविली पायीं डोई
__________________
शरीराबद्दल बोलतांना शरीर हे चांगलेही नाही आणि वाईटही नाही. तसे पाहायला गेले तर शरीर हे दुःखाचे कोठार, घाणीचे आगर आहे. पण हेच शरीर हरिभजनासाठी कामाला येते म्हणून हे शरीर चांगले आहे, असे सांगतात.
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार
शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ।
शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचे घोसुलें
शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ।
शरीर विटाळाचें आळें । मायामोहपाश जाळें
पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिले ।
शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचाही निध
शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीरा ।
शरीरा सुख नेदावा भोग । न द्यावें दु:ख न करीं त्याग
शरीर वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ।
____________
आजकाल, सगळे आयते मिळाले तर बरे, असा विचार असतो. पण हा विचार आजकालचाच नाही, तर त्याकाळीही लोकांना एखाद्या बाबाजीच्या मागे लागावे, आणि त्याने आपल्याला आयते मोक्षपद द्यावे, अशी इच्छा असे. पण तुकाराम महाराज हे अशा लोकांचा मोहभंग अत्यंत निर्भीडपणे करतात. इंद्रियांचा जय साधून, मन एकाग्र करून, निर्विषय करूनच हे साध्य होईल असे बजावतात. आणि स्वप्नातील घावाने काय विव्हळतोस, हे सर्व मिथ्या आहे, असे समजावतात.
नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं
इंद्रियांचा जय साधूनियां मन । निर्विषय कारण असे तेथें
उपवास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मा शेवटीं असे फळ
आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाणे
स्वप्नींचिया घायें विवळसी वायां । रडे रडतियासवें मिथ्या
तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासी जाय वेगीं
आपण आज तुकाराम महाराजांचे आणखी काही स्फुट अभंग पाहिले. पुढील लेखात अजून काही अत्यंत परिणामकारी अभंग पाहणार आहोत.
आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.
माधव भोपे
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.
Very Nice
Thank you. Keep reading.