‘मी’ ची ओळख काय आहे?
आजच्या जगात ‘मी’ या एका शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे असे दिसते. हा ‘मी’ मोठा होत होत इतका मोठा झाला आहे, की त्यापलीकडे काहीच नाही असे वाटू लागले आहे. पण नेमका हा ‘मी’ आहे कोण, याबद्दल मात्र कोणीच विचार करायला तयार नाही असे वाटते.
प्रपंचात विद्या मिळवून खूप धन कमवून, संसारात यशस्वी झालेल्या मनुष्याला आपल्या विद्वत्तेचा ,यशाचा गर्व चढतो.तो स्वतःला सर्वज्ञ समजून दुसऱ्याला अनेक गोष्टीत उपदेश करू लागतो,तो लोकसमुदायावर प्रभाव गाजवू लागतो,नेतृत्व करू लागतो, त्याला एक झिंग चढते स्वतःला सुंदर, शूरवीर, रसिक,शहाणा, श्रेष्ठ समजू लागतो.
एक अतीव सुन्दर काव्य आहे..कुणाचे ते माहीत नाही..
या लोकी धनवंत मी, प्रबल मी, सर्वज्ञ मी, धीर मी,
ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, स्वानंद मी, श्रेष्ठ मी,
भोक्ता मी च, सुजाण मी,चतुर मी,विद्याब्धि मी, शूर मी,
मी मी हेचि कळे, परंतु न कळे, कोठील मी, कोण मी ?
काय करावे या ‘मी’ ला ?
मी हे केवळ सर्वनाम आहे, ती आत्मारामाची फक्त प्रेरणा आहे… आत्माराम नव्हे..
हा मी, नाम,कर्तव्यादि उपाधिमुळे स्वतः:ला तेच समजणारा आहे,खोटा आहे.चोर आहे. तो वस्तुतः: खरा नाहीच.
समर्थांनी दासबोधात (४-९-११) सांगितले आहे..
येक मुख्य परमेश्वरु । दुसरी प्रकृति जगदाकारु ।
तिसरा आपण कैंचा चोरु । आणिला मधें ॥
हा मी अस्तित्वातच नाही. ‘मी’ हा जीवाचा भ्रम आहे.
आत्मज्ञानामुळे हा खोटा ‘मी’ स्वानंदघन अशा स्वस्वरूपात विलीन होतो…
हा एवढा मोठा विषय आहे की यावर उपनिषदकालापासून थोर संत महात्म्यांना जीवनभर उपदेश करावा लागला आहे.अत्यंत विस्तारपूर्वक ग्रंथ लिहावें लागले आहेत. गेल्या हजारो वर्षांत याविषयी चर्चा, वादविवाद झाले आहेत,होत आहेत.
*हा जो खोटा मी आहे तो मायेचा पुत्र आहे. परमार्थात परब्रहम, माया आणि जीव हे सर्व सनातन आहेत असे मानले गेले आहे.
*निश्चल निर्गुण परब्रह्म परमात्म्याला जेंव्हा स्वतःच्या जाणीवेचे स्फुरण झाले की ‘मी ब्रह्म आहे ‘ तेव्हा त्याला मूळचा ‘हरिसंकल्प’ म्हणले गेले. हीच मूळमाया होय.
*तिला दोन अंगे आहेत.एक शुद्ध व संपूर्ण ज्ञानमय ईश्वर किंवा अंतरात्मा.
*दुसरे शक्तिगर्भ सामर्थ्य जे की सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण आणि पृथ्वीसहित पंचमहाभूते यांचा अष्टधाप्रकृती चिखल (कर्दम) आहे,ज्याला आपण गुणक्षोभिणी माया किंवा दृश्य विश्व असे जाणतो.
*पुढे परब्रह्माला असेही वाटले की ‘एकोहं बहुस्याम ‘ मी एक आहे अनेक(बहु) व्हावे, तेव्हाच मायेच्या आवरणाने वेष्टिलेला आत्मा वेगळा झाला आणि अज्ञानरूपी अहंकार तयार झाला त्या अहंकार चतुष्ट्यात मन, बुद्धि आणि चित्त पण समाविष्ट झाले (समर्थानी त्याला अंतःकरणासह अंतःकरणपंचक मानले).
*मायेच्या प्रभावात आल्याने, या खोट्या मी मुळे हा आत्मा जीवदशेला आला. तो एकूण ८२ तत्वांच्या वेटोळ्यांनी बांधला गेला. भूत पंचकाचे नंतर उपरोल्लेखित अंतःकरण पंचक ,नंतर पुढे विषय पंचक(शब्द,स्पर्श ,रूप, रस ,गंध) तयार झाले.ते भोगण्यासाठी ज्ञानेंद्रियपंचक(कान ,त्वचा ,डोळे ,जीभ, नाक ), कर्मेंद्रियपंचक (वाणी,हात,पाय,जननेंद्रिय,गुदा) अशी सूक्ष्मदेहाची २५ तत्वे आहेत.
*प्रत्येक पंच महाभूताची संबंधित ५ तत्त्वे याप्रमाणे ५ गुणिले ५ अशी स्थूल देहाची २५ तत्वे आहेत.
*आकाशाची :- काम,क्रोध,शोक,मोह, भय,
*वायूची:- चलन, वळण,प्रसारण ,निरोध,आकुंचन ,
*तेजाची:- भूक,तहान,आळस ,झोप ,मैथुन,
*आपाची:- रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम आणि
*पृथ्वीची:- अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम अशी ती २५ तत्वे आहेत.
ही एकूण ५० तत्वे झाली.
*पुढची ३२ ही प्रत्येकी ४
*देह (स्थूल,सूक्ष्म,कारण आणि महाकारण) ,
*अवस्था (जागृति,स्वप्न,सुषुप्ति,तुर्या),
*अभिमान (विश्व,तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा ),
*स्थाने (नेत्र,कण्ठ,हृदय,मूर्धन, ),
*भोग (स्थूल, प्रविविक्त, आनंद, आनंदवभास ),
*मात्रा (आकार, उकार, मकार,अर्धमात्रा ),
*गुण (तम्,रज,सत्त्व,शुद्धसत्त्व ) आणि
*शक्ती(क्रिया,द्रव्य,इच्छा, ज्ञान) अशी आहेत.
*जिज्ञासूंनी पंचीकरण हे स्वतंत्रपणे अभ्यासावे. हा एक प्रचंड मोठा विषय आहे. आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर, समर्थ यांच्या पंचीकरण प्रकरणात थोडा भेद आढळतो परंतु सर्वांचा मूळ गाभा एकच आहे.
*जसे सूत बोटाभोवती गुंडाळून त्याला बाहेर काढून त्याभोवती सूत गुंडाळून त्याचा मोठा गोळा केला आणि त्याला नंतर उलगडत गेलो तर नंतर शेवटी हातात काहीच येत नाही असे आपण या देहाचे तत्व विवरण केल्यावर जाणवते .
*केवळ आत्म्याला भ्रम झाल्याने तो स्वतःला मर्यादित देह कल्पू लागतो समजू लागतो
*विवेकाने हे पंचीकरण करून विवरत जाता शेवटी आपणच विशाल आत्मा म्हणून त्याला स्व दर्शन होते.आत्म्याला ब्रह्मगोळ दिसू लागतो.
**मात्र खऱ्या मी मध्ये या खोट्या मी ला विलीन व्हायचे असेल, आत्म्याला परमात्म्यात विलीन व्हायचे असेल तर त्याला परमेश्वरी कृपेची नितांत आवश्यकता आहे. भगवंत स्वतः गीतेच्या दहाव्या अध्यायात -विभूती योगात -सांगतात की
*श्लोक १०
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१० ॥
त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. ॥ १०-१० ॥
*श्लोक ११
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०-११ ॥
त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. ॥ १०-११ ॥
या विषयावर खूप लिहिण्यासारखे आहे, पण लिहिण्यापेक्षा जास्त, समजण्याचा हा विषय आहे. आणि समजणे म्हणजे नुसतेच ‘समजणे’ नाही.. तर अनुभवण्याचा खरं तर विषय आहे.. हा एक अखंड चालणारा प्रवास आहे, आणि त्या प्रवासातील एक पथिक होणे, एवढेच माझ्यासारख्या पामराला शक्य आहे..
ΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩΩ
पांडुरंग देशपांडे. दि. २१/१२/२०२४
लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.
लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.
Discover more from GoodLifeHub.in
Subscribe to get the latest posts sent to your email.