https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Renuka Ashtak-3 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी-रेणुका अष्टक-3

renuka-7

विष्णूदासाची कविता 

तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी

( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥
यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥
केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥
वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥
झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥
गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥
जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥
आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥
शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥

Renuka Ashtak-2 लाज याची रेणुके, तुला सारी- रेणुका अष्टक-2

renuka-3

विष्णूदासाची कविता 

लाज याची रेणुके, तुला सारी

( वृत्त : दिंडी )
अखिल पतितांची, दुरित कृती केली
पतितपावन ही, कीर्ति आयकेली
म्हणुनि पडलों येउनी तुझ्या दारीं
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१॥
मूळपीठ स्वस्थानिं वास केला
सतत जपलों मी नाममालिकेला
बहुत दिन गे, घातली तुझी वारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥२॥
जरी आहे मी स्वार्थ – काम – साधू
तरी लोकांनीं मानियलें साधू
तुझ्या नांवाची दाखवितों थोरी
लाज याची रेणुके तुला सारी ॥३॥
नसे ब्रह्मांडीं तुझ्यावीण कोणी
अतां वेगें उडि घालि सुनिर्वाणीं
त्रिविध तापें तापलों असे भारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥४॥
गृहीं व्यालेली कामधेनु माय
ग्रामलोकांसी ताक मागुं काय
कृपण म्हणतिल निर्दैवि हा भिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥५॥
जन्मतां गाजे सिंहिणिचें तोक
ग्रामसिंहाचे संगे करी शोक
जंबुकाचें भय कंप घे शिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥६॥
होय सर्पाची दासि गरुड – माता
गलंडानें वैद्याचि रडे कांता
समर्थाचा आश्रीत करी चोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥
तुझ्या नामीं विश्वास अल्प नाहीं
म्हणुनि धांवे दुष्कीर्ति कल्पना ही
पतित पापी मी परम दुराचारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥८॥
तुझ्या चरणाची भेट घ्यावि वाटे
परी नेते प्रारब्ध आडवाटें
गळां पडली दृढ संचिताचि दोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥९॥
अहा ! दारिद्र्यें पीडित गृह – दारा
कर्जदारहि धावोनि येति दारा
त्यात रोगाची दाटली उभारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१०॥
चलित दिवसाची साथि काकि मामी
परी निर्वाणीं कुणि न ये कामीं
निर्धनाची मानिती ते शिसारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥११॥
पहा बुडतों मी दुःखसागरांत
कशी बसलिस तूं स्वस्थची घरांत
कृपावंते ही विनती अवधारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१२॥
सर्व माझे अजि हारले उपाय
म्हणुनि अंबे धरियले तुझे पाय
विष्णुदासाची दीनजननी, तारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१३॥

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

renukadevi-1

विष्णूदासाची कविता 

अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये

वृत्त : ( शिखरिणी )
न द्यावी कां वाटे, पतित म्हणुनी भेट मजला ।
न घ्यावी कां वाटे, खबरहि अनाथाचि तुजला ॥
नतोद्धारायाची, सय अझुनि कां येउंच नये ।
अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये ॥१॥
म्हणेना बाई ये, जवळ पिपिलीके शर्करा ।
म्हणेना अंगासी, मर्दन मला केशर करा ॥
तसें बुद्ध्या येणें, मज तुजकडे भाग पडतें ।
अगाई रेणुके ! मजविण तुझें काय अडतें ॥२॥
अनंदे तूं भेटी, खचित मज देशील म्हणुनी ।
अनंदें मीं होतों, अजवर अयुष्यासि गणुनी ॥
निदानीं राहीला, मरणलग हा वाद शिलकीं ।
अगाई रेणुके ! कशि तुं निगमा वादशिल कीं ॥३॥
उपेक्षा दीनाची, करतिस तुझी बाइ मरजी ।
नसे जागा द्याया, तुजवर अपीलाचि अरजी ॥
दया माया कांहीं, मजविषयिं चित्तांत नसुं दे ।
अगाई रेणुके ! अठवण तुला माझि असुं दे ॥४॥
अनावृष्टीनें या, मरतिल किती जीव न कळे ।
तुझीं हीं जीं बाळें, जगतिल किती जीवनकळे ॥
कसें झालें ? आलें, प्रलयसम हें वर्ष बिघन ।
अगाई रेणुके ! सदय ह्रदयें वर्षवि घन ॥५॥
जिलाही दीनाची, निगम म्हणती कल्पलतिका ।
दिनाचा वेलीनें कवळुनी गळा कापिल ति कां ॥
कशी झाली रक्षा – कर हयग्रिवा सायक रसी ।
अगाई रेणुके ! विपरित असें काय करसी ॥६॥
असोनी तूं माझ्या, ह्रदयिं फिरवीसी दशदिशा ।
कुटस्था लावीली, जनन मरणाची अवदशा ॥
सवेंची म्हातारा, करुनि करिसी बाळ तरणा ।
अगाई रेणुके ! तुजजवळ ही कां प्रतरणा ॥७॥
करावें तें केलें, तिळभर उणें नाहिं पडलें ।
तुझ्या एक्या नामीं, सकलहि मला धर्म घडले ॥
कृपेचें राहीलें, उचित प्रिय देणें तुजकडे ।
अगाई रेणुके ! लवकर अतां घे मजकडे ॥८॥
अहो मी अन्यायी, म्हणवुन उपेक्षा करुं नये ।
क्षमावंते, माते ! निजपथ क्षमेचा त्यजुं नये ॥
पतीतोद्धारायास्तव मिरविसी कंकण करीं ।
अगाई रेणुके ! पतित मी अहों पावन करी ॥९॥
दिनाची तूं आई, अलिस दृढ आह्मां समजुनी ।
कृपादृष्टी ठेवी, निज परशुरामा समजुनी ॥
तरी दीनाला घे, जवळ स्तन देवोनि अननीं ।
अगाई रेणूके ! जरि तुं अससी दीन – जननी ॥१०॥
स्वयें विष्णूदासा – वदनिं वदवीसी शिखरिणीं ।
जशी अंबा रंभा, मधुफळ रसाची शिकरिणी ।
तशी ही सद्विद्याक्षर शिकविशी बोधक मला ।
अगाई रेणुके ! नमन तुझिया पादकमला ॥११॥

भूपाळ्या-1 Morning holy prayers in Indian tradition

Morning holy prayers in Indian tradition

प्रातःकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व देवांचे, संतांचे, स्मरण करण्याची आपली परंपरा आहे. आजकाल ती लोप पावत चालली आहे. बऱ्याच लोकांना प्रातःस्मरण करण्याची इच्छा असते, पण संबंधित साहित्य सहज उपलब्ध  नसते. या ठिकाणी आपले परंपरागत साहित्य, वेगवेगळ्या भूपाळ्या, इत्यादि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या उपक्रमातील पहिले पुष्प आज प्रकाशित करीत आहोत. यानंतर अजून भूपाळ्या, स्तोत्रे, इत्यादि या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. 

आपण ब्लॉग ला subscribe केल्यास नवीन पोस्ट प्रकाशित होताच सर्वप्रथम आपणास नोटिफिकेशन मिळू शकेल. 

माधव भोपे 

ganapati

भूपाळी श्री गणपतीची

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिद्धींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथा  शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । कंठी हार  साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी  शोभा । स्मरता उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

shriram

भूपाळी रामाची

उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिले भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥

vitthal-rukhumai

भूपाळी पंढरीची

उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविध ताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपति दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी । महादोष  हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर  । पैलपार तरतील ॥ ४ ॥

shri vishnu-1

भूपाळी श्रीविष्णूची-1

राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥


माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥


केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥


प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥


पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥

shri vishnu-2

भूपाळी श्रीविष्णूची-2  

[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥


भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥


सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रल्हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥


रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥


झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महामुद्गल  ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥


तुझा नामदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥


घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥


मीराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोनि  वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥


कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥


गूळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥


गरुडपारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाचा ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥


हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥


निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥

Customer is King-अमेरिकेतील ग्राहक सेवा

customer service in usa

सदर लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Customer is King

अमेरिकेतील कस्टमर सर्विस

अमेरिकेतील विविध मॉल्स मध्ये हिंडताना एक जाणवले की येथे “मेड इन यू.एस. ए.” अशा वस्तू फारच कमी दिसतात. बहुतांश वस्तू मेड इन चायना, कोरिया, जापान, मलेशिया, जापान, इंडिया, इ. येथील अर्थव्यवस्थेची भिस्त ही manufacturing पेक्षा ट्रेडिंग आणि सर्विस वर जास्त आहे. आणि त्यामुळे customer service ही अत्यंत प्रगत आहे असे जाणवले.

तुम्ही कुठल्याही स्टोअर मध्ये, रेस्टोरेंट मध्ये, पार्क किंवा म्युझियम, अॅक्वेरियम, झू इत्यादि मध्ये, कुठेही जा, तुम्हाला सर्विस देणारी व्यक्ति हसतमुख असणार आणि कितीही गर्दी असली तरी तुमची दाख्ह्ला घ्यायला व स्वागत करायला कुणी ना कुणी असते आणि “Hi-!, How are you-?, How may I help you?” म्हणून तुमचे स्वागत केले जाते. जेंव्हा तुम्ही कोणती वस्तू पहायला सुरुवात करता तेंव्हा कुणीही तुमच्या मागे मागे येत नाही. मात्र एखाद्या वस्तूबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तेथील व्यक्ति चट्कन पुढे येते आणि त्या वस्तूबद्दल, सविस्तर माहिती देते. त्यांना त्या वस्तूबद्दल पूर्ण माहिती असते आणि तुमच्या प्रश्नांची ते पटापट आणि खरी खरी उत्तरे देतात.

एके रविवारी आम्ही आमच्या घरापासून २ तासांच्या अंतरावर असलेल्या एका village वजा असणाऱ्या गावातील एका मॉल मध्ये गेलो होतो.  तो मॉल हा बऱ्याचशा ब्रान्डेड वस्तू अगदी कमी किमतीत मिळण्या बद्दल प्रसिद्ध होता. तिथे असेच, सन ग्लासेस घेण्यासाठी म्हणून आम्ही एका चष्म्यांच्या दुकानात गेलो. ते पूर्ण स्टोअर सांभाळण्यासाठी एक उंच धिप्पाड अत्यंत हसतमुख अशी अमेरिकन लेडी होती. आम्ही अनेक गॉगल्स पाहिले, ट्राय केले,  पण कोणता घ्यावा ते लक्षात येत नव्हते. तेंव्हा आम्ही तिच्याकडे गेलो आणि तिला आमच्या मापाचा गॉगल दाखव म्हणून सांगितल्यानंतर ती अत्यंत उत्साहाने आम्हाला दोघांनाही वेगवेगळे चष्मे काढून दाखवू लागली. एकेक चष्मा, सौ. च्या चेहऱ्यावर चढवून, ती, “यू कॅन ट्राय धिस,.. प्लीज ट्राय धिस..” म्हणत होती व तो चष्मा घातल्यावर “ Oh, you are looking beautiful!” असे म्हणून छानपैकी हसत होती. इतक्यात नातीने पण लहान मुलांचा एक चष्मा आपल्या डोळ्यावर घालून घेतला तेंव्हा ती आमच्या नातीकडे अत्यंत कौतुकाने पाहू लागली व “ Do you like it?” म्हणून विचारू लागली. नातीनेही अत्यंत तत्परतेने “या ऽऽ“ असे म्हणून उत्तर दिले तेंव्हा ती कौतुकाने जोरात हसली. मुलाने जेंव्हा नातीला आवरायचा प्रयत्न केला तेंव्हा ती बाई कौतुकाने म्हणाली, “ मलाही ३ मुले आहेत. व ती अशीच नॉटी आहेत. त्यांना सांभाळता सांभाळता, माझी पण अशीच त्रेधा उडते”

इतके सारे गॉगल्स पाहिल्यानंतरही आम्हाला दोघांना आम्हाला हवा तसा (आखूड शिंगी, बहुदुधी) गॉगल न मिळाल्यामुळे (तसा, गॉगल घेण्याची आम्हाला एवढी जास्त आवश्यकता पण वाटत नव्हती) आम्ही निघायचे ठरवले, पण मग मुलाने तो पर्यंत त्याच्यासाठी एक गॉगल बघितला व थोडी तरी खरेदी तिथे झाली. तरी आम्हाला निघतांना त्या बाईने अनेकदा विश केले आणि हसतमुखाने, “ हॅव अ नाईस डे” म्हणून आम्हाला निरोप दिला.

असाच अनुभव सर्व ठिकाणी येत असल्यामुळे, अमेरिकेत, खरेदीसाठी जाणे म्हणजे कंटाळवाणे न वाटता एक आनंददायी अनुभव वाटतो.

कुठल्याही दुकानासमोर, मॉल समोर, हॉटेल समोर, त्या दुकानापेक्षा कमीत कमी चौपट पाचपट आणि जास्तीत जास्त वीसेक पट तरी मोकळी जागा गाड्यांच्या पार्किंग साठी असतेच असते. त्यामुळे गाडी उभी करायला अडचण येत नाही. अर्थात कधी कधी खूप जास्त गर्दी असल्यास पार्किंग फुल असते, ती गोष्ट वेगळी.

———

माधव भोपे <<<<<>>>>>>—————