https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Customer service & Etiquettes in USA-अमेरिकेतील ग्राहक सेवा आणि सभ्यता

hotel

Customer service & Etiquettes in USA

अमेरिकेतील ग्राहक सेवा आणि अमेरिकेतील सभ्यता.

तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये, मॉलमध्ये, किंवा इतरत्र कुठल्याही ठिकाणी, counter वर असलेल्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर, अगदी बिना अपवाद- तो किंवा ती- जास्त करून तीच- तुम्हाला अत्यंत मनापासून हास्य करून विचारणार- “ हॅलो” किंवा “हाऽय”, “हाऊ मे आय हेल्प यू टुडे?” तसेच तुम्ही मोठ्या शॉप मधून हिंडत असतांना, जागजागी उभ्या असलेल्या सेल्स पर्सोनेल्स तुम्हाला सुहास्य वदनाने-  “हाऽय, हाऊ आर यू ?” म्हणून विचारणार; त्यांना तुम्ही तितक्याच सभ्यतेने, “ I am fine, how about you?” म्हणून प्रतिसाद देणे अपेक्षित असते. आपण एखाद्या शॉपमधून बाहेर पडत असतो (काही माल खरेदी करा अथवा न करा) तेंव्हा counter वरील व्यक्ती “ हॅव ए नाईस डे” म्हणून आपल्याला न चुकता विश करते . त्याला आपण “ यू टू” म्हणून विश करायचे असते. आणि कुठेही, सेल्स पर्सोनेल, बसलेले दिसणार नाहीत, ते उभेच असतात. In fact, मला कुठल्याही ठिकाणी सेल्स पर्सोनेलला बसायला, खुर्चीच काय, साधा स्टूल पण दिसला नाही. या पार्श्वभूमी वर आपल्याकडची स्थिति आठवून पहिली, तर आपल्याला अजून किती पल्ला गाठावयाचा आहे हे लक्षात येते.

अमेरिकन सभ्यता: शॉप मध्ये किंवा इतरत्र, चुकून जरी एकमेकांना धक्का लागला तरी अमेरिकन व्यक्ती अगदी मनापासून- “ Oh, I am sorry” असे म्हणणार. तसेच एकमेकांना ढकलून पुढे जाण्याच्या भारतीय वृत्तीच्या ऐवजी- दुसऱ्या व्यक्तीला जाण्यासाठी जागा करून देण्याची पद्धत आहे. अर्थात दुसरी व्यक्तीही तशीच असते व अत्यंत अदबीने, “Thank you” म्हणून अशा वेळी आभार व्यक्त करते.

एकदा आम्ही एका मॉलच्या पार्किंग लॉट मध्ये तो पूर्ण भरलेला असल्यामुळे, आमच्या गाडीसाठी पार्किंगची जागा शोधात होतो. इतक्यात एका अमेरिकन, मध्यम वयाच्या स्त्रीने-जी की तिची गाडी पार्किंग मधून काढायला चालली होती- आम्हाला खूण करून सांगितले- माझी जागा रिकामी होतेय; व आम्हीही खुणेनेच (thumbs up) तिचे आभार मानीत तिची पार्किंग ची जागा घेतली.- अशा प्रकारे- इतरांना मदत करणे हा येथील लोकांचा सहज स्वभाव बनून गेलेला आहे असे जाणवले.shopping-mall-parking.1000x700

reunion tower
Reunion tower

अमेरिकेत सर्वत्र १४-१५ ते २०-२१ वयापर्यंतची चुणचुणीत मुले व मुली ठिकठिकाणी (दुकानात, हॉटेल मध्ये इ.) काम करतांना दिसतात. आम्ही ड़ॅलस मध्ये, री-युनियन टॉवर बघायला गेलो, तेंव्हा आम्हाला लिफ्ट मध्ये रिसीव करायला, अशीच १४-१५ वर्षाची मुलगी, अगदी प्रोफेशनली सर्व माहिती सांगत होती आणि आम्ही लिफ्ट मधून बाहेर पडतांना, “ बाय बाऽय, हॅव अ नाईस डे!” म्हणत होती. झू मध्ये सुद्धा, अशीच, १५-१६ वर्षांची तरुणाई, ठिकठिकाणी, माहिती देण्यासाठी व गाईड करण्यासाठी होती.  आम्ही नायगारा धबधबा पाहायला गेलो, तेंव्हा, आम्हाला बोटीत चढतांना- व्यवस्थित चढायला मदत करणारी, सर्व गर्दीचे व्यवस्थापन करणारी १५-१६ वर्षांची मुलगी, अत्यंत तडफेने व शिताफीने करत होती हे बघून खूपच कौतुक वाटले. तसेच, ठिकठिकाणच्या मॉल मध्ये, २० ते २५ वर्षांची मुले व मुली, अगदी प्रोफेशनली काम करतांना दिसतात. हॉटेल मध्ये सुद्धा , अशीच तरुण मुले मुली, हसतमुखाने तुमची ऑर्डर घेतात, व तत्परतेने ती पूर्ण करतात. इथे कुठल्याही कामाला कमी मानले जात नाही, हे यावरून प्रत्यक्ष दिसले व अनुभवाला आले, ही सर्व मुले, चांगल्या घरातली, वेल मॅनर्ड दिसली. अमेरिकेत मुले १४-१५ व्या वर्षीच आपापले कमवायला लागतात, हे ऐकले व वाचले होतेच, मात्र आता प्रत्यक्ष बघायला मिळत होते. आपल्याला वाटते तशी इथली तरुणाई स्वैरपणे वागतांना, आम्हाला तरी, दिसली नाही, उलट अत्यंत efficiently व जबाबदारीने वागतांना दिसली. अर्थात, हे सर्व आम्ही पाहिलेल्या मर्यादित वेळेत जे दिसले त्यावरून जे वाटले, ते मांडले आहे, प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे जाणकार लोक सांगू शकतील.

इथे मॅन पॉवर ची अत्यंत कमतरता आहे असे जाणवले. ठिकठिकाणी, “ Now Hiring” चे बोर्ड, बघायला मिळतात; इतकेच नाही तर वेगवेगळ्या स्टोर्स, मॉल इ. मध्ये, त्यांच्या कडे काम करण्यासाठीचे आकर्षक बेनिफिट्स, incentives इ. ची माहिती सांगणारी पॅम्फलेट्स ही ठेवलेली दिसतात.

आम्ही नायगरा बघायला गेलो तेंव्हा, तेथून ४० कि.मी. दूर, बफेलो येथे, हॉटेल हॉलिडे एक्स्प्रेस इन मध्ये उतरलो होतो. तेथील काऊंटर वरील मॅनेजर काय काय कामे करीत होता हे बघून थक्क झालो. एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये, त्याच्या शिवाय, खालच्या मजल्यावर इतर कुणीही स्टाफ नव्हता. तो येणारे फोन घेत होता. तसेच आमच्या सारख्या चेक इन करणाऱ्या गिऱ्हाईकांचे चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेत होता. प्रत्येक प्रश्नाला, हसत मुखाने व अदबीने, “सर.. सर..” असे म्हणून उत्तर देत होता, व त्याला जे काम करणे शक्य असेल ते लगेच करून टाकत होता. रूम मध्ये जाण्याआधी आम्हाला पाण्याच्या बाटल्या हव्या होत्या. त्या त्याला मागितल्यावर  त्याने थोड्या दूर असलेल्या जागेवरून लगेच तीन बाटल्या काढून दिल्या. आम्ही अजून २ बाटल्या मिळतील का? असे विचारल्यावर, “ Oh, sure, !” असे म्हणून पुन्हा तेथून दोन बाटल्या न वैतागता काढून दिल्या, आम्हाला लिफ्ट चा रस्ता दाखवला व कसे जायचे ते सांगितले. आम्ही रूम मध्ये गेल्यानंतर तेथील एक्स्ट्रा बेड्स (जे की सोफा कम बेड होते), त्यावरील गाडी (matress) खूपच पातळ आहे असे आम्हास दिसून आले, तसेच पांघरायला चादर नव्हती. आम्ही काऊंटर वर फोन केल्यानंतर, ५ मिनिटांच्या आत तोच माणूस, अजून एक बेड स्वतःच घेऊन आला. त्याने ते आधीच्या बेड वर अंथरले व आता ठीक आहेका बघा म्हणून म्हणाला. पण तरीही ते तेवढे जाड वाटत नव्हते, हे आम्ही सांगितले व त्याच्याही लक्षात आले तेंव्हा तो म्हणाला, “ जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स.” मी अजून दोन बेड्स आणतो, त्यानंतरही जर तुम्हाला कम्फर्टेबल नाही वाटले तर रूम बदलून देतो. त्याने लगेच दोन गाद्या स्वतः आणल्या, टाकल्या. आता कम्फर्टेबल वाटत आहे असे आम्ही म्हटल्यावर तो समाधानाने हसला, व अजून काही लागल्यास मला फोन करा, म्हणून निघाला. इतक्यात, चादरी राहिल्या म्हणून त्याला आठवण देताच, “ Oh ! I am sorry, I will bring them right away!” असे म्हणून ताबडतोब जाऊन ३-४ स्वच्छ धुतलेल्या चादरी घेऊन आला व त्यातील एक चादर स्वतः आमच्या बेड वर पसरून व्यवस्थित चारी बाजूंनी आत दाबून दिली व आमचे पूर्ण समाधान झाले आहे अशी खात्री करून घेतल्यानंतरच तो तेथून निघाला. एवढेच नाही, तर आम्हाला झालेल्या त्रासाची भरपाई करण्यासाठी त्याने आम्हाला फ्री आईस क्रीम पाठवले. या अनुभवाची तुलना भारतातली कुठल्याही (अगदी महागातल्या) हॉटेलशी करून पहा. ढीगभर स्टाफ नुसता इकडून तिकडे ऐटीत फिरत असतो, पण ग्राहकाकडे ढुंकूनही पाहायला त्यांना वेळ नसतो. आपल्याकडील एखाद्या हॉटेल चा  मॅनेजर मला नाही वाटत एवढे सर्व करेल म्हणून. तो फार झाले तर त्याच्या हाताखालच्या एखाद्या नोकराला, “ अरे ते ६ नंबरच्या साहेबांना काय लागते बघ” असे कोणाला तरी ओरडून सांगेल.

सभ्यता आणि एटिकेट्स हे येथील माणसाच्या अंगात भिनले आहेत असे म्हणले तरी चालेल . आम्ही सकाळी जेंव्हा येथील सोसायटी च्या प्ले ग्राउंड वर फिरायला जात असू, किंवा इतर वेळेसही, साईड वॉक वरून जात असू, तेंव्हा कुणीही अमेरिकन पुरुष किंवा स्त्री, समोरून येत असल्यास सुहास्य वदनाने आम्हाला हॅलो करीत असे. व सोबत आमची नात असल्यास तिला कौतुकाने “ हा ऽऽय म्हणणार.

अमेरिकन माणूस शक्यतो आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो. बऱ्याच शॉप्स किंवा मॉल मध्ये, Push pull doors असतात. जेंव्हा तुम्ही एखादा दरवाजा Push करून आतमध्ये जाता, तेंव्हा मागून कोणी व्यक्ति येत असल्यास, तुम्ही दरवाजा धाड्कन सोडून द्यायचा नाही, असा रिवाज आहे. तुम्ही दरवाजा तसाच धरून उभे राहायचे व मागील व्यक्ती आत आल्यानंतर दरवाजा सोडायचा. मागील व्यक्तीही तुम्हाला कृतज्ञतेने “Thank you” म्हणते . तुम्ही त्याचा हसून स्वीकार करायचा. “Excuse me…,  sorry…” इत्यादी शब्द तर सारखे ऐकू येतात.

पण आपले भारतीय लोक काही आपला बाणा सोडत नाहीत. याचे प्रत्यंतर नायगारा येथे आले. नायगारा धबधबा अर्ध्यापेक्षा जास्त पाहून झाला होता. व आता अगदी जवळून अंगावर तुषार घेण्यासाठी मुलगा व सून थोडा उंच एक स्पॉट आहे, तिथे गेले. आम्ही दोघे खालीच थांबलो. खाली बसायला बरेच बाक ठेवले होते. काही बाकांच्या समोर, थोड्या अंतरावर रेलिंग पण होते. आम्ही त्या रेलिंग ला टेकून उभे राहिलो. त्या रेलिंगवर काही जणांनी आपले ओले कपडे, ज्यात एक मोज्यांची जोडी पण होती, वाळत घातले होते.(वाळत घालणारे, भारतीयच होते, हे नंतर लगेच कळाले). आमच्या नकळत सौ. चा हात त्यापैकी एका मोज्याला लागला व तो खाली पडला. आमचे त्याकडे लक्षही नव्हते. पण इतक्यात मागून आवाज आला, “ ओ ऑन्टी..” आणि मागील बाकावर बसलेल्या ग्रुप मधील एका पुरुषाने, तो मोजा उचलून ठेवण्याबद्दल आम्हाला खुणेनेच, सांगितले. त्यांच्या आपसातील बोलण्यावरून ते बहुतेक South Indian (बहुतेक आंध्रातील) असावेत, असे वाटले. आपले कितीही वय झाले असले, तरी असे ऑन्टी म्हणून कोणी हाक मारणे आपल्याला नक्कीच आवडणार नाही. अमेरिकेत कुणीही कुणाला असे ऑन्टी, अंकल, असे नात्याने हाक मारत नाहीत. कितीही वयाची बाई असली तरी तिला “मॅम” च म्हणणार/ खैर, आम्ही सॉरी म्हणत, लगेच तो मोजा उचलून वर ठेवला. त्यावर त्या भारतीय माणसाने, thank you वगैरे काही म्हटले नाही. याच जागी एखाद्या अमेरिकन माणसाचा मोजा पडला असता तर, आमच्याकडून हे चुकून घडले आहे हे ओळखून, त्याने स्वतः उठून तो जागेवर ठेवला असता.

अमेरिकेतील सभ्यता, मॅनर्स आणि एटिकेट्स याबद्दल जे जाणवले, ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

——–******———

नोट:  उपरोक्त माहिती, योग्य त्या क्रमाने लावली नाहीये व जशी आठवत गेली तशी लिहिली आहे. 

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Hotels in America-अमेरिकेतील हॉटेल्स

thai hotel

Small Hotels in America अमेरिकेतील छोटी हॉटेल्स

अमेरिकेतील हॉटेल्स चे अनुभव

नायगारा पाहून परत येत असतांना, बफेलो येथून, क्लीव्हलँडला कारने परत येत असतांना, वाटेत कुठे ब्रेकफास्ट मिळेल का म्हणून मोबाईल वर शोध घेत होतो.

अमेरिकन फूड मधील आम्हाला काहीच चालण्यासारखे नसायचे, कारण बहुतेक सर्व पदार्थांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरुपात नॉन व्हेज असतेच. भारतीय जेवणाशी त्यातल्या त्यात मॅच होणारे दोन प्रकार म्हणजे दोन प्रकार: एक तर मेक्सिकन आणि दुसरे म्हणजे थाई.

आम्हाला मोबाईलवर वाटेतील एका छोट्याशा व्हिलेज मध्ये एक थाई रेस्टॉरंट असल्याचा शोध लागला. गूगल मॅप च्या ‍‌सहाय्याने रस्ता शोधत शोधत आम्ही त्या बऱ्याच आतल्या बाजूला असलेल्या छोट्याशा खेडेगावात गेलो.  अत्यंत शांत व छोटेसे खेडे होते ते. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता- नेहमीप्रमाणे. खेडे असल्यामुळे वाहनेही अगदी अभावानेच होती. मॅपवरून पत्ता काढून आम्ही त्या थाई रेस्टॉरंटमध्ये गेलो. बहुतेक त्यांचे रहाते घरच छोट्याश्या रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित केले होते, व २-३ थाई स्त्रियाच ते रेस्टॉरंट चालवीत होत्या. अत्यंत टुमदार, रेखीव व कलात्मक सजावट असलेली जागा. आतमध्ये कमालीची शांतता आणि स्वच्छता. खेडेगाव म्हणून कसलाही गचाळ पणा चालेल अशी मानसिकता नाही. सर्व गोल टेबल्सवर स्वच्छ टेबल क्लॉथ्स, त्यावर स्वच्छ काचेचे ग्लास. परीट घडीचे पांढरे शुभ्र रुमाल टोकदार घडी घालून त्या ग्लास मध्ये ठेवलेले.thai hotel

आम्ही तिथे जाऊन बसल्यावर मध्यमवयीन थाई स्त्रीने  (जी की बहुतेक तेथील मालकीण असावी), तत्परतेने व हसतमुखाने, आमच्या हातात मेन्यू कार्ड दिले. इथे सगळ्याच हॉटेल्स मध्ये तुम्हाला मेन्यू कार्ड लगेच देतात. त्यासाठी, तुम्हाला ‘शुक, शुक’ म्हणून कोणाचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करावा लागत नाही, की ओरडावे लागत नाही. तसेच तुम्ही ऑर्डर देईपर्यंत तुमच्या छातीवर उभे रहात नाहीत, की, अर्धवट ऑर्डर घेऊन घाई घाईने पळून जात नाहीत. तुम्हाला मेन्यू कार्ड दिल्यानंतर, ते वाचून तुमचा मेन्यू ठरवायला पुरेसा वेळ देतात व तुमचे ठरले आहे असे दिसताच, तुमची ऑर्डर घ्यायला पुढ्यात येतात. तसेच तुमची जी स्पेशल requirement असेल ती काळजीपूर्वक नोट करतात उदा..Less spicy, no onion, no meat, no eggs, इत्यादि. व त्याबरहुकूम पदार्थ बनवतात.thai woman

तर अशा प्रकारे आमची ऑर्डर घेऊन त्या स्त्रिया गेल्या, आणि १५ मिनिटात, अत्यंत स्वादिष्ट व गरम गरम असे जेवण आमच्या पुढ्यात आले. त्या शांत खेड्यात, इतक्या छान वातावरणात खाल्लेले जेवण हे आमच्या चांगलेच लक्षात राहिले.thai food

आम्ही नायगरा हून परत आलो, तेंव्हा, रात्रीचे १० वाजून गेले होते, बराच उशीर झाल्यामुळे, व विमान तळावरून घरी पोहोचायला अजून एक तास लागणार असल्यामुळे, आम्ही, बाहेरच जेवायचे ठरवले. परंतु हॉटेल्सही बंद होण्याची वेळ झाली होती. बहुतेक सर्व हॉटेल्स रात्री १० किंवा जास्तीत जास्त १०.३० पर्यंत बंद होतात. मग सचिन गाडी चालवीत असतांना, मी वेब वर, उशिरापर्यंत उघडी असणारी हॉटेल्स शोधू लागलो. अशी फारच थोडी हॉटेल्स होती. त्यातले, भारतीय जेवण देणारे एक हॉटेल नशिबाने सापडले, जे की ११.३० पर्यंन्त उघडे होते. आम्ही तिथे फोन करून खात्री करून घेतली आणि मॅप वरून शोधत शोधत रात्री ११ च्या सुमारास त्या हॉटेल मध्ये पोहोंचलो. ते हॉटेल बहुतेक कुणीतरी भारतीय बिझनेसमननेच सुरु केले असावे. हॉटेल अजून प्राथमिक अवस्थेतच होते, म्हणजे डेकोरेशन वगैरे विशेष काही नव्हते. पण तिथे बरेच भारतीय ग्रुप्स जेवण करीत असतांना दिसत होते. आम्ही गेल्याबरोबर, वेटर च्या स्वरुपात, ३-४ भारतीय मुलींचा जथा आम्हाला समोर आला, व आम्हाला रिकाम्या असलेल्या टेबल वर बसवले. लगेच त्यातील दोन मुली ऑर्डर घ्यायला आल्या. इथे जे भारतीय शिक्षण घेतात, ते असे पार्ट टाईम जॉबही करतात, असे ऐकले होते. या मुली बहुतेक अशांपैकीच असाव्यात असे वाटले. आम्ही बरेच थकून आलो होतो व खूप सडकून भूक लागली होती. अशा वेळी, आम्हाला जास्त वाट पाहायला न लावता, रात्री ११.३० वाजता, गरमागरम भारतीय जेवण आमच्यासमोर आले. त्या जेवणाचा स्वाद इतका चांगला लागला म्हणून सांगू!

त्याआधी आम्ही ह्यूस्टन ला ‘नासा’ पाहायला गेलो होतो, तेंव्हा, तेथून निघतांना, मेक्सिकन जेवणाचा आस्वाद घेतला, त्याची माहिती, नंतरच्या एपिसोड मध्ये!

——*****—–

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Roads in America-अमेरिकेतील रस्ते

a-Typical-multi-lane-highway-California-USA-b-5-lane-highway-in-the-simulator

Roads in America- अमेरिकेतील रस्ते

अमेरिकेची महत्वाची जमेची बाजू म्हणजे अमेरिकेतील रस्ते. भरपूर रुंद, व्यवस्थित बांधलेले, वेगवान आणि विना थांबता, विना अडथळ्याचा प्रवास करता येण्यासारखे रस्ते.roads in usa-1

३ ते ४ लेन च्या रस्त्यांवर (प्रत्येकी  ३ ते ४, म्हणजे दोन्ही बाजूंनी ६ ते ८ लेन )  तुम्ही विना अडथळा सरासरी ताशी १०० ते १२५ किमी च्या वेगाने आरामात जाऊ शकता. रस्ते दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे टोल वेज, म्हणजे ज्या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी टोल द्यावा लागतो, आणि दुसरे म्हणजे फ्री वेज, म्हणजे ज्यावर टोल द्यावा लागत नाही.

फ्री वेज हे टोल वेज च्या समांतर, पण थोडे बाजूला, कमी रुंद (पण तरीही आपल्याकडील मोठ्या रस्त्यांपेक्षा ही जास्त रुंद) असे रस्ते, जिथे वेगमर्यादा कमी असते. तुम्हाला रमत गमत, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत जायचे असल्यास, तुम्ही अशा फ्री वेज ने जाऊ शकतात.

आणि हो, दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर, वेग मर्यादा सगळी वाहने कसोशीने पाळतात. ट्रॅफिक पोलिसाच्या गाड्या उपरोक्त दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर कायम गस्त घालत असतात, आणि तुम्ही जर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जातांना आढळला, तर लगेच तुम्हाला अडवले जाते.american police stopping a car

अमेरिकेत कायद्याचा चांगलाच दरारा आहे. कोणीही पोलिसांशी हुज्जत घालत नाही किंवा धमकावत नाही. इतकेच नाही तर  पोलिसांनी इशारा केल्यानंतर गुपचुप गाडी बाजूला घेतली जाते व पोलिसांशी अत्यंत आदराने बोलले जाते. कारण येथील ट्रॅफिक पोलिसांनाही खूप अधिकार आहेत, आणि कायदा मोडणार्यांची गय केली जात नाही.

आम्ही इथे असतांना एक बातमी खूप गाजली होती. एका माणसाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. तो थांबला ही. त्याच्या सोबत त्याची गर्ल फ्रेंड होती. अतिरेक्यांचा भीतीमुळे इथे, सहसा, अशा वेळी पोलीस, त्या व्यक्तीला हात वर करण्याची सूचना देतात. अशा वेळे हात वर करून, पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. चुकून जरी हात खिशाकडे गेला, तर, तुम्ही पिस्तुल काढता आहात असे वाटून पोलीस ऑफिसर लगेच त्याच्या जवळचे पिस्तुल काढून तुम्हाला गोळी ही झाडू शकतो. त्याला तसा पूर्ण अधिकार आहे. तर त्या माणसाचा हात खिशाकडे गेल्यामुळे ऑफिसरने गोळी झाडली व त्यात त्या गाडी चालकाचा मृत्यू झाला. तो चालक आफ्रिकन-अमेरिकन (ब्लॅक) असल्यामुळे नंतर बरीच निदर्शने वगैरे झाली. पण त्या ऑफिसर वर काहीही कारवाई झाली नाही, उलट त्याचे वरिष्ठ व सरकार त्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले.

आता टोल रस्ते म्हटल्यावर भारतातील टोल नाके डोळ्यासमोर येतील तर तसे अजिबात नाही. टोल रस्ते असूनही कुठे टोल नाके नाहीत, की गाड्यांचे थांबणे नाही. मग टोल कसा वसूल करतात? इथे जवळ जवळ प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतेच. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही क्रेडिट कार्डवरच चालते.

प्रवासासाठी स्वतःची कार हेच मुख्य साधन आहे, तर टोल रोड साठी तुम्हाला प्री पेड कार्ड मिळते. त्याचे एक स्टीकर तुम्ही तुमच्या कारच्या विंडस्क्रीन वर बाहेरच्या बाजूने लावलेले असते. तुम्ही जेंव्हा टोल रोड वरून जाता, तेंव्हा, त्या रोड वर ठराविक अंतरावर, उंच जागी लावलेले कॅमेरे तुमच्या कार वरील त्या स्टीकर वरील इन्फोर्मेशन सेन्स करतात आणि तुमच्या क्रेडिट कार्ड अकौंट मधून टोल ची रक्कम वजा होते. ( आता आपल्याकडेही अशी पद्धत आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे समजले; खरेच तसे झाले तर खूप बरे होईल. अर्थात, आपल्याकडील डोकेबाज मंडळी टोल कसा चुकवायचा याचे अनेक मार्ग सुरुवातीला शोधून काढतील- उदाहरणार्थ साईडने कट मारणे, स्टीकर झाकून टाकणे, इत्यादि) ज्यांच्या गाडीवर असे स्टीकर नसेल, त्यांच्या गाडीची माहिती कॅमेऱ्यात रजिस्टर होते आणि महिना अखेरीस त्यांना, त्या महिन्यात त्यांनी जेवढा प्रवास टोलच्या रस्त्यावरून केला असेल त्याचे, बिल पोस्टाने त्यांच्या घरी, तसेच ई-मेल वर येते.a-Typical-multi-lane-highway-California-USA-b-5-lane-highway-in-the-simulator

आता आपल्या भारतीय मनाला हा प्रश्न पडू शकतो की बिल न भरले तर काय करून घेणार आहेत? कोण विचारणार आहे? तर याचे उत्तर असे, की अमेरिकेतील ९९ % लोक हे कायदा पाळणारे आहेत. तसे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहेत म्हटले तरी चालेल. आणि दुसरे म्हणजे, तुम्ही कुठलेही सरकारी बिल थकवले तर तुमच्यावर लगेच कायदेशीर कार्यवाही सुरु होते. त्यात उशीर, किंवा दयामाया नाही, की ओळखपाळख, राजकीय लागेबांधे, इत्यादीचा संबंध नाही. तिसरे म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डचा स्कोअर खाली येतो आणि परिणाम म्हणून तुमचा व्याजाचा दर वाढतो, त्यावरील लिमिट खाली येते आणि सर्वच बाजूंनी तुमची कोंडी होऊन जाते. त्यामुळे, सरकारी बिल न भरण्याचा वेडेपणा सहसा कुणीही करीत नाही.

या प्रशस्त अशा, सिमेंटने बांधलेल्या टोल वेज वर ठिकठिकाणी स्पष्ट शब्दात माहिती व सूचना लिहिलेल्या असतात (अर्थात त्यांचा अर्थ नीट कळण्यासाठी काही दिवस इथे राहणे आवश्यक आहे). तसेच इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स वर महत्वाचे संदेश झळकत असतात. एखादे संशयास्पद वाहन, किंवा कायदा मोडून पाळणारे एखादे वाहन असल्यास अशा वाहनांची माहिती या बोर्ड्स वर झळकत असते.

आम्हाला रस्त्यावर अशी माहिती अधून मधून वाचायला मिळत होती. अजून एक म्हणजे, या लांब लचक रस्त्यांवर, समजा एखादे वाहन मध्येच बंद पडले किंवा त्यांना काही कारणामुळे थोडेसे थांबावे लागले, तर रस्त्याच्या कडेला मधून मधून ठराविक अंतरावर जास्तीची जागा असते, जेथे की असे वाहन थोड्या वेळासाठी उभे करता येईल. त्यामुळे बाकीच्या ट्रॅफिकचा खोळंबा होत नाही. अमेरिकेतील असे टोल वेज हे गावांपासून किंवा मुख्य वस्तीपासून भरपूर लांब असतात, त्यामुळे असे रस्ते कुठल्याही गावाच्या भर वस्तीतून जात आहेत असे कधीच नसते. आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उंच आणि घनदाट अशी झाडे लावलेली असतात. त्यामुळे, गाडी चालवतांना छान वाटते.

तर अशा या रस्त्यांवर असलेली आणखी एक अप्रतिम सुविधा म्हणजे ठराविक अंतरावर असलेले “रेस्ट एरियाज” . रेस्ट एरिया म्हणजे टोल वे पासून थोड्या अंतरावर, सहसा हिरव्यागार झाडीत आतल्या बाजूस असलेली विश्रांतीची ठिकाणे. ही विश्रांतीची ठिकाणे अत्यंत नीट नेटकी, स्वच्छ आणि विनामूल्य असतात. छोटीशी पण टुमदार, बैठी इमारत, बाहेर गाड्या पार्क करायला खूप म्हणजे खूपच प्रशस्त जागा. आणि बिल्डिंग अर्थातच पूर्णपणे एअर कंडिशन्ड. रेस्ट एरिया मध्ये आत बसायला छान जागा, खुर्च्या, सोफे, इत्यादि असतात.rest area-2

rest_areaत्या त्या भागाचा नकाशा, त्या भागाची माहिती देणारी पॅम्फ्लेट्स इत्यादि ठेवलेले असतात. तेथील छोट्याशा ऑफिसमध्ये माहिती देण्यासाठी एखादी व्यक्ती बसलेली असते व ती तुम्हाला, विचारलेल्या गोष्टीची तत्परतेने व सविस्तर माहिती, हसतमुख चेहऱ्याने देते. प्रत्येक ठिकाणी एक अॅटोमॅटिक व्हेंडिंग मशीन ही ठेवलेली असते, ज्यात तुम्ही ठराविक रकमेची नाणी, नोटा टाकून, किंवा कार्ड स्वाईप करून कोल्ड ड्रिंक, चॉकलेट्स, कुकीज किंवा इतर पॅक्ड खाण्याचे पदार्थ घेऊ शकता. प्रत्येक रेस्ट एरिया मध्ये अत्यंत स्वच्छ, भरपूर पाणी असलेली, कमोड मध्ये पुरेसे टिशू पेपर्स असलेली, पूर्ण एअर कंडिशन्ड, अशी, वॉश रूम उपलब्ध असते (इथे तिला रेस्ट रूम म्हणतात.) लहान मुलांसाठी कमी उंचीची सोय पण उपलब्ध असते. प्रत्येक ठिकाणच्या वॉश बेसिन मध्ये सेन्सर बसवलेले असतात (विमान तळावर असतात तसे), जेणे करून तोटी च्या खाली हात धरल्यावर पाणी येईल.rest area-3

तर तुम्ही गाडी चालवतांना थकले असल्यास, किंवा तुम्हाला सोबत आणलेले पदार्थ खाण्यासाठी थांबायचे असल्यास, ही एक अप्रतिम व्यवस्था आहे. हे रेस्ट एरियाज त्या त्या ठिकाणच्या कौंटी कडून मॅनेज केले जातात असे कळाले.

—–००००—–

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Kojagari Poornima- कोजागरी पौर्णिमा

Kojagari Poornima

How to celebrate Kojagari Pornima

Kojagari Poornima- कोजागरी पौर्णिमा

यावर्षी कोजागरी पोर्णिमा केंव्हा आहे- आणि ज्येष्ठ अपत्याला केंव्हा ओवाळायचे

कोजागरी पोर्णिमा
रास पोर्णिमा
कौमुदी महोत्सव
नवान्न पौर्णिमा
कोजागरी पोर्णिमेचे आयुर्वेदात महत्व
आयुर्वेदाप्रमाणे कोजागरी पोर्णिमा कशी साजरी करावी

नवरात्र आणि दसरा झाल्यानंतर आपल्या संस्कृतीत साजरा केला जाणारा एक अतिशय आनंदमय उत्सव म्हणजे कोजागरी पोर्णिमा. यावर्षी पंचांगात पोर्णिमा दोन दिवस दाखविली आहे, त्यामुळे काही लोकांचा संभ्रम होण्याची शक्यता आहे. पण याचे निराकरण दातेंच्या आणि अन्य पंचांगातच दिलेले आहे. यावर्षी पोर्णिमा तिथी दि. १६ ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी लागते आहे, आणि दि. १७ ऑक्टोबर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी संपते आहे. कोजागरीचा उत्सव हा रात्री साजरा करीत असल्यामुळे, आज म्हणजे दि. १६ ऑक्टोबर बुधवारीच रात्री हा उत्सव साजरा करण्याचा आहे. पण कोजागरी पोर्णिमेला ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याचा कार्यक्रम (ज्येष्ठापत्य निरंजन) मात्र दुसऱ्या दिवशी, म्हणजे दि. १७ ऑक्टोबर गुरुवारी करायचा आहे.
आपण यापूर्वीच्या “नवदुर्गांची उपासना ” या लेखात बघितल्याप्रमाणे, हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. तसेच कोजागरी पोर्णिमेला धार्मिक आणि पौराणिक संदर्भही जोडले गेले आहेत. आज इथे आपण त्या सर्वांची माहिती करून घेणार आहोत.


पौराणिक संदर्भ


पुराणात असा उल्लेख आहे. की ह्या दिवशी आकाशात देवी लक्ष्मी, देवांचा खजिनदार कुबेर आणि देवराज इंद्र फेरफटका मारण्यास निघतात. आणि कोण जागा आहे हे पाहण्यासाठी “कोजागर्ति कोजागर्ति” असा आवाज देतात. जे जागे असतात त्यांच्यावर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा होते. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मीची खाष्ट बहीण फेरा मारते. तिला आक्काबाई म्हणतात. जे जागे नसतात,  निद्रिस्त असतात त्याना ती शाप देते. त्याना दारिद्र्य येते. म्हणुनच एखादा मनुष्य चोहोकडून संकटात आला की त्याच्यावर आकाबाईचा फेरा आला असे म्हटले जाते.
या पौर्णिमेच्या दिवशी रात्री, साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. त्यामुळेच या पौर्णिमेला कोजागरी पोर्णिमा असे म्हणतात- कोजागिरी हा त्याचा अपभ्रंश आहे. ‘कोण जागे आहे’ याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.
पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती.

ऐतिहासिक संदर्भ-

शिवाजी महाराज

इतिहासकार सभासदांच्या बखरीत असा उल्लेख आढ़ळतो की अफजलखान वध करून जेव्हा शिवाजी महाराज परत आले त्यावेळी महाराणी सईबाईसाहेब निवऱ् तल्या   होत्या. त्या आठवणीने राजे बेचैन होऊन  रात्री आपल्या वाड्याच्या सौंधावर येरझाऱ्या घालित होते. इतक्यात त्याना “कोजागर्ति”असा आवाज ऐकू आला. त्याचक्षणी अष्टावधानी राजांनी उत्तर दिले “अहम जाग्रति “! असे म्हणतात की त्याचवेळी आई भवानीने राजाना दर्शन देवून आशिर्वाद दिला.

रास पोर्णिमा (Raas Poornima/ Ras Pornima)

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. त्यामुळे या पोर्णिमेला ‘रास पोर्णिमा’ असेही म्हणतात. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.

कौमुदी महोत्सव (Kaumudi Mahotsav)

कौमुदी महोत्सव हा प्राचीन भारतात साजरा केला जाणारा सण होता. कौमुदीच्या दिवशी (म्हणजे कार्तिक महिन्याची पौर्णिमा) हा सण साजरा केला जात असे.
विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम आणि आनंद वाढावा यासाठी कौमुदी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असे. कौमुदी महोत्सव हा भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेला सण आहे. या सणाच्या काळात झाडांमध्ये अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलेही बहरतात. शेतात पिकांचे वेगवेगळे रंग दिसतात. हळुवार पणे वाहणारा थंड गार वारा आणि बहरलेले चांदणे प्रत्येकाचे मन वेधून घेतात.

धार्मिक महत्त्व

या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची, कुबेराची  आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राचीही  पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांचे  या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.

नवान्न पौर्णिमा (Navanna Poornima)

कृषि संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने कोजागरी पोर्णिमा

(Ayurvedic importance of Kojagari Purnima)

आयुर्वेदाच्या दृष्टीने कोजागरी पोर्णिमा म्हणजे ऋतूचक्रातील बदलाचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी म्हणून केलेली उपाययोजना असे म्हणता येईल.
आश्विन महिना हा म्हणजे ऋतू चक्रानुसार शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यामधील संधिकाल! या महिन्यात पाऊस कमी होत होत थांबतो आणि मग दिवसा कडक ऊन पडायला सुरुवात होते.याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. पावसाळ्यातील कुंद, दमट हवामान, गारवा,नवीन पाणी आणि त्या काळात घेतला जाणारा आहार यामुळे शरीरात पित्त दोष वाढलेला आणि साठलेला असतो. हाच साठलेला पित्त दोष शरदात कडक ऊन पडू लागले की अजून वाढतो, आणि पित्ताचे विविध विकार निर्माण करतो. हा त्रास होऊ नये म्हणून पित्त शामक पदार्थ आहारात वाढवायला हवे. गोड, मधुर चवीचे व शीतल ,थंड पदार्थ पित्त कमी करतात व त्याला नियंत्रणात ठेवायला मदत करतात. फक्त थंड पदार्थ जे वापरायचे ते नैसर्गिकरित्या थंड हवेत,कृत्रिम पद्धतीने गार केलेली शीतपेये ,आईस्क्रीम वगैरे नकोत! आयुर्वेदानुसार दूध हे उत्तम पित्त शामक आहे. पित्ताच्या चिकित्से मध्ये विरेचन ही येते. आणि दूध हे विरेचनाचे सुद्धा काम करते.
आयुर्वेदानुसार, या दिवशी सकाळी दूध आटवून ठेवावं व संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर मोकळ्या अंगणात, गच्चीवर किंवा गॅलरीत दूध थंड व्हायला ठेवावं. दुधाच्या भांड्यावर पातळ कॉटन किंवा मलमलचं कापड झाकून ठेवावं म्हणजे धूळ वगैरे पडत नाही. हे दूध तयार करताना खरं म्हणजे नुसती खडीसाखर आणि वेलचीपूड घालणं अपेक्षित आहे- आणि फार झाले तर अजून त्यात थोडेसे जायफळ आणि केशर घातले तर अजून चांगली चव येऊ शकते. हल्ली मात्र दूध अगदी घट्ट रबडी प्रमाणे आटवून ,मलईदार बनवून शिवाय त्यात भरपूर सुका मेवा टाकला जातो. आटीव दूध आधीच पचायला जड होतं त्यात सुका मेवा घातल्याने ते अजूनच जड होतं. त्यात सोबत भेळ, चिवडा, समोसे, कचोरी, काय वाट्टेल ते- चवीच्या नावाखाली, खाल्ले जाते. अशावेळी या सर्व गोष्टींबरोबर दूध हे पचनावर फारच ताण देणारं ठरतं. त्यामुळे खालील काळजी घेतली, तर दुधाचा खरा फायदा होईल.
•दूध खूप घट्ट आटवू नये तसेच खूप बदाम काजू, चारोळी वगैरे खूप जास्त टाकू नये. अगदी चवीपुरते खूप थोड्या प्रमाणात घालायला हरकत नाही.
•ज्यांचा कोठा मुळातच हलका आहे अशा व्यक्तींनी दूध बेतानेच प्यावे.

अशा प्रकारे कोजागरी पोर्णिमा साजरी केली तर तिचा खरा आनंद घेता येईल.
आपणा सर्वांना कोजागरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-5

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-5

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-4    वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

याठिकाणी, अहंकार, हा शब्द, आपला consciousness, अशा अर्थाने लक्षात घ्यायला हवा. गीतेत अहंकार हा शब्द ५ ठिकाणी आला आहे. त्यातील पाहिला उल्लेख, ७ व्या अध्यायात, चौथ्या श्लोकात आलेला आहे.

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च |
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा||

 भूमि, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतें, आणि मन बुद्धि आणि अहंकार, या आठ प्रकारांने विभाजित असलेली ही माझी ‘अपरा’ म्हणजे जड प्रकृती आहे.

तसेंच १३ व्या अध्यायात, ५ व्या श्लोकात,

महाभूतान्यङ्ककारो बुद्धिरव्यक्त मेव च |

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचरा: ||

 क्षेत्र क्षेत्रज्ञ योगा मध्ये, क्षेत्राच्या वर्णनात वरील श्लोक आला आहे, पाच महाभूतें, अहंकार, बुद्धि, आणि ‘अव्यक्तम्’ एव, म्हणजे मूल प्रकृति सुद्धा, दहा इंद्रियें, एकम् म्हणजे एक ‘मन’ आणि पञ्च इन्द्रिय गोचरा, म्हणजे पाच इंद्रियांचे विषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे क्षेत्र आहेत असे सांगितले आहे.

मनुष्याचे उद्दिष्ट जरी, सत्व रज, तम या तीन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचे असले, आणि मन, बुद्धि आणि अहंकार यांच्या अतीत असलेले तत्व जाणून घेण्याचे असले, तरी, जो पर्यंत ते उद्दिष्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत, ही सर्व ‘instruments’ सुस्थितीत रहावीत हीच प्रार्थना देवीकडे केली आहे.

आपण नेहमी वापरतो त्या अर्थाने अहंकार हा शब्द, किंवा त्याचे रूप, गीतेच्या  खालील श्लोकांमध्ये आले आहे, ते जिज्ञासूंनी पाहावे. (अध्याय- श्लोक)

१६-१८; १८-१७;, १८- ५८,५९.

आपण ४२ व्या श्लोकापर्यंत अर्थ पाहिला. देवी कवच एकूण ५६ श्लोकांचे आहे. उर्वरित १४ श्लोकांबद्दल थोडक्यात पाहू.

पदमेकं न गच्छेतु यदीच्छेच्छुभमात्मनः।
कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैव गच्छति॥43॥

 

मनुष्य आपले शुभ इच्छित असेल तर कवचाशिवाय एक पाऊल ही पुढे टाकू नये. (या स्तोत्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा श्लोक आहे असे वाटते.)

तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः।
यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम्‌।

परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान्‌॥44॥

 

कवचाने सुरक्षित मनुष्य जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला धन प्राप्ति होईल आणि पूर्ण कामनांची सिद्धि करवणाऱ्या विजयाची प्राप्ति होईल. तो ज्या ज्या अभीष्ट वस्तूचे चिन्तन करेल त्या त्या वस्तूची त्याला निश्चित प्राप्ति होईल. तो पुरुष या पृथ्वीवर तुलनारहित महान ऐश्वर्य प्राप्त करील.

निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः।

त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यः कवचेनावृतः पुमान्‌॥45॥

 

कवचाने सुरक्षित मनुष्य निर्भय होतो. युद्धात त्याचा पराजय होत नाही आणि तो तीन्ही लोकांत पूजनीय होतो.

इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम्‌।
यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः॥46॥

 

देवीचे हे कवच, देवांनाही दुर्लभ आहे. जो रोज नियमपूर्वक तीन्ही संधीकाळी (सकाळ, दुपार, संध्याकाळ) श्रद्धेने या स्तोत्राचा पाठ करतो,

दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येष्वपराजितः।
जीवेद् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः॥47॥

 

त्याला दैवी कला प्राप्त होते, आणि तो तीन्ही लोकांमध्ये कधीही पराजित होत नाही. तो अपमृत्यू पासून रहित होतो, आणि शताधिक वर्षेंपर्यंत जीवित राहतो.

नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः।
स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम्‌॥48॥

 

(लूत आणि विस्फोटक हे व्याधींचे प्रकार आहेत) या व्याधी नष्ट होतात त्याच्यावर, स्थावर, जंगम आणि कृत्रिम विषाचा काहीही परिणाम होत नाही. [कण्हेर, भांग, अफू, धत्तुरा, आदींचे ‘स्थावर’ विष म्हटले जाते. साप, विंचू इत्यादि विषारी प्राणी चावल्यामुळे चढलेले म्हणजे, ‘जंगम’ विष, आणि, अहिफेन (अफू) आणि तेल यांच्या संयोगाने किंवा, तत्सम विविध वस्तूंच्या संयोगाने बनलेले कृत्रिम विष]


अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले।
भूचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः॥49॥

 

या पृथ्वीतलावर मारण, मोहन आदि जितके अभिचार प्रयोग आहेत, तसेंच अशा प्रकारचे जितकेही मंत्र यंत्र आहेत, ते सर्व, या कवचाला हृदयात धारण केल्याने त्या मनुष्याला पाहताच नष्ट होतात. पृथ्वीवर विचरणारे ग्रामदेवता, आकाशचारी देवविशेष, जलदेवता, उपदेश मात्राने सिद्ध होणारे निम्न कोटीचे देवता,

 

सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा।
अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः॥50॥

 

ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः।
ब्रह्मराक्षसवेतालाः कूष्माण्डा भैरवादयः॥51॥

 

नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते।
मानोन्नतिर्भवेद् राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम्‌॥52॥

 

आपल्या जन्माच्या बरोबर प्रकट होणारे देवता (सहजा) कुलदेवता, माला (कंठमाला इत्यादि), डाकिनी, शाकिनी, अंतरिक्षामध्ये विचरणाऱ्या घोर डाकिनी, ग्रह, भूत, पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, ब्रम्हराक्षस, वेताळ, कूष्मांड आणि भैरव आदि अनिष्टकारक देवता सुद्धा हे कवच हृदयात धारण केलेल्या मनुष्याला पाहूनच पळून जातात. कवचधारी पुरुषाला राजासमान वृद्धि प्राप्त होते.

(वरील विवरणात दिलेल्या ‘कुलदेवता’ या शब्दाचा आपापल्या कुलदेवते सोबत गल्लत करू नये. वरील सर्व क्षुद्र देवता म्हणवल्या जातात, आणि निरनिराळ्या योनितल्या देवता आहेत, ज्या की त्या त्या पातळीवर exist होतात.)

यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले।

जपेत्सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा॥53॥

यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्‌।
तावत्तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी॥54॥

 

कवचाचा पाठ करणारा पुरुष आपल्या कीर्तीने विभूषित भूतलावर सुयशासाहित वृद्धीला प्राप्त होतो. जो प्रथम कवचाचा पाठ करून मग सप्तशतीचा चण्डी पाठ करतो तो, जोपर्यन्त वन, पर्वत, आणि काननासाहित ही पृथ्वी टिकून रहाते, तोपर्यंत त्याची पुत्र, पौत्र आदि संतान परंपरा कायम राहते.

देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम्‌।
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः॥55॥

 

नंतर, देहाचा अंत होतो, तेंव्हा, तो पुरुष भगवती महामायेच्या प्रसादाने त्या नित्य परम पदाला प्राप्त होतो, जे की देवांलाही दुर्लभ आहे.

लभते परमं रूपं शिवेन सह मोदते॥ॐ॥56॥

तो सुंदर दिव्य रूप धारण करतो आणि शिवासहित आनंदाचा भागीदार होतो.

आजकालच्या मनोविज्ञानात सकारात्मक विचारांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. आपली संस्कृति पाहिली, तर पावलोपावली, मनाला नकारात्मक विचारांपासून परावृत्त करून  सकारात्मक विचारांकडे जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतो, जो की खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपल्या अवतीभोवती सगळीकडे आसुरी विचार आणि आचार बोकाळलेले दिसतात, आणि तेच कसे नॉर्मल आहेत असे उदात्तीकरण केले जाते. अशा काळात, अशा मंगल आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या आपल्या पुरातन ठेव्याचे आपण जतन केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.  

ॐ शांतिः शांतिः शांतिः!

माधव भोपे

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

१७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते.

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे रक्षण कर. आग्नेय दिशेला अग्निशक्ति तू माझे रक्षण कर.

आठ दिशांची माहिती आपणा सर्वांना आहेच. तरीही, उजळणीसाठी आपण अष्टदिशांचे चित्र पाहू

Durgadevi kavach

देवी कवचामध्ये पूर्व दिशेपासून सुरुवात करून, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य अशाप्रकारे क्रमाने सर्व दिशांनी ती देवी माझे रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे. वरील आठ दिशांच्या शिवाय, ऊर्ध्व आणि अध अर्थात वर आणि  खाली या प्रकारे १० दिशा झाल्या. म्हणून एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

याशिवाय, पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे:–अग्रतः म्हणजे पुढे, आणि  पृष्ठतः म्हणजे मागे, जया आणि विजया देवी माझे रक्षण करोत. डाव्या बाजूला अजिता आणि दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अपराजिता माझे रक्षण करो. १७ ते ४२ या श्लोकांत विविध अंगांचे आणि संकल्पनांचे रक्षण करण्याविषयी देवीची विविध नांवे घेऊन प्रार्थना केली आहे.

कवचामध्ये उल्लेख केलेले विविध अवयव आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांची माहिती बघूयात

1

शिखा (शेंडी)

उद्योतिनी

2

मूर्ध्नि (मस्तक भाग)

उमा

3

ललाट (कपाळ)

मालाधरी

4

भुवया

यशस्विनी

5

भ्रूमध्य

त्रिनेत्रा

6

नाकपुड्या (नासिका)

यमघण्टा

7

दोन्ही डोळ्यांचा मध्यभाग

शङ्खिनी

8

श्रोत्र (कान)

द्वारवासिनी

9

कपोल (गाल)

कालिका

10

कर्णमूल

शांकरी

11

नासिका (नाक): इथे नाकपुड्या आणि नाक हे दोन वेगवेगळे कल्पिले आहेत)

सुगन्धा

12

उत्तरोष्ठ(वरील ओठ)

चर्चिकादेवी

13

अधरोष्ठ(खालचा ओठ)

अमृतकला

14

जिंव्हा

सरस्वती

15

दात

कौमारी

16

कण्ठप्रदेश

चण्डिका

17

घण्टिका (गळ्याची घाटी)

चित्रघण्टा

18

तालुका (टाळू)

महामाया

19

चिबुक (हनुवटी)

कामाक्षी

20

वाचा

सर्वमङ्गला

21

ग्रीवा (गळा)

भद्रकाली

22

पृष्ठवन्श(मेरुदण्ड्)

धनुर्धरी

23

बहिः कण्ठ(कण्ठाचा बाहेरील भाग)

नीलग्रीवा

24

नलिका(कण्ठनळी)

नलकूबरी

25

स्कन्धयोः (दोन्ही खांदे)

खड्गिनी

26

दोन्ही बाहू म्हणजे दण्ड

वज्रधारिणी

27

दोन्ही हात

दण्डिनी

28

अङ्गुली(हाताची बोटें)

अम्बिका

29

नखें

शूलेश्वरि

30

कुक्षि (कोख, उदर) पहा: वामकुक्षी

कुलेश्वरी

31

स्तन

महालक्ष्मी

32

मन

शोकविनाशिनी

33

हृदय

ललितादेवी

34

उदर

शूलधारिणी

35

नाभि

कामिनी

36

गुह्य

गुह्येश्वरी

37

मेढ्र(लिंग)

पूतना आणि कामिका

38

गुदा

महिषवाहिनी

39

कटी (कंबर)

भगवती

40

जानु (गुडघे)

विन्ध्यवासिनी

41

जंघा(म्हणजे पोटऱ्या)

महाबला, सर्व कामना पूर्ण करणारी

42

गुल्फ(पायाचे घोटे)

नारसिंही

43

पादपृष्ठ(पायांचा वरचा भाग)

तैजसी

44

पायाची बोटें

श्री देवी

45

पायाचे तळवे

तलवासिनी

46

नखें(पायाची)

दंष्ट्राकराली

47

केश

ऊर्ध्वकेशिनी

48

रोमकूप अर्थात, शरीरावरील रोमछिद्र

कौबेरी

49

त्वचा

वागीश्वरी

50

रक्त, मज्जा, वसा,मांस, अस्थि, मेद

सप्त धातूंपैकी सहा धातू: रक्त-blood, मज्जा- bone marrow and nervous tissue,

वसा-म्हणजे रक्तामध्ये स्थित स्नेह (ज्याला आजकालच्या भाषेत fatty acid म्हणता येईल), मांस म्हणजे स्नायू म्हणता येईल, अस्थि म्हणजे हाडें, आणि मेद म्हणजे चरबी किंवा fat. वरील सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत हे ओघानेच आले.

पार्वति

51

अंत्र म्हणजे आतडे किंवा gut.

कालरात्री

52

पित्त (शरीरात अन्न पचविण्यासाठी पित्त आवश्यक आहे) म्हणजेच वेगवेगळे पाचक रस.

मुकुटेश्वरी

53

पद्मकोश म्हणजे मूलाधार आदि कमलकोश

पद्मावती

54

कफ (कफ म्हणजे आपण समजतो तसा चिकट पदार्थ नव्हे, आयुर्वेदात कफ संकल्पना वेगळी आहे)

चूडामणी

55

नखांचे तेज

ज्वालामुखी

56

शरीरातील समस्त संधि (सांधे)

अभेद्या (जिचे भेदन कोणतेही अस्त्र करू शकत नाही)

57

शुक्र

ब्रह्माणी

58

छाया

छात्रेश्वरी

59

अहंकार, मन, बुद्धि

धर्मधारिणी

60

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण

वज्रहस्ता

61

प्राण

कल्याण शोभना

62

रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करतांना

योगिनी

63

सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण

नारायणी

64

आयुष्य

वाराही

65

धर्म

वैष्णवी

66

यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

चक्रिणी

67

गोत्र

इंद्राणी

68

पशू

चंडिका

69

पुत्राचे रक्षण

महालक्ष्मी

70

भार्येचे रक्षण

भैरवी

71

पंथ (अर्थात, while travelling)

सुपथा

72

मार्ग

क्षेमकरी

73

राजाच्या दरबारी

महालक्ष्मी

74

सर्व ठिकाणी

विजया

आपल्याकडे सर्व देवांची कवचें प्रसिध्द आहेत. रामरक्षा हेही एक प्रकारचे कवच आहे, आणि   डोक्यापासून ते पायापर्यंत च्या अवयवांचा उल्लेख आहे. आपल्यापैकी काहींनी योगनिद्रेचा class कधी केला असेल. त्यामध्ये, शरीराच्या एकेक अवयवांवर आपला consciousness घेऊन जाऊन, शरीराचा तो तो भाग शिथिल होत आहे, अशी कल्पना करायची असते.

देवी कवचामध्ये आपल्या शरीराचे बाह्यभाग, आणि बरेच अंतर-अवयव यांच्या कडे आपले ध्यान  (consciousness) घेऊन जाऊन, त्या त्या भागांना, किंवा, अंतर्गत अवयवांना, देवीच्या एकेक नावाशी, रूपाशी, जोडले आहे, आणि त्या त्या भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे. या कवचात स्थूल अवयवांसोबत काही सूक्ष्म गोष्टी, आणि काही concepts ही जोडले आहेत. त्यातील, सत्व, रज आणि तम हे गुण, रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करणारी इंद्रियें. (बाह्य इंद्रियें नव्हे, तर त्या त्या संवेदना जाणवणारी मेंदूतील centres), यांचा उल्लेख आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात. तसेच, मन आणि बुद्धि यांचे रक्षण कर, हेही लक्षात येऊ शकते. पण अहंकार? आपल्या मनात कदाचित अशी शंका येऊ शकते, की माझ्या अहंकाराचे रक्षण कर, असे कसे म्हटले जाऊ शकते? कारण ‘अहंकार’ हा शब्द आपल्याकडे सहसा ‘तो मनुष्य फार अहंकारी आहे’, म्हणजे गर्विष्ठ आहे, अशा अर्थाने वापरला जातो. अहंकाराचा त्याग करा, असेच सर्व ठिकाणी सांगितल्याचे ऐकायला, वाचायला, येते. मग अहंकाराचे रक्षण कर असे कसे?

याबद्दल वाचूयात पुढील भागात 

क्रमशः

माधव भोपे