https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

Renuka Ashtak-1 अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये- रेणुका अष्टक-1

renukadevi-1

विष्णूदासाची कविता 

अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये

वृत्त : ( शिखरिणी )
न द्यावी कां वाटे, पतित म्हणुनी भेट मजला ।
न घ्यावी कां वाटे, खबरहि अनाथाचि तुजला ॥
नतोद्धारायाची, सय अझुनि कां येउंच नये ।
अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये ॥१॥
म्हणेना बाई ये, जवळ पिपिलीके शर्करा ।
म्हणेना अंगासी, मर्दन मला केशर करा ॥
तसें बुद्ध्या येणें, मज तुजकडे भाग पडतें ।
अगाई रेणुके ! मजविण तुझें काय अडतें ॥२॥
अनंदे तूं भेटी, खचित मज देशील म्हणुनी ।
अनंदें मीं होतों, अजवर अयुष्यासि गणुनी ॥
निदानीं राहीला, मरणलग हा वाद शिलकीं ।
अगाई रेणुके ! कशि तुं निगमा वादशिल कीं ॥३॥
उपेक्षा दीनाची, करतिस तुझी बाइ मरजी ।
नसे जागा द्याया, तुजवर अपीलाचि अरजी ॥
दया माया कांहीं, मजविषयिं चित्तांत नसुं दे ।
अगाई रेणुके ! अठवण तुला माझि असुं दे ॥४॥
अनावृष्टीनें या, मरतिल किती जीव न कळे ।
तुझीं हीं जीं बाळें, जगतिल किती जीवनकळे ॥
कसें झालें ? आलें, प्रलयसम हें वर्ष बिघन ।
अगाई रेणुके ! सदय ह्रदयें वर्षवि घन ॥५॥
जिलाही दीनाची, निगम म्हणती कल्पलतिका ।
दिनाचा वेलीनें कवळुनी गळा कापिल ति कां ॥
कशी झाली रक्षा – कर हयग्रिवा सायक रसी ।
अगाई रेणुके ! विपरित असें काय करसी ॥६॥
असोनी तूं माझ्या, ह्रदयिं फिरवीसी दशदिशा ।
कुटस्था लावीली, जनन मरणाची अवदशा ॥
सवेंची म्हातारा, करुनि करिसी बाळ तरणा ।
अगाई रेणुके ! तुजजवळ ही कां प्रतरणा ॥७॥
करावें तें केलें, तिळभर उणें नाहिं पडलें ।
तुझ्या एक्या नामीं, सकलहि मला धर्म घडले ॥
कृपेचें राहीलें, उचित प्रिय देणें तुजकडे ।
अगाई रेणुके ! लवकर अतां घे मजकडे ॥८॥
अहो मी अन्यायी, म्हणवुन उपेक्षा करुं नये ।
क्षमावंते, माते ! निजपथ क्षमेचा त्यजुं नये ॥
पतीतोद्धारायास्तव मिरविसी कंकण करीं ।
अगाई रेणुके ! पतित मी अहों पावन करी ॥९॥
दिनाची तूं आई, अलिस दृढ आह्मां समजुनी ।
कृपादृष्टी ठेवी, निज परशुरामा समजुनी ॥
तरी दीनाला घे, जवळ स्तन देवोनि अननीं ।
अगाई रेणूके ! जरि तुं अससी दीन – जननी ॥१०॥
स्वयें विष्णूदासा – वदनिं वदवीसी शिखरिणीं ।
जशी अंबा रंभा, मधुफळ रसाची शिकरिणी ।
तशी ही सद्विद्याक्षर शिकविशी बोधक मला ।
अगाई रेणुके ! नमन तुझिया पादकमला ॥११॥

भूपाळ्या-1 Morning holy prayers in Indian tradition

Morning holy prayers in Indian tradition

प्रातःकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व देवांचे, संतांचे, स्मरण करण्याची आपली परंपरा आहे. आजकाल ती लोप पावत चालली आहे. बऱ्याच लोकांना प्रातःस्मरण करण्याची इच्छा असते, पण संबंधित साहित्य सहज उपलब्ध  नसते. या ठिकाणी आपले परंपरागत साहित्य, वेगवेगळ्या भूपाळ्या, इत्यादि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या उपक्रमातील पहिले पुष्प आज प्रकाशित करीत आहोत. यानंतर अजून भूपाळ्या, स्तोत्रे, इत्यादि या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. 

आपण ब्लॉग ला subscribe केल्यास नवीन पोस्ट प्रकाशित होताच सर्वप्रथम आपणास नोटिफिकेशन मिळू शकेल. 

माधव भोपे 

ganapati

भूपाळी श्री गणपतीची

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिद्धींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथा  शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । कंठी हार  साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी  शोभा । स्मरता उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

shriram

भूपाळी रामाची

उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिले भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥

vitthal-rukhumai

भूपाळी पंढरीची

उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविध ताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपति दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी । महादोष  हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर  । पैलपार तरतील ॥ ४ ॥

shri vishnu-1

भूपाळी श्रीविष्णूची-1

राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥


माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥


केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥


प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥


पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥

shri vishnu-2

भूपाळी श्रीविष्णूची-2  

[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥


भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥


सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रल्हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥


रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥


झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महामुद्गल  ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥


तुझा नामदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥


घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥


मीराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोनि  वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥


कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥


गूळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥


गरुडपारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाचा ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥


हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥


निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥

Customer is King-अमेरिकेतील ग्राहक सेवा

customer service in usa

सदर लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Customer is King

अमेरिकेतील कस्टमर सर्विस

अमेरिकेतील विविध मॉल्स मध्ये हिंडताना एक जाणवले की येथे “मेड इन यू.एस. ए.” अशा वस्तू फारच कमी दिसतात. बहुतांश वस्तू मेड इन चायना, कोरिया, जापान, मलेशिया, जापान, इंडिया, इ. येथील अर्थव्यवस्थेची भिस्त ही manufacturing पेक्षा ट्रेडिंग आणि सर्विस वर जास्त आहे. आणि त्यामुळे customer service ही अत्यंत प्रगत आहे असे जाणवले.

तुम्ही कुठल्याही स्टोअर मध्ये, रेस्टोरेंट मध्ये, पार्क किंवा म्युझियम, अॅक्वेरियम, झू इत्यादि मध्ये, कुठेही जा, तुम्हाला सर्विस देणारी व्यक्ति हसतमुख असणार आणि कितीही गर्दी असली तरी तुमची दाख्ह्ला घ्यायला व स्वागत करायला कुणी ना कुणी असते आणि “Hi-!, How are you-?, How may I help you?” म्हणून तुमचे स्वागत केले जाते. जेंव्हा तुम्ही कोणती वस्तू पहायला सुरुवात करता तेंव्हा कुणीही तुमच्या मागे मागे येत नाही. मात्र एखाद्या वस्तूबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तेथील व्यक्ति चट्कन पुढे येते आणि त्या वस्तूबद्दल, सविस्तर माहिती देते. त्यांना त्या वस्तूबद्दल पूर्ण माहिती असते आणि तुमच्या प्रश्नांची ते पटापट आणि खरी खरी उत्तरे देतात.

एके रविवारी आम्ही आमच्या घरापासून २ तासांच्या अंतरावर असलेल्या एका village वजा असणाऱ्या गावातील एका मॉल मध्ये गेलो होतो.  तो मॉल हा बऱ्याचशा ब्रान्डेड वस्तू अगदी कमी किमतीत मिळण्या बद्दल प्रसिद्ध होता. तिथे असेच, सन ग्लासेस घेण्यासाठी म्हणून आम्ही एका चष्म्यांच्या दुकानात गेलो. ते पूर्ण स्टोअर सांभाळण्यासाठी एक उंच धिप्पाड अत्यंत हसतमुख अशी अमेरिकन लेडी होती. आम्ही अनेक गॉगल्स पाहिले, ट्राय केले,  पण कोणता घ्यावा ते लक्षात येत नव्हते. तेंव्हा आम्ही तिच्याकडे गेलो आणि तिला आमच्या मापाचा गॉगल दाखव म्हणून सांगितल्यानंतर ती अत्यंत उत्साहाने आम्हाला दोघांनाही वेगवेगळे चष्मे काढून दाखवू लागली. एकेक चष्मा, सौ. च्या चेहऱ्यावर चढवून, ती, “यू कॅन ट्राय धिस,.. प्लीज ट्राय धिस..” म्हणत होती व तो चष्मा घातल्यावर “ Oh, you are looking beautiful!” असे म्हणून छानपैकी हसत होती. इतक्यात नातीने पण लहान मुलांचा एक चष्मा आपल्या डोळ्यावर घालून घेतला तेंव्हा ती आमच्या नातीकडे अत्यंत कौतुकाने पाहू लागली व “ Do you like it?” म्हणून विचारू लागली. नातीनेही अत्यंत तत्परतेने “या ऽऽ“ असे म्हणून उत्तर दिले तेंव्हा ती कौतुकाने जोरात हसली. मुलाने जेंव्हा नातीला आवरायचा प्रयत्न केला तेंव्हा ती बाई कौतुकाने म्हणाली, “ मलाही ३ मुले आहेत. व ती अशीच नॉटी आहेत. त्यांना सांभाळता सांभाळता, माझी पण अशीच त्रेधा उडते”

इतके सारे गॉगल्स पाहिल्यानंतरही आम्हाला दोघांना आम्हाला हवा तसा (आखूड शिंगी, बहुदुधी) गॉगल न मिळाल्यामुळे (तसा, गॉगल घेण्याची आम्हाला एवढी जास्त आवश्यकता पण वाटत नव्हती) आम्ही निघायचे ठरवले, पण मग मुलाने तो पर्यंत त्याच्यासाठी एक गॉगल बघितला व थोडी तरी खरेदी तिथे झाली. तरी आम्हाला निघतांना त्या बाईने अनेकदा विश केले आणि हसतमुखाने, “ हॅव अ नाईस डे” म्हणून आम्हाला निरोप दिला.

असाच अनुभव सर्व ठिकाणी येत असल्यामुळे, अमेरिकेत, खरेदीसाठी जाणे म्हणजे कंटाळवाणे न वाटता एक आनंददायी अनुभव वाटतो.

कुठल्याही दुकानासमोर, मॉल समोर, हॉटेल समोर, त्या दुकानापेक्षा कमीत कमी चौपट पाचपट आणि जास्तीत जास्त वीसेक पट तरी मोकळी जागा गाड्यांच्या पार्किंग साठी असतेच असते. त्यामुळे गाडी उभी करायला अडचण येत नाही. अर्थात कधी कधी खूप जास्त गर्दी असल्यास पार्किंग फुल असते, ती गोष्ट वेगळी.

———

माधव भोपे <<<<<>>>>>>—————

Customer service & Etiquettes in USA-अमेरिकेतील ग्राहक सेवा आणि सभ्यता

hotel

Customer service & Etiquettes in USA

अमेरिकेतील ग्राहक सेवा आणि अमेरिकेतील सभ्यता.

तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये, मॉलमध्ये, किंवा इतरत्र कुठल्याही ठिकाणी, counter वर असलेल्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर, अगदी बिना अपवाद- तो किंवा ती- जास्त करून तीच- तुम्हाला अत्यंत मनापासून हास्य करून विचारणार- “ हॅलो” किंवा “हाऽय”, “हाऊ मे आय हेल्प यू टुडे?” तसेच तुम्ही मोठ्या शॉप मधून हिंडत असतांना, जागजागी उभ्या असलेल्या सेल्स पर्सोनेल्स तुम्हाला सुहास्य वदनाने-  “हाऽय, हाऊ आर यू ?” म्हणून विचारणार; त्यांना तुम्ही तितक्याच सभ्यतेने, “ I am fine, how about you?” म्हणून प्रतिसाद देणे अपेक्षित असते. आपण एखाद्या शॉपमधून बाहेर पडत असतो (काही माल खरेदी करा अथवा न करा) तेंव्हा counter वरील व्यक्ती “ हॅव ए नाईस डे” म्हणून आपल्याला न चुकता विश करते . त्याला आपण “ यू टू” म्हणून विश करायचे असते. आणि कुठेही, सेल्स पर्सोनेल, बसलेले दिसणार नाहीत, ते उभेच असतात. In fact, मला कुठल्याही ठिकाणी सेल्स पर्सोनेलला बसायला, खुर्चीच काय, साधा स्टूल पण दिसला नाही. या पार्श्वभूमी वर आपल्याकडची स्थिति आठवून पहिली, तर आपल्याला अजून किती पल्ला गाठावयाचा आहे हे लक्षात येते.

अमेरिकन सभ्यता: शॉप मध्ये किंवा इतरत्र, चुकून जरी एकमेकांना धक्का लागला तरी अमेरिकन व्यक्ती अगदी मनापासून- “ Oh, I am sorry” असे म्हणणार. तसेच एकमेकांना ढकलून पुढे जाण्याच्या भारतीय वृत्तीच्या ऐवजी- दुसऱ्या व्यक्तीला जाण्यासाठी जागा करून देण्याची पद्धत आहे. अर्थात दुसरी व्यक्तीही तशीच असते व अत्यंत अदबीने, “Thank you” म्हणून अशा वेळी आभार व्यक्त करते.

एकदा आम्ही एका मॉलच्या पार्किंग लॉट मध्ये तो पूर्ण भरलेला असल्यामुळे, आमच्या गाडीसाठी पार्किंगची जागा शोधात होतो. इतक्यात एका अमेरिकन, मध्यम वयाच्या स्त्रीने-जी की तिची गाडी पार्किंग मधून काढायला चालली होती- आम्हाला खूण करून सांगितले- माझी जागा रिकामी होतेय; व आम्हीही खुणेनेच (thumbs up) तिचे आभार मानीत तिची पार्किंग ची जागा घेतली.- अशा प्रकारे- इतरांना मदत करणे हा येथील लोकांचा सहज स्वभाव बनून गेलेला आहे असे जाणवले.shopping-mall-parking.1000x700

reunion tower
Reunion tower

अमेरिकेत सर्वत्र १४-१५ ते २०-२१ वयापर्यंतची चुणचुणीत मुले व मुली ठिकठिकाणी (दुकानात, हॉटेल मध्ये इ.) काम करतांना दिसतात. आम्ही ड़ॅलस मध्ये, री-युनियन टॉवर बघायला गेलो, तेंव्हा आम्हाला लिफ्ट मध्ये रिसीव करायला, अशीच १४-१५ वर्षाची मुलगी, अगदी प्रोफेशनली सर्व माहिती सांगत होती आणि आम्ही लिफ्ट मधून बाहेर पडतांना, “ बाय बाऽय, हॅव अ नाईस डे!” म्हणत होती. झू मध्ये सुद्धा, अशीच, १५-१६ वर्षांची तरुणाई, ठिकठिकाणी, माहिती देण्यासाठी व गाईड करण्यासाठी होती.  आम्ही नायगारा धबधबा पाहायला गेलो, तेंव्हा, आम्हाला बोटीत चढतांना- व्यवस्थित चढायला मदत करणारी, सर्व गर्दीचे व्यवस्थापन करणारी १५-१६ वर्षांची मुलगी, अत्यंत तडफेने व शिताफीने करत होती हे बघून खूपच कौतुक वाटले. तसेच, ठिकठिकाणच्या मॉल मध्ये, २० ते २५ वर्षांची मुले व मुली, अगदी प्रोफेशनली काम करतांना दिसतात. हॉटेल मध्ये सुद्धा , अशीच तरुण मुले मुली, हसतमुखाने तुमची ऑर्डर घेतात, व तत्परतेने ती पूर्ण करतात. इथे कुठल्याही कामाला कमी मानले जात नाही, हे यावरून प्रत्यक्ष दिसले व अनुभवाला आले, ही सर्व मुले, चांगल्या घरातली, वेल मॅनर्ड दिसली. अमेरिकेत मुले १४-१५ व्या वर्षीच आपापले कमवायला लागतात, हे ऐकले व वाचले होतेच, मात्र आता प्रत्यक्ष बघायला मिळत होते. आपल्याला वाटते तशी इथली तरुणाई स्वैरपणे वागतांना, आम्हाला तरी, दिसली नाही, उलट अत्यंत efficiently व जबाबदारीने वागतांना दिसली. अर्थात, हे सर्व आम्ही पाहिलेल्या मर्यादित वेळेत जे दिसले त्यावरून जे वाटले, ते मांडले आहे, प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे जाणकार लोक सांगू शकतील.

इथे मॅन पॉवर ची अत्यंत कमतरता आहे असे जाणवले. ठिकठिकाणी, “ Now Hiring” चे बोर्ड, बघायला मिळतात; इतकेच नाही तर वेगवेगळ्या स्टोर्स, मॉल इ. मध्ये, त्यांच्या कडे काम करण्यासाठीचे आकर्षक बेनिफिट्स, incentives इ. ची माहिती सांगणारी पॅम्फलेट्स ही ठेवलेली दिसतात.

आम्ही नायगरा बघायला गेलो तेंव्हा, तेथून ४० कि.मी. दूर, बफेलो येथे, हॉटेल हॉलिडे एक्स्प्रेस इन मध्ये उतरलो होतो. तेथील काऊंटर वरील मॅनेजर काय काय कामे करीत होता हे बघून थक्क झालो. एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये, त्याच्या शिवाय, खालच्या मजल्यावर इतर कुणीही स्टाफ नव्हता. तो येणारे फोन घेत होता. तसेच आमच्या सारख्या चेक इन करणाऱ्या गिऱ्हाईकांचे चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेत होता. प्रत्येक प्रश्नाला, हसत मुखाने व अदबीने, “सर.. सर..” असे म्हणून उत्तर देत होता, व त्याला जे काम करणे शक्य असेल ते लगेच करून टाकत होता. रूम मध्ये जाण्याआधी आम्हाला पाण्याच्या बाटल्या हव्या होत्या. त्या त्याला मागितल्यावर  त्याने थोड्या दूर असलेल्या जागेवरून लगेच तीन बाटल्या काढून दिल्या. आम्ही अजून २ बाटल्या मिळतील का? असे विचारल्यावर, “ Oh, sure, !” असे म्हणून पुन्हा तेथून दोन बाटल्या न वैतागता काढून दिल्या, आम्हाला लिफ्ट चा रस्ता दाखवला व कसे जायचे ते सांगितले. आम्ही रूम मध्ये गेल्यानंतर तेथील एक्स्ट्रा बेड्स (जे की सोफा कम बेड होते), त्यावरील गाडी (matress) खूपच पातळ आहे असे आम्हास दिसून आले, तसेच पांघरायला चादर नव्हती. आम्ही काऊंटर वर फोन केल्यानंतर, ५ मिनिटांच्या आत तोच माणूस, अजून एक बेड स्वतःच घेऊन आला. त्याने ते आधीच्या बेड वर अंथरले व आता ठीक आहेका बघा म्हणून म्हणाला. पण तरीही ते तेवढे जाड वाटत नव्हते, हे आम्ही सांगितले व त्याच्याही लक्षात आले तेंव्हा तो म्हणाला, “ जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स.” मी अजून दोन बेड्स आणतो, त्यानंतरही जर तुम्हाला कम्फर्टेबल नाही वाटले तर रूम बदलून देतो. त्याने लगेच दोन गाद्या स्वतः आणल्या, टाकल्या. आता कम्फर्टेबल वाटत आहे असे आम्ही म्हटल्यावर तो समाधानाने हसला, व अजून काही लागल्यास मला फोन करा, म्हणून निघाला. इतक्यात, चादरी राहिल्या म्हणून त्याला आठवण देताच, “ Oh ! I am sorry, I will bring them right away!” असे म्हणून ताबडतोब जाऊन ३-४ स्वच्छ धुतलेल्या चादरी घेऊन आला व त्यातील एक चादर स्वतः आमच्या बेड वर पसरून व्यवस्थित चारी बाजूंनी आत दाबून दिली व आमचे पूर्ण समाधान झाले आहे अशी खात्री करून घेतल्यानंतरच तो तेथून निघाला. एवढेच नाही, तर आम्हाला झालेल्या त्रासाची भरपाई करण्यासाठी त्याने आम्हाला फ्री आईस क्रीम पाठवले. या अनुभवाची तुलना भारतातली कुठल्याही (अगदी महागातल्या) हॉटेलशी करून पहा. ढीगभर स्टाफ नुसता इकडून तिकडे ऐटीत फिरत असतो, पण ग्राहकाकडे ढुंकूनही पाहायला त्यांना वेळ नसतो. आपल्याकडील एखाद्या हॉटेल चा  मॅनेजर मला नाही वाटत एवढे सर्व करेल म्हणून. तो फार झाले तर त्याच्या हाताखालच्या एखाद्या नोकराला, “ अरे ते ६ नंबरच्या साहेबांना काय लागते बघ” असे कोणाला तरी ओरडून सांगेल.

सभ्यता आणि एटिकेट्स हे येथील माणसाच्या अंगात भिनले आहेत असे म्हणले तरी चालेल . आम्ही सकाळी जेंव्हा येथील सोसायटी च्या प्ले ग्राउंड वर फिरायला जात असू, किंवा इतर वेळेसही, साईड वॉक वरून जात असू, तेंव्हा कुणीही अमेरिकन पुरुष किंवा स्त्री, समोरून येत असल्यास सुहास्य वदनाने आम्हाला हॅलो करीत असे. व सोबत आमची नात असल्यास तिला कौतुकाने “ हा ऽऽय म्हणणार.

अमेरिकन माणूस शक्यतो आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो. बऱ्याच शॉप्स किंवा मॉल मध्ये, Push pull doors असतात. जेंव्हा तुम्ही एखादा दरवाजा Push करून आतमध्ये जाता, तेंव्हा मागून कोणी व्यक्ति येत असल्यास, तुम्ही दरवाजा धाड्कन सोडून द्यायचा नाही, असा रिवाज आहे. तुम्ही दरवाजा तसाच धरून उभे राहायचे व मागील व्यक्ती आत आल्यानंतर दरवाजा सोडायचा. मागील व्यक्तीही तुम्हाला कृतज्ञतेने “Thank you” म्हणते . तुम्ही त्याचा हसून स्वीकार करायचा. “Excuse me…,  sorry…” इत्यादी शब्द तर सारखे ऐकू येतात.

पण आपले भारतीय लोक काही आपला बाणा सोडत नाहीत. याचे प्रत्यंतर नायगारा येथे आले. नायगारा धबधबा अर्ध्यापेक्षा जास्त पाहून झाला होता. व आता अगदी जवळून अंगावर तुषार घेण्यासाठी मुलगा व सून थोडा उंच एक स्पॉट आहे, तिथे गेले. आम्ही दोघे खालीच थांबलो. खाली बसायला बरेच बाक ठेवले होते. काही बाकांच्या समोर, थोड्या अंतरावर रेलिंग पण होते. आम्ही त्या रेलिंग ला टेकून उभे राहिलो. त्या रेलिंगवर काही जणांनी आपले ओले कपडे, ज्यात एक मोज्यांची जोडी पण होती, वाळत घातले होते.(वाळत घालणारे, भारतीयच होते, हे नंतर लगेच कळाले). आमच्या नकळत सौ. चा हात त्यापैकी एका मोज्याला लागला व तो खाली पडला. आमचे त्याकडे लक्षही नव्हते. पण इतक्यात मागून आवाज आला, “ ओ ऑन्टी..” आणि मागील बाकावर बसलेल्या ग्रुप मधील एका पुरुषाने, तो मोजा उचलून ठेवण्याबद्दल आम्हाला खुणेनेच, सांगितले. त्यांच्या आपसातील बोलण्यावरून ते बहुतेक South Indian (बहुतेक आंध्रातील) असावेत, असे वाटले. आपले कितीही वय झाले असले, तरी असे ऑन्टी म्हणून कोणी हाक मारणे आपल्याला नक्कीच आवडणार नाही. अमेरिकेत कुणीही कुणाला असे ऑन्टी, अंकल, असे नात्याने हाक मारत नाहीत. कितीही वयाची बाई असली तरी तिला “मॅम” च म्हणणार/ खैर, आम्ही सॉरी म्हणत, लगेच तो मोजा उचलून वर ठेवला. त्यावर त्या भारतीय माणसाने, thank you वगैरे काही म्हटले नाही. याच जागी एखाद्या अमेरिकन माणसाचा मोजा पडला असता तर, आमच्याकडून हे चुकून घडले आहे हे ओळखून, त्याने स्वतः उठून तो जागेवर ठेवला असता.

अमेरिकेतील सभ्यता, मॅनर्स आणि एटिकेट्स याबद्दल जे जाणवले, ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

——–******———

नोट:  उपरोक्त माहिती, योग्य त्या क्रमाने लावली नाहीये व जशी आठवत गेली तशी लिहिली आहे. 

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Hotels in America-अमेरिकेतील हॉटेल्स

thai hotel

Small Hotels in America अमेरिकेतील छोटी हॉटेल्स

अमेरिकेतील हॉटेल्स चे अनुभव

नायगारा पाहून परत येत असतांना, बफेलो येथून, क्लीव्हलँडला कारने परत येत असतांना, वाटेत कुठे ब्रेकफास्ट मिळेल का म्हणून मोबाईल वर शोध घेत होतो.

अमेरिकन फूड मधील आम्हाला काहीच चालण्यासारखे नसायचे, कारण बहुतेक सर्व पदार्थांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरुपात नॉन व्हेज असतेच. भारतीय जेवणाशी त्यातल्या त्यात मॅच होणारे दोन प्रकार म्हणजे दोन प्रकार: एक तर मेक्सिकन आणि दुसरे म्हणजे थाई.

आम्हाला मोबाईलवर वाटेतील एका छोट्याशा व्हिलेज मध्ये एक थाई रेस्टॉरंट असल्याचा शोध लागला. गूगल मॅप च्या ‍‌सहाय्याने रस्ता शोधत शोधत आम्ही त्या बऱ्याच आतल्या बाजूला असलेल्या छोट्याशा खेडेगावात गेलो.  अत्यंत शांत व छोटेसे खेडे होते ते. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता- नेहमीप्रमाणे. खेडे असल्यामुळे वाहनेही अगदी अभावानेच होती. मॅपवरून पत्ता काढून आम्ही त्या थाई रेस्टॉरंटमध्ये गेलो. बहुतेक त्यांचे रहाते घरच छोट्याश्या रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित केले होते, व २-३ थाई स्त्रियाच ते रेस्टॉरंट चालवीत होत्या. अत्यंत टुमदार, रेखीव व कलात्मक सजावट असलेली जागा. आतमध्ये कमालीची शांतता आणि स्वच्छता. खेडेगाव म्हणून कसलाही गचाळ पणा चालेल अशी मानसिकता नाही. सर्व गोल टेबल्सवर स्वच्छ टेबल क्लॉथ्स, त्यावर स्वच्छ काचेचे ग्लास. परीट घडीचे पांढरे शुभ्र रुमाल टोकदार घडी घालून त्या ग्लास मध्ये ठेवलेले.thai hotel

आम्ही तिथे जाऊन बसल्यावर मध्यमवयीन थाई स्त्रीने  (जी की बहुतेक तेथील मालकीण असावी), तत्परतेने व हसतमुखाने, आमच्या हातात मेन्यू कार्ड दिले. इथे सगळ्याच हॉटेल्स मध्ये तुम्हाला मेन्यू कार्ड लगेच देतात. त्यासाठी, तुम्हाला ‘शुक, शुक’ म्हणून कोणाचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करावा लागत नाही, की ओरडावे लागत नाही. तसेच तुम्ही ऑर्डर देईपर्यंत तुमच्या छातीवर उभे रहात नाहीत, की, अर्धवट ऑर्डर घेऊन घाई घाईने पळून जात नाहीत. तुम्हाला मेन्यू कार्ड दिल्यानंतर, ते वाचून तुमचा मेन्यू ठरवायला पुरेसा वेळ देतात व तुमचे ठरले आहे असे दिसताच, तुमची ऑर्डर घ्यायला पुढ्यात येतात. तसेच तुमची जी स्पेशल requirement असेल ती काळजीपूर्वक नोट करतात उदा..Less spicy, no onion, no meat, no eggs, इत्यादि. व त्याबरहुकूम पदार्थ बनवतात.thai woman

तर अशा प्रकारे आमची ऑर्डर घेऊन त्या स्त्रिया गेल्या, आणि १५ मिनिटात, अत्यंत स्वादिष्ट व गरम गरम असे जेवण आमच्या पुढ्यात आले. त्या शांत खेड्यात, इतक्या छान वातावरणात खाल्लेले जेवण हे आमच्या चांगलेच लक्षात राहिले.thai food

आम्ही नायगरा हून परत आलो, तेंव्हा, रात्रीचे १० वाजून गेले होते, बराच उशीर झाल्यामुळे, व विमान तळावरून घरी पोहोचायला अजून एक तास लागणार असल्यामुळे, आम्ही, बाहेरच जेवायचे ठरवले. परंतु हॉटेल्सही बंद होण्याची वेळ झाली होती. बहुतेक सर्व हॉटेल्स रात्री १० किंवा जास्तीत जास्त १०.३० पर्यंत बंद होतात. मग सचिन गाडी चालवीत असतांना, मी वेब वर, उशिरापर्यंत उघडी असणारी हॉटेल्स शोधू लागलो. अशी फारच थोडी हॉटेल्स होती. त्यातले, भारतीय जेवण देणारे एक हॉटेल नशिबाने सापडले, जे की ११.३० पर्यंन्त उघडे होते. आम्ही तिथे फोन करून खात्री करून घेतली आणि मॅप वरून शोधत शोधत रात्री ११ च्या सुमारास त्या हॉटेल मध्ये पोहोंचलो. ते हॉटेल बहुतेक कुणीतरी भारतीय बिझनेसमननेच सुरु केले असावे. हॉटेल अजून प्राथमिक अवस्थेतच होते, म्हणजे डेकोरेशन वगैरे विशेष काही नव्हते. पण तिथे बरेच भारतीय ग्रुप्स जेवण करीत असतांना दिसत होते. आम्ही गेल्याबरोबर, वेटर च्या स्वरुपात, ३-४ भारतीय मुलींचा जथा आम्हाला समोर आला, व आम्हाला रिकाम्या असलेल्या टेबल वर बसवले. लगेच त्यातील दोन मुली ऑर्डर घ्यायला आल्या. इथे जे भारतीय शिक्षण घेतात, ते असे पार्ट टाईम जॉबही करतात, असे ऐकले होते. या मुली बहुतेक अशांपैकीच असाव्यात असे वाटले. आम्ही बरेच थकून आलो होतो व खूप सडकून भूक लागली होती. अशा वेळी, आम्हाला जास्त वाट पाहायला न लावता, रात्री ११.३० वाजता, गरमागरम भारतीय जेवण आमच्यासमोर आले. त्या जेवणाचा स्वाद इतका चांगला लागला म्हणून सांगू!

त्याआधी आम्ही ह्यूस्टन ला ‘नासा’ पाहायला गेलो होतो, तेंव्हा, तेथून निघतांना, मेक्सिकन जेवणाचा आस्वाद घेतला, त्याची माहिती, नंतरच्या एपिसोड मध्ये!

——*****—–

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे 

Roads in America-अमेरिकेतील रस्ते

a-Typical-multi-lane-highway-California-USA-b-5-lane-highway-in-the-simulator

Roads in America- अमेरिकेतील रस्ते

अमेरिकेची महत्वाची जमेची बाजू म्हणजे अमेरिकेतील रस्ते. भरपूर रुंद, व्यवस्थित बांधलेले, वेगवान आणि विना थांबता, विना अडथळ्याचा प्रवास करता येण्यासारखे रस्ते.roads in usa-1

३ ते ४ लेन च्या रस्त्यांवर (प्रत्येकी  ३ ते ४, म्हणजे दोन्ही बाजूंनी ६ ते ८ लेन )  तुम्ही विना अडथळा सरासरी ताशी १०० ते १२५ किमी च्या वेगाने आरामात जाऊ शकता. रस्ते दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे टोल वेज, म्हणजे ज्या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी टोल द्यावा लागतो, आणि दुसरे म्हणजे फ्री वेज, म्हणजे ज्यावर टोल द्यावा लागत नाही.

फ्री वेज हे टोल वेज च्या समांतर, पण थोडे बाजूला, कमी रुंद (पण तरीही आपल्याकडील मोठ्या रस्त्यांपेक्षा ही जास्त रुंद) असे रस्ते, जिथे वेगमर्यादा कमी असते. तुम्हाला रमत गमत, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत जायचे असल्यास, तुम्ही अशा फ्री वेज ने जाऊ शकतात.

आणि हो, दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर, वेग मर्यादा सगळी वाहने कसोशीने पाळतात. ट्रॅफिक पोलिसाच्या गाड्या उपरोक्त दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर कायम गस्त घालत असतात, आणि तुम्ही जर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जातांना आढळला, तर लगेच तुम्हाला अडवले जाते.american police stopping a car

अमेरिकेत कायद्याचा चांगलाच दरारा आहे. कोणीही पोलिसांशी हुज्जत घालत नाही किंवा धमकावत नाही. इतकेच नाही तर  पोलिसांनी इशारा केल्यानंतर गुपचुप गाडी बाजूला घेतली जाते व पोलिसांशी अत्यंत आदराने बोलले जाते. कारण येथील ट्रॅफिक पोलिसांनाही खूप अधिकार आहेत, आणि कायदा मोडणार्यांची गय केली जात नाही.

आम्ही इथे असतांना एक बातमी खूप गाजली होती. एका माणसाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. तो थांबला ही. त्याच्या सोबत त्याची गर्ल फ्रेंड होती. अतिरेक्यांचा भीतीमुळे इथे, सहसा, अशा वेळी पोलीस, त्या व्यक्तीला हात वर करण्याची सूचना देतात. अशा वेळे हात वर करून, पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. चुकून जरी हात खिशाकडे गेला, तर, तुम्ही पिस्तुल काढता आहात असे वाटून पोलीस ऑफिसर लगेच त्याच्या जवळचे पिस्तुल काढून तुम्हाला गोळी ही झाडू शकतो. त्याला तसा पूर्ण अधिकार आहे. तर त्या माणसाचा हात खिशाकडे गेल्यामुळे ऑफिसरने गोळी झाडली व त्यात त्या गाडी चालकाचा मृत्यू झाला. तो चालक आफ्रिकन-अमेरिकन (ब्लॅक) असल्यामुळे नंतर बरीच निदर्शने वगैरे झाली. पण त्या ऑफिसर वर काहीही कारवाई झाली नाही, उलट त्याचे वरिष्ठ व सरकार त्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले.

आता टोल रस्ते म्हटल्यावर भारतातील टोल नाके डोळ्यासमोर येतील तर तसे अजिबात नाही. टोल रस्ते असूनही कुठे टोल नाके नाहीत, की गाड्यांचे थांबणे नाही. मग टोल कसा वसूल करतात? इथे जवळ जवळ प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतेच. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही क्रेडिट कार्डवरच चालते.

प्रवासासाठी स्वतःची कार हेच मुख्य साधन आहे, तर टोल रोड साठी तुम्हाला प्री पेड कार्ड मिळते. त्याचे एक स्टीकर तुम्ही तुमच्या कारच्या विंडस्क्रीन वर बाहेरच्या बाजूने लावलेले असते. तुम्ही जेंव्हा टोल रोड वरून जाता, तेंव्हा, त्या रोड वर ठराविक अंतरावर, उंच जागी लावलेले कॅमेरे तुमच्या कार वरील त्या स्टीकर वरील इन्फोर्मेशन सेन्स करतात आणि तुमच्या क्रेडिट कार्ड अकौंट मधून टोल ची रक्कम वजा होते. ( आता आपल्याकडेही अशी पद्धत आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे समजले; खरेच तसे झाले तर खूप बरे होईल. अर्थात, आपल्याकडील डोकेबाज मंडळी टोल कसा चुकवायचा याचे अनेक मार्ग सुरुवातीला शोधून काढतील- उदाहरणार्थ साईडने कट मारणे, स्टीकर झाकून टाकणे, इत्यादि) ज्यांच्या गाडीवर असे स्टीकर नसेल, त्यांच्या गाडीची माहिती कॅमेऱ्यात रजिस्टर होते आणि महिना अखेरीस त्यांना, त्या महिन्यात त्यांनी जेवढा प्रवास टोलच्या रस्त्यावरून केला असेल त्याचे, बिल पोस्टाने त्यांच्या घरी, तसेच ई-मेल वर येते.a-Typical-multi-lane-highway-California-USA-b-5-lane-highway-in-the-simulator

आता आपल्या भारतीय मनाला हा प्रश्न पडू शकतो की बिल न भरले तर काय करून घेणार आहेत? कोण विचारणार आहे? तर याचे उत्तर असे, की अमेरिकेतील ९९ % लोक हे कायदा पाळणारे आहेत. तसे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहेत म्हटले तरी चालेल. आणि दुसरे म्हणजे, तुम्ही कुठलेही सरकारी बिल थकवले तर तुमच्यावर लगेच कायदेशीर कार्यवाही सुरु होते. त्यात उशीर, किंवा दयामाया नाही, की ओळखपाळख, राजकीय लागेबांधे, इत्यादीचा संबंध नाही. तिसरे म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डचा स्कोअर खाली येतो आणि परिणाम म्हणून तुमचा व्याजाचा दर वाढतो, त्यावरील लिमिट खाली येते आणि सर्वच बाजूंनी तुमची कोंडी होऊन जाते. त्यामुळे, सरकारी बिल न भरण्याचा वेडेपणा सहसा कुणीही करीत नाही.

या प्रशस्त अशा, सिमेंटने बांधलेल्या टोल वेज वर ठिकठिकाणी स्पष्ट शब्दात माहिती व सूचना लिहिलेल्या असतात (अर्थात त्यांचा अर्थ नीट कळण्यासाठी काही दिवस इथे राहणे आवश्यक आहे). तसेच इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स वर महत्वाचे संदेश झळकत असतात. एखादे संशयास्पद वाहन, किंवा कायदा मोडून पाळणारे एखादे वाहन असल्यास अशा वाहनांची माहिती या बोर्ड्स वर झळकत असते.

आम्हाला रस्त्यावर अशी माहिती अधून मधून वाचायला मिळत होती. अजून एक म्हणजे, या लांब लचक रस्त्यांवर, समजा एखादे वाहन मध्येच बंद पडले किंवा त्यांना काही कारणामुळे थोडेसे थांबावे लागले, तर रस्त्याच्या कडेला मधून मधून ठराविक अंतरावर जास्तीची जागा असते, जेथे की असे वाहन थोड्या वेळासाठी उभे करता येईल. त्यामुळे बाकीच्या ट्रॅफिकचा खोळंबा होत नाही. अमेरिकेतील असे टोल वेज हे गावांपासून किंवा मुख्य वस्तीपासून भरपूर लांब असतात, त्यामुळे असे रस्ते कुठल्याही गावाच्या भर वस्तीतून जात आहेत असे कधीच नसते. आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उंच आणि घनदाट अशी झाडे लावलेली असतात. त्यामुळे, गाडी चालवतांना छान वाटते.

तर अशा या रस्त्यांवर असलेली आणखी एक अप्रतिम सुविधा म्हणजे ठराविक अंतरावर असलेले “रेस्ट एरियाज” . रेस्ट एरिया म्हणजे टोल वे पासून थोड्या अंतरावर, सहसा हिरव्यागार झाडीत आतल्या बाजूस असलेली विश्रांतीची ठिकाणे. ही विश्रांतीची ठिकाणे अत्यंत नीट नेटकी, स्वच्छ आणि विनामूल्य असतात. छोटीशी पण टुमदार, बैठी इमारत, बाहेर गाड्या पार्क करायला खूप म्हणजे खूपच प्रशस्त जागा. आणि बिल्डिंग अर्थातच पूर्णपणे एअर कंडिशन्ड. रेस्ट एरिया मध्ये आत बसायला छान जागा, खुर्च्या, सोफे, इत्यादि असतात.rest area-2

rest_areaत्या त्या भागाचा नकाशा, त्या भागाची माहिती देणारी पॅम्फ्लेट्स इत्यादि ठेवलेले असतात. तेथील छोट्याशा ऑफिसमध्ये माहिती देण्यासाठी एखादी व्यक्ती बसलेली असते व ती तुम्हाला, विचारलेल्या गोष्टीची तत्परतेने व सविस्तर माहिती, हसतमुख चेहऱ्याने देते. प्रत्येक ठिकाणी एक अॅटोमॅटिक व्हेंडिंग मशीन ही ठेवलेली असते, ज्यात तुम्ही ठराविक रकमेची नाणी, नोटा टाकून, किंवा कार्ड स्वाईप करून कोल्ड ड्रिंक, चॉकलेट्स, कुकीज किंवा इतर पॅक्ड खाण्याचे पदार्थ घेऊ शकता. प्रत्येक रेस्ट एरिया मध्ये अत्यंत स्वच्छ, भरपूर पाणी असलेली, कमोड मध्ये पुरेसे टिशू पेपर्स असलेली, पूर्ण एअर कंडिशन्ड, अशी, वॉश रूम उपलब्ध असते (इथे तिला रेस्ट रूम म्हणतात.) लहान मुलांसाठी कमी उंचीची सोय पण उपलब्ध असते. प्रत्येक ठिकाणच्या वॉश बेसिन मध्ये सेन्सर बसवलेले असतात (विमान तळावर असतात तसे), जेणे करून तोटी च्या खाली हात धरल्यावर पाणी येईल.rest area-3

तर तुम्ही गाडी चालवतांना थकले असल्यास, किंवा तुम्हाला सोबत आणलेले पदार्थ खाण्यासाठी थांबायचे असल्यास, ही एक अप्रतिम व्यवस्था आहे. हे रेस्ट एरियाज त्या त्या ठिकाणच्या कौंटी कडून मॅनेज केले जातात असे कळाले.

—–००००—–

माधव भोपे.

वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर  २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे. 

माधव भोपे