https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-5 Sant Namdev Abhang-5

sant namdev

Sant Namdev Abhang-5

संत नामदेवांचे अभंग-5

 

याधीच्या लेखात आपण संत नामदेवांनी ‘नामा’ची महती हर प्रकारे सांगितली आहे, त्यासंबंधात काही अभंग पाहिले. नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी । ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

 

नामाचे महत्त्व किती सांगू आणि किती नको असे नामदेवाला होऊन जाते, आणि पुढील काही अभंगात, नामदेव, आपल्या अभंगांतून नामाचे सामर्थ्य सांगतात.

वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना

गायन करिसी तरी गुणिजन होसी | परी वैष्णव न होसी अरे जना

पुराण सांगसी तरी पुराणिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना

कर्म आचरसी तरी कर्मठ चि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना

यज्ञ करिसी तरी याज्ञिक चि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना

नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना

 

वेद, पुराण, यज्ञ, गायन, निरनिराळ्या प्रकारचे कर्म केले, तर त्या त्या क्षेत्रात मनुष्य पारंगत होईल, पण तो ’वैष्णव’ होईल याची खात्री नाही. पण केशवाचे, विष्णूचे नांव घेतल्यास मनुष्य तद्रूपच होऊन जातो असे नामदेव महाराज सांगतात.

काही काही अभंग हे खूपच विशेष आहेत. म्हणून ते मुद्दाम वेगळ्या रंगात  दिले आहेत. त्यातलाच हा एक अभंग. एका विशिष्ट वयानंतर सर्वांनी लक्षात घेण्यासारखा हा उपदेश आहे.

सर्वांग–साजिरीं आहेत इंद्रियें । तंव सावध होयें हरिकथे

कीर्तन नर्तन वाचे जनार्दन | न पवसी पतन येरझारी

पूर्ण मनोरथ घडती एका नामें । दाटेल सप्रेमें जीवहेतु

नामा म्हणे विलास न करीं तूं आणिक | सर्वी सर्व एक नाम असे

 

या शरीराचा, त्याच्या इंद्रियांचा, काही भरवसा नाही. जोपर्यंत सगळी इंद्रियें शाबूत आहेत, सुस्थितीत आहेत, तोपर्यंतच हरिकथेसाठी सावध व्हायला पाहिजे. नसता मुखाने ‘राम राम’ च्या ऐवजी ‘लाम लाम’ असे येऊन, तो राम ‘लांब’ जाण्याची वेळ यायची!

नामाच्या पुण्याचे- वक्ता आणि श्रोता दोघेही वाटेकरी आहेत. दोघांनाही त्याचा फायदा होतो. अर्थात श्रोता ‘सावधान’ असला पाहिजे आणि वक्ता ‘प्रेमळ’ असला पाहिजे.

जें जें पुण्य जोडे हरिनामगजरीं | त्याचे वांटेकरी दोघे जण

सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता । जो भजे अनंता निर्विकल्प

तेणें सुखें सुख चढे नित्य नवें । जाणती अनुभवें संतजन

नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं | न संडिती वारी पंढरीची

नाम कसेही घ्यावे, कीर्तनाचे रंगी ‘नाचता’ येत नसले, तरी वेडे वाकडे नाचावे, असा एक फारच बहारदार अभंग आहे-

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी | म्हणें वाचा उदंडीं रामनाम

श्रीहरीसारिखा गोसावी पैं चांगु । फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां

चुकलें पाडस कुरंगिणी गिंवसी | तैसा हृषीकेशी न्याहाळी तूंतें

धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें । तैसा वोरसे तूंतें केशिराज

नामा म्हणे इतुकें न करवे नि्दैवा | तरी वाचेसीं केशवा उच्चारी पां

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां- वेड्या बागड्या सारखे, कसेही वेडे वाकडे तोंड करून गायले आणि नाचले, तर हृषीकेशी माऊली ही आपल्या लेकराकडे कौतुकानेच पाहते. जणू चुकलेले पाडस हरिणीला सापडले तर तिला जसा आनंद होईल, तसा आनंद देवाला, भक्ताला पाहून होतो- वासराला पाहून धेनू हंबरते- तिला पान्हा फुटतो- अगदी तशीच, देवाची आपल्या लेकरांप्रति प्रीती असते. नामदेव महाराज म्हणतात, अरे निर्दैवा! इतकेही करणे जमत नसेल, तर वाचेने नुसते केशव केशव म्हण.

नामदेव महाराज लहानपणा पासूनच विठ्ठलाचे लाडके होते, त्यांच्या लहानपणी त्यांनी विठ्ठलाला, हट्ट करून नैवेद्य खायला लावला होता. मोठेपणीही, जेंव्हा मुक्ताईने ‘हे मडके जरा कच्चे आहे’ असे म्हटले, तेंव्हा ते रुसून विठ्ठल माऊलीकडेच गाऱ्हाणे घेऊन गेले होते. अशा कितीतरी कथा, नामदेवांच्या निरागसपणाच्या आपल्याला ठाऊक आहेत. त्याच आधारावर ते सांगतात, की देवाला आपल्या भक्ताचे तसेच कौतुक असते, जसे एखाद्या मातेला, आपल्या बालकाचे.

नामात तल्लीन झाल्यानंतर स्वतःच्या स्त्री पुत्राचीही आठवण त्यांना राहिली नाही अशी त्यांची स्थिति त्यांनी वर्णन केली आहे-

हातीं वीणा मुखीं हरि| गाये राउळाभीतरीं

अन्न–उदक सोडिलें | ध्यान देवाचें लागलें

स्त्री पुत्र बाप माय । यांचा आठव न होय

देहभाव विसरला | छंद हरीचा लागला

नामा म्हणे हें चि देई। तुझे पाय माझी डोई

नामाच्या तल्लीनतेमध्ये देहभानच राहत नाही- मग देह राहिला काय किंवा गेला काय- कोण फिकीर करते? म्हणून नामदेव महाराज म्हणतात- ‘काळ देहासि आला खाऊ- आम्ही आनंदे नाचू गाऊ’

काळ देहासी आला खाऊं | आम्ही आनंदें नाचूं गाऊं

कोणे वेळेस काय बा गाणें | हें तों भगवंता मी नेणें

टाळ मृदंग दक्षिणेकडे | माझें गाणें पश्‍चिमेकडे

नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी द्यावी सेवा

पूर्ण कृपा केली देवा | दिधली पादपदूम-सेवा

पापें पळालीं पळालीं | नामकीर्तन-कल्लोळीं

रंगमाळा जागरणीं | तेथे मुक्ति वाहती पाणी

जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा

नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी

नामदेव स्वतःला ‘संत’ म्हणवत नाहीत- “जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा” असे म्हणतात आणि “नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी” असे म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतात- देवाच्या भक्तांची हीच तर ओळख असते!

संत नामदेवांच्या निवडक अभंगांचा हा पाचवा भाग, नामाची महति आणि सामर्थ्य सांगणारा होता. पुढील भागात, नामदेव महाराज संतांचा महिमा सांगतात त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

माधव भोपे

 

संत नामदेवांचे अभंग-4 Sant Namdev Abhang-4

namdev-7

Sant Namdev Abhang-4

संत नामदेवांचे अभंग-4

 

मागील लेखात आपण ‘देह अभिमान’ म्हणजे ‘मी देह आहे’ या समजुतीमुळे काय काय दुःख सहन करावे लागते, याचे वर्णन संत नामदेवांनी केलेले पाहिले. नंतर आपल्या मनाला, विषय भोगांपासून दूर राहून, देवाच्या स्मरणात राहण्याविषयी परोपरीने समजावले त्याचे अभंग आहेत.

आता पुढील काही अभंग हे ‘नामाच्या गोडी विषयी आहेत.

नामाची गोडी सांगतांना संत नामदेवांनी काही खूप बहारदार उदाहरणे दिली आहेत. त्यावरून, एखादी गोष्ट समजावून सांगतांना, उपमांचा वापर केल्यावर ती गोष्ट कशी आपल्या मनावर पटकन ठसते, याचाही अनुभव येईल.

गोक्षीर लाविले आंधळिया–मुखीं | तेथील पारखी जिंव्हा जाणे

तैसें देवा तुझें नाम निरंतर | जिंव्हेसी पाझर अमृताचे

सोलूनियां केळें साखरें घोळिलें | आंधारी खादलें तरी गोड

जाणोनियां नामा करी विनवणी | अमृताची खाणी नाम तुझें

 

नाम कळत किंवा नकळत जरी घेतले, तरी त्याचा फायदा व्हायचा तो होतोच, त्याची गोडी येतेच, हे सांगतांना नामदेव महाराज सांगतात- गाईचे दूध आंधळ्या माणसाला जरी प्यायला दिले, तों ते पाहू शकत नसला, तरी त्याच्या जिभेला त्या दुधाची चव बरोबर कळते. दिसत नाही म्हणून त्याचे काही अडत नाही. तसे देवा, तुझ्या नामाची महति माहीत नसतांना जरी नांव घेतले, तरी तुझे नांव अमृतरूपी असल्याने, जिंव्हेला जणू अमृताचा पाझर फुटतो.

केळे सोलून, त्यात साखर घालून, अंधारात जरी खाल्ले, तरी ते गोडच लागते. तसे देवाचे नांव हे जाणता, अजाणता कसेही घेतले, तरी त्याची गोडी अनुभवास येतेच.

नाम तें चि रूप रूप तें चि नाम । नामरूप भिन्न नाहीं नाहीं

आकारला देव नामरूपा आला । म्हणोनि स्थापिले नाम वेदी

नामापरता मंत्र नाहीं हो आणिक | सांगती ते मूर्ख ज्ञानहीन

नामा म्हणे नाम केशव केवळ | जाणती प्रेमळ भक्‍त भले

 

नाम आणि रूप हे भिन्न नाहीतच मुळी. देव हा ‘नाम’ रूपाने आकारास आला आहे. नामापरता दुसरा कोणता मंत्र नाही.

मंत्राचा पैं मंत्र हरि हा उच्चार । न लगे तो विचार करणें कांहीं

सुफळ नाम गाढें वाचेसीं उच्चारू | केशव हा चि करूं सर्वांभूती

नाहीं त्यासी पतन नव्हेचि बंधन | नित्य हें चि स्नान रामनामें

नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालूं नका

 

आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही नामाचा उच्चार सुरू करा, जास्त काही विचार करण्याची गरज नाही. आणखीन जास्त पसारा वाढवायची गरज नाही.

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी । ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

पहा विचारूनि अनुभव मनीं | नका आडरानीं झणीं भरू

नामावांचूनियां तरलों जे म्हणती | ते आधीं बुडती भवाब्धींत

नामा म्हणे नाम ओकाराचें मूळ | ब्रह्म तें केवळ रामनाम

विठ्ठल विठ्ठल म्हणा उघडा मंत्र जाणा | कळिकाळ आंकणा होईल तुम्हां

वेदांचें हें सार शास्त्रांचे गहृर | तें जाणा अक्षर विठ्ठलनाम

न करावें खंडण अखंड उच्चारण | देश काळ वर्तमान नाहीं येथें

जीवींचें निजगूज मुक्‍तीचें तें बीज | नामा म्हणे मज सांपडलें

काळ वेळ नसे नामसंकीर्तनीं । उंच नीच योनि हें हि नसे

धरा नाम कंठीं सदा सर्वकाळ | मग तो गोपाळ सांभाळील

कृपाळु कोंवळा सुखाचा सागर | करील उद्धार भाविकांसी

नामा म्हणे फार सोपें हें साधन | वाचे नाम घेणें इतुकें चि

 

न पढावे वेद, नको शास्त्रबोध | नामाचे प्रबंध पाठ करा

नव्हे ब्रह्मज्ञान, न होय वैराग्य | साधा भक्तिभाग्य संतसंगें

येर क्रियाकर्म करितां हो कळी– | माजीं कोण बळी तरले सांगा

नामा म्हणे गूज सांगितलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं

 

केशव म्हणतां क्लेश जाती परते | त्याहूनि सरतें आणिक नाहीं

वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी | उदंड वाचेसीं हरि म्हण

पहा याहूनियां आन नाहीं दुसरें | भीष्में युधिष्ठिर उपदेशिला

नामा म्हणे धरीं केशवीं विश्‍वास | तरसी गर्भवास नामें एके

साराचें हि सार भक्‍तीचें भांडार | नाम निरंतर गातां वाचे

कासया करावें आणिक साधन । नामाविण क्षण जाऊं नेदी

दया शांति क्षमा हें चि पैं भूषण । नामसंकीर्तन अहर्निशी

नामा म्हणे जप अखंड नामाचा | काळ हा सुखाचा सदोदित

भवसिंधूचा पार तरावयालागीं । साधन कलियुगीं आणिक नाहीं

अहर्निशीं नाम जपा श्रीरामाचे । जें सकळ धर्माचिं मुकुट–मणि

न चले वर्णाश्रम धर्म–आचरण | न घडे व्रत दान तप कोणा

नव्हे तीर्थाटन पुराण–श्रवण | नव्हे ब्रह्म–ज्ञान शास्त्र–बोध

नामा म्हणे नाम राघोबाचें गातां | ब्रह्म–सायुज्यता घर रिघे

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे | नामापासीं असे भक्ति मुक्ति

नामाऐसें सोपें नाहीं त्रिभुवनी । नाम संजीवनी साधकांसी

यज्ञ–दान–तपें नामें आलीं हाता | नामें सर्व सत्ता प्राप्त होय

नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं | नाहीं त्याचे तुकीं दुजा कोणी

कलियुगात यज्ञ, तप, निरनिराळी व्रतें हे सर्व करण्याची मनुष्याची क्षमता राहणार नाही, म्हणून सर्व संतांनी ‘नामाचा’ आश्रय घ्यायला सांगितले आहे. ‘नानक नाम जहाज है’- संसार रूपी, निरनिराळ्या संकटांनी भरलेला भवसागर तरून जाण्यास नाम हे ‘जहाज आहे- या जहाजात बसून, सुरक्षितपणे, आरामात पैलतीराला पोंचता येते, असे गुरु नानक सांगून गेले आहेत. कोणत्याही संताची वाणी पाहिली, तरी त्यात हर प्रकारे नामाचे महत्त्व सांगितले आहे.

नामदेवांच्या तर नांवातच ‘नाम’ आहे. नामदेव हे केवळ ‘नाम’ घेण्यासाठीच जन्माला आले. त्यामुळे, नाम माहात्म्य सांगतांना नामदेवांच्या वाणीला अधिकच बहर येतो यात काही नवल नाही.

पुढील लेखात आपण नामाच्या सामर्थ्याबद्दल नामदेवांचे काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-3 Sant Namdev Abhang-3

vithal mandir

Sant Namdev Abhang-3

संत नामदेवांचे अभंग-3

 

संत नामदेवांची भजने पाहतांना, मागील लेखात आपण, मनुष्य कसा विषयसुखाच्या मागे लागून केविलवाणा झाला आहे, अशा अर्थाचे काही अभंग पाहिले. तसेच भक्तीचे नुसते वरवरचे सोंग किंवा ढोंग करणाऱ्या लोकांचा कसा सुळसुळाट झाला आहे, त्याबद्दल ही नामदेवांचे अभंग पाहिले. तसेच, “सजीवासी हाणी लाथा, निर्जीवपायी ठेवी माथा”, असे क्रांतिकारी विचार ही पाहिले.

आता, देह अभिमान- “मी देह आहे” अशा भ्रमामुळे मनुष्याचे कसे हाल होतात, आणि त्यावर काय उपाय आहे, याबद्दल काही खूप छान अभंग आहेत.

देहाचा अभिमान न धरावा चित्तीं | धरावी उपरति उपशम

सर्वांभूतीं देव ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची

चिंता न करी नाम्या येणें तरसी जाण| तुज सांगितली खूण निर्वाणींची

 

लौकिकाची कांहीं न धरावी लाज | हें चि निज काज साधावें तें

निंदा करिती तो मानावा आदर | स्तुति तें उत्तर नायकावें

न धरावी चाड मान–सन्मानाची | आवडी भक्तीची रूढवावी

नामा म्हणे हें चि रूढवावें मानसीं | क्षण एक नामासी विसंबूं नये

 

निर्विकल्प ब्रह्म कैसेनि आतुडे | जंववरी न मोडे मीतूंपण

शब्द–चित्र–कथा सांगती पाल्हाळ | मन नाहीं निश्‍चळ हरि–पायीं

आणूतें प्रमाण होतां दुजेपण | मेरूतें समान देईल दुःख

नामा म्हणे ब्रह्म सर्वांभूती पाहीं । तरी ठाईचा ठाई निवशील

 

 

परब्रह्मींची गोडी नेणती बापुडीं | संसार–सांकडीं विषयभरित

तूंते चुकली रे जगजीवनरक्षा । अनुभवाविण लक्षा नये चि रे कोणा

जवळीं असतां क्षीर नव्हे चि वरपडा | रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला

दर्दुरा कमळिणी एके ठाई बिढार | वास तो मधुकर घेऊनि गेला

नामा म्हणे ऐसीं चुकली बापुडीं | अमृत सेवितां पुडी चवी नेणे

एकदा परब्रह्माची गोडी लागली, तर संसारातील विषय आवडणार नाहीत. इथे गोचीड आणि गाईचे वासरू यांची तुलना केलेली आहे. गोचीड हे, गाईच्या स्तनापाशी असते. पण ते आयुष्यभर तिचे रक्तच सेवन करते. जेंव्हा की गाईचे वासरू मात्र दूधरूपी अमृत सेवन करते. तसेच दर्दुर म्हणजे बेडूक आणि मधुकर म्हणजे भुंगा हे दोन्ही कमळाच्या जवळ असतात, पण कमळाच्या सुगंधाचे सेवन भुंगा करतो, आणि बेडूक मात्र कमळाच्या अगदी जवळ असूनही त्याच्या सुगंधापासून वंचित राहतो. तसेच विषयी लोक, संसारात येऊन हरिनामरूपी अमृत सेवन करण्याच्या ऐवजी विषयरूपी चिखलाचेच सेवन करण्यात धन्यता मानतात.

संसार करितां देव जैं सांपडे | तरी कां झाले वेडे सनकादिक

संसारीं असतां जरी देव भेटता | शुकदेव कासया जाता तयालागीं

ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार | तरी कां निरहंकार झाले साधु

नामा म्हणे आतां सकळ सांडून | आलोंसें शरण विठोबासी

 संसार करून जर देव सापडला असता, तर सनकादिक, शुकदेव हे कशाला संसारापासून दूर राहिले असते, असे म्हणून, सगळे सोडून विठोबाला शरण जा असे नामदेव महाराज कळकळीने सांगतात.  

संसार–सागर भरला दुस्तर | विवेकी पोहणार विरळा संत

कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पोहूनियां

भ्रम हा भोंवरा फिरवी गरगरा | एक पडिले घरा चौर्‍यांशीच्या

नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचे । भय कळिकाळाचें नाहीं तुम्हां

वरील अभंग इतके सोप्या शब्दात आहेत, की त्यांच्यावर वेगळे काही भाष्य करण्याची गरज पडत नाही. पण त्यानिमित्ताने, आपलीही उजळणी होते, म्हणून भाष्य करावेसे वाटते.

त्यानंतर, येणारे भोग, शरीराची पीडा इत्यादि ही आपल्याच कर्माची फळें आहेत, त्यासाठी ईश्वराला किंवा कोणाला दोष देण्याची काय गरज आहे, अशा प्रकारचे काही अभंग आहेत-

पापाचें संचित देहासी दंडण | तुज नारायणा बोल नाहीं

सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वाऊगा चि

पेरी कडू जिरें इच्छी अमृतफळ | अर्कवृक्षा केळ केवीं होय

मुसळाचें धनु न होय सर्वथा | पाषाण पिळितां रस कैंचा

नामा म्हणे देवा तुज कां रुसावें । मनासी पुसावें आपुलिया

 नंतर समर्थांनी जसे आपल्या मनाला समजावले होते, तसेच नामदेव महाराजही पुढील काही अभंगांमधून समजावतात

अरे अलगटा माझिया तूं मना | किती रानोरानां हिंडविसी

विठोबाचे पायीं दृढ घाठीं मिठी| कां होसी हिंपुटी वायांविण

संकल्प विकल्प सांडी तूं समूळ | राहे रे निश्‍चळ क्षणभरी

आपुलें निजहित जाण तूं त्वरित | वासनारहित होई वेगीं

नामा म्हणे तुज ठाईंचें कळतें । सोसणें कां लागते गर्भवा

क्षण एक मना बैसोनि एकांतीं | विचारीं विश्रांति कोठें आहे

लक्ष चौर्‍्यांशीच्या करितां येरझारा | शिणलासी गव्हारा वेळोवेळां

दुर्लभ आयुष्य मनुष्य–देहींचें | जातसे मोलाचें वायांविण

नामा म्हणे तुज येतों काकुळती | सोडीं रे संगति वासनेची

वासनेची संगत सोडण्याविषयी नामदेव महाराज अगदी काकुळतीला येऊन सर्वांना विनंती करतात

वासनेची करणी आइकें तूं मना | या केली रचना ब्रह्मांडाची

निर्गुण चैतन्य सदा सुख–राशि | त्या दिलीं चौऱ्यांशी लक्ष सोंगे

ऐसी हे लाघवी पाहतां क्षणभंगुर | ब्रह्मादि हरिहर ठकिले इणें

नामा म्हणे तरी चि इचा संग तुटे | दैवयोगें भेटे संत–संग

दैव योगाने संत भेटले, तरच या वासनेचा संग तुटू शकतो.

परियेसी वासने संकल्पस्वरूपे | विश्‍व त्वां आटोपें वश केलें

ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें | विषयाकारणें ठोठिंगत

परी माझ्या मना सांडीं वो समर्थे | देई मज दीनातें कृपादान

नामा म्हणे पुढती गांजिसील मज | येईल केशिराज सोडवणे

ब्रह्मादिक ही या वासनेची खेळणीं आहेत. अशा वासनेला नामदेव महाराज दम देतात की तू मला सोड, माझ्या नादी लागू नकोस, कारण तू जर मला गांजलेस, तर साक्षात केशीराज मला सोडवायला समर्थ आहे, हे लक्षात ठेव

पुढील लेखात नाम स्मरणाचे महत्त्व सांगणारे काही अभंग बघणार आहोत.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-2 Sant Namdev Abhang-2

namdev-5

Sant Namdev Abhang-2

संत नामदेवांचे अभंग-2

 

संत नामदेवाची भजनें म्हणजे अगदी थोड्या शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करणारी आहेत. मागील लेखात आपण नामदेवांची, आयुष्याच्या क्षणभंगुरपणाबद्दलची काही भजनें पाहिली. त्याचप्रमाणे  संसारात पडल्यावर माणूस, स्वतःचे आणि मुला बाळांचे पोट भरता भरता, कसा केविलवाणा होऊन जातो, पण त्याला त्याचे भान नसते, हे सांगणारे काही त्यांचे अभंग आहेत.

विषयाचा आंदणा दिसे केविलवाणा | करितसे कल्पना नानाविध

कुटुंब–पाईक म्हणवी हरीचा दास । मागे ग्रासोग्रास दारोदारी

पोटालागीं करी नाना विटंबना | संतोषवी मना दुर्जनांच्या

वैराग्याची वार्ता कैंची दैवहता | नुपजे सर्वथा प्रेमभावो

नामा म्हणे ऐसे तारी एक्या गुणें | अजा आरोहण गजस्कंधीं

goat on the shoulder of elephant

विषयांनी बांधलेला माणूस केविलवाणा दिसतो, सतत नानाविध कल्पना- असे झाले तर-तसे झाले तर- अशा कल्पना करून करून चिंता करत राहतो. ‘मागे ग्रासोग्रास दारोदारी’ हे या स्वरूपात नाही, तरी वेगळ्या स्वरूपात आपण आजही पाहतोच. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कशा कशा दुर्जनांची चाकरी करावी लागते, त्यांना खुश ठेवावे लागते. अशा माणसाला वैराग्य कुठून येणार- तो ‘दैव-हत’- दैवापुढे हतबल झालेला असा- जो माणूस आहे, त्याच्या हृदयात देवाविषयी प्रेम भाव कसा उपजेल?

पण असे जरी असले, तरी एक मार्ग आहे- “अजा आरोहण गजस्कंधीं” या ठिकाणी एक छान उपमा दिली आहे- बोकड जंगलातून जात असतांना- त्याला नाना प्रकारच्या हिंस्त्र श्वापदांपासून भय असते- पण कसेही करून जर त्याने हत्तीशी मैत्री करून घेतली- तर तो त्याच्या खांद्यावर बसून मजेत जंगल पार करू शकतो- समर्थाचा आश्रय घेतल्यास संकटांना घाबरण्याचे कारण उरत नाही- मग सर्व शक्तिमान परमेश्वराचा आश्रय घेतला- तर संसाररूपी जंगल विनासायास, सुरक्षितपणे पार करता येते.

अजून एका अभंगात, वीतभर पोटासाठी काय काय करावे लागते, याचे अगदी वास्तव वर्णन केले आहे- मला यात अजून एक सुचवावेसे वाटते- आजकाल नुसते पोट भरणे एवढे अवघड राहिले नाही- पण या ठिकाणी आपण रसना- जिभेची चटक- किंवा वासना- विविध भोग भोगण्याची अदम्य इच्छा- या गोष्टी जर घातल्या, तर खालील अभंग अगदी तंतोतंत आजच्या काळाला लागू पडतो-

वीतभर पोट लागलेंसे पाठी | साधूसंगें गोष्टी सांगूं न देई

पोट माझी माता पोट माझा पिता | पोटानें ही चिता लाविलीसे

पोट माझा बंधु पोट माझी बहीण | पोटानें हें दैन्य मांडियेले

विष्णुदास नामा पोटाकडे पाहे | अजूनि किती ठाय हिंडवीसी

त्यानंतरच्या एका अभंगात, पापा पासून वाचण्याचा अगदी सोपा मार्ग संत नामदेव सांगतात-

परदारा परधन परनिंदा परपीडन | सांडोनि भजन हरीचें करा

सर्वांभूती कृपा संतांची संगति | मग नाहीं पुनरावृत्ति जन्ममरण

नामा म्हणे नलगे साधन आणिक | दिधली मज भाक पांडुरंगे

खरंच- आपल्या आजूबाजूला पाहिले, तर सर्व प्रकारची दुष्कृत्यें या चार प्रकारात मोडतात- परदारा, परधन, परनिंदा आणि परपीडन. या चार गोष्टी सोडून, हरीचे भजन जर केले, आणि सगळ्यांबद्दल कृपाभाव ठेवला, आणि संत- सज्जनांची संगत धरली- तर यापेक्षा वेगळे साधन काय लागणार- अशा माणसाला जन्ममरण आणि  पुनरावृत्तिपासून सुटका मिळेल, यात काही संशय नाही- आज इतरांबद्दल द्वेष, असूया, या गोष्टींमुळे मनुष्य नाना प्रकारच्या मानसिक आणि मनो कायिक रोगांना बळी पडत असलेला आपण बघतो- तो सगळ्यांबद्दल कृपाभाव जर ठेवला, तर अशा रोगांपासून दूर राहू शकेल. या तीनच ओळींमध्ये संत नामदेवांनी आधुनिक जगात सुद्धा कसे राहावे याचा आदर्शच घालून दिला आहे असे दिसते.

आणि मग आजकालच्या जगात नुसतेच भक्त असण्याचे ढोंग करणारे- महात्मा असण्याचे ढोंग करणारे असे लोक कसे बोकाळले आहेत, त्याबद्दलचे काही अभंग आजच्या स्थितीलाही तंतोतंत लागू पडतात-

मुखीं नाम हातीं टाळी । दया नुपजे कोणे काळीं

काय करावें तें गाणें | धिग धिग लाजिरवाणें

हरिदास म्हणोनि हालवी मान | कवडीसाठीं घेई प्राण

हरिदासाचे पायीं लोळे | केशीं धरोनि कापी गळे

नामा म्हणे अवघे चोर | एक हरिनाम थोर

पोटीं अहंतेसी ठावो | जिंव्हे सकळ शास्त्रांचा सरावो

भजन चालिले उफराटें। कोण जाणे खरें खोटें

सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा

सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा

मृत्तिकेच्या पूजा नागा । जित्या नागा घेती डांगा

नामा म्हणे अवघें खोटें | एक हरिनाम गोमटे

 वरील अभंगात तर सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा, असे सांगून अशा दांभिक लोकांचे वर्णन केले आहे- सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा, मृत्तिकेच्या पूजा नागा । जित्या नागा घेती डांगा या ओळींमधून नामदेव किती सुधारक विचाराचे होते, हे दिसून येते.

 ज्ञानदेवांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसांनी अल्लाउद्दीन खिलजीचें महाराष्ट्रावर आक्रमण झालें. तत्पूर्वी महाराष्ट्र मुसलमानांच्या आक्रमणापासून मुक्‍त होता. पण नामदेव महाराज ऐंशी वर्षं जगले. म्हणजे ज्ञानदेवानंतर नामदेव जवळ जवळ पन्नास वर्षे राहिले.  त्यांनी  पाहिलें की सगळीकडे इस्लामचा प्रचार चालला आहे.  काही इस्लामचे राजे तर आले आणि गेले.  काही टॅक्स घेऊन परत गेले, परंतु सूफी तत्त्वज्ञानी भारतात फिरत होते ते महाराष्ट्रांतहि होते आणि परमात्मा एक आहे असें सांगत होते. नामदेवाने विचार केला की हा जो हल्ला आहे तो कसा परतवता येईल? त्यातला चांगला अंश ग्रहण केल्याशिवाय होणार नाही. इस्लाम म्हणतो, परमेश्वर एक आहे. पण हिंदूंमध्ये काय चालतें ? कुणी गणपतीची पूजा करतात, कुणी कुणाची, कुणी कुणाची. आणि जो तो आपली उपासना श्रेष्ठ मानून चालला आहे. फकीर सांगत होते, अल्लाह एक आहे, मानव एक आहे. त्यातले गुण घेतले पाहिजेत, म्हणजे तो हल्ला परतवता येईल. नामदेवाने विचार केला, आपणसुद्धा एकच ईश्‍वर मानतो. परमेश्‍वराचें एकत्व तर आपणहि मानतो. आपण दहा ईश्‍वर काही मानत नाही. हिंदूंचे मत वेदामध्ये एका वाक्यात आलें आहे, ‘एकं सत्‌ विप्रा बहुधा वदन्ति – सत्य एक आहे, पण विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नामांनी बोलावतात. हिंदू धर्मातहि परमेश्‍वराचें एकत्व मानले आहे. पण तें लोपल्यासारखें होते. आम्ही नाना देवतांच्या मागे लागल्यामुळे या देवतेचा उपासक त्या देवतेच्या दर्शनालासुद्धा जाणार नाही, इतकी तयारी होती. म्हणून नामदेवाने विचार केला की एकत्वाचें प्रतिपादन केले पाहिजे. म्हणून जिथे जिथे इस्लामचा प्रचार होता तिथे तिथे यात्रा करीत नामदेव महाराज पोहोचले. इस्लामचा प्रचार सगळ्यात जास्त पंजाबात होता, म्हणून नामदेव महाराज तेथे गेले आणि  वीस वर्ष राहिले! तिथे त्यांनी पाहिलें की, प्रत्येक गांवात एक फकीर फिरत आहे आणि ईश्‍वर एक आहे असें समजावून सांगत आहे. नामदेवाने विचार केला ही एकता तर आपल्याहि धर्मात आहे, पण ती सांगितल्याशिवाय कशी कळणार? त्यांनी  एक भजन केलें आहे. त्यात एका बाजूने हिंदूला टोला हाणला

व दुसऱ्या बाजूने मुसलमानांना.

हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीति

नामे सोई सेविआ जह देहुरा न मसीति

 हिंदू देवळातील देवाला पूजतात, तर मुसलमान मस्जीदीला पवित्र मानतात- पण दोघांनीही हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सोई सेविआ जह देहुरा न मसीति त्याचे सेवन करा-त्याची आस धरा-जो न देवळात राहतो, न मस्जीदीत. हिंदु देवळाची पूजा करतात आणि देवाला विसरले; मुसलमान मशिदीची पूजा करतात, मशिदीतच परमेश्‍वर आहे असें मानतात. म्हणजे तुम्हीसुद्धा मूर्तिपूजक आहात. म्हणून दोन्हीची पूजा सोडा आणि अंतर्यामी जो भगवान्‌ आहे त्याच्याकडे वळा, असें सांगत सांगत नामदेव महाराज  फिरले.  त्याचा परिणाम असा झाला की इस्लामची जी लाट आली होती ती थोपविली गेली. नानक महाराज आले, त्यांनी तेंच सांगितलें.

असो. हे थोडे विषयांतर झाले. पण आजकालच्या जगात, दंभ- ढोंग यांचीच कशी चलती झाली आहे, हे सांगणारे आणखी काही अभंग आहेत-

काय करूनि तीर्थाटणें | मन भरिलें अवगुणें

काय करावें तें तप | चित्तीं नाहीं अनुताप

मन:संकल्पाचीं पापें | न जाती तीर्थाचेनि बापें

नामा म्हणे सर्व सोपें । पाप जाय अनुतापें

 बापरे! मन:संकल्पाचीं पापें | न जाती तीर्थाचेनि बापें किती स्पष्ट बोलतात नामदेव महाराज- मनात नुसता पापाचा संकल्प जरी केला तर तीर्थाच्या बापानेही ती पापें जायची नाहीत!

आणखी एक अभंग- मीच भक्त आहे- मीच मुक्त आहे अशी शेखी मिरविणाऱ्या पापी आणि दुराचारी लोकांची पोलखोल केली आहे-

देहाचें ममत्व नाहीं जों तुटले | विषयीं विटलें मन नाहीं

तंव नित्य–सुख कैसेनि आंतुडे | नेणती बापुडे प्रेमसुख

मी चि एक भक्‍त मी चि एक मुक्‍त | म्हणवी पतित दुराचारी

नामा म्हणे तुझे कृपेविण देवा | केंवीं जोडे ठेवा विश्रांतीचा

तसेच एका अभंगात- हट्टाने कठिण योग साधना करणाऱ्या साधकांना सुद्धा सावध केले आहे- भुजंग हा नुसता पवन म्हणजे वाऱ्याचा आहार करून राहतो, अशी वदंता आहे- पण म्हणून तो काही योगेश्वर होत नाही. निरनिराळ्या योग साधनांनीt काया पालटेल- पण मन शुद्ध झाले नाही तर त्याचा काही उपयोग नाही असे सांगितले आहे.

 भुजंग विखार पवनाचा आहार | परी योगेश्‍वर म्हणूं नये

पवनाच्या अभ्यासें काया पालटी | परी तो वैकुंठीं सरता नव्हे

मन हें दर्पण करोनि निर्मळ | पाहें पां केवळ आत्मा स्वयें

तुझा तूं केवळ तुजमाजीं पाहीं | नामा म्हणे ध्याई केशिराजु

 आपल्या संत परंपरेमध्ये अशी अनेक रत्नें आहेत. अशा या अमूल्य ठेव्याची ओळख आपण येत्या काही लेखांत करून घेणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांची भजने-1 

 

संत नामदेवांचे अभंग-1 Sant Namdev Abhang-1

namdev-3

Sant Namdev Abhang-1

संत नामदेवांचे अभंग-1

आपल्या भारत देशाला संतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. आणि महाराष्ट्र हा त्यात अग्रेसर आहे. साधारण तेराव्या शतकापासूनच्या संत परंपरेचा आढावा घेतला, तर त्यात संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, सोयराबाई, जनाबाई, संत तुकाराम, संत दामाजीपंत, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, अशा कितीतरी संतांची नांवे सांगता येतील.

या सर्वांची सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून होते. “ज्ञानदेवे रचिला पाया”.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

अवघ्या 21 वर्षे राहिलेल्या ज्ञानेश्वरांना सर्व संत “माऊली” म्हणतात, यातच त्यांचे अलौकिकपण दिसून येते. संत ज्ञानदेव हे इ. स. 1275 ते 1296 या काळात होऊन गेले.  

साधारण त्याच काळात, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी (ज्याला नंतर नरसी नामदेव म्हणू लागले) येथे इ. स. 1270 ते 1350 या कालावधीत संत नामदेव होऊन गेले.

वर दिलेल्या सर्व संतमंडळींनी भागवत धर्माचा, भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार आपआपल्या काळाच्या गरजेनुसार केला, आणि त्यांच्या रचना आज महाराष्ट्रातील घराघरात रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनल्या आहेत.

आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्रातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्या विविध रचनांचा, अभंगांचा अभ्यास केलेला होता. त्यांच्या जवळील लोकांनी त्यांना आग्रह करून त्यांच्याकडून त्यातील काही निवडक अभंग निवडून त्यावर त्यांच्या भाष्यासह पुस्तक रूपात प्रसिद्ध केले होते. 

वरील सर्व संतांचे साहित्य खूप मोठे आहे. आणि त्यांचे पूर्ण साहित्य ज्यांना वाचणे शक्य नाही, अशा जिज्ञासूंसाठी हे निवडक अभंग, या संतांच्या साहित्याची तोंडओळख करून घेण्यासाठी तर खूप उपयोगी आहेच. पण मला स्वतःला आयुष्यात कठीण प्रसंगात हे साहित्य दीपस्तंभा प्रमाणे उपयोगी  पडले आहे. संत आपल्या आयुष्यात किती प्रचंड कार्य करून जातात, की जे येणाऱ्या कित्येक पिढ्या, कित्येक शे वर्षे किती उपयोगी पडते, याची कल्पना फक्त तेच करू शकतील ज्यांना याचा अनुभव आलेला आहे. असो.

तर अशा या संत साहित्यातील संत नामदेव यांच्या काही रचना, येणाऱ्या काही दिवसांत, प्रस्तुत करण्याचा विचार आहे. आणि त्यांचा अर्थ, माझ्या अल्पबुद्धीला जसा लक्षात येतो, तसा काही ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की परमार्थ मार्गावरील साधकांना हा प्रयत्न रुचेल.

Sant Namdev Abhang-1 

संत नामदेवांचे सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.

या ठिकाणी, संत नामदेवांचे अभंग कुठल्या क्रमाने घेतलेले नाहीत, तर साधारण विषयवार घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कधी कधी माणसाला, आयुष्याचा विचार करतांना, त्याचा क्षणभंगुरपणा अत्यंत व्यथित करतो, आणि काही सुचेनासे होते. आपल्यासारख्या सामान्यांना तेवढ्यापुरते स्मशानवैराग्य येते, आणि काही वेळातच आपण पुन्हा रोजच्या व्यवहारात गुंतून जातो, आणि त्या क्षणभंगुरपणाला विसरून जातो. पण नामदेवांना हा क्षणभंगुरपणा आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. खालील अभंगात संत नामदेवांनी या क्षणभंगुरपणाचे अत्यंत वास्तव वर्णन केले आहे, आणि शाश्वत काय आहे, हे सांगितले आहे..

1

अंतकाळीं मी परदेशी | ऐसें जाणोनि मानसीं|

म्हणोनियां हृषीकेशी | शरण तुजसी मी आलों||

 नवमास गर्भवासी | कष्ट झाले मातेसी

ते निष्ठुर झाली कैसी | अंतीं दूर राहिली||

 जीवीं बापासी आवड । मुखीं घालूनि करी कोड

जेव्हां लागली यम–ओढ । तेव्हां दूर टाकिलें||

 मित्र आले गोत्रज आले । ते हि स्मशानी परतले

शेवटी टाकोनियां गेले | मजलागीं स्मशानीं||

 ऐसा जाणोनि निर्धार | मग मज आला गहिंवर

तंव दाही दिशा अंधकार | मग मज कांहीं न सुचे||

 ऐसें जाणोनि निर्वाण पाहीं । मनुष्य–जन्म मागुता नाहीं

नामा म्हणे तुझे पायीं | ठाव देई विठोबा||

 पूर्ण आयुष्याचा हिशोब या अभंगात मांडला आहे. आणि कितीही जवळचे असले, तरी त्यांची साथ केवळ स्मशानभूमीपर्यंतच या विदारक सत्याला मांडले आहे. मग शेवटी काय बरोबर येते? तर आयुष्यभर केलेली भक्तीच शेवटी सोबत येते, असे सांगितले आहे.  

  1.  

चोरा ओढोनियां नेइजे जें शूळीं | चालतां पाउलीं मृत्यु जैसा

तैसी परी मज झाली नारायणा | दिवसें–दिवस उणा होत असे ||

 वृक्षाचिये मुळीं घालितां कुऱ्हाडी | वेंचे तैसी घडी आयुष्याची

नामा म्हणे हेंहि लहरीचें जळ | आटत सकळ भानुतेजें ||

 

आयुष्य पळा पळाने कमी होत आहे, याची जाणीव या ठिकाणी करून दिली आहे, आणि लहरींचे जळ जसे सूर्याच्या तेजाने आटते, तसे हे आयुष्य आटत जाते आहे हे सांगितले आहे.namdev payri

 

3

जंव हंस काया नव जाय सांडोनि | तंव घेई ठाकोनि रामनाम

अंतकाळ–वेळीं तुझें नव्हे कोण्ही | मी माझें म्हणऊनि भुललासी ||

 एकलें चि येणें एकलें चि जाणें | पहा दृढ ज्ञानें विचारोनि

पाप पुण्य दोन्ही अंतींचीं सांगाती | येरें तीं राहती जेथींचीं तेथें

विष्णुदास नामा विनवितसे तुम्हां | झणीं परब्रह्मा विसरू नका ||

 

शेवटी फक्त आयुष्यभर केलेले पुण्य आणि पाप हेच सोबत येणार आहे त्यामुळे परब्रह्म परमात्म्याला विसरू नका, तोच तुम्हाला यातून तारेल, असे विनवून सांगितले आहे.

संत कबिरानेही एका अभंगात अशीच भावना व्यक्त केली आहे-

उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मैला

छुटेंगे महल अटारी, छूटेगी दुनियादारी
कुटुंब कबीला छुटे-छुटे, बचपन दिन संग खेला रे

जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला
ना जानू या किधर गिरेगा, लगे या पवन का रेला

जब होवे उमर पूरी, जब छूटेगा हुकुम हजूरी
जम के दूत बड़े मजबूत, जम से पड़ा झमेला

हर के कबीर गुण गावे, वह हर को परा पावे
गुरु की करनी गुरु जानेगा , चेला की करनी चेला

 4

 जाइजणा देह जाईल नेणसी | लौकिक मिरविसी लाजसी ना

माझें माझें माझें मानिसी निर्भांत | करिसी अपघात रात्रंदिवस ||

 सांग तूं कोणाचा आलासी कोठूनि | दृढ बुद्धि मनीं विचारी पां

विषयार्चेनि संगें भुलशील झणें । भोगिसी पतन रात्रंदिवस

नामा म्हणे एक ध्याई कमळापति | निजाचा सांगाती केशिराज ||

5

आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक | संपत्तीचें सुख विषय हा

हित तें आचरा हित तें विचारा | नामीं भाव धरा जाणतेनो ||

 संपत्तीच्या बळें एक झाले आंधळे । वेढिले कळिकाळें स्मरण नाहीं

एक विद्यावंत जातीच्या अभिमानें | नेले तमोगुणें रसातळा

नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा | सोडवीं केशवा मायबापा ||

 6

प्रपंच–घडामोडी न सरे कल्पकोडी | वासनेची बेडी पडली पायीं

सोडवण करा आलेंनो संसारा | शरण जा उदारा विठोबासी ||

 लटकी मायादेवी गर्भवासी गोंवी | नश्‍वर भोगवी नाना योनि

नामा म्हणे तुम्हीं विचारावें मनीं | सोयरा निर्वाणीं पांडुरंग ||

 7

अवघे सावधान होऊनि विचारा | सोडवण करा संसाराची

अवघा काळ वाचे म्हणा नारायण | वायां एक क्षण जाऊंनद्या ||

 अवघे मायामोहे गुंतलेती पाहा | अवघे सहज आहां ब्रह्मरूप

नामा म्हणे अवघे सुखाचे चि व्हाल | जरी मन ठेवाल विठ्ठलपायीं ||

 

 यापुढील काही लेखांत आपण संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहणार आहोत.

 

 

 माधव भोपे 

 

मनाच्या तळाशी.. To the bottom of Mind

powers-of-the-mind

Random thoughts…

These are some random thoughts.. not necessarily arranged in an orderly manner-i.e. a purpose- a beginning..the content.. and a summary… 

Some of these thoughts are based on some books I read, some speeches I heard, and some of them just ‘occurred’ to me…  It’s a mixed bag… 

May be, in future, these musings will take a more orderly shape… till that time..  read on….

 

 

कधी कधी आपल्याला एखादे उच्च ध्येय गाठायचे असते.. पण त्यासाठी लागणारा दृढ निश्चय, स्पष्टता आणि निर्भयता नसते.. आपल्याकडे हे गुण नसल्यामुळे, जीवनात वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो.

आपल्या मनात असंख्य प्रकारच्या भीती आणि काळज्या असतात. “असे झाले तर?..” “तसे झाले तर?..” आणि पूर्ण आयुष्यभर आपण या अनामिक भीतींच्या ओझ्याखाली दबून सगळी कामें एखाद्या गुलामासारखी करीत राहतो. कुठल्याच कामाचा मनापासून आनंद घेऊ शकत नाही.

 

त्या भीती तशाच राहतात, कारण आपण कधीच त्या खऱ्या आहेत का, त्यांची किती शक्यता आहे, इत्यादि गोष्टींची छाननी करीत नाहीत. आपण त्यांना भिडतच नाही. आणि आपण या गोष्टी कधीच.. कधीच.. कुणा बरोबरही शेअर करत नाहीत.. अगदी आपल्या ‘जवळच्या’ माणसांसोबत, जवळच्या नात्यात.. अगदी आपले आई वडील, भाऊ बहीण.. शिक्षक, जवळचा मित्र.. कुणाही बरोबर शेअर करत नाहीत. अर्थात त्या शेअर न करण्यामागे तसेच काही कारण असू शकते, किंवा आपला त्या व्यक्तिबद्दलचा अविश्वास.. आपली खिल्ली उडवली जाण्याची, आपण मूर्ख ठरवले जाण्याची भीती, आपली कमजोर स्थानें उघडी पडण्याची भीती… आपल्या बद्दल गैरसमज होण्याची भीती..

ही कारणें ही तितकीच काल्पनिक असू शकतात, जितकी की आपली भीती.. आपला अहंकार आपल्याला या गोष्टींची चर्चा करू देत नाही, आणि त्या एखाद्या बाहेरून झाकलेल्या जखमेसाख्या, आतल्या आत चिघळत जातात..

 

अशा प्रकारच्या भीती सर्वांनाच असतात.. पण केंव्हा ना केंव्हा यांचे परीक्षण केले गेलेच पाहिजे.. त्यांचा सामना केला गेलाच पाहिजे. तरच आपण मरेपर्यंत निर्भय होऊन जगू शकू. निर्भय होऊन जगणे हेच खरे जगणे आहे. हे शक्य आहे का? तर शक्य आहे. हे तेंव्हा शक्य आहे, जेंव्हा आपण  ‘बाह्य’ जगतात वागण्याचे ‘नियम’ किंवा ‘पद्धत’ समजून घेऊ आणि आपल्या ‘आत’ काय चालले आहे ते समजून घेऊ शकू.

एक गोष्ट समजून घेण्याची आहे, की एखादी घटना ‘बाह्य’ जगात घडण्याआधी आपल्या ‘आतल्या’ जगात फार पूर्वी घडलेली असते..

 

आपल्या मनाला क्षणाक्षणाला बदलणाऱ्या बाह्य जगतासोबत चिकटून राहण्याची एवढी सवय झालेली असते, की आपल्या आत.. अगदी आत असलेले स्वतःचे ‘निखळ अस्तित्व’.. त्याला जाणवतच नाही.. आपले ‘निखळ अस्तित्व’, जे की सगळ्या दुःख, चिंता, काळज्या यांच्या पलिकडे आहे.. कालातीत आहे.. शुद्ध आनंद स्वरूप आहे.. पण ते जाणवण्यासाठी आधी मनाचा गढूळपणा कमी होणे गरजेचे असते..

 

मनाचा गढूळपणा कमी होण्यासाठी मात्र नित्य सराव, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांची गरज आहे..

हा विषय निघाला, की “काय करावे, आम्हाला योग्य मार्गदर्शनच नाही मिळत. आजकालच्या जगात ‘खरे गुरु’ मिळणेच अवघड झाले आहे..” इत्यादि गोष्टी लगेच ऐकायला मिळतात. पण वरील तीन गोष्टींपैकी पहिल्या दोन आधी व्हाव्या लागतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

 

 

 

माधव भोपे