https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत नामदेवांचे अभंग-10 Sant Namdev Abhang-10

sant namdev

Sant Namdev Abhang-10

संत नामदेवांचे अभंग-10

रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा एक साधक त्यांच्याकडे आला आणि खूप दिवस झाले, मी साधना करीत आहे पण अजून मला ईश्वर प्राप्ती होत नाही असे सांगू लागला. रामकृष्ण त्याला जवळच्या नदीत घेऊन गेले. त्यांनी त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. तो साधक श्वास घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागला. मोठ्या प्रयत्नाने त्याने रामकृष्णांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि बाहेर येऊन म्हणू लागला, “हे काय? माझा जीव घेणार होतात की काय आज? मी तुमच्याकडे ईश्वर प्राप्ती करून घ्यायसाठी आलो आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघलात! रामकृष्ण म्हणाले, “मी जेंव्हा तुला पाण्याखाली दाबून धरले होते, तेंव्हा तुला सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची वाटली?”

“कशाची म्हणून काय विचारता? श्वास घेण्यासाठी माझा जीव तडफडत होता! मला सगळ्यात जास्त आवश्यकता तेंव्हा श्वास घेण्याची वाटत होती!”

तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “इतकी तीव्रतेने जेंव्हा तुला ईश्वरप्राप्तीची आवश्यकता वाटेल, ईश्वरा शिवाय एक क्षण ही राहणे जेंव्हा तुला अशक्य होईल, तेंव्हा, तत्क्षणीच तुला ईश्वर प्राप्ती होईल!”

सर्व संतांची आपल्याला हीच अवस्था दिसते. म्हणूनच त्यांना ईश्वरप्राप्ती झालेली असते. “चुकलिया माये, बाळ हुरूहुरू पाहे”.. “जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी” अशा अभंगांमधून संत तुकाराम महाराज आपली तळमळ व्यक्त करतात.

संत नामदेवही आपली साधक अवस्थेतील तळमळ खालील अभंगांतून व्यक्त करतात-

जननिये जिवलगे ये वो पांडुरंगे । शिणलों भेटी दे गे एक वेळां

त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टी पाहे | येऊनियां राहें हृदयामाजीं

वासनेच्या संगें शिणले माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी

नाहीं तुझी सेवा केली मनोधर्मे  । संसार–संभ्रमें भ्रांत सदा

नाहीं तुझें नाम गाइले आवडी | वाळली कुर्वंडी त्रिविध तापें

नामा म्हणे आई धांवें लवलाहीं । बुडतों चिंताडोहीं काढीं मज

साधकाला जेंव्हा आपले अपराध कळून येतात, अनेक प्रयत्नांनीही विषय, वासना आटोक्यात येत नाही हे जेंव्हा कळते, तेंव्हा अनन्य भावाने आपल्या जननीचा धावा करणे हेच त्याला सुचते.

तुमची आमची अशी अवस्था असते की आपल्यासारखे चांगले आपणच अशी आपली पक्की धारणा असते. आपले दोष आपल्याला कधीच दिसून येत नाहीत. मग त्यांच्याबद्दल वाईट वाटणे तर दूरच. पण संतांची अवस्था अशी नसते. त्यांना आपण म्हणजे अपराधांची राशी आहो असे वाटत असते-

काय गुणदोष माझे विचारिसी | आहें मी तों राशी अपराधांची

अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत | अखंड दुश्‍चित आचरलों

स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति| पुससी विरक्ति कोठोनियां

तूं चि माझा गुरु तूं चि तारी स्वामी | सकळ–अंतर्यामी गाऊं तुज

नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण | नको करूं शीण पांडुरंगा

देवाच्या नांवाचा महिमा तर कळला आहे, पण मुखी नांव मात्र येत नाही. अमृत साक्षात समोर दिसत असूनही ते घेण्याची इच्छा होत नाही.

पण संतांनी या अभंगांतून, स्वतःच्या मिषाने खरे तर तुमच्या आमच्यासारख्या संसारी जीवांची अवस्था वर्णन केली आहे, असे जाणवते.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam

अमृताहुनी गोड नाम तुझें देवा | मन माझें केशवा कां बा नेघे

सांग पंढरीराया काय करूं यासी | कां रूप ध्यानासी न ये तुझें

कीर्तनीं बैसतां निद्रें नागविले | मन माझें गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनाम–कीर्ति | न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे

___________________________________

बालकामध्ये कोणती विशेषता असते? कोणतेही संकट आले, की त्याला फक्त आईचा धावा करणे, आईच्या कुशीत लपणे, हेच माहिती असते.

अग्नीमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु

तैसा धांवें माझिया काजा | अंकिला मी दास तुझा

वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरिणी

नामा म्हणे मेघा जैसा | विनवितो चातक तैसा

तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजीं प्रेम पान्हा पांडुरंगे

तूं माझी गाउली मी तुझें वासरूं | नको पान्हा चोरूं पांडुरंगे

तूं माझी हरिणी मी तुझें पाडस | तोडी भव–पाश पांडुरंगे

तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज | चारा घालीं मज पांडुरंगे

नामा म्हणे होसी भक्‍तीचा वल्लभ | मागें पुढें उभा सांभाळिसी

वरील अभंगात ‘माऊली-तान्हा’, ‘गाऊली-वासरू’, ‘हरिणी-पाडस’, ‘पक्षिणी-अंडज’ अशा कितीतरी उपमा देऊन नामदेव महाराज आपले आणि पांडुरंगाचे बालक आणि मातेचे नाते वर्णन करतात.  

 ___________________________________

तसेच खालील अभंगातील शब्दरचना किती गोड आहे- ‘भुकाळु, कृपाळु, सांभाळु’ अशा शब्दांनी त्यातील कोमल भाव नेमका व्यक्त होतो.

येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारीं भवव्यथे पांडुरंगे

मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु । करी माझा सांभाळु पांडुरंगे

मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्त तूं अन्न | मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगे

मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगे

मी धन–लोभी शुद्ध तूं पूर्ण कनक–कुंभ | मी मगर तूं अंभ पांडुरंगे

मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तू बोध । मी शुष्क नदी तूं ओघ पांडुरंगे

मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक | मी प्रजा तूं पाळक पांडुरंगे

मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी । मी अपत्य तूं जननी पांडुरंगे

मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय | मी आडळ तूं साह्य पांडुरंगे

शीघ्र येई वो श्रीरंगे भक्‍तमानस–रंगे | प्रेम–पान्हा दे गे नामदेवा

_____________________________________

 खालील गीत तर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण बऱ्याचदा ऐकतो.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Pakshini_Prabhati_Chariyasi

पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये | पिलू वाट पाहे उपवासी

तैसें माझें मन करी वो तुझी आस | चरण रात्रंदिवस चिंतीतसे

तान्हें वत्स घरीं बांधलेसें देवा । तया हृदयीं धांवा माउलीचा

नामा म्हणे केशवा तूं माझा सोइरा | झणीं मज अव्हेरा अनाथनाथा

 

_____________________________________

जे काही मागायचे ते केशवा जवळच मागायचे- आणि मागायचे ते काय- विषय भोग नाही, तर त्याचीच अनन्य भक्ति- खालील अभंगसुद्धा ‘मंगला नाथ’ यांच्या आवाजात आपण भक्ति गीतांच्या कार्यक्रमात बऱ्याचदा ऐकतो.

click here to listen the song

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | न करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | न करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

साधनेच्या उत्तरावस्थे मध्ये साधकाची देवाशी एवढी जवळीक होते, की मग तो म्हणतो, “आम्ही भक्तांनीच तुझा महिमा वाढविला आहे- नाही तर तुला कोण विचारतो!”

देवा आम्हीं तुज दिलें थोरपण | मानीं हें वचन सत्य माझें

पतित अमंगळ तुज झालों साह्य | विचारून पाहें खरेंखोटें

रोग व्याधि पीडा जनांसी नसतां | कोण पाचारितां वैद्यालागीं

कल्पनेचें भूत झडपी या संसारीं | माने पंचाक्षरी पाचारितां

 _____________________________

आम्हीं शरणागतीं केलासी सरता | येऱ्हवीं अनंता कोण जाणे

वेदशास्त्रपुराणीं उबगोनि सांडिलासी | तो आम्हीं धरिलासी हृदयकमळीं

चतुरां शिरोमणि अहो केशिराजा | अंगीकार तुझा केला आम्हीं

सहस्र नामीं झालासी संपन्न । तरी हें हि भूषण आमुचें चि

येऱ्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा । पाहें मेघश्‍यामा विचारोनि

होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी । लक्ष्मी तेथें करी चरणसेवा

ते हि तंव जाण आमुची जननी । तूं तियेवांचोनि शोभसी कैसा

तुज नाहीं नाम रूप जाति कुळ | अनादिचें मूळ म्हणती तूज

आम्ही भक्‍त तरी तूं भक्‍तवत्सल | ऐसा प्रगट बोठ जगामाजीं

ऐसे आमुचेनि भोगिसी थोरीव | आमुचा जीवभाव तुझे ठायीं

नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता | तरी या बोला उचिता प्रेम देई

 मी तुझा दास म्हणवतो आणि तरी जर माझ्यात प्रेमभाव नसेल तर त्यात तुलाच कमीपणा आहे असे देवाला बजावायला संत कमी करीत नाहीत!

तुझा विष्णुदास म्हणताती जगीं | नाहीं माझे अंगीं प्रेमभावो

तेणें थोर लाज वाटे पंढरीराया | ये माझ्या हृदया एक वेळां

द्वैताद्वैतभाव आहे माझे ठायीं | अनुभव नाहीं स्वरूपाचा

नामा म्हणे माझा उजळ करीं माथा | भेटी देउनी संतां निरवीं मज

आणि मग नामदेव महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात-

घे रे घे रे नाम्या दिलें माझें प्रेम | घोकी माझें नाम सर्वकाळ

शिरावरी हात ठेवीतसे माझ्या | अभिमान तुझा गेला म्हणुनी

भक्तिसुख देवें दिले नामयातें | नामा परमामृतें तृप्त झाला

नामा म्हणे देवा झालों मी पावन | माझें तुजविण कोण आहे

 आणि मग समर्थाच्या दासाला साक्षात काळाचीही भीती नाही-

आम्ही विठोबाचे दूत | यमा आणूं शरणागत

मुखीं नाम हातीं टाळी । महापाप करूं होळी

एवढा प्रताप नामाचा | रीघ नव्हे कळिकाळाचा

ऐसा नामा यशवंत | विठोबाचा शरणागत

आणि मग देहाची आठवण सुद्धा राहत नाही- फक्त मुखात केशवाचे मंगल नाम राहावे हीच इच्छा राहते.

देह जावो अथवा राहो- येथे ऐका

 देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो

चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा

वदनीं तुझें मंगळ नाम | हृदयीं अखंडित प्रेम

नामा म्हणे केशिराजा | केला नेम चालवी माझा

_____________________________________

साधनेच्या उच्च अवस्थेत, उन्मनी अवस्थेत आपल्या आराध्य दैवताचे चिंतन करता करता द्वैत मावळते- योग्यांना ध्यानाच्या अवस्थेत येणारा अनुभव- तो अनाहत ध्वनि- भक्तांना भक्तीच्या उच्च अवस्थेत अनायासेच अनुभवायला येतो. हे केवळ कवित्व नाही- हा साक्षात अनुभव शब्दरूपांनी प्रकटला आहे.

देहमंदिराभीतरीं । शेजे सूतले श्रीहरि

निद्रा–उन्मनीचे भरीं । तें म्यां स्वप्न देखिले

ध्यानीं पहुडला सांवळा | जवळीं नारी बारा सोळा

विंजणें वारिती सकळा | सोहं–शब्द जागरणीं

धिं धिं तुरे वाजती | अनुहात–ध्वनि गर्जती

तेथें निद्रा ना सुषुप्ति | चंद्र सूर्य मावळले

मना पवना नाहीं भेद । तया ठायीं हा गोविंद

तेथें खुंटला अनुवाद | वेद–श्रुति आटल्या

म्हणे विष्णुदास नामा | जन्ममरण नाहीं आम्हां

कृपा केली मेघश्यामा | संतसंगें तारिलों

 खालील अभंगही अद्वैताच्या उच्च अनुभवाचे वर्णन करणारा आहे- “आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे”, “पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे| प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |”

चेईला म्हणजे ‘जागा झाला, भानावर आला’

चेइला तो जाण रे सद्गुरुवचनीं निर्धारे

विपरीत मानवा विसर पडला कंठीं जया परिहार रे |

आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे

चंद्रसूर्य जेणें प्रकाशे तो मी कैसा पाहूं रे |

अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे

चेइला तेणें ओळखिला येरांसी अगम्य भाई रे |

पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे

प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |

काष्ठी पावक उपजला तो हि तया सम रे

नामा म्हणे केशिराजा चेइल्या आम्हां तुम्ही रे |

संत नामदेव यांच्या विपुल अभंग भांडारातील काही मोजके अभंग आपण या १० भागांत पाहिले. संत मंडळी ही आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असतात. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रभूमी मध्ये जन्म मिळाला हे खरोखर आपले भाग्य आहे.

यापुढे महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम यांच्या अभंगांबद्दल लिहिण्याचा विचार आहे.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-9 Sant Namdev Abhang-9

sant namdev

Sant Namdev Abhang-9

संत नामदेवांचे अभंग-9

 

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 8 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, भक्तिरस इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

विठू माऊली हे सर्व भक्तांचे विश्रांतिस्थान आहे, तर पंढरी नगरी ही विठोबाच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी, म्हणून सर्व संतांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्या संतांनी पंढरीचा महिमा अनेक प्रकारे वर्णन केला आहे.

पंढरीचा महिमा वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात-

अवघी हे पंढरी सुखाची मांदुस | माझा स्वप्रकाश रत्न हरि

धन्य संतजन तेथींचे पारखी | ज्यां झाली ओळखी विठ्ठलनामीं

अनुभवूनि चित्तीं पाहिलें विवेकें | धरिले पुंडलीकें हृदयकमळीं

त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण | करूनि भूषण भोगितसे

युगें गेलीं परी पालट चि नाहीं| नित्य शुद्ध पाहीं तेज:पुंज

पाहतां नित्यनवें ध्यातां चित्त निवे | म्हणोनि नामा जीवें विसंबेना

 

मांदुस म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे संदूक किंवा पेटी. पंढरी हे सुखाचे मांदुस आहे, कारण तिथे स्वयं प्रकाश रत्न ‘हरि’ आहे.

____________________________________

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें | भावें अनुसरले विठ्ठलपायीं

काया वाचा मनें रंगले चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग

नामाचेनि बळें उडविलीं साधनें । तोडिली बंधनें संसाराची

मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं | हिंडे वाळवंटीं दीनरूप

योगियांचे घरीं रिघे काकुळती । अव्हेरिले संतीं म्हणोनियां

ऐसे भक्तराज देवा वंद्य झाले | तें एक राज्य केलें पुंडलीकें

हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी | कीर्ति चराचरी वर्णितसे

 पंढरीच्या सुखाचे वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात- पंढरीचे सुख ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी मुक्तिपद म्हणजे काहीच नाही. पंढरीचे सुख मिळालेले भक्त मुक्तिपद फुकटही घेत नाहीत. ते मुक्तिपद बिचारे पंढरीच्या वाळवंटात, संतांनी अव्हेरले म्हणून दीनवाणे फिरते आणि मग योगीजनांकडे जाते!

____________________________________

अवघी हे पंढरी सुखाची वोवरी | अवघा घरोघरीं ब्रह्मानंद

अवघा हा विठ्ठल सुखाचा चि आहे | अनुसरे तो लाहे सर्व सुख

पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं | अवघा ध्यावा ध्यानीं अवघ्या मनें

अवघिये आवडी अवघा गावा गीतीं | अवघा सर्वांभूती तो चि आहे

अवघा हा जाणावा अवघा हा मानावा । अवघा वाखाणावा अवघी वाचा

अवघा वोळखोनि अवघा गिळिजे मनें । अवघा हा चि होणें म्हणे नामा

____________________________________

नामदेव महाराज म्हणतात, पंढरीस जाऊन जीवन्मुक्त व्हावे- आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण करावे आणि विठ्ठलाचे प्रेमसुख घ्यावे.

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावें । विठ्ठला भेटावे जिवलगा

काया वाचा मन चरणीं ठेवावें | प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ

सुखाचें साजिरे श्रीमुख पहावें । जीवें उतरावें निंबलोण

बाहेरी भीतरी कैवल्य आघवें । वाचे न बोलवे ब्रह्मानंदु

चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण | करी तुझें ध्यान रात्रंदिवस

 

___________________________________

आणि पंढरीच्या पांडुरंगाची नामदेव महाराजांनी रचलेली खालील आरती ही तर जगप्रसिद्ध आहे आणि घरोघरी आणि सगळ्या मंदिरांत विठ्ठलाची म्हटली जाणारी सगळ्यात लोकप्रिय आरती आहे.

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा

तुळसीमाळा गळां कर ठेवून कटीं | कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती | चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती

दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णू मी किती

आषाढी कार्तिकी भक्‍त जन येती | चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती

दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती

____________________________________

मागील एका अभंगात “वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना” असे म्हणून नामदेव महराजांनी “नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना” असे सांगून, वेगवेगळ्या ज्ञानशाखा, किंवा व्यवसाय या वैष्णव होण्याला उपयोगी नाहीत, पण केशवाचे नाम घेतले तर मात्र केशवरूप होशील असे सांगितले आहे, त्याच धर्तीवर, वेगवेगळ्या पंचमहाभूतांचे ध्यान केले तर तद्रूप होशील पण केशवास ध्यायले तर केशवरूप होशील असे आपल्या मनाला बजावले आहे.

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वी चि होसी | परी केशव न होसी अरे मना

आप ध्यासी तरी आप चि होसी | परी केशव न होसी अरे मना

तेज ध्यासी तरी तेज चि होसी | परी केशव न होसी अरे मना

वायु ध्यासी तरी वायु चि होसी | परी केशव न होसी अरे मना

आकाश ध्यासी तरी आकाश चि होसी | परी केशव न होसी अरे मना

नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी | तरी चि केशव होसी अरे मना

____________________________________

संसारात असतांना केशवाचे ध्यान कसे करायचे असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर दोन उदाहरणें देऊन नामदेव महाराजांनी खाली सांगितले आहे-

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परी लक्ष तेथें

वावडी म्हणजे पतंग. पतंग आकाशात दूर उडतो, कुठे कुठे जातो, पण त्याचा दोर उडवणाऱ्याच्या हाती असतो. त्यामुळे अशी कल्पना केली आहे की  पतंगाचे लक्ष तो कितीही उंच गेला तरी आपल्याला धरणाऱ्या हाताकडे असते. तसे आपले लक्ष आपण संसारात कुठल्याही भलत्या कामात असले तरी लक्ष मात्र आपले आपण ज्याचे अंश आहोत, त्या देवाकडे असले पाहिजे.

वरील अर्थ हा मला ज्याप्रमाणे लावता आला तसा इथे सांगितला आहे. जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें भलतियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

वरील पतंगाच्या उपमेलाच अजून स्पष्ट करणारा हा अभंग अगदी नितांतसुंदर आहे. जुन्या काळातील लोकांना हे चित्र सहज डोळ्यांसमोर येऊ शकेल. पूर्वीच्या काळी नदीवरून किंवा पाणवठ्यावरून लांबून पाणी आणावे लागायचे. तेंव्हा ते आणणाऱ्या स्त्रीचे कसब बघण्यासारखे असायाचे. एकावर एक अनेक हंडे घेऊन ती पाणी आणायला जायची. येतांना ते पाण्याचे सगळे हंडे एकावर एक ठेवून, दोन्ही हात मोकळे ठेवून, आपल्या सख्यांबरोबर ती गुजरी (खेड्यातील स्त्री) मस्त गप्पा मारीत येत असते. एकीकडे रस्त्यावरचे खड्डेही चुकवीत असते. पण तिचे मुख्य लक्ष हे आपल्या डोक्यांवरील हंड्यांकडे असते. आणि त्यांचा तोल सांभाळीत ती चालते आणि भांड्यातील पाणी अजिबात सांडू देत नाही. किंवा दुसरी उपमा एखादा धनलोभी असतो, तो बाहेरून त्याची सर्व कामें करीत असला तरी त्याचे लक्ष किती धन येते आहे याकडे असते.  तसेच संसारात, आपली रोजची कर्तव्यें तर चोख बजावायची पण चित्त मात्र श्रीहरीकडे ठेवायचे हे कसब सवयीने जमते.  

_____________________________________

खालील अभंग हा आमच्या शालेय शिक्षणात कुठल्या तरी वर्षाला मराठी विषयात होता असे आठवते. हृदयात श्री हरि असेल तर संसाराची अग्निबाधा होणार नाही, अशा अर्थाचा हा अभंग आहे.

अग्नि जाळी तरी न जळती पांडव | हृदयी माधव म्हणोनियां

अग्नि जाळी तरी न जळती गोपाळ | हृदयी देवकीबाळ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी न जळे हनुमंत | हृदयीं सीताकांत म्हणोनियां

अग्नि जाळी तरी न जळे पैं सीता | हृदयी रघुनाथ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद  | हृदयी गोविंद म्हणोनियां

नामा म्हणे स्वामी स्मरावें गोविंदा | चुके अग्निबाधा संसाराची

पुढील भागात आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधकाची होणारी तळमळ व्यक्त करणारे नामदेवांचे अभंग आहेत, ते पाहणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-8 Sant Namdev Abhang-8

sant namdev

Sant Namdev Abhang-8

संत नामदेवांचे अभंग-8

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 7 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

या काळात, म्हणजे गेल्या ८-९  शतकांत भारताच्या विविध भागात होऊन गेलेल्या संतांपैकी प्रायः सगळे संत हे आपआपल्या इष्ट देवाच्या सगुणरूपाच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले दिसतात. संत नामदेव सुद्धा विठ्ठलाच्या भक्तिरसात आकंठ बुडालेले होते. आपली कनवाळू माऊली, सावळी विठाई हिचे वर्णन करतांना त्यांच्या वाणीला विशेष बहर येतो. सगुण भक्तीचे वर्णन करणारे काही अभंग हे खरोखर अनुभवायचे आहेत.

विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटावया उभारी दोन्ही बाह्या

गुण–दोष त्यांचे न पाहे चि डोळां । भेटे वेळोवेळां केशिराज

ऐसा दयावंत घेत समाचार | लहान आणि थोर सांभाळितो

सर्वांलागी देतो समान दर्शन | उभा तो आपण सम पायीं

नामा म्हणे तया संतांची आवडी । भेटावया कडाडीं उभा चि असे

दीनांचा कैवारी असा पंढरीनाथ हा दोन्ही हात उभारून भक्तांना कडकडून भेटायला उत्सुक असा उभा आहे.


वेदासी कानडा श्रुतीसी कानडा | विठ्ठल उघडा पंढरिये

नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडियाचें

नामा म्हणे तुझें अवघें चि बरवें । त्याहुनी बरवें प्रेम तुझें

 

भक्तवत्सल असा पंढरीनाथ, वेदांना आणि श्रुतीला अगम्य (कानडा) आहे, पण पंढरीमध्ये मात्र तो उघडा आहे. कोणालाही प्राप्य आहे. त्याचे नांव ही अत्यंत गोड आहे, आणि रूप तर त्याहूनही गोड आहे. देवाचे नाम आणि रूप तर गोड आहेच, पण त्याहूनही त्याचे प्रेम हे अत्यंत उत्कट आहे. (या प्रेमाची गोडी मात्र संतच जाणतात).

कृष्णाला विविध रूपांमध्ये पाहणारी खालील रचना ही ‘पाळणा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

मुक्‍ताफळ–नथ नाकीं | चरणीं ल्याली वाळे वांकी

पीतांबरें अंग झांकी | कृष्णम्मा माझी

खांद्यावरी कांबळी | पायघोळ लांबली

पांघरली धाबळी | कृष्णम्मा माझी

गाईपाठीं लागली | पळतां नाहीं भागली

माय बहीण चांगली | कृष्णम्मा माझी

देहुडा पाउलीं । उभी माझी माउली

विश्रांतीची साउली | कृष्णम्मा माझी

उभी नीट वीटेवरी । शोभे भींवरेचे तीरी

नामयाची कैवारी | कृष्णम्मा माझी

खालील ‘गवळण’ ही सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण पूर्वी कित्येकदा ऐकली  असेल.  या रचनेचा अर्थ प्रथमदर्शनी समजण्यास अवघड असला, तरी ही  रेडिओवर लागल्यानंतर मन एका वेगळ्याच विश्वात जायचे हे मात्र खरे.

रात्र काळी घागर काळी | यमुनाजळें हीं काळीं वो माय

बुंथ काळी बिलवर काळी | गळां मोतीं एकावळी काळी वो माय

मी काळी कांचोळी काळी | कांस कांसली ते काळी वो माय

एकली पाण्याला नव जाय साजणी ।सवें पाठवा मूर्ति सांवळी गो माय

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी | कृष्णमूर्ति बहु काळी वो माय

ही गवळण येथे ऐकू शकता  

आठवणीतली गाणी या मराठी गीतांचे छान संकलन असलेल्या वेबसाइट वर हे उपलब्ध आहे.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Ratra_Kali_Ghagar_Kali

 ही गवळण दत्ताराम गाडेकर यांनी संगीतबद्ध केली आहे. गायक गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर हे आहेत. पण यातील स्त्री गायिका कोण हे समजले नाही.

‘बुंथ’ या शब्दाचा अर्थ आहे आवरण किंवा ओढणी, डोक्यावरून सर्व शरीरावर आच्छादनार्थ घेतलेले वस्त्र. बिलवर म्हणजे बांगडी, एकावळी किंवा एकसर म्हणजे एकेरी मोत्यांची किंवा मण्यांची माळ. काचोळी म्हणजे चोळी. या शब्दाचा अर्थ पूर्वीच्या काळातील लोकांना माहित आहे.

काजळकाळ्या रात्री, काळी घागर घेऊन, काळ्याकभिन्न यमुनेचे काळेशार पाणी (रात्रीच्या अंधारात ते पाणीही काळेशार दिसते. आणि तशीही यमुना ही ‘काळी’ म्हणूनच प्रसिद्ध आहे.!) आणायला एक गोपी साजशृंगार करून कृष्णाच्या विचारात त्याला भेटायला निघालीय. काळ्या रंगाचे बिलवर, काळी ओढणी, काळ्या मोत्यांचा एकसर, काळी चोळी तसंच साडी पण काळी. पण एकटीनं अपरात्री जायची भीती वाटते. पण सावळी कृष्णमूर्ती सोबत असल्यावर मग मात्र कशाचे भय उरत नाही अशा अर्थाची ही रचना आहे. थोडक्यात, कृष्णाच्या काळ्या रंगात रंगून निघाल्यानंतर, म्हणजेच द्वैत संपून अद्वैतात स्थिति झाल्यानंतर कशाचे भय उरत नाही असा या गवळणीचा अर्थ असावा असे मला वाटते.

काही इतिहासकारांच्या मते ‘विष्णुदास नामा’ हे एक वेगळे संतकवि सोळाव्या शतकात पंढरपुरात होऊन गेले, त्यांची ही रचना आहे. रचना कोणाची का असेना, पण अत्यंत गूढ अर्थ असलेली अशी ही  रचना आहे.

 खालील एका अभंगात योगी, ज्ञानी यांच्याही पेक्षा भक्तांचे परब्रह्म कसे प्रिय आहे त्याचे खूप छान वर्णन केले आहे.

योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार | आमुचें साकार विटेवरी

दाटुगें नागर कटीं ठेवूनि कर | सर्वस्वें उदार भक्‍तांलागीं

ज्ञानिया सिद्धांतीं लक्षा परी न ये। आमुची वाट पाहे अनाथांची

जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय । आमुचें भकितप्रिय सांसारिका

नामा म्हणे जीवें करीन ओंवाळणी | झणीं चक्रपाणि दिठावसी

सत्य नित्य युक्‍त शुद्ध बुद्ध मुक्‍त | कारणरहित निरंजन

तें आम्हीं देखिले चर्मचक्षु-दृष्टी | उभा वाळवंटी पंढरीये

वेदां अगोचर तया सहस्रमुखा | तें झालें पुंडलीका लोभापर

परतलिया श्रुति म्हणती नेति नेति । आम्हां गातां गीतीं सांपडलें

स्वरूपाचा निर्धार बोलती पुराणें । शिणलीं दर्शनें विवादती

नामा म्हणे यासी भाव चि कारण | पावावया चरण केशवाचे

ब्रह्म अविनाश आनंदघन । त्याहुनी चरण गोड तुझे

ते जीवें न सोडी अगा पंढरीनाथा । जाणसी तत्त्वतां हृदय माझें

परात्पर वस्तु जे कां अपरंपार | तियेचा साक्षात्कार पाय तुझे

सच्विदानंदघन जेथें हारपठें मन । त्याहुनी चरण गोड तुझे

नामा म्हणे तुझीं पाउठें सुकुमार | तें माझें माहेर विटेवरी

माझिया रे मनें मज उपदेश केला | तो मज बिंबला हृदयकमळीं

निर्वाणींची एक सांगितली खूण | कैवल्य चरण केशवाचे

वेदशास्त्रे स्मृति आणिक पुराणें | पढोनि जाणणें हें चि सत्य

तप अनुष्ठान करोनि साधन | प्रत्यक्ष विधान चरण हे चि

नामा म्हणे मज कळलें अनुभवें । न विसंबें जीवें चरण तुझे

पंढरीचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा

सारथि सर्वांचा साक्षिभूत असे | संकटीं सायासे गजेंद्रासी

गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी । भिल्ठीणीचे करीं फळें भक्षी

भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी । नामा म्हणे हरि गोड मानी

पाला खाऊनियां धाला बहिणी–घरीं | भक्‍तालागीं हरि वेडा झाला

सुदाम्याचे पोहे कोरडे चि खाय । मटमटा पाहे चहूंकडे

विदुराच्या कण्या खाय धणीवरी । झाला बळीचे द्वारीं द्वारपाळ

नामा म्हणे हरीचे न कळती पवाडे | नेणों भक्‍तांपुढें वेडा झाला

वरील सर्व अभंग हे भक्तीच्या अत्यंत उन्नत अवस्थेत नामदेवांना झालेल्या अनुभवाचे बोल आहेत एवढे नक्की. आपल्यासारख्यांना हे अभंग वाचून, त्या भक्तिसुखाचा किंचित आभास जरी झाला, तरी धन्य म्हणावे अशी स्थिती आहे.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-7 Sant Namdev Abhang-7

sant namdev

Sant Namdev Abhang-7

संत नामदेवांचे अभंग-7

यापूर्वीच्या सहाव्या भागात संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांतून सांगितलेली संताची महति आपण पाहिली.

संत हे सर्वसामान्य जनांसाठी, अवघड विषय अत्यंत सोपा करून सांगत असतात. जशी माऊली आपल्या लेकरांना जेवू घालतांना त्यांच्या तोंडात मावतील असेच छोटे छोटे, चिमणे घास करून भरवते, आणि जे काही दूध भाकरी किंवा भात वगैरे असेल, ते अगदी बारीक कुस्करून त्या मुलाला सुपाच्य करून देते, तद्वतच संत हे सर्वसामान्य जनांना वेदांतातील अवघड ज्ञान, सोपे करून सांगत असतात.

खालील अभंग हा ‘खेळिया’ म्हणून ओळखला जातो. त्याच्यात उपनिषदांतील ‘एकोहं बहुस्यामि’ असे परब्रह्माच्या ठिकाणी झालेले स्फुरण, आणि त्यासाठी ‘अरुप’ असलेले ते, नांव रूपाला आले, आणि कसा खेळ करू लागले, याचे मनोरंजक वर्णन आहे. ‘स्वतःच स्वतःला व्यायले’ ही कल्पना किती सार्थ आहे!

आणि ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते बारा वर्ष लपाले रे.. यातून शुकदेवांची गोष्ट सांगितली आहे. शुकदेव हे पोपटाच्या स्वरूपात भगवान शिवांच्या कोपापासून वाचण्यासाठी त्रिभुवनात फिरत शेवटी महर्षि व्यासांच्या आश्रमात आले आणि त्यांच्या पत्नीच्या मुखात प्रवेश करून लपून बसले. महर्षि व्यासांनी त्यांना शिवाच्या कोपापासून वाचविले, आणि शुकदेव व्यासांच्या पत्नीच्या गर्भात शिरले. बाहेरच्या जगात मायेचा संपर्क येईल म्हणून ते १२ वर्ष बाहेरच आले नाही. शेवटी महर्षि व्यासांच्या सांगण्यावरून ते बारा वर्षांनी भीत भीत बाहेर आले, तेंव्हा त्यांची अवस्था बारा वर्षाची बालकाची होती. जन्मल्याबरोबर ते नग्न अवस्थेतच, जंगलाच्या दिशेने पळाले, अशी कथा आहे.

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण- चार मुखें असलेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे नारद यांच्याबद्दलही विनोदाने ‘ कुचाळी करुनी पोरे भांडवी आपण राहे वेगळा रे’ असे वर्णन केले आहे! अशाच मिस्किल शैलीत हनुमानाचे आणि श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे. आणि शेवटी हा सर्व एक खेळ आहे हे सत्य सांगितले आहे.

नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें । जीव–शिव नांव पावलें रे

आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें | जाणूनि खेळ खेळें रे

ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले | ते बारा वर्षे लपालें रे

कांपत कांपत बाहेरी आलें | तें नागवें चि पळुनी गेलें रे

चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याहि जाण | तो खेळियांमाजीं आगळा रे

कुचाली करूने पोरें भांडवी | आपण राहे वेगळा रे

खेळ खेळे परी डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहणा रे

खेळियांमाजीं हनुम्या शाहणा | न पडे काम–व्यसनीं रे

काम चि नाहीं तेथें क्रोध चि कैंचा | तेथें कैचे भांडण रे

रामा गड्याची आवडी मोठी | म्हणूनि लंके पेणें रे

यादवांचा पोर एक गोप्या भला | तो बहुत चि खेळ खेळला रे

लहान थोर अवघीं मारिलीं | खेळ चि मोडूनि गेला रे

ऐसे खेळिये कोट्यानुकोटी | गणित नाहीं त्यासी रे

विष्णुदास नामा म्हणे वडील हो | पहा देहीं शोधूनि रे

खालील अभंगात, अद्वैत अनुभव आल्यानंतर सुख दुःखाची कोण पर्वा करते, सापाने त्वचा (कात) टाकली आणि बिळात गेला की मग बाहेर राहिलेल्या त्या निर्जीव त्वचेला कोण सांभाळते, अशी अनेक उदाहरणें देऊन, अद्वैत अनुभव सोपा करून सांगितला आहे.

सुखदुःखें दोन्ही आम्हांसी सारिखीं | प्रतीति पारखी मना आली

अंतर्बाह्य एक ब्रह्म चि कोंदलें | दुजेपण गेलें निपटूनि

त्वचा टाकूनियां सर्प गेला बिळीं | मग ते सांभाळी कोण सांगा

ओघ सांडूनिया गंगा सिंधू ठाये | विसरली धाये खळाळाची

नामा म्हणे रात्र जैसी कां पाहिठी | धारणा ते झाली तैसें आम्हां

ब्रम्हानंदाची प्राप्ती झाल्यानंतर इतर गोष्टींची कोण पर्वा करते- याची अजून काही उदाहरणे देतात

निद्रिस्ताचे सेजे साप कां उर्वशी । पाहों विषयासी तैसे आम्ही

ऐसी कृपा केली माझ्या केशिराजें । प्रतीतीचें भोजें एकसरा

शेण आणि सोनें भासतें समान | रत्न का पाषाण एकरूप

पाया लागो स्वर्ग वरी पडों वाघ | आत्मस्थिती–भंग कदा नोहे

नामा म्हणे कोणी निंदा अथवा वंदा । झालों ब्रह्मानंदाकार आम्ही

संत मंडळींचे उपकार मानतांना, आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा असे म्हणून पुढील अभंगात संतांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरीच्या दासा

कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं | ही संतमंडळी सुखी असो

अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकांसी

नामा म्हणे तयां असावें कल्याण | ज्यां मुखीं निधान पांडुरंग

नंतर महाभारतातील एक कथा सांगून, ब्रह्मनिष्ठ वैराग्यशील पुरुषाचे महत्त्व सांगतात.

पत्रावळी काढी वैकुंठनायक | धांवूनियां शुक आला तेथें

दाटी पाहुनी द्वारीं मानसीं विचारी | जावया भीतरी काय काज

वाहे हा प्रसाद स्वहस्तें अनंत | वेंचोनियां शीत घाली मुखीं

घंटानाद वाजे लक्ष–द्विज–पंकिति | अक्षयीं वाजती वेळोवेळां

ऐकोनि विस्मित ऋषिसमुदाव । पुसे धर्मराव देवाजीसी

सांगतसे खूण वैकुंठनायक | ब्रह्मनिष्ठ एक आला येथें

तेथूनि उठले धर्म नारायण | बाहेरी येऊन पाहताती

शुकाचिये मिषें व्यासाचा नंदन | सांगतसे खूण जगदीश

धरूनियां करीं नेला तो भीतरीं | नामा म्हणे करी पूजा त्याची

खालील एका अभंगात ज्ञानेश्वरीबद्दल सुप्रसिद्ध ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हा चरण आला आहे. ज्ञानदेव हे नामदेवांचे समकालीन होते. पण त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच संजीवन समाधी घेतली. त्यांचे वर्णन करतांना ‘ज्ञानराज माझी योग्यांची माऊली’ असे म्हणून, ज्ञानेश्वरीचे महत्त्व वर्णन करतांना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी असे सांगतात. आणि हे अगदी खरेच आहे. ज्ञानेश्वरी हा युगानुयुगांत एखादाच होणारा असा ग्रंथ आहे. आणि तो नुसताच ‘वाचण्याचा’ नाही, तर ‘अनुभवण्याचा’ आहे, हे ज्ञानेश्वरीचे जाणकार चांगलेच जाणतात.

त्यापुढे जाऊन, नामदेव महाराज आपल्या गुरूंचे-विसोबा खेचरांचे ऋण व्यक्त करतांना म्हणतात- डोळियाचा डोळा उघडला ज्याने- अशा सद्गुरूंचे पाय मी विसंबणार नाही.

ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणें निगमवल्ली प्रगट केली

अध्यात्म–विद्येचें दाविलेसे रूप | चैतन्याचा दीप उजळिला

छप्पन्नभाषेचा केलासे गौरव | भवार्णवीं नाव उभारली

श्रवणाचे मिषें बैसावें येऊनि | साम्राज्य–भुवनीं सुखी नांदे

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी

सद्गुरूसारिखा सोइरा जिवलग | तोडिला उद्वेग संसारींचा

काय उतराई होऊं कवण्या गुणें । जन्मा नाहीं येणें ऐसें केलें

माझें सुख मज दाखविले डोळां | दिधली प्रेमकळा नाममुद्रा

डोळियाचा डोळा उघडिला जेणें । लेवविले लेणें आनंदाचे

नामा म्हणे निकी सांपडली सोय | न विसंबे पाय खेचराचे

 

पुढील भागात संत नामदेवांचे आणखी काही अभंग पाहूयात.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-6 Sant Namdev Abhang-6

sant namdev

Sant Namdev Abhang-6

संत नामदेवांचे अभंग-6

तेराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेले थोर संत नामदेव यांच्या अभंगांविषयी आपण चर्चा करीत आहोत. यापूर्वीच्या चौथ्या आणि पाचव्या भागात भगवंताच्या नामाचे महत्त्व आणि नामाचे सामर्थ्य याबाबत नामदेवांचे अभंग आपण पाहिले.

नामाची गोडी लागायला, सत् संगत- आणि संतांची संगत पाहिजे. संतांचा महिमा सांगणारी काही भजने आपण पाहूयात.

संतपायीं माया धरितां सद्भावें । तेणें भेटे देव आपोआप

म्हणूनि संतां अखंड भजावें | तेणें भेटे देव आपोआप

साधूपाशीं देव कामधंदा करी | पीतांबर धरी वरी छाया

नामा म्हणे देव इच्छी संतसंग | आम्हां जिवलग जन्मोजन्मी

ज्ञानेविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत | वेद बोले हात उभारोनि

तरी तें चि ज्ञान जाणायालागूनि | संतां वोळगोनि वश्य कीजे

प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला | पाहिजे साक्षिला सद्गुरु तो

नामा म्हणे सेवा घडावी संतांची | व्हावी कृपा त्यांची तें चि ज्ञान

संतांची महति सांगतांना नामदेव महाराज म्हणतात- ‘साधूपाशी देव कामधंदा करी’- आणि अनेक संतांच्या गोष्टींमधून आपल्याला हे दिसते- देव जनाबाईला जात्यावर धान्य दळू लागले, काम करू लागले, संत कबीराचे शेले विणू लागले, चोखोबासोबत गुरे ओढू लागले अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. संतांनी आपला भार पूर्ण देवावर घातलेला असतो. त्यामुळे मग त्यांची पूर्ण जबाबदारी तो घेतो.  

परिसाचेनि संगें लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे

कीटकी ध्यातां भृंग झाली तो चि वर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे

अग्नीस मिळें तें न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगे

नामा म्हणे केशवा मज देई संतसंग । आणिक कांहीं तुज न मागें बापा

 

जसे परिसाचे स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण होते, तसेच सामान्य जनांना संतांच्या संगतीने नारायणाची भेट होते, म्हणून नामदेव महाराज म्हणतात हे देवा- मला फक्त संत संगत दे- आणखी काहीही नको.

कडू वृंदावन साखरें घोळिलें | तरी काय गेलें कडूपण

तैसा तो अधम करी तीर्थाटण | नोहे त्याचें मन निर्मळत्व

बचनाग–रवा दुग्धी शिजविला | तरी काय गेला त्याचा गुण

नामा म्हणे संतसज्जन–संगती | ऐशास हि गति काळांतरीं

kadu vrundavan

कडू वृंदावन नांवाचे फळ असते, जे आयुर्वेदात काही रोगांसाठी औषधीच्या रूपात वापरतात. ते खूप कडू असते. साखरेत घोळले तरी त्याचे कडूपण जात नाही. अधम माणसाने तीर्थाटन केले तरी त्याचे मन निर्मळ होत नाही. बचनाग- हेही एक प्रकारचे विष आहे-ते दुधात शिजविले तरी त्याचा विषारी गुण काही जात नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, इतके कडू, किंवा अधम असले तरी, अशा लोकांचीही बुद्धि संतांच्या संगतीने पालटू शकते, आणि कालांतराने त्यांनाही योग्य गती मिळू शकते.

धिग धिग तो ग्राम धिग धिग तो आश्रम | संतसमागम नाहीं जेथें

धिग धिग ते संपत्ति धिग धिग ते संतति | भजन सर्वांभूती नाहीं जेथें

धिग तो आचार धिग तो विचार । वाचें सर्वेश्‍वर नाहीं जेथें

धिग तें गाणें धिग तें पढणें | विठ्ठठनाम–नाणें नाहीं जेथें

नामा म्हणे धिग धिग त्यांचें जिणें | एका नारायणेंवांचूनियां

नामदेव महाराज म्हणतात, तो गांव, तो आश्रम काय कामाचा जिथे संत समागम नाही. त्याचा धिक्कार असो. अशी संपत्ति आणि अशी संतती यांचा पण धिक्कार असो.

मंत्र तंत्र दीक्षा सांगतील लक्ष | परी राम प्रत्यक्ष न करी कोणी

प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय । आणिकांची काय चाड मज

सर्वकर्मी राम भेटविती मातें । जीवेंभावें त्यांतें ओवाळीन

नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला | सोयरा भेटला अंतरींचा

 

संतांचें लक्षण- संत कसा ओळखावा याबद्दलही नामदेव महाराज सांगतात

संतांचें लक्षण ओळखावया खूण । दिसती उदासीन देहभावा

सतत अंतरीं प्रेमाचा जिह्याळा | वाचे वसे चाळा रामकृष्ण

तुझ्या ध्यानीं ज्यांचें सदा भरलें मन | विश्‍व तूं चि म्हणून भजती भावें

ऐसे नित्यानंदें बोधें जें निवाठे | ते जीवावेगळे न करीं नाम्या

 

आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या आवाजात अगदी समर्थपणे गायलेला आपण ऐकतो-

वैष्णवाघरीं सर्वकाळ | सदा झणझणती टाळ

कण्याभाकरीचें खाणें । गांठी रामनाम–नाणें

बैसावयासी कांबळा | द्वारीं तुळसी रंगमाळा

नामा म्हणे नेणती कांहीं । चित्त अखंड विठ्ठलपायीं

 

अजून संतांचे लक्षण सांगतांना नामदेव महाराज सांगतात- सगळ्या गोष्टीत सम राहतो- तो खरा संत –

जैसा वृक्ष नेणें मान–अपमान | तैसे ते सज्जन वर्तताती

येऊनियां पूजा प्राणी जे करिती | त्याचें सुख चित्तीं तया नाहीं

अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती | तया न म्हणती छेदूं नका

निंदास्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे

नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी | जीवा शिवा गांठी पडुनी जाय

 

आणि मग भक्तांनी सुद्धा हेच गुण अंगी बाणवावेत- लोकांच्या निंदेने व्यथित होऊ नये-

निंदील हे जन सुखे निंदूं द्यावें । सज्जनीं स्वभावें क्षोभूं नये

निदास्तुति ज्यासी समान पैं झाली | त्याची स्थिति आली समाधीसी

शत्रु मित्र ज्यासी सम समानत्वें । तो चि पैं देवातें आवडला

माती आणि सोनें भासे ज्या समान | तो एक निधान योगिराज

नामा म्हणे ऐसे भक्‍त जे असती | तेणें पावन होती ठोक तिन्ही

 

 

संत नामदेवांचे अभंग खूप आहेत. त्यातील काही निवडक अभंग आपण पाहत आहोत. आचार्य विनोबा भावे यांनी हे निवडक अभंग अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले होते, त्या आधारावर आपण ही लेखमाला सुरू केली आहे. यापुढील भागात अजून काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे 

Makar Sanranti-2025

sankrant-8

यावर्षीच्या संक्रांतीसंबंधात माहिती-

यावर्षी सूर्य मंगळवार दि. १४ जानेवारीला सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करीत आहे. म्हणून संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी १६.५५ पर्यन्त आहे.मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते?हिंदू आणि इतर भारतीय धर्मांमधील सण हे हिंदू कॅलेंडर किंवा पंचांगानुसार साजरे केले जातात. आणि पंचांगातील तिथी या चंद्राच्या भ्रमणानुसार शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमा अन पुन्हा कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्या अशा मोजल्या जातात. आणि आपले मुख्य सण- जसे की पोळा-( श्रावण अमावस्या), रक्षाबंधन (श्रावण पौर्णिमा), गणेश चतुर्थी- (भाद्रपद शुक्ल चतुर्थी), देवी घटस्थापना ( आश्विन शुक्ल प्रतिपदा), दसरा (आश्विन शुक्ल दशमी), दिवाळी (आश्विन महिन्याची अमावस्या) इत्यादि सर्व सण हे चांद्र कालगणनेनुसार किंवा चांद्र महिन्यानुसार (Lunar calendar) ठरतात, जेंव्हा की आपण रोजच्या व्यवहारात वापरीत असलेले जानेवारी फेब्रुवारी हे कॅलेंडर ज्याला की ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात, ते सूर्यावर आधारित आहे (Solar calendar). ग्रेगोरियन कॅलेंडर हे इ. स. १५८२ मध्ये पोप ग्रेगोरी 11 यांनी जूलियन कॅलेंडर च्या ऐवजी सुरू केले जे सौर कॅलेंडर आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तुम्ही हिंदू पंचांग काढून पहा. पंचांगात सूर्याचा राशी बदल हा  इंग्रजी महिन्याप्रमाणे  दर महिन्याच्या साधारण 14 किंवा 15 तारखेच्या आसपास होतो असे दिसून येईल. म्हणजे सूर्य एका राशीत साधारण 30 दिवस राहतो. अर्थात, सूर्याच्या प्रवेशाचा किंवा बाहेर पडण्याचा अर्थ असा नाही की सूर्य फिरत आहे, तो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, याला परिभ्रमण म्हणतात आणि पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा वेळ लागतो.मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीपासून मकर राशीत संक्रमण करण्याचा दिवस. तसे सूर्याचे संक्रमण दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत होतच असते- म्हणजे तसे पाहिले तर दर महिन्यातच संक्रांत असते!. पण जेंव्हा सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ते झाले- मकर संक्रमण.  हे संक्रमण अनेक कारणांमुळे महत्त्वाचे मानले गेले, आणि त्यामुळे हे मकर संक्रांती म्हणून साजरे केले जाऊ लागले.  मकर म्हणजे कॉन्स्टेलशन ऑफ कॅप्रिकॉर्न (constellation of Capricorn). खगोलशास्त्रातील मकर राशी आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील मकर राशीमध्ये थोडा फरक आहे. संक्रांती म्हणजे संक्रमण, या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे, हिंदू धर्मातील सुरुवातील उल्लेख केलेले इतर सण चंद्र कॅलेंडर वर आधारित असल्यामुळे, सूर्यावर आधारित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये त्यांच्या तारखा बदलत राहतात, पण मकर संक्रांत ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असल्याने, ती ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ठराविक तारखेला येते.  पण ग्रेगोरियन कॅलेंडर मध्येही ती लीप वर्षाला 15 तारखेला येते.पण काही शे वर्षांपूर्वी ती 14 तारखेलाच येत होती का? तर नाही.सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिटे व दहा सेंकद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.उत्तरायण म्हणजे काय? ४०० वर्षांपूर्वी संक्रांत ९ जानेवारीला येत होती! भौगोलिक संदर्भदरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे (स्वतःच्या आसाभोवती तिरक्या अंशाने फिरणे) (Axial precession) सूर्याच्या मकरसंक्रमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखाइंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०
  • इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
  • इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
  • इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
  • इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
  • सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
    • १३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
    • १५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
    • १४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
  • १६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)
  • १७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)
  • १८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)
  • १९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)
  • २० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)
  • २१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)
  • २२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)
  • २३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)
असो. वरील तांत्रिक बाबी काहीही असल्या, तरी, आपल्या येथील सर्व सण हे निसर्गचक्राच्या कुठल्या ना कुठल्या महत्वाच्या घटनेसोबत जोडलेले असतात, हे नक्की.भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे या भारतातील सर्व सण हे कृषि संस्कृतीशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण आहे. या दिवसांमध्ये शेतातील खरीपाचे धान्य घरी आलेले असते, आणि रबीच्या पेरणीची बहुतेक सर्व महत्वाची कामें उरकलेली असतात आणि शेतकऱ्याला थोडी सवड मिळालेली असते. निसर्ग यावेळी अत्यंत अनुकूल असतो, शेतात धान्य बहरात डोलत असते. तसेच निसर्गात उत्तरायणाची सुरुवात ही आनंददायक, प्रकाशाने आणि उत्साहाने भरलेली अशी असते. आणि अशा वेळी होणारा आनंद साजरा करण्यासाठी निमित्त म्हणून हा सण साजरा केला जातो. म्हणून शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात .rमहाराष्ट्रातील संक्रांती बद्दल-महाराष्ट्रात संक्रांत हा सण ३ दिवस साजरा केला जातो. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. भोगीच्या आणि संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करतात. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करतात. सकाळी मुगाची खिचडीही करण्याची पद्धत आहे. यादिवशी सगळ्या भाज्यांची मिळून लेकुरवाळी भाजीही करतात. त्यात वाल, वांगे, गाजर, ओले हरभरे, ताजा वाटाणा, अजून जेवढ्या प्रकारच्या शेंगा उपलब्ध असतील त्याप्रमाणे त्या शेंगा, या सर्वांची तिळाचा कूट लावून भाजी करतात. वरील प्रमाणे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि अशी मिश्र भाजी ही या थंडीच्या ऋतुला अनुकूल उष्ण, स्निग्ध आणि पौष्टिक असते.सासरी गेलल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगीच्या  दुपारी जेवणाचा बेतही खास असतो. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार बेत असतो. संक्रांतीच्या दिवशी तीळगूळ घातलेली पोळी करतात. काही जण पुरणाची पोळी पण करतात. 
  • किंक्रांत
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलेआहारदृष्ट्या महत्त्वसंक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. हा दिवस, काही कारणांमुळे  दूर गेलेले नातेसंबंध, नातेसंबंधात निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठीही आहे. पुराणातील कथेनुसार भगवान सूर्यदेव या दिवशी आपला पुत्र शनि यास भेटतात. शनि हा मकर राशीचा स्वामी मानला गेला आहे.  सूर्य आणि शनि या पिता पुत्रांचे आपआपसात जमत नाही अशी आख्यायिका आहे. पण या दिवशी, सूर्यदेव शनीला भेटतात आणि परस्पर संबंध नीट करतात.अन्य माहितीमहाभारतात  भीष्म पितामह हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. उत्तरायणात प्राण त्याग केलेले योगी, उत्तम गतीला जातात, त्यांना पुनर्जन्माच्या चक्रात अडकावे लागत नाही, असे सांगितले आहे. (गीतेतील आठवा अध्याय पहावा).मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो). यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडयात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगूळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. त्याला वस्तू ‘लुटणे’ असे म्हणतात. त्यानिमित्ताने देण्याची सवय लागते, आणि महिलांच्या एकमेकींच्या सामूहिकरीत्या भेटीही होतात. महिलांचा हा सण अत्यंत आवडीचा असतो. नवीन लग्न झालेल्या मुळी  या दिवशी हौसेने काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते, हे कदाचित त्यामागचे कारण असावे.मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे..महाराष्ट्रात आपण तीळ गूळ घ्या, गोड बोला, असे म्हणून एकमेकांना तीळ आणि गूळ देऊन मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतो. या दिवशी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्यांना त्यांच्याविषयीचा आदर म्हणून पाया पडून त्यांचे आशिर्वाद घ्यायचे असतात आणि मोठ्यांनी लहानांना तीळ आणि गूळ देऊन त्यांचे तोंड गोड करायचे असते आणि त्यांना आशिर्वाद द्यायचा असतो. तसेच बरोबरीच्या लोकांनी एकमेकांना तीळगूळ देऊन शुभेच्छा द्यायच्या असतात. आपण सर्व ही एकमेकांना शुभेच्छा देऊन हा मंगल सण साजरा करूयात- तीळगूळ घ्या- गोड गोड बोला!