Sant Namdev Abhang-9
संत नामदेवांचे अभंग-9
तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 8 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, भक्तिरस इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.
विठू माऊली हे सर्व भक्तांचे विश्रांतिस्थान आहे, तर पंढरी नगरी ही विठोबाच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी, म्हणून सर्व संतांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्या संतांनी पंढरीचा महिमा अनेक प्रकारे वर्णन केला आहे.
पंढरीचा महिमा वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात-
अवघी हे पंढरी सुखाची मांदुस | माझा स्वप्रकाश रत्न हरि
धन्य संतजन तेथींचे पारखी | ज्यां झाली ओळखी विठ्ठलनामीं
अनुभवूनि चित्तीं पाहिलें विवेकें | धरिले पुंडलीकें हृदयकमळीं
त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण | करूनि भूषण भोगितसे
युगें गेलीं परी पालट चि नाहीं| नित्य शुद्ध पाहीं तेज:पुंज
पाहतां नित्यनवें ध्यातां चित्त निवे | म्हणोनि नामा जीवें विसंबेना
मांदुस म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे संदूक किंवा पेटी. पंढरी हे सुखाचे मांदुस आहे, कारण तिथे स्वयं प्रकाश रत्न ‘हरि’ आहे.
____________________________________
पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें | भावें अनुसरले विठ्ठलपायीं
काया वाचा मनें रंगले चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग
नामाचेनि बळें उडविलीं साधनें । तोडिली बंधनें संसाराची
मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं | हिंडे वाळवंटीं दीनरूप
योगियांचे घरीं रिघे काकुळती । अव्हेरिले संतीं म्हणोनियां
ऐसे भक्तराज देवा वंद्य झाले | तें एक राज्य केलें पुंडलीकें
हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी | कीर्ति चराचरी वर्णितसे
पंढरीच्या सुखाचे वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात- पंढरीचे सुख ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी मुक्तिपद म्हणजे काहीच नाही. पंढरीचे सुख मिळालेले भक्त मुक्तिपद फुकटही घेत नाहीत. ते मुक्तिपद बिचारे पंढरीच्या वाळवंटात, संतांनी अव्हेरले म्हणून दीनवाणे फिरते आणि मग योगीजनांकडे जाते!
____________________________________
अवघी हे पंढरी सुखाची वोवरी | अवघा घरोघरीं ब्रह्मानंद
अवघा हा विठ्ठल सुखाचा चि आहे | अनुसरे तो लाहे सर्व सुख
पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं | अवघा ध्यावा ध्यानीं अवघ्या मनें
अवघिये आवडी अवघा गावा गीतीं | अवघा सर्वांभूती तो चि आहे
अवघा हा जाणावा अवघा हा मानावा । अवघा वाखाणावा अवघी वाचा
अवघा वोळखोनि अवघा गिळिजे मनें । अवघा हा चि होणें म्हणे नामा
____________________________________
नामदेव महाराज म्हणतात, पंढरीस जाऊन जीवन्मुक्त व्हावे- आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण करावे आणि विठ्ठलाचे प्रेमसुख घ्यावे.
पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावें । विठ्ठला भेटावे जिवलगा
काया वाचा मन चरणीं ठेवावें | प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ
सुखाचें साजिरे श्रीमुख पहावें । जीवें उतरावें निंबलोण
बाहेरी भीतरी कैवल्य आघवें । वाचे न बोलवे ब्रह्मानंदु
चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण | करी तुझें ध्यान रात्रंदिवस
___________________________________
आणि पंढरीच्या पांडुरंगाची नामदेव महाराजांनी रचलेली खालील आरती ही तर जगप्रसिद्ध आहे आणि घरोघरी आणि सगळ्या मंदिरांत विठ्ठलाची म्हटली जाणारी सगळ्यात लोकप्रिय आरती आहे.
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा
तुळसीमाळा गळां कर ठेवून कटीं | कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती | चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णू मी किती
आषाढी कार्तिकी भक्त जन येती | चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती
____________________________________
मागील एका अभंगात “वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना” असे म्हणून नामदेव महराजांनी “नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना” असे सांगून, वेगवेगळ्या ज्ञानशाखा, किंवा व्यवसाय या वैष्णव होण्याला उपयोगी नाहीत, पण केशवाचे नाम घेतले तर मात्र केशवरूप होशील असे सांगितले आहे, त्याच धर्तीवर, वेगवेगळ्या पंचमहाभूतांचे ध्यान केले तर तद्रूप होशील पण केशवास ध्यायले तर केशवरूप होशील असे आपल्या मनाला बजावले आहे.
पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वी चि होसी | परी केशव न होसी अरे मना
आप ध्यासी तरी आप चि होसी | परी केशव न होसी अरे मना
तेज ध्यासी तरी तेज चि होसी | परी केशव न होसी अरे मना
वायु ध्यासी तरी वायु चि होसी | परी केशव न होसी अरे मना
आकाश ध्यासी तरी आकाश चि होसी | परी केशव न होसी अरे मना
नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी | तरी चि केशव होसी अरे मना
____________________________________
संसारात असतांना केशवाचे ध्यान कसे करायचे असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर दोन उदाहरणें देऊन नामदेव महाराजांनी खाली सांगितले आहे-
वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परी लक्ष तेथें
वावडी म्हणजे पतंग. पतंग आकाशात दूर उडतो, कुठे कुठे जातो, पण त्याचा दोर उडवणाऱ्याच्या हाती असतो. त्यामुळे अशी कल्पना केली आहे की पतंगाचे लक्ष तो कितीही उंच गेला तरी आपल्याला धरणाऱ्या हाताकडे असते. तसे आपले लक्ष आपण संसारात कुठल्याही भलत्या कामात असले तरी लक्ष मात्र आपले आपण ज्याचे अंश आहोत, त्या देवाकडे असले पाहिजे.
वरील अर्थ हा मला ज्याप्रमाणे लावता आला तसा इथे सांगितला आहे. जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें
धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें
नामा म्हणे असावें भलतियां व्यापारी | लक्ष सर्वेश्वरीं ठेवूनियां
वरील पतंगाच्या उपमेलाच अजून स्पष्ट करणारा हा अभंग अगदी नितांतसुंदर आहे. जुन्या काळातील लोकांना हे चित्र सहज डोळ्यांसमोर येऊ शकेल. पूर्वीच्या काळी नदीवरून किंवा पाणवठ्यावरून लांबून पाणी आणावे लागायचे. तेंव्हा ते आणणाऱ्या स्त्रीचे कसब बघण्यासारखे असायाचे. एकावर एक अनेक हंडे घेऊन ती पाणी आणायला जायची. येतांना ते पाण्याचे सगळे हंडे एकावर एक ठेवून, दोन्ही हात मोकळे ठेवून, आपल्या सख्यांबरोबर ती गुजरी (खेड्यातील स्त्री) मस्त गप्पा मारीत येत असते. एकीकडे रस्त्यावरचे खड्डेही चुकवीत असते. पण तिचे मुख्य लक्ष हे आपल्या डोक्यांवरील हंड्यांकडे असते. आणि त्यांचा तोल सांभाळीत ती चालते आणि भांड्यातील पाणी अजिबात सांडू देत नाही. किंवा दुसरी उपमा एखादा धनलोभी असतो, तो बाहेरून त्याची सर्व कामें करीत असला तरी त्याचे लक्ष किती धन येते आहे याकडे असते. तसेच संसारात, आपली रोजची कर्तव्यें तर चोख बजावायची पण चित्त मात्र श्रीहरीकडे ठेवायचे हे कसब सवयीने जमते.
_____________________________________
खालील अभंग हा आमच्या शालेय शिक्षणात कुठल्या तरी वर्षाला मराठी विषयात होता असे आठवते. हृदयात श्री हरि असेल तर संसाराची अग्निबाधा होणार नाही, अशा अर्थाचा हा अभंग आहे.
अग्नि जाळी तरी न जळती पांडव | हृदयी माधव म्हणोनियां
अग्नि जाळी तरी न जळती गोपाळ | हृदयी देवकीबाळ म्हणोनियां
अग्नि जाळी तरी न जळे हनुमंत | हृदयीं सीताकांत म्हणोनियां
अग्नि जाळी तरी न जळे पैं सीता | हृदयी रघुनाथ म्हणोनियां
अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद | हृदयी गोविंद म्हणोनियां
नामा म्हणे स्वामी स्मरावें गोविंदा | चुके अग्निबाधा संसाराची
पुढील भागात आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधकाची होणारी तळमळ व्यक्त करणारे नामदेवांचे अभंग आहेत, ते पाहणार आहोत.
माधव भोपे
