https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संवादाचा आधार need-for-communication

communication

कमी होत चाललेला परस्पर संवाद: एक चिंताजनक वास्तव

need-for-communication

आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या युगात मानवी संवाद हा हळूहळू हरवत चालला आहे. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत असत, आपल्या भावना व्यक्त करत असत आणि त्यातून त्यांचे मन हलके होत असे. परंतु आजच्या काळात ही परंपरा लोप पावत आहे असे दिसते.  

 पूर्वीचा काळ आणि सहज उपलब्ध संवाद

जुन्या काळात संवाद हा जीवनाचा अविभाज्य भाग होता. मित्र, शेजारी, आप्त आणि नातेवाईक हे सगळे एकमेकांच्या आयुष्यात सक्रिय सहभागी असत. एखाद्याला काही सांगायचे असेल, मन मोकळे करायचे असेल, तर त्याला कोणतीही औपचारिकता बाळगावी लागत नसे. एकमेकांच्या खाजगी जीवनाबद्दलही बोलणे वर्ज्य नव्हते. घरातील सुना पाणवठ्यावर किंवा इतर ठिकाणी एकमेकींना भेटल्यावर, सासूबद्दल, नणंदेबद्दल, दिराबद्दल बोलून मन हलके करू शकट होत्या. तसेच सासवा सुद्धा आपल्या सुनांबद्दल एकमेकींशी बोलून मन हलके करू शकत होत्या. याला कोणी योग्य म्हणो की अयोग्य, कागाळ्या करणे म्हणो की चुगल्या करणे म्हणो, पण यामुळे भावनांचा निचरा होण्याला मदत होत होती हे नक्की. आजकाल प्रत्येकाला आपले कसे चांगले चालले आहे हे दाखविणे गरजेचे वाटते. त्यामुळे मनातल्या खुपणाऱ्या गोष्टी मनातच राहतात. पूर्वी   लोक एकमेकांना वेळ देत असत आणि कोणत्याही क्षणी एकमेकांसाठी  उपलब्ध असत. या संवादातून भावनांचा ओलावा टिकून राहत असे आणि प्रत्येकाला आपण एकटे नाही याची जाणीव होत असे. या संवादामुळे  एक प्रकारची भावनिक आधाराची जाळी निर्माण झाली होती, जी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवत असे.communication

 आजचा काळ: वेळेचा अभाव आणि भावनिक एकाकीपणा

आजच्या काळात मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आधुनिक जीवनशैलीत कोणाकडेही दुसऱ्यासाठी वेळ नाही. प्रत्येकजण आपल्या कामात, स्वतःच्या जगात इतका व्यस्त आहे की, जवळच्या व्यक्तीशीही संवाद साधायला त्याला फुरसत मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की, लोक आपल्या मनातील भावना – मग त्या चिंता असोत, सुख-दु:ख असोत, आनंद असो किंवा राग – कोणाशीच व्यक्त करू शकत नाहीत. या भावनांचा निचरा न झाल्याने त्या मनातच साठत जातात आणि हळूहळू मानसिक तणाव वाढत जातो. आजकाल मानसिक रोग आणि मनोकायिक व्याधींचे प्रमाण वाढत चालले आहे, याचे एक प्रमुख कारण म्हणजे हा हरवत चाललेला संवादच आहे. लोक एकमेकांपासून इतके दूर गेले आहेत की, आपल्या जवळच्या व्यक्तीला काय वाटते हे समजून घेण्याची इच्छाही त्यांच्यात उरलेली नाही. या भावनिक एकाकीपणामुळे अनेकांना नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.depression

 संवादाची कला शिकण्याची गरज

या समस्येवर मात करण्यासाठी लोकांना पुन्हा एकमेकांशी संवाद साधण्याची कला शिकणे आवश्यक आहे. संवाद ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित कला नाही, तर ती एकमेकांना समजून घेण्याची, भावना शेअर करण्याची आणि परस्परांना आधार देण्याची प्रक्रिया आहे. आजच्या पिढीला ही कला अवगत नाही, कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ तंत्रज्ञानात आणि स्वतःपुरता मर्यादित असतो. संवाद साधणे हे केवळ शब्दांचे आदान-प्रदान नाही, तर त्यात भावनांचा समावेश असतो. ही कला शिकण्यासाठी लोकांना एकमेकांसोबत वेळ घालवणे, मन मोकळे करणे आणि परस्परांबद्दल सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवरही संवादाचे महत्त्व शिकवले जावे, जेणेकरून नवीन पिढी या मूलभूत मानवी गरजेकडे दुर्लक्ष करणार नाही.

 आधुनिक उपकरणांचा प्रभावcommunication

आधुनिक उपकरणे जसे की मोबाईल फोन, टीव्ही आणि इंटरनेट यांनी ही समस्या आणखीनच गंभीर बनवली आहे. आजकाल लोक एकमेकांशी बोलण्याऐवजी आपला जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवतात. सोशल मीडियावरून मित्रांशी संपर्कात राहणे सोपे झाले असले, तरी या आभासी संवादात ती खरी भावनिक जवळीक आणि ओलावा नसतो. मोबाईलवर चॅटिंग करताना आपण खऱ्या अर्थाने मन मोकळे करू शकत नाही, कारण समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया, त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्याच्या आवाजातील भावना आपल्याला दिसत नाहीत. टीव्ही आणि इतर मनोरंजनाच्या साधनांनीही लोकांना एकमेकांपासून दूर नेले आहे. घरात सगळे एकत्र बसलेले असले तरी प्रत्येकजण आपापल्या मोबाईल किंवा टीव्हीमध्ये गुंतलेला असतो. यामुळे कुटुंबातील संवादही कमी झाला आहे आणि एकटेपणाची भावना वाढत चालली आहे.

ऐकून घेणे: संवादाचा महत्त्वाचा भागListening

संवादाची कला ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यात ऐकून घेणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. आजकाल कोणालाच दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची सवय उरलेली नाही. प्रत्येकजण फक्त स्वतःचे मत मांडण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त असतो. परंतु खरा संवाद तेव्हाच होतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचे मनापासून ऐकतो, त्याच्या भावना समजून घेतो आणि त्याला प्रतिसाद देतो. ऐकून घेणे ही एक कला आहे, जी शिकणे आणि अंगीकारणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. जर लोकांनी एकमेकांना ऐकायला सुरुवात केली, तर अर्धी समस्या आपोआप सुटेल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन मोकळे करते आणि समोरची व्यक्ती ते लक्ष देऊन ऐकते, तेव्हा त्या व्यक्तीला आपण एकटे नाही असे वाटते आणि त्याचा मानसिक ताण कमी होतो.

आजकाल कमी होत चाललेला परस्पर संवाद ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा संवाद आज दुर्मिळ झाला आहे आणि त्यामुळे लोक भावनिकदृष्ट्या एकटे पडत आहेत. आधुनिक उपकरणांनी ही समस्या आणखीनच वाढवली आहे, परंतु त्यावर मात करणे अशक्य नाही. संवादाची कला शिकणे, एकमेकांना वेळ देणे आणि ऐकून घेण्याची सवय लावणे या गोष्टींमुळे आपण पुन्हा एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. समाज म्हणून आपण जर या दिशेने पावले उचलली, तर मानसिक रोगांचे प्रमाण कमी होईल आणि जीवनात पुन्हा एकदा भावनिक जवळीक निर्माण होईल. संवाद हा मानवाच्या अस्तित्वाचा पाया आहे आणि तो जपणे ही आपली जबाबदारी आहे.

 

माधव भोपे 

संत तुकारामांचे अभंग-7 Sant Tukaram abhang-7

tukaram-3

संत तुकारामांचे अभंग-7 Sant Tukaram abhang-7

या आधी आपण ७ जानेवारी पासून ते २१ जानेवारी पर्यंत संत नामदेवांच्या अभंगांची माहिती १० लेखांमधून घेतली,  त्यानंतर दि. २३ जानेवारी पासून ९ फेब्रुवारी पर्यंत संत तुकारामांच्या अभंगां ची माहिती ६ लेखांमधून घेतली. 

मध्यंतरी काही दिवस या उपक्रमात खंड पडला. माझा दूसरा ब्लॉग goodworld.in यावरही या काळात A glimpse of Vedas या नांवाने काही माहिती लिहिली आहे. त्यातही या काळात खंड पडला. 

पण आता वरील विषयांवरचे लिखाण पुन्हा सुरू करीत आहे. संत तुकारामांच्या अभंगांबद्दल चर्चा करणाऱ्या लेखमालिकेतील हा ७ वा लेख असेल. यात अर्थात, संतांचे अभंग जशास तसे दिले आहेत, पण त्यांच्याविषयी आपल्याला वाटणाऱ्या भावना थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न अगदीच तोकडा आहे, पण कोणत्याही निमित्ताने का होईना, संतांची आणि ईश्वराची आठवण होणे हे महत्त्वाचे. या विषयात रस असणाऱ्या भाविकांना हा प्रयत्न आवडेल असे वाटते. 

Sant Tukaram abhang-7 

संत तुकारामांचे अभंग-7 

संत तुकारामांचे अभंग आपण गेल्या ६ लेखांमधून पाहत आहोत. मागील लेखात काही करुणापर अभंग आणि काही स्फुट अभंग आपण पाहिले. मी यू ट्यूब वर पू. डॉ. सुषमाताई वाटवे यांची प्रवचने ऐकत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली आहे. त्या म्हणतात की भक्तिला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, आनंदरूप आहे.. आणि आपणही ईश्वराचेच स्वरूप आहोत किंवा अंश आहोत. पण नुसते हे ज्ञान होऊन काय कामाचे? आपल्याला याची प्रचिती- प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी, त्या ईश्वराकडेच करुणा भाकावी लागेल.

मनुष्य जसा जसा अध्यात्माकडे वळतो, तसे तसे त्याला आपल्यातले अवगुण प्रकर्षाने जाणवायला लागतात. तो पर्यंत कुठल्याही माणसाला आपल्यात काही अवगुण आहेत याची साधी शंका सुद्धा येत नाही. उलट आपल्यातल्या अवगुणांनाच आपले वैशिष्ट्य आणि आपले गुण समजून आपण तोऱ्यात असतो. पण जेंव्हा मनुष्य अध्यात्माकडे वळतो, तेंव्हा त्याची अवस्था कशी होते, ते खालील अभंगात तुकाराम महाराज वर्णन करतात-

माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर

आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं

आणि जेंव्हा हे अवगुण लक्षात येतात- आणि आपल्याच्याने ते आटोक्यात येत नाहीत, त्यावेळी त्या दयासिंधू कडे करुणा भाकल्यावाचून पर्याय राहत नाही- “आता आड उभा राहे नारायणा.”

तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने मला खूप मदत केली आहे.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।।

अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

 

आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याचे बळ आपल्याकडे असतेच असे नाही. कित्येक वेळा काय बोलावे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलण्यात तितके हुशार किंवा हजरजबाबी नसतो. पण अशा वेळी, बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।। आपण जे काही बरळतो, त्याला तो नीट करून घेतो. आपल्या प्रत्येक हालचालीत, तो आपल्याला अगदी लहान मुलाला जशी त्याची माऊली हाताला धरून चालविते, तसे चालवितो. लहान मूल जसे जेंव्हा त्याला आईचा आधार असतो, तेंव्हा कशालाही घाबरत नाही, त्याप्रमाणे चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।।

आणि जेंव्हा असा आईचा आधार असतो, तेंव्हा कोणी आपले शत्रू वाटतच नाहीत- जसे लहान मुलाला शत्रू- मित्र अशी काही भावना नसते- त्याप्रमाणे देवाचा आधार घेतल्यानंतर- अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे. अवघे जन हे सोयरे- सखे वाटू लागतात.

आणि मग संसारातील अडचणी या अडचणी वाटतच नाहीत- सगळा खेळ वाटू लागतो- तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

हा अभंग खरेच त्या पातळीवर जाऊन अनुभवायचाच विषय आहे- जेंव्हा तो अनुभव येतो- तेंव्हा अंगावर सर्रकन काटा येतो.

जोपर्यंत विठू माऊलीची भेट होत नाही, तोपर्यंत साधकाची अवस्था कशी होते हे खालील अभंगातून वर्णन केले आहे-

पडियेलों वनीं थोर चिंतवनीं । उशीर कां आझूनि लावियेला

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां

काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां

तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे

आपल्या स्वभावातील अवगुण जसे जसे दिसू लागतात तसे तसे संत म्हणतात- “भागलो मी आता माझिया स्वभावे”

भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्‍वासीजे

देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं

अमृताची दृष्टी घाळूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा

घेई उचलूनि पुसें तहानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें

बुझावोनि माझी धरीं हनुवटी । ओवाळुनी दिठी करुनी सांडीं

तुका म्हणे बापा अहो विश्‍वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं

 

खालील एक अभंगही माझ्या खूप आवडीचा आहे. जेंव्हा कोणी तत्त्वज्ञानाचा खूप कीस पाडू लागते, तेंव्हा म्हणावेसे वाटते-

मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें

नेणतें लेकरू आवडीचे तान्हे । बोलतों वचनें आवडीनें

भक्ति नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज

तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव

 

खरंच देवावर सर्व भार घालून राहणे- ही काही छोटी गोष्ट नाही. आयुष्यात क्षणोक्षणी आणि घडी घडीला येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जायचे असेल तर याच्या सारखा दुसरा उपाय नाही. आजकालच्या मॉडर्न सायन्सप्रमाणे सुद्धा relaxed राहणे हा सर्व प्रकारच्या टेन्शन वर उत्तम उपाय आहे.

अशा प्रकारे अनेक करुणापर अभंग तुकाराम महाराजांचे आहेत.

आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी, काही शल्यें असतात, तो मनात राहतात, आणि ती आपण कोणापाशीही शेअर करू शकत नाही. जसे लहान मूल आपल्या आई पाशी सगळ्या गोष्टी शेअर करते, तसे मोठेपणी-

जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा

देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक

घालूं देवासीच भार । देव सुखाचा सागर

राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसीं

तुका म्हणे आम्ही बाळें । या देवाचीं लडिवाळें

वरील अभंग हा उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजात अगदी आर्तपणे गायला आहे. तो अभंग आपण आठवणीतील गाणी या वेबसाइट वर  खालील लिंकवर ऐकू शकतो. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Jau_Devachiya_Gava

तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल लिहितांना कोणताही अभंग सोडावासा वाटत नाही, इतके सर्व अभंग छान आहेत. आपण येत्या काही लेखांमधून आणखी काही अभंगांचा आस्वाद घेणार आहोत.

 आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे

Renuka Ashtak-11 तुला माझा अंबिके ! नमस्कार- रेणुका अष्टक-11

devi image

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

१६ कडव्यांचे दीर्घ अष्टक 

Renuka Ashtak-11 

तुला माझा अंबिके ! नमस्कार

( वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥

सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥

विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥

साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥

सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥

मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥

पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ – भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥

माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥

ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥

तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥

काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥

पहा जातो नरजन्म – रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥

कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥

मीच अथवा तुज ह्रदय – मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस – रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥

कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥

केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥

************************************** 

Renuka Ashtak-10 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी- रेणुका अष्टक-10

devi image

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-10

तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी

( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥


यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥


केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥


वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥


झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥


गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥


जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥


आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥


शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥

************************************** 

Renuka Ashtak-9 ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं- रेणुका अष्टक-9

devi-1

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-9

ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं

 

( दिंड्या )
माझि पतिताची, पापकृती खोटी ।
तुझी पावन करण्याचि शक्ति मोठी ॥
समजवंता मी, काय समजाऊं ।
ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं ॥१॥


जरी गेलिस तूं मायबाइ झोंपी ।
तरी बुडतिल भव – सागरांत पापी ।
ब्रह्मज्ञानीही लागतील वाहूं ॥ ऊठ० २॥


कामक्रोधादिक चोरटे गृहांत ।
शिरुनि पडले ते दुष्ट आग्रहांत ॥
लुटूं म्हणती हणुं, मारुं जीव घेऊं ॥ ऊठ० ३॥


काळसर्प मुख, वासुनी उशाला ।
टपत बसला तो, भीइना कशाला ॥
कितीतरि या निर्वाणिं तुला बाहूं ॥ ऊठ० ४॥


कृपा सोडुनि निजलीस यथासांग ।
उपेक्षीसी मज, काय अतां सांग ।
कृपावंते ! निष्ठूर नको होऊं ॥ ऊठ० ५॥


तुझ्याविण मी कोणासि हात जोडूं ।
आइ म्हणुनी, कोणाचा पदर ओढूं ॥
तुझे पाय सोडूनि कुठें जाऊं ॥ ऊठ० ६॥


जगीं त्राता तुज – वीण कोणि नाहीं ।
माझि कोणी कळवळ जाणिनाही ॥
तूंच जननी तूं, जनक बहिण भाऊ ॥ ऊठ० ७॥


नको सांड करुं, माझिया जिवाची ।
तुला एकविरे ! आण भार्गवाची ॥
नको सहसा जगदंबे अंत पाहूं ॥ ऊठ० ८॥


जरी माझी ना, करिसी तूं उपेक्षा ।
तरी वाढेल तुझें नांव याहिपेक्षां ॥
विष्णुदास म्हणे, गूण तुझे गाऊं ॥ ऊठ० ९॥

************************************** 

Renuka Ashtak-8 नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं- रेणुका अष्टक-8

devi-1

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी ७ अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-8

नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं

( वृत्तः भुजंगप्रयात )
तुझीं आसती कोटि ब्रह्मांड बाळें ।
तसें घेइ पोटीं मलाही दयाळे ॥
नको दुसर्‍या गर्भवासासि धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥१॥

तुझ्या वांचुनी होतसे जीव कष्टी ।
तुला एकदां पाहुं दे माय दृष्टीं ॥
नको प्रीतिचा लाविला कोंभ मोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥२॥

समर्थागृहीं इष्ट शिष्टाधिकारी ।
तया पंगतीं बैसलीया भिकारी ॥
नको अन्नपात्रामधें भिन्न वाढूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥३॥

जपोनी तुझें नांव मोठें प्रतापी ।
बुडाला जगीं कोणता सांग पापी ॥
नको येकट्याला मला खालिं धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥४॥

तुझ्या भेटिची लागली आस मोठी ।
परी दुष्ट येती आडवे शत्रु कोटी ॥
नको भीड त्यांची धरुं माझि तोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥५॥

तुझा पुत्र हा वाटल्या तारणें हो ।
तुझा शत्रु हा वाटल्या मारणें हो ॥
नको तीसरा याविणें खेळ मांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥६॥

पुरे झाली ही नांवनीशी कवीता ।
रसाभास होतो, बहु शीकवीता ॥
मना माउलीला नको व्यर्थ भांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥७॥

अम्ही लेकरांनीं रडावें रुसावें ।
अमा देउनी त्वांचि डोळे पुसावे ॥
नको कायदा हा तुझा तूंचि फाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥८॥

गडे ! येउनी तूं कडे घे मुक्यानें ।
करी शांत आलिंगुनीया मुक्यानें ।
नको विष्णुदासाप्रती तूं विभांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥९॥

**************************************