https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

संत तुकारामांचे अभंग-6 Sant Tukaram abhang-6

tukaram-5

Sant Tukaram abhang-6 

संत तुकारामांचे अभंग-6

थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत ५ लेखांमधून आपण ढोबळपणे विविध विषयांनुसार तुकाराम महाराजांचे अभंग पाहिले. तुकाराम महाराजांचे अभंग इतके आहेत, आणि इतके हृदयस्पर्शी आहेत की कोणता अभंग घ्यावा आणि कोणता सोडावा हे ठरवणे फार अवघड आहे.

आज त्यांचे अजून काही करुणापरक अभंग आपण पाहूत.

खालील अभंगांत तुकाराम महाराजांनी तुमची आमची स्थितीच अगदी यथार्थ वर्णन केली आहे असे वाटते. आपल्याला जप तप ही साधनें जमत नाहीत, ‘न सांडवे अन्न-‘ उपास तापास पण करवत नाहीत, वनात जाता येत नाही, काही पाठांतर करावे म्हटले तर तेही होत नाही. कसलीच योग्यता नाही- आणि आयुष्य तर थोडे आहे. काय करावे? हे आयुष्य म्हणजे एक कोडेच आहे. पंढरी राया-तुझ्यावीण सगळा शीण वाटतो. मला फक्त एकच येते- सगळी लाज सोडून तुला शरण येणे आणि तुझी करुणा भाकणे- असे सगळे भाव खालील काही अभंगांत व्यक्त होतात-

 

जपतपादि साधनें । मज चितवेना मनें

करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें

तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं

 

 

न संडवे अन्न । मज न सेववे वन

म्हणऊनि नारायणा । कींव भाकितों करुणा

नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर

तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंचि कोडें

 

येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया

तुजविण शीण वाटे क्षीण झाली काया

यातिहीन मतिहीन कर्म हीन माझें

सर्व लज्जा सांडोनियां शरण आलों तुज

दीनानाथ दीनबंधु नाम तुज साजे

पतितपावन नाम ऐसी ब्रीदाबळी गाजे

विटेवरी उभा नीट कटावरी कर

तुका म्हणे हेंचि आम्हां ध्यान निरंतर

 

 

_______________________

 

आणि मागणे काय? तर एकच मागणे आहे- माझे प्रपंचातील चित्त ओसरावे आणि तुझ्या पायी लागावे –

 

प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो

ऐसें करीं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा

पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता

लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा

 

 

पतित पतित । परि मी त्रिवाचा पतित

परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता

नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि

अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों

 

 

______________________

 

माझ्या मनात दुर्बुद्धि कधीही न् येवो

 

दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा

आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं

उपजला भावो । तुझे कृपें सिद्धी जावो

तुका म्हणे आतां । लाभ नाहीं यापरता

 

____________________________

 

 

सुरुवातील हरिनाम घेतांना मन त्यामध्ये लागत नाही- पण हरकत नाही- मुखात नाम आले की ते नाम आपले काम बरोबर करेल आणि हळू हळू मनातही उतरेल.

 

नसे तरी मनीं नसो । परी वाचे तरी वसो

देह पडो या चिंतनीं । विठ्ठलनामसंकीर्तनीं

दंभस्फीति भलत्या भावें । मज हरिजन म्हणवावे

तुका म्हणे काळांतरीं । मज सांभाळील हरी

 

________________________

 

सुरुवातीला आपल्या इंद्रियांना बळजबरीने वळण लावावे लागते. पण आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, की एकदा इंद्रियांना वळण पडले- देवाच्या सुखाची गोडी लागली, की मग ती अशी लुब्धावतात  की मग तिथून हलण्याचे नांव घेत नाहीत-

 

आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासूनियां

पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जागृतीं स्वपनीं पांडुरंग

पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा

तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ तें ध्यान विटेवरी

 

_______________________

 

आपल्यापैकी काही जण गुरू नाही म्हणून स्वस्थ बसतात. पण तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचे माझ्यावर असे प्रेम आहे की देव स्वतःच गुरू होतो- माझ्या मागे पुढे उभा राहून सांभाळतो- आणि तुकाराम महाराज म्हणतात- विश्वास नसेल तर पुराणात पाहा- असे कितीतरी पुरावे सापडतील.

 

खालील अभंग मी खुलताबाद येथे असतांना माझ्या रूम वर (तेंव्हा बॅचलर होतो) रात्री पडल्या पडल्या, कुठल्या तरी देवळात, रात्री भजनी मंडळातील गायक तल्लीन होऊन गात असतांना कानावर आला आणि तो तसाच हृदयावर कोरला गेला. पूर्वी आपल्याकडे दर गुरुवारी, एकादशीला, किंवा पर्वाला कोणाच्या तरी घरी किंवा मंदिरात लोक एकत्र जमून टाळ मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भजने म्हणत, रामकृष्ण हरि कीर्तन करत. मला आठवते, मी मॅट्रिकला असतांना माझे वडीलही भजनी मंडळात जाऊन या भजनात सामील होत. मी कधी कधी त्यांच्या सोबत जात असे. आता अशी भजनें दुर्मिळ झाली आहेत.

 

 

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु

पढियें देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें

मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे

योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां

तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी

 

आणि संसार करतांना देवाची आठवण कशी करावी, असा कोणाला प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर ही महाराजांनी देऊन ठेवले आहे-

 

दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी

ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी

 

अशाच अर्थाचा एक अभंग आपण नामदेव महाराजांचाही पाहिला होता.

 

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें भलतियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

 

___________________________

 

खालील एक अभंगही मला खूप आवडतो. अगदी प्रॅक्टिकल आणि matter of fact असा हा अभंग आहे. शेवटी ‘औट’ म्हणजे साडेतीन हात तुझी जागा आहे. कशाला तृष्णा आणि हांव वाढवतोस- एक राम विसरला तर सगळे श्रमच आहेत.

 

एक शेर अन्ना चाड । येर वाउगी बडबड

कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं

औट हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा

तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम

 

_________________

 

खालील एक अभंग फारच गमतीशीर आहे. जेंव्हा दोन स्वार्थी लोक एकमेकांना भेटतात, तेंव्हा ते स्वतःच्या स्वार्था साठी दुसऱ्याला कसे ठकवायचा प्रयत्न करतात याचे फारच विनोदी उदाहरण दिले आहे.

 

वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला

अंतीं मरसी तें न चुके । मजही मारितोसी भुके

येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें झाला

देह तों जाणार । घडेल हा परउपकार

येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि

गांठी पडली ठका ठका । त्याचें वर्म जाणें तुका

 

एकदा एक वाघ कोल्ह्याला उपदेश करतो की तुझे शरीर तू मला सुखाने खाऊ दे कारण शेवटी हा देह पडणारच आहे, अंत हा कोणाला चुकणार नाही, त्यामुळे निदान माझा तरी भुकेने चाललेला जीव वाचव, त्याने तुझ्या पदरी पुण्यच पडेल.

हे ऐकून कोल्हा म्हणतो हे तू बरे केलेस, स्वतःच्या तोंडानेच काय बरोबर आणि काय चूक याचा निवाडा केला. देह सगळ्यांचाच पडतो त्यामुळे मला सोडून देऊन आणि भुकेने जात असेलेले स्वतःचे प्राण त्यागून तूच का हे पुण्य स्वतःच्या पदरी पडून घेत नाहीस? जेव्हा एका ठकाची दुसऱ्या ठकाशी गाठ पडते तेव्हा ते एकमेकांना असेच स्वार्थी सल्ले देतात, त्यामूळे अशा स्वार्थी लोकांच्या स्वार्थी उपदेशांचे वर्म मला आता कळून चुकले आहे.

 

यावरूनच ‘गाठ पडली ठका ठका’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

 

यापुढील लेखात आपण तुकाराम महाराजांचे आणखी काही प्रत्ययकारी अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

 

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-5 Sant Tukaram abhang-5

tukaram-5

Sant Tukaram abhang-5 

संत तुकारामांचे अभंग-5 

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील काही अभंग आपण मागील 4 लेखांमधून पाहत आहोत. मागील काही लेखांत आपण पाहिले की संतांचा रुसवा देवापाशी, प्रेम देवाशी, भांडण देवाशी, जे काही मागायचे, हक्काने, तेही देवापाशीच. कुठल्याही प्रकारे, प्रत्येक क्षण हा देवाशी जोडला गेला पाहिजे. गीतेतील

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥अ.९-२२ ॥

“जे लोक अनन्य भावाने निरंतर माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो” या वचनावर दृढ श्रद्धा संतांची असते. त्यामुळेच ते देवाशी भांडूही शकतात.  

तुकाराम महाराजांचे काही अभंग असे देवाशी भांडण व्यक्त करणारे आहेत.

तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्‍चर्य हें चित्ती वाटतसे

काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा

तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वायांविण श्रम केला

 देवाला इथे तुकाराम महाराज चक्क, ‘झोपला होता काय?’ असे खडसावून विचारीत आहेत! (भक्तांवर, तुझे नांव घेणाऱ्यांवर विपत्ति येतात, त्यावेळी धावून न येता नुसती गंमत पाहतोस). आणि देवा, तुझे नांव घेण्याचा उगाच खटाटोप केला असे म्हणत आहेत!

____________________

तसेंच खालील अभंगात, तुम्ही निर्गुणाची ‘खोळ’ ओढून बसला आहात, मग आम्हालाच का डोळे आणि कान दिले, या डोळ्यांनी आणि कानांनी तुमची अपकीर्ति पाहिली आणि ऐकली जात नाही, असे सांगतात.

तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले

नाइकवे तुझी अपकीर्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे

आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला

तुका म्हणे दु:खी असें हें कळों द्या । पुढलिया धंद्या मन नेघे

________________________

आणि खालील अभंगात तर, हरि तूं  निष्ठुर असेही म्हणतात! आणि पुढे त्या अभंगात, हरिश्चंद्राचे, शिबी राजाचे, बळी राजाचे, उदाहरण देऊन म्हणतात, की या तुझ्या भक्तांचे तू सर्वस्व हरण केलेस. तुला भावाने जे भजतात, त्यांच्या संसाराची तू ही गति करतोस,

हरि तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण

नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें

घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व

पुत्र पत्नी जीव । डोंबा घरीं वोपविलीं

राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दयाळु भूतीं

तुळविलें अंतीं । तुळें मांस तयाचें

बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर

करूनि काहार । तो पाताळीं घातला

तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति

ठाव नाहीं रे पुढती । तुका म्हणे करिसी तें

__________________

आणखी एका अभंगात, देवा तू आंधळ्याची काठी हिरावून घेऊन त्याला कड्यावर लोटून देतोस, आणि साखर म्हणून हातात माती देतोस असेही म्हणतात.

अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी

हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित

चाळवूनि हातीं । साकर म्हणोनि द्यावी माती

तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे

__________________

तसेच खालील अभंग “आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण” इतक्या अटीतटीने देवाशी भांडणारे आहेत.

आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण

झालों पोरटीं निढळें । ठाव नाहीं बुड आळें

आम्हीं जना भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें

तुका म्हणे देश । झाला देवाविण ओस

 

कामधेनूचें वासरू । खाया न मिळे काय करूं

ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें

बेसुनि कल्पद्रुमातळीं । पोटासाठी तळमळी

तुका म्हणे नारायणा । भले लोकीं हें दिसेना

दुष्काळात जेंव्हा खायलाही मिळत नव्हते, तेंव्हाही भांडण विठ्ठलाशीच होते! त्यांनी कोणापुढेही हात पसरला नाही. शिवाजी महाराजांनी दिलेला धनाचा नजराणा, त्यांनी आदरपूर्वक परत पाठविला, ही कथा प्रसिद्धच आहे.

दिवट्या, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।
पुढे ते म्हणतात,
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।

 _____________________

 देवाशी भांडणात एके ठिकाणी तर ते म्हणतात, देवा, आम्ही पतित नसतो, तर तू पतितपावन कसा झाला असतास?

जरी मी पतित नव्हतों देवा । तरि तूं पावन कैंचा तेव्हां

म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी

लोहो महिमान परिसा । नाहीं तरी दगड जैसा

तुका म्हणे याचकभावें । कल्पतरु मान पावे

 देवा, आम्ही मोठ्या नवसाने तुला झालोत, नाहीतर तुझे नांव कोणी घेतले असते, एवढेच काय, तुला पिंडदान तरी कोणी केले असते!?

 नवां नवसांचीं । झालों तुम्हासी वाणीचीं

कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें

कोण होतें मागे पुढें । दुजे बोलाया रोकडें

तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतासि वोसंगा

__________________

संत ज्ञानेश्वर यांना सर्व संत आपली माऊली मानत. तुकाराम महाराजही ज्ञानेश्वरांबद्दल बोलतांना आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त करतात-

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले

करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं

जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची

तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया

 

बोलिली लेंकुरें । वेडी वांकुडीं उत्तरे

करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध

नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला

तुका म्हणे ज्ञानेश्‍वरा । राखा पायांपें किंकरा

____________

आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या आवाजात अजूनच प्रभावीपणे व्यक्त केला आहे-

ज्ञानियांचा राजा हा अभंग येथे ऐकू शकता

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां

मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी

ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणें काय पुढें

तुका म्हणे नेणें युक्‍तीची ते खोली । म्हणोनी ठेविली पायीं डोई

 __________________

 शरीराबद्दल बोलतांना शरीर हे चांगलेही नाही आणि वाईटही नाही. तसे पाहायला गेले तर शरीर हे दुःखाचे कोठार, घाणीचे आगर आहे. पण हेच शरीर हरिभजनासाठी कामाला येते म्हणून हे शरीर चांगले आहे, असे सांगतात.

 शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार

शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ।

शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचे घोसुलें

शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ।

शरीर विटाळाचें आळें । मायामोहपाश जाळें

पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिले ।

शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचाही निध

शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीरा ।

शरीरा सुख नेदावा भोग । न द्यावें दु:ख न करीं त्याग

शरीर वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ।

 ____________

आजकाल, सगळे आयते मिळाले तर बरे, असा विचार असतो. पण हा विचार आजकालचाच नाही, तर त्याकाळीही लोकांना एखाद्या बाबाजीच्या मागे लागावे, आणि त्याने आपल्याला आयते मोक्षपद द्यावे, अशी इच्छा असे. पण तुकाराम महाराज हे अशा लोकांचा मोहभंग अत्यंत निर्भीडपणे करतात. इंद्रियांचा जय साधून, मन एकाग्र करून, निर्विषय करूनच हे साध्य होईल असे बजावतात. आणि स्वप्नातील घावाने काय विव्हळतोस, हे सर्व मिथ्या आहे, असे समजावतात.

 नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं

इंद्रियांचा जय साधूनियां मन । निर्विषय कारण असे तेथें

उपवास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मा शेवटीं असे फळ

आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाणे

स्वप्नींचिया घायें विवळसी वायां । रडे रडतियासवें मिथ्या

तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासी जाय वेगीं

 

आपण आज तुकाराम महाराजांचे आणखी काही स्फुट अभंग पाहिले. पुढील लेखात अजून काही अत्यंत परिणामकारी अभंग पाहणार आहोत.

 

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-4 Sant Tukaram abhang-4

tukaram-3

Sant Tukaram abhang-4 

संत तुकारामांचे अभंग-4 

महाराष्ट्रात 16 व्या आणि 17 व्या शतकात होऊन गेलेले थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत 3 भागांमध्ये आपण तुकाराम महाराजांचे कांही अभंग पाहिले. संत हे स्वभावतः क्षमाशील असतात. तुकाराम महाराजांची आणि मंबाजीची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण संतांचे भांडण देवाशी असते. तसे अभंग बुडविल्यानंतर त्यांनी देवाशी भांडण मांडले होते, आणि नंतर अभंग वर आल्यावर त्यांना, देवाला विनाकारण त्रास दिल्याबद्दल पश्चात्तापही झाला होता. अशाच एका अभंगात, तुकाराम महाराज विठ्ठलाचा मायाळूपणा वर्णन करतांना, आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागतात. या अभंगातील शब्दरचना ही किती गोड आहे-

 

तूं माउलीहून मायाळ । चंद्राहूनि शीतळ

पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।

देऊं कशाची उपमा । दुजी तुज पुरुषोत्तमा

ओंवाळूनि नामा । तुझ्यावरूनि टाकिलों ।

तुवां केलें रे अमृता । गोड त्याही तूं परता

पांचां तत्त्वांचा जनिता । सकळ सत्तानायक ।

कांहीं न बोलोनी आतां । उगाच चरणीं ठेवितों माथा

तुका म्हणे पंढरिनाथा । क्षमा करीं अपराध ।

 

__________________________________

 

अशाच दुसऱ्या एका अभंगात आपल्याला अवगुणी, अन्यायी असे संबोधून ते विठ्ठलाचा धावा करतात. विठ्ठलाला ‘विठ्ठले’ म्हणून माऊलीरूप समजून हाक मारण्याची पद्धतही किती गोड आहे!

 

मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई

आतां मज पायीं । ठाव देई विठ्ठले ।

पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर

राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ।

अनेक बुद्धीचे तरंग । क्षणक्षणां पालटती रंग

धरू जातां संग । तंव तो होतो बाधक ।

तुका म्हणे आतां । अवघी तोडीं माझी चिंता

येऊनि पंढरिनाथा । वास करीं हृदयीं ।

 

_____________________

विठ्ठलाच्या भेटीसाठी काकुळतीला येऊन केलेले अनेक अभंग वाचतांना आणि म्हणतांना तर डोळ्यात पाणी येते.

 

कन्या सासुऱ्यासी  जाये । मागे परतोनि पाहे

तेसें झालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा

चुकलिया माये । बाळ हुरूहुरू पाहे

जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी

 

 

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची

भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलोची

तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा

 

 

वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळां

तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी

कां बा मोकलिलें कोणा निरविलें । कठिण कैसें झालें हृदय तुझें

तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा

 

__________________

 

ते विठ्ठलालाच, तुझे ध्यान कसे करू हे तूच सांग असे काकुळतीला येऊन विचारतात.

 

कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावी मज याचकासी

कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी

कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणू कैसा तुज

कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चिती । कैसी स्थिती मती दावीं मज

तुका म्हणे जेसें दास केलें देवा । तेसें हें अनुभवा आणीं मज

 

_______________

 

आपल्यासारखी संसारी माणसें, देवाला, धन, धान्य, समृद्धि, कीर्ती, आणि काय काय मागतात. पण तुकाराम महाराजांचे मागणे अगदी माफक होते. माझा देह कुठेही असो, आणि कसल्याही अवस्थेत असो, पण चित्त मात्र तुझ्या पायी राहू दे, हेच त्यांचे मागणे होते. आणि देह अवसानी- म्हणजे देह सोडायची वेळ येईल तेंव्हा फक्त कफ-वात-पित्त हे दूर सारून ठेव, जेणे करून की मला तुझे नांव घेता येईल.  

 

आतां केशीराजा हेंचि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असां द्यावें

कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं

तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी

 

 

देवा आतां ऐसा करीं उपकार । देहाचा विसर पाडी मज

तरीच हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें

ठाव देई चित्ता राखें पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित

आस भय चिंता लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा

मागणें तें एक हेंचि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई

तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध

 

______________________

 

तुकाराम महाराज कीर्तन करू लागले, लोक त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊ लागले, आणि तुकाराम महाराजांचे नांवही होऊ लागले. पण ते या कीर्तीने अस्वस्थ होत आणि पुन्हा विठ्ठलाची करुणा भाकून यापासून वाचव म्हणून साकडे घालत.

 

 

नव्हें दास खरा । परि हा झालासे डांगोरा

यासी काय करू आतां । तूं हें सकळ जाणता

नाहीं पुण्य गाठीं । जें हें वेचूं कोणासाठी

तुका म्हणे कां उपाधि । वाढविली कृपानिधि

 

दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यात  न पडे

आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया

मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा

तुका म्हणे देवा । माझे सोडवणें धांवा

 

नावडे जें चित्ता । तेंचि होसी पुरविता

कां रे पुरविलो पाठी । माझी केली जीवें साठीं

न करावा संग । वाटे दुरवावें जग

सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात

जन धन तन । वाटे लेखावें वमन

तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा

 

 

तुकाराम महाराजांचे खूप अभंग खूप प्रसिद्ध आहेत. आपण इथे त्यातील काही कमी प्रसिद्ध असे अभंग पाहत आहोत. या वाटचालीत पुढील भागात आपण अजून काही अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-3 Sant Tukaram abhang-3

tukaram-3

Sant Tukaram abhang-3

संत तुकारामांचे अभंग-3

संत तुकारामांचे अभंग पाहत असतांना आपण मागील लेखात काही स्फुट अभंग पाहिले..

तुकरामांनी त्यांच्या अभंगात ठिकठिकाणी आपल्या जीवनातील काही घटना कुठलाही आडपडदा न ठेवता वर्णन केल्या आहेत. खालील अभंगात त्यांनी आपल्या जन्मापासून ते इंद्रयाणीत वह्या बुडवीपर्यन्तच्या वेगवेगळ्या घटना थोडक्यात वर्णन केल्या आहेत.

तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले होते.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

संत तुकारामांना चार मुले होती. त्यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती पण नवऱ्याला माया लावणारी होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.Sant Tukaram abhang-3

नंतर, प्राकृतात रचना केली म्हणून जेंव्हा त्यांना त्यांचे अभंग इंद्रयाणीत बुडविण्याची आज्ञा झाली, तेंव्हा अभंग इंद्रयाणीत बुडवून ते व्यथित होऊन इंद्रायणीकाठीच तेरा दिवस आकांत मांडून, देवाशी भांडण काढून बसले. नंतर त्यांच्या अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्यानंतर, देवाला आपल्यासाठी विनाकारण त्रास दिल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. तेही त्यांनीं आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहे.

 याती शूद्र वैश्य केला वेवसाव । आधीं तो हा देव कुळपूज्य

नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्‍न तुम्हीं संतीं

संवसारें जालों अतिदुःखें दु:खी । मायबापें सेखीं क्रमिलिया

दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली

लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां

देवाचें देऊळ होतें जें भंगलें । चित्तासी तें आलें करावेंसें

आरंभीं कीर्तन करी एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं

कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्‍वासें आदरें करोनियां

गाती पुढें त्यांचें धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां

संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली

ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि

वचनें मानिलीं नाहीं सुहृदांचीं । समूळ प्रपंची वीट आला

सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां

मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं

यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे

निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखवलें

बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान

विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे

आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे

भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें

तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे

 


 

अभंगांच्या वह्या बुडविल्यानंतरचा आकांत त्यांनीं खालील अभंगात मांडला आहे

तेरा दिवस झाले निश्‍चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा

पाषाणांची खोळ घेऊनि बैसलासी । काय हषीकेशी झालें तुज

तुजवरी आतां प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा

फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नाश पांडुरंगा

तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी

 

आणि जेंव्हा विठ्ठलाच्या कृपेने तेराव्या दिवशी अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्या त्यावेळी झालेला पश्चात्ताप त्यांनीं खालील अभंगात व्यक्त केला आहे.

थोर अन्याय केला । तुझा अंत म्यां पाहिला

जनाचियां बोला– । साठीं चित्त क्षोभविलें ।

भागविलासी केला सीण । अधम मी यातीहीन

झांकूनि लोचन । दिवस तेरा राहिलों ।

अवघें घालूनियां कोडें । तहानभुकेचें सांकडे

योगक्षेम पुढें । तुज करणें लागलें ।

उदकीं राखिले कागद । चुकविला जनवाद

तुका म्हणे ब्रीद । साच केलें आपुलें

 

संसारात इतक्या विपत्ति आल्या तरी ‘जे होते ते बऱ्यासाठीच’, या विचाराने ते लिहितात-

बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली

अनुतापें तुझें राहिलें चितन । झाला हा वमन संवसार

बरें झालें देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्यें

बरें झालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ठोरें गुरे

बरें झालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा

बरें झालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं

तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण

 ____________________

 तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरूची फक्त ओझरतीच भेट झाली. राघवचैतन्य केशवचेतन्य- बाबाजी असे त्यांच्या गुरूंचे नांव असल्याचे तुकाराम महाराज सांगतात. माघ शुद्ध दशमी, गुरुवारी त्यांनीं गंगास्नानाला (इंद्रायणी) जातांना आपल्याला अचानक ‘सापडविले’, आपल्या डोक्यावर हात ठेवला, आणि ‘रामकृष्ण हरि’ हा मंत्र दिला, असे ते सांगतात. पण गुरूंची काही सेवा घडली नाही म्हणून ते खंत पण व्यक्त करतात.

babaji chaitanya

 सद्गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडलीं सेवा कांहीं

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर

राघवचैतन्य केशवचेतन्य । सांगितली खूण माळिकेची

बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि

माघ शुद्ध दशमी पाहूनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे


रामकृष्ण हरि या नांवाचा आधीच त्यांना छंद लागला होता, आणि गुरूंनी तोच त्यांच्या आवडीचा मंत्र त्यांना सांगितला. त्यांना कुठे गुहेत जावे लागले नाही, की तप करावे लागले नाही, हेही त्यांनीं सांगितले आहे.

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंफा कांहीं कोठें

जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे

तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग


मागील एका लेखात जसे आपण बघितले होते, तोच अभंग इथे पुन्हा उद्धृत करीत आहोत, ज्याच्यात त्यांनीं नामदेवांनी आपल्याला त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्याबद्दल स्वप्नात येऊन सांगितल्याचा उल्लेख आहे.

नामदेवें केलें स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगे येऊनियां

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये

शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन

नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे

संत तुकारामांची अभंग संपदा एवढी मोठी आहे, आणि एवढी रसाळ आहे, की त्यातून निवड करणे शक्य नाही. तरी आपण त्यातील काही मुख्य मुख्य अभंग येत्या काही लेखांत पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

 

 

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-2 Sant Tukaram abhang-2

vithal rukmini

Sant Tukaram abhang-2

संत तुकारामांचे अभंग-2

संत तुकारामांचे अभंग आपण बघत आहोत. लौकिक अर्थाने संत तुकारामांचे जीवन हे कष्टाने भरलेले होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय जो सावकारीचा होता, तो त्यांनी आपली ऋणकोंची कर्जें माफ करून संपवून टाकला होता. संसारात त्यांचे चित्त लागत नव्हते. त्यात दुष्काळ पडला. बायको मुलांना खायला घालायची पण पंचाईत. संसारात मन लागत नव्हते आणि ईश्वरप्राप्ती अजून झाली नव्हती, अशा विमनस्क अवस्थेत, आपल्या आराध्य दैवताला- पंढरीच्या पांडुरंगाला आळवणे एवढेच त्यांना सुचत होते

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ

मग हे दृष्टि गेली वरी आलें पडळ

तिमिर कोंदलेंसे वाढे वाढतां प्रबळ

भीत मी झालों देवा काय ज्याल्याचें फळ ।

आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा

शरण मी आलों तुज निवारूनियां पापा

अंजन लेववूनी करीं मारग सोपा

जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ।

होतसे खेद चित्ता कांहीं नाठवे विचार

जात होतों जनामागें तो हि सांडिला आधार

हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार

फिरली माझीं मज कोणी न देती आधार ।

जोंबरी चळण गा तोंवरी म्हणती माझा

मानिती लहान थोर देहसुखाचिया काजा

इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा

कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ।

गुंतलो या संवसारें केसा झालोंसें अंध

मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध

स्वहित न दिसेचि केला आपुला वध

लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ।

लागती चालतां गा गुणदोषांच्या ठेंसा

सांडिली वाट मग झालों निराळा कैसा

पाहातों वास तुझी थोर करूनी आशा

तुका म्हणे वैद्यरजा पंढरीच्या निवासा ।

यातील इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा या ओळी विशेषतः ज्यांचे वय झाले आहे, एक एक अवयव साथ सोडत आहेत, त्यांच्या मनाला भिडतील अशा आहेत- “इंद्रियें मावळली” ही शब्दरचना किती प्रभावी आहे! आणि “आला बागुल आजा”- लहानपणी आई ज्या बागुलबुवाची भीती दाखवायची तो आता वृद्धपणी दिसू लागला- आणि कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा तरुणपणी निरोगी आणि देखणा असणारा देह म्हातारपणी किती वेगळा आणि कुरूप दिसू लागला! तरुणपणी संसारात गुंतल्याने, मी आणि माझे या माया, तृष्णेच्या जाळ्यात गुंतल्याने देवाकडे चित्त लागले नाही- स्वहित साधण्याची आठवण राहिली नाही- म्हणून आता पंढरीच्या  वैद्याचा धावा करीत आहे.

वरील अभंगातील वर्णन हे आपल्यासारख्या संसारी माणसाचे वर्णन करण्यासाठी केले असावे. कारण तुकाराम महाराज तर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.


जेंव्हा पांडुरंगाची कृपा झाली, त्याने आपली भक्ति दिली, तेंव्हा भक्तिरसात न्हाऊन त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-

आजी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे

विठोबाचीं वेडी आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचूं वाहूं टाळी रंजवूं गोविंदा

सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तों आमचें कवतुक


आहा आहा रे भाई ।

खालील काही अभंग -आहा आहा रे भाई । असे म्हणून खूप मोलाचा उपदेश केला आहे-

आहा आहा रे भाई ।

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ।

पराविया नारी माउलीसमान । परधनीं बाटों नेदीं मन

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ।

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें आले हो सांगतों ।

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर

पुण्य तें असे गातां नाचतां फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ।

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ।

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी

पुढती पुढती अधिक गोडी । भरूनि कळस भजन आवडी

केशवदास नटतसे ।

वरील अभंगात विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी पंथाची तत्वें सांगितली आहेत- अभिमान जिंका, देवाच्या भक्तिमध्ये लज्जा आणि मान ठेवू नका, पर नारीला माऊलीसमान माना, परधनाची आशा धरू नका ( ह्या दोन तत्वांची आज समाजाला किती आवश्यकता आहे!), सोमवार आणि एकादशी व्रत करा, (वारकऱ्यांची ही ओळख आहे).


यापुढील एक रचना अगदी रोखठोकपणे समजातील अप प्रवृत्तींवर प्रहार करणारी आहे-

आहा आहा रे भाई ।

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वायां बाहेरी

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा

विद्याबळें वाद करूनियां छळी । आणिकांसी फळी मांडोनियां

गांवींचिया देवा नाही दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना

सदा सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नींही गोविंदा आठवीना

खाचेमध्यें धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं

तुका म्हणे नटें दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावे

 बाईलेचा दास- पितरांस उदास- जन्मदात्या आई वडिलांच्या उपकारांची जाणीव न ठेवणे- हे प्रत्येक पिढीत वाढत चालले आहे. ‘दान’ देण्याची दानत कोणामध्ये राहिली नाही- प्रत्येकजण फक्त घेण्याचेच बघतो..

 ________________

या उलट यापुढील रचनेत, जे लोक देवाला आळवतात, माता पित्यांची सेवा करतात, इतरांचे सुख दुःख जाणतात अशा परोपकारी जनांना मनापासून नमन करतात-

आहा आहा रे भाई ।

नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती बोळवित त्यांसी नमो

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरूचें त्या

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे

नमो तयां जाणे आणिकांचें सुखदु:ख । राखे तहान भूक तया नमो

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी

तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे


यापुढील रचनेत गंगा, पिंपळ, तुळशी, रुद्राक्ष इत्यादि पवित्र वस्तूंचे महत्व सांगतात.

आहा आहा रे भाई ।

 गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ

तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ।

गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्‍वरू

झाड नव्हे कल्पतरु । कामधेनु गाय न म्हणावी ।

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी

तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ।

तुकाराम महाराज, आपले चरित्र काही अभंगांमधून अगदी वास्तव रीतीने वर्णन करतात, असे काही अभंग आपण पुढील भागात पाहणार आहोत.

 

माधव भोपे

 

संत तुकारामांचे अभंग-1 Sant Tukaram abhang-1

tukaram-3

Sant Tukaram abhang-1

संत तुकारामांचे अभंग-1

महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांबद्दल माहिती करून घेतांना, सुरुवातीच्या १० भागांमध्ये आपण १३ व्या शतकातील संत नामदेव यांच्या अभंग संपदेतील काही अभंगांची माहिती घेतली.

येत्या काही भागांमध्ये आपण १६ व्या आणि १७ व्या शतकातील, थोर संत कवि तुकाराम महाराज यांच्या रसाळ अभंगांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील संतांचे अभंग आणि रचना इथल्या प्रत्येक स्त्री पुरुष लहान थोर यांच्या रक्तातच भिनले आहेत असे म्हटले तरी चालेल, इतके ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहेत. वारकऱ्यांच्या तोंडात तर संत तुकारामांचे अभंग सतत असतात, कीर्तनकारांच्या कीर्तनातही संत तुकारामांच्या अभंगांशिवाय पान हलत नाही. आणि घरोघरी संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकाराम यांचे हरिपाठाचे अभंग हे नित्य म्हटल्या जाणाऱ्यापैकी आहेत.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची

ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंतांची

संत तुकारामांच्या अभंगांची शब्दरचना अत्यंत प्रभावकारी आणि प्रत्ययकारी आहे. त्यांचे अभंग हे त्यांच्या अनुभवातून आपोआप उमटलेले शब्द आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक रचना ही सरळ मनाला भिडते.

संत नामदेवांचे राहिलेले कार्य त्यांनी आपल्याकडून करून घेतले आहे, अशी तुकाराम महाराजांची धारणा होती.

नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले. देवाचे वर्णन करणारे  कवित्व करावे, उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले,  व तू अभंगाचे माप पुरपूर टाक, असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की,”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”

भागवत धर्माचा, वारकरी पंथाच्या इमारतीचा पाया ज्ञानदेवांनी रचला, आणि संत तुकाराम हे त्या इमारतीचे कळस झाले, असे संत बहिणाबाई म्हणून गेली आहे.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

 

संत तुकारामांच्या काळी, महाराष्ट्रात मोगल आणि इतर आक्रमकांचा धुमाकूळ सुरू होता. प्रजेला कोणी वाली उरले नव्हते. लोकांमध्ये अंधश्रद्धा बोकाळली होती. अशा वेळी, जनजागृती करण्याचे आणि अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे कामही संत तुकारामांनी केले. त्याच वेळी छत्रपति शिवाजी महाराजांचा उदय झाला. संत तुकारामांची आणि शिवाजी महाराजांची भेट प्रसिद्ध आहे.

 

संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहतांना आपण सुरूवातीला त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले काही अत्यंत प्रसिद्ध अभंग पाहणार आहोत.

 

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां

तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें

 

 

अत्यंत कमी शब्दात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणणारा हा अभंग हा वारकऱ्यांच्या, कीर्तनकारांच्या अत्यंत आवडीचा आहे.


 

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती

मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळही

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो

सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं

आपल्या विठ्ठलाचे सौंदर्य वर्णन करतांना तुकाराम महाराज त्याला ‘राजस सुकुमार- मदनाचा पुतळा-‘ अशी उपमा देतात. त्याच्यासमोर चंद्र आणि सूर्य यांचे तेज लोप पावते. ‘कासे सोनसळा- कंबरेला सोनेरी पितांबर आणि- पांघरे पाटोळा (पाटोळा म्हणजे पांघरायचे वस्त्र) असा हा घननीळ- मेघासारखा निळा रंग असलेला माझा विठ्ठल पाहण्यासाठी मला धीर निघत नाही.- याठिकाणी तुकाराम महाराज स्वतःला गोपीच्या स्वरूपात पाहतात- आणि म्हणतात- सकळही तुम्ही व्हा गे एकसवा- तुम्ही सगळ्या एका बाजूला व्हा- आणि मला माझ्या घन नीळाला पाहू द्या.

 

खेळिया

 

मागे संत नामदेवांचे अभंग पाहतांना आपण नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें । जीव-शिव नांव पावलें रे

आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

या अभंगात संत नामदेवांनी संसार हा खेळ समजून कसा खेळायचा ते सांगितले आहे ते पाहिले होते आणि त्यात त्यांनी सहजरित्या अद्वैत सिद्धांत सांगितला होता.

संत तुकाराम सुद्धा त्यांच्या पर्यन्त होऊन गेलेल्या संतांची महति सांगतांना, हा खेळ त्याच्या नियमानुसार जो खेळेल तोच ‘उतरेल’ असे सांगतात. सगळीकडे एकत्व पाहिल्यास तुझ्यावर ‘डाव’ येणार नाही. द्वैतबुद्धि ठेवली, तर फसगत होईल. त्रिगुणांच्या फेऱ्यात सापडला तर दुःखी होशील, पण ‘या चौघांची’ म्हणजे चार वेदांची आज्ञा पाळशील तर दुःखी होणार नाहीस असे सांगतात.

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोघांची तरी धरीं सोई रे

 

खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयांची घाई रे ।

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे

 

या खेळात गुंतायचे नाही- निराळेच राहायचे- खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा- नामदेव या शिंप्याच्या पोराने विठ्ठल ‘बसवंत’ केला- तो खेळात नाही अडकला.

 

आपुल्या संवगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे

एक घाई खेळतां तो न चुकेचि कोठें । तया संत जन मानवले रे ।

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे

कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे

सकळिकां मिळोनी एकचि घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायी रे ।

रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे

पांचा संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे

ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनी । तो ही खेळिया निवडिला रे ।

ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे

जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे

एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ।

 

ब्राह्मणाचा पोर- म्हणजे एकनाथ- याने आपले गुरू -जनार्दन यांना ‘बसवंत’ केले- आदर्श मानले आणि गुरूंच्या उपदेशामुळे, ते स्वतःच ‘बसवंत’ झाले.

आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे

तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे

एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ।

 


 

आणि खालील अभंगात- भीमातीरि विठ्ठलाच्या आनंदात नाचणाऱ्या वैष्णवांच्या आनंद सोहळ्याचे अप्रतिम वर्णन केले आहे. हा अभंग स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतानी अजूनच विलोभनीय केला आहे-

 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे

क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे

कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।

लुब्धली नादीं लागली समाधि । मूढ जन नर नारी लोकां रे

पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।

वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणीं जाती रे

निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

वरील ओळी ऐकून अक्षरशः अंगावर शहारा येतो- मातले हे वैष्णव वीर रे! काय शब्दरचना आहे!

संत तुकारामांचे ‘तुकाराम गाथा’ या स्वरूपात जवळ जवळ ४५८३ अभंग आहेत. सगळ्या अभंगांचा अभ्यास करायचा म्हटले तर अक्खा जन्म सुद्धा कमी पडेल. आपण येत्या काही लेखांत, आचार्य विनोबा भावे यांनी निवडलेले काही अभंग आणि इतर काही अभंग पाहणार आहोत.

 

 

माधव भोपे